चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ ऑक्टोबर २०१९

Date : 16 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दृष्टीहिन IAS अधिकारी प्रांजल पाटील तिरुअनंतपुरमची उपजिल्हाधिकारी :
  • थिरुवनंतपुरम : क्लास इज परमनंट...नाणं खणखणीत असलं की ते कुठेही असलं तरी वाजल्याशिवाय राहत नाहीच. असंच घडलंय उल्हासनगरच्या प्रांजल पाटीलच्या बाबतीत. देशातील पहिली दृष्टीहिन महिला आयएएस अधिकारी प्रांजल पाटीलने सोमवारी (14 ऑक्टोबर) तिरुवनंतपुरममध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. महाराष्ट्रातील उल्हासनगरमधील असलेली प्रांजल हे केरळ कॅडरमध्ये नियुक्त होणारी पहिली दृष्टीहिन आयएएस अधिकारी ठरली आहे.

  • प्रांजल पाटीलची दृष्टी जन्मापासून कमकुवत होती, पण वयाच्या सातव्या वर्षी तिची दृष्टी पूर्णत: गेली. परंतु ती खचली नाही, आयुष्यात काहीतरी करायचं आहे, हा निश्चय करुन ती वाटचाल करत राहिली.

  • आपल्या पहिल्या प्रयत्नातच प्रांजलने यूपीएससी परीक्षेत 773 वं स्थान मिळवलं होतं. 30 वर्षीय प्रांजलने 2017 मध्ये आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करत 124वं स्थान मिळवलं. मग प्रशिक्षणानंतर प्रांजलने 2017 मध्ये केरळच्या एर्नाकुलममध्ये असिस्टट कलेक्ट र म्हणून आपल्या प्रशासकीय कारकीर्दीची सुरुवात केली.

  • पदवीचं शिक्षण घेताना प्रांजलने पहिल्यांदा यूपीएससीबाबत वाचलं. यानंतर तिने यूपीएससी परीक्षेसंदर्भात माहिती मिळवण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच तिने आयएस अधिकारी बनण्याचं निश्चित केलं. बीए केल्यानंतर ती दिल्लीत गेली आणि जवाहरलाल नेहरु विद्यापीठातून एमए पूर्ण केलं.

दहावी, बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर :
  • दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक मंगळवारी जाहीर करण्यात आलं. १८ फेब्रुवारी २०२० पासून बारावीच्या तर ३ मार्चपासून दहावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध करून दिलं आहे.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडणार आहेत. तर ३ मार्च ते २३ मार्च दरम्यान, दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्याच्या हेतूनं आणि अभ्यासाच्या नियोजनाच्या दृष्टीने यावेळी वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आल्याचं शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच हे संभाव्य वेळापत्रक असून परीक्षेपूर्वी महाविद्यालयं आणि शाळांमध्ये पाठवण्यात येणारं परीक्षेचं वेळापत्रकच अंतिम मानण्यात येणार असल्याचंही मंडळाकडून सागंण्यात आलं.

  • प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचं वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल. लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत काही सुचना, हरकती असल्यास संबंधित विभागीय मंडळांकडे तसंच राज्य मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात, असं शिक्षण मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

हितसंबंधांच्या जोखडातून माजी क्रिकेटपटूंची मुक्तता :
  • नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू लवकरच एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या सांभाळू शकणार आहेत. कारण परस्पर हितसंबंधांचे चक्रव्यूह त्यांना भेदता येणार आहे. कारण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीने या संदर्भातील प्रस्ताव सादर केला आहे.

  • सध्या ‘बीसीसीआय’च्या घटनेनुसार कोणताही क्रिकेटपटू एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडू शकत नाही. त्यामुळे भावी अध्यक्ष सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कपिल देव यांनाही हितसंबंधांच्या नियमाचा फटका बसला.

  • प्रशासकीय समितीने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात ११वा स्थिती अहवाल सादर केला. यात ‘बीसीसीआय’च्या घटनेमधील कलम क्रमांक ३८मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. ही सूचना मान्य झाल्यास ‘बीसीसीआय’ किंवा राज्य संघटनांशी दोन वर्षांहून कमी कालावधीचा करारबद्ध खेळाडूंना अनेक जबाबदाऱ्या सांभाळता येऊ शकतील.

