चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ नोव्हेंबर २०१९

Updated On : Nov 16, 2019 | Category : Current Affairsराज्यात १२ हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन :
 • राज्यात १२ हजार शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामधील पहिल्या टप्प्यात राज्यातील विविध ठिकाणच्या खासगी शाळांमधील मुलाखतीद्वारे होणारी शिक्षक भरती आता डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे उमेदवारांना आणखी एका महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 • शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी विविध अडथळे पार करावे लागले. शिक्षक भरतीसाठी नियुक्त्या देण्यासाठी पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. ९ ऑगस्टला अभियोग्यताधारकांची मुलाखतीशिवाय यादी प्रसिद्ध झाली होती. त्यातून निवड झालेल्या अभियोग्यताधारकांच्या नियुक्त्या जिल्हा परिषद व काही संस्थांमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या यादीची प्रतीक्षा अभियोग्यता लागून राहिली होती.

 • राज्य शासनाकडून पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी ८७ हजार उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे. विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या भरती प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय शिक्षक भरती करण्याबाबत उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

 • पहिल्या यादीत निवड न झालेल्या व दुसऱ्या निवड यादीला पात्र असलेल्या अभियोग्यताधारकांचा विचार होणार आहे. यात ५ हजार ८२२ उमेदवारांचा समावेश करण्यात आला होता. या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करून शाळांमधील नियुक्तीपत्रे देण्यात आलेली आहेत.

बरीमाला वादात सरकारने मतभेदाची बाजू जाणून घ्यावी :
 • शबरीमाला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ३-२ बहुमताने जो निकाल दिला त्यामधील मतभेदाची अत्यंत महत्त्वाची बाजू सरकारने जाणून घ्यावी, असे न्या. आर. एफ. नरिमन यांनी शुक्रवारी येथे सांगितले. न्या. नरिमन यांनी स्वत:च्या आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या वतीने गुरुवारी मतभेद असलेला आदेश दिला.

 • शबरीमालाप्रकरणी मतभेद असलेला देण्यात आलेला निकाल कृपया सरकारला जाणून घेण्यास सांगावे, कारण तोही तितकाच महत्त्वाचा आहे, असे न्या. नरिमन यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना सांगितले.

 • शबरीमाला प्रकरणाची पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर सुनावणी झाली, न्या. नरिमन आणि न्या. चंद्रचूड हे त्या पीठातील सदस्य होते. बहुमताच्या निकालाबाबत त्यांनी आपले मतभेद नोंदविले. शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालाचा फेरविचार करावा यासाठी करण्यात आलेली याचिका त्यांनी फेटाळली.

बदलत्या जगात वेगवान परराष्ट्र धोरण आवश्यक : 
 • जागतिक व्यासपीठावर भारताने खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित असताना  भारतीय परराष्ट्र धोरणाला सिद्धातांशी बांधून ठेवणे शक्य नाही. वेगाने बदलणाऱ्या जगात हे धोरण वेगवानच असले पाहिजे, असे मत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केले.

 • ‘बियाँड द दिल्ली डोगमा : इंडियन फॉरेन पॉलिसी इन चेंजिंग वर्ल्ड’ या विषयावर दी इंडियन एक्स्प्रेस समूहाने आयोजित केलेल्या चौथ्या रामनाथ गोएंका स्मृती व्याख्याना मालेत ते बोलत होते.

 • सध्या आपण बदलाच्या एका टोकावर आहोत. अधिक आत्मविश्वासाने ध्येयांचा पाठलाग करावा लागतो आणि विरोधाभासांनाही तोंड द्यावे लागते. जोखीम पत्करल्यानेच महत्त्वाकांक्षा पूर्ण होतात, असेही जयशंकर यांनी सांगितले.

भारताला नियोजित वेळेत ‘एस-४००’ क्षेपणास्त्रे देणार- पुतिन : 
 • भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० क्षेपणास्त्रे भारताला नियोजित वेळेत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. भारत आणि रशियामध्ये करण्यात आलेल्या याबाबतच्या कराराविरुद्ध अमेरिकेने इशारा दिला आहे.

 • भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी एस-४०० ही ट्रम्फ क्षेपणास्त्रे संपादित करण्याची इच्छा असल्याचे भारताने २०१५ मध्येच जाहीर केले होते. पुतिन गेल्या वर्षी भारतात आले होते तेव्हा त्याबाबतचा ५.४३ अब्ज डॉलरचा करार करण्यात आला होता. एस-४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा योजनेनुसारच केला जाईल, असे पुतिन यांनी येथे ११ व्या ब्रिक्स परिषदेनंतर सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात ब्रिक्स परिषदेच्या वेळी द्विपक्षीय चर्चा झाली.

 • रशियासमवेतच्या एस-४०० कराराला अमेरिकेने विरोध दर्शविला असून रशियाकडून शस्त्रे आणि लष्करी सामग्री घेणाऱ्या देशांवर र्निबध घालण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने दिला आहे.

गौतम नवलखा यांना २ डिसेंबपर्यंत अटकेपासून संरक्षण : 
 • शहरी नक्षलवादाप्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांना उच्च न्यायालयाने अटकेपासून २ डिसेंबपर्यंत अंतरिम दिलासा दिला. तसेच २ डिसेंबर रोजी नवलखा आणि या प्रकरणातील सहआरोपी आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनासाठीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

 • पुणे सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर नवलखा यांनी अटकेपासून दिलासा मिळवण्यासाठी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी याचिकेवर झालेल्या सुनावणीच्या वेळी नवलखा यांच्यासह तेलतुंबडे यांनीही अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या याचिकेवर २ डिसेंबर रोजी सुनावणी घेण्याचे न्यायालयाने निश्चित केले.

 • नवलखा यांच्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवापर्यंत तहकूब करताना न्यायालयाने त्यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यामुळे याचिकेवरील पुढील सुनावणीपर्यंत नवलखा यांना अटकेपासून अंतरिम संरक्षणही द्यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांतर्फे करण्यात आली.

दिनविशेष :
 • आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन

महत्वाच्या घटना 

 • १८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता हेलिऑस वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.

 • १८९३: डॉ. अ‍ॅनी बेझंट यांचे भारतात आगमन.

 • १९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.

 • १९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह सुरू झाली.

 • १९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्‍नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.

 • १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.

 • १९९६: कोकण रेल्वेच्या रत्‍नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.

 • १९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधील ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.

 • २०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्‍च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.

जन्म 

 • १८९४: केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी काव्यविहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७५)

 • १८९७: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)

 • १९०९: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९८२)

 • १९१७: संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९९१)

 • १९२७: मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार डॉ. श्रीराम लागू यांचा जन्म.

 • १९२८: मराठी संत साहित्यातील विद्वान डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००६)

 • १९३०: इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९९७)

 • १९६३: अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री यांचा जन्म.

 • १९६८: भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०१४)

 • १९७३: बॅडमिंटनपटू पुल्लेला गोपीचंद यांचा जन्म.

मृत्यू 

 • १९१५: गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले.

 • १९४७: व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७७)

 • १९५०: अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चे एक संस्थापक डॉ. बॉब स्मिथ यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७९)

 • १९६०: अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९०१)

 • १९६७: संगीतकार रोशनलाल नागरथ ऊर्फ रोशन यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १९१७)

 • २००६: नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९१२)

 • २०१५: प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.

 

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)