चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ मार्च २०२०

Date : 16 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
मध्य प्रदेशात आज शक्तिपरीक्षा : 
  • विधानसभेतील अभिभाषणानंतर सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडावा, असे निर्देश मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना दिले आहेत. मात्र, ठरावाबाबत सोमवारीच निर्णय घेऊ, असे विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोमवारी कमलनाथ सरकारची शक्तिपरीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम असून, नवा सत्तासंघर्ष सुरू झाला आहे.

  • काँग्रेसच्या २२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे पाठवले आहेत. या आमदारांनी आपल्याकडेही १० मार्चला स्वतंत्र पत्रे पाठवली असून, सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडावा़, असे निर्देश राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना शनिवारी रात्री दिले.

  • दुसरीकडे, विश्वासदर्शक ठराव मांडण्यास परवानगी द्यायची की नाही, याबाबतचा निर्णय सोमवारीच जाहीर करण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्ष एन. पी. प्रजापती यांनी रविवारी सांगितले. मध्यप्रदेश विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. सभागृहाचे कामकाज चालविणे हा अध्यक्षांचा विशेषाधिकार असल्याचे एका मंत्र्याने सांगितले. बंडखोर आमदारांपैकी काहींना परत आणण्यासाठी काँग्रेस आणखी काही वेळ घेईल आणि सोमवारची बहुमत चाचणी टाळेल, असे संकेत कायदामंत्री पी.सी. शर्मा यांनी दिले. हे प्रकरण न्यायालयात जाऊ शकते, असे काँग्रेसच्या एका आमदाराने सांगितले.

करोना आणीबाणी निधीचा भारताचा ‘सार्क’पुढे प्रस्ताव : 
  • करोना विषाणूच्या महासाथीशी लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार सार्क देशांनी रविवारी केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘आणीबाणी निधी’चा प्रस्ताव सार्क देशांपुढे मांडला आणि या निधीत भारत एक कोटी डॉलर्सचे योगदान देईल, अशी घोषणा केली.

  • करोना आपत्तीशी स्वतंत्रपणे न लढता सार्क देशांनी एकत्र यावे, असे आवाहन मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. घाबरू नका, सज्ज राहा, गोंधळ नको, सहकार्य करा, असे आवाहन मोदी यांनी केले.

  • सार्क देशांच्या प्रमुखांच्या या विशेष संवादात मोदी यांच्याव्यतिरिक्त श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबया राजपक्ष, मालदिवचे अध्यक्ष इब्राहिम मोहंमद सोली, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली, भूतानचे दूत लोटय तेशरिंग, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना, अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी आणि पाकिस्तानचे आरोग्यमंत्री जफर मिर्झा या परिषदेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले.

  • पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या बहुतेक सर्व सूचनांचे सार्क देशांच्या प्रमुखांनी स्वागत केले आणि सहकार्याची ग्वाही दिली.

  • आम्ही डॉक्टर आणि तज्ज्ञांचा समावेश असलेले आणि करोना चाचणीच्या उपकरणांनी सुसज्ज असलेले ‘शीघ्र प्रतिसाद पथक’ स्थापन करीत असल्याचे मोदी यांनी सांगितले.

MPSC च्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित, करोनामुळे राज्य सरकारचा निर्णय : 
  • करोना या साथीच्या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठीच्या Epidemic Act,1897 या कायद्याची अमलबजावणी राज्यात करण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर राज्यातील MPSC च्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत स्थगित करण्याच्या सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्यात आल्या आहेत.

  • राज्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी तसे पत्र राज्य लोकसेवा आयोगाला पाठवले आहे. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, “राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, १८९७ दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना व नियमावली निर्गमित करण्यात आलेली आहे.”

  • राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवलेले पत्र. या पत्रात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला स्पष्ट सांगण्यात आले आहे की, “करोना विषाणूचा राज्यातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून कोणत्याही कारणास्तव होणाऱ्या गर्दीस प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे ३१ मार्च २०२० पर्यंत आपल्या स्तरावरून घेण्यात येणाऱ्या विविध परिक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. अशा सूचना आपणास सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने देण्यात येत आहेत. तरी त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.”

बॉक्सिंगमधून भारताला तीन ते चार ऑलिम्पिक पदकांची खात्री : 
  • भारतीय बॉक्सिंग गेल्या काही महिन्यांपासून एक वेगळीच उंची गाठत आहे. देशाला बॉक्सिंग या खेळाकडून आता अपेक्षा वाढू लागल्या आहेत. जॉर्डन येथील आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी टोक्यो ऑलिम्पिकच्या नऊ जागा निश्चित करून ऐतिहासिक कामगिरी केली. यापुढेही हा आकडा वाढत जाणार आहे. त्यामुळे बॉक्सिंग या खेळातून देशाला टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तीन ते चार पदके हमखास मिळतील, असा विश्वास भारतीय बॉक्सिंग महासंघाचे महासचिव जय कवळी यांनी व्यक्त केला. भारतीय बॉक्सर्सच्या कामगिरीविषयी आणि ऑलिम्पिकमधील योजनांविषयी त्यांच्याशी केलेली ही बातचीत –

  • * भारताच्या तब्बल नऊ बॉक्सर्सनी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान निश्चित केले. या ऐतिहासिक यशाबद्दल काय सांगाल?

  • भारतीय बॉक्सिंग सक्षम झाल्याचे हे द्योतक आहे. हे यश गेल्या २-३ वर्षांतील नाही. गेल्या दीड-दोन दशकांमध्ये तळागाळातील बॉक्सिंगला यशोशिखरावर नेण्यासाठी जिवापाड मेहनत करणाऱ्या मंडळींचे हे यश आहे. मेरी कोम, विकास कृष्णन, सतीश कुमार हे आमचे अनुभवी बॉक्सर घडविण्यात या मंडळींचा मोठा वाटा आहे. भारतीय बॉक्सर्सनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. याआधी २०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे तब्बल ८ खेळाडू सहभागी झाले होते. त्यानंतर आता नऊ बॉक्सर्सनी ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळवून देशाचा नावलौकिक उंचावला आहे.

टोकियो ऑलिम्पिक वेळापत्रकानुसारच होणार - पंतप्रधान शिंजो आबे यांचा निर्धार : 
  • करोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतामध्येही अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून अनेक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र जपान ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन ठरलेल्या वेळापत्रकानुसारच पार पडेल असा निर्धार व्यक्त केला आहे.

  • करोनामुळे जगभरात आतापर्यंत अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या मतानुसार ही परिस्थिती फारशी गंभीर नाही. ऑलिम्पिकचं आयोजन हे ठरलेल्या वेळेनुसारच होईल असं आबे यांनी स्पष्ट केलं आहे.

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ऑलिम्पिकचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकलावं अशी मागणी केली होती, मात्र ऑलिम्पिक समिती सदस्यांशी चर्चा केल्यानंतरच यावर निर्णय घेतला जाईल असं शिंजो आबे यांनी स्पष्ट केलंय.

१६ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.