नोबेल विजेत्या अभिजीत बॅनर्जींची नाळ मराठी मातीशी :
  • ‘जागतिक दारिद्रय़ निमूर्लनासाठी प्रायोगिक दृष्टिकोन’ या विषयावरील संशोधनासाठी भारतीय वंशाचे अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी, त्यांच्या पत्नी एस्तेर डफलो आणि मायकेल क्रेमर यांना यंदाचे अर्थशास्त्राचे नोबेल सोमवारी जाहीर झाले. आपल्या मुलाला नोबेल मिळाल्याबद्दल अभिजित यांची आई प्राध्यापक निर्मला बॅनर्जी यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच वेळी त्यांनी अभिजित यांची नाळ मराठीशी जुळली असल्याचेही सांगितले.

  • अभिजित बॅनर्जी यांचा जन्म मुंबईत १९६१ मध्ये झाला. अभिजित यांची आई म्हणजेच निर्मला बॅनर्जी या मूळच्या मुंबईकर आहेत. निर्मला यांचे माहेरचे अडनाव पाटणकर. मुंबईमध्येच लहानाच्या मोठ्या झालेल्या निर्मला यांचे अर्थशास्त्रातील पदवीचे शिक्षण एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये झाले.

  • अभिजित यांना नोबेल मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना निर्माला यांनी बीबीसीकडे आपली प्रतिक्रिया नोंदवली. सध्या कोलकात्यामध्ये राहणाऱ्या निर्मला यांनी लंडनला गेल्यानंतर माझा मुंबईशी संपर्क कमी झाल्याची खंत व्यक्त केली. ‘लंडनला रहायला गेल्यामुळे माझा माहेरशी म्हणजेच मुंबईशी संपर्क कमी झाला. मी सध्या कोलकात्यामध्ये राहते. मुंबईत कोणी नातेवाई नसल्याने तिकडे फारसं येणं होतं नाही,’ असं निर्मला सांगतात.

  • अभिजित यांना मराठी येते का असा प्रश्न निर्मला यांना विचरला असता त्यांनी ‘अभिजितला मराठी बऱ्याच प्रमाणत समजतं पण त्याला मराठी बोलता येत नाही. मीच लग्नानंतर कोलकात्याला आल्यावर बंगाली भाषेत लिहायला आणि बोलायला शिकले,’ असं सांगितलं.

मार्गारेट अ‍ॅटवूड, बर्नार्डिन एव्हरिस्टो यांना बुकर पुरस्कार :
  • लंडन : इंग्रजी साहित्यविश्वात मानाच्या ओळखल्या जाणाऱ्या बुकर पुरस्काराच्या निवडीसाठी यंदा सर्वाधिक चुरस झाली. परीक्षक मंडळाने अंतिम निकालाच्या दिवशी पाच तासांहून अधिक काळ चर्चा करीत नियमांना बगल देऊन अखेर कॅनेडियन लेखिका मार्गारेट अ‍ॅटवूड आणि आफ्रो-ब्रिटिश लेखिका बर्नार्डिन एव्हरिस्टो यांच्या पुस्तकांना संयुक्तपणे पुरस्कार जाहीर केला.

  • दोघींचे नाव पुकारण्यात आल्यानंतर त्या हातात हात घालूनच पुरस्कार स्वीकारण्यासाठी सामोऱ्या गेल्या. अ‍ॅटवूड म्हणाल्या की, हा पुरस्कार मला एकटीलाच मिळाला असता तर जरा अडचणीचे वाटले असते, पण आता माझ्याबरोबर एव्हरिस्टो याही आहेत. १९९२ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली असताना पुरस्काराचे नियम बदलून दोन जणांना एकाचवेळी पुरस्कार द्यायचा नाही असे ठरले होते, पण यावेळी पाच तासांच्या चर्चेनंतर परीक्षक समितीचे प्रमुख पीटर फ्लॉरेन्स यांनी आम्ही हा नियम बदलत आहोत असे जाहीर करून दोघींना पुरस्कार जाहीर केला.

  • एव्हरिस्टो यांनी सांगितले की,‘आता माझे साहित्य बऱ्याच  मोठय़ा समुदायापर्यंत पोहोचणार आहे. कृष्णवर्णीय महिलेला हा पुरस्कार प्रथमच मिळाला आहे, इतर कुणाला या पुरस्काराचे कदाचित अप्रुप वाटणारही नाही पण माझ्यासाठी ते आहे.आणखी कृष्णवर्णीय महिलांनी हा पुरस्कार मिळवावा अशी अपेक्षा आहे.’

अयोध्या: राम मंदिर प्रकरणी आज सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता :
  • अयोध्येतील राम मंदिर प्रकरणी आज (बुधवार) सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याबाबत मंगळवारी संकेत दिले.

  • मंगळवारी अयोध्या प्रकरणी सुनावणीचा ३९ वा दिवस होता. तसंच सर्व पक्षकारांनी आपला युक्तीवाद बुधवारी पूर्ण करण्याचे आदेशही काल झालेल्या सुनावणीदरम्यान देण्यात आले होते. दरम्यान, या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

  • आज सर्व पक्षकार आपला युक्तीवाद पूर्ण करतील अशी आशा असल्याची माहिती हिंदू महासभेचे वकील विष्णू जैन यांनी दिली. त्यानंतर मोल्डिंग ऑफ रिलीफवर चर्चा करण्यात येईल. तसंच बुधवारीच यावर चर्चा पूर्ण झाल्यास निकाल सुरक्षित ठेवला जाईल. परंतु या सर्व बाबी न्यायालयावर अवलंबून असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दिनविशेष :
  • जागतिक भूलतज्ज्ञ दिन / जागतिक अन्न दिन

महत्वाच्या घटना 

  • १७७५: ब्रिटिश सैन्याने अमेरिकेच्या मेन राज्यातील पोर्टलँड शहर जाळले.

  • १७९३: फ्रेन्च राज्यक्रांती – फ्रान्सचा राजा सोळावा लुई याची विधवा पत्‍नी मेरी अ‍ॅंटोनिएत हिचा गिलोटीनवर वध करण्यात आला.

  • १८४६: डॉ. जॉन वॉरेन या अमेरिकन डॉक्टरने शस्त्रक्रिया करताना भूल देण्यासाठी सर्वप्रथम इथर या रसायनाचा वापर केला.

  • १८६८: डेन्मार्कने निकोबार बेटांचे सर्व हक्‍क ब्रिटिशांना विकले.

  • १९०५: भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी करण्याचा आदेश दिला.

  • १९२३: वॉल्ट डिस्‍ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्‍ने यांनी द वॉल्ट डिस्‍ने कंपनी ची स्थापना केली.

  • १९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची रावळपिंडी येथे हत्या करण्यात आली.

  • १९६८: हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान.

  • १९७३: हेन्‍री किसिंजर आणि ली डक थो यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • १९७५: बांगला देशातील रहिमा बानू ही २ वर्षांची मुलगी ही देवी रोगाचा जगातील शेवटचा रुग्ण ठरली.

  • १९७८: माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्यासाठी वांडा रुटकिविझ पहिल्या युरोपियन महिला आहे.

  • १९८४: आर्चबिशप डेसमंड टुटू यांना नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • १९९९: जागतिक व्यावसायिक बिलियर्ड्‌स, स्‍नूकर संघटनेतर्फे वर्षातील सर्वोत्कृष्ट बिलियर्ड्‌स खेळाडूसाठी दिला जाणारा फ्रेड डेव्हिस पुरस्कार भारताच्या गीत सेठीला देण्यात आला.

जन्म 

  • १८४१: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर १९०९)

  • १८४४: अल्बेनिया देशाचे पहिले पंतप्रधान इस्माईल क्यूम्ली यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९१९)

  • १८५४: आयरिश लेखक व नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर १९००)

  • १८८६: इस्राईल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन-गुरीयन  यांचा जन्म.

  • १८९०: वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक अनंत हरी गद्रे तथा समतानंद यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९६७)

  • १८९६: स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक सेठ गोविंद दास यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९७४)

  • १९०७: कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र सोपानदेव चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९८२)

  • १९२६: केबल विजन आणि एचबीओ चे संस्थापक चार्ल्स डोलन यांचा जन्म.

  • १९४८: अभिनेत्री, दिग्दर्शिका, निर्माती, भरतनाट्यम नर्तिका आणि नृत्यदिग्दर्शक हेमा मालिनी यांचा जन्म.

  • १९४९: भारतीय अभिनेते, पटकथालेखक आणि नाटककार क्रेझी मोहन यांचा जन्म.

  • १९५९: मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष अजय सरपोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून २०१०)

  • १९८२: भारतीय अभिनेते, गायक आणि निर्माता पृथ्वीराज सुकुमारन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १७९३: फ्रेन्च सम्राज्ञी मेरी आंत्वानेत यांचे निधन. (जन्म: २ नोव्हेंबर १७५५)

  • १७९९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक वीरपदिया कट्टाबोम्मन यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १७६०)

  • १९०५: आध्यात्मिक गुरू पंत महाराज बाळेकुन्द्री यांचे निधन. (जन्म: ३ सप्टेंबर १८५५)

  • १९४४: उद्योजक, प्रभाकर कंदिलचे निर्माते गुरुनाथ प्रभाकर ओगले यांचे निधन.

  • १९४८: नाटककार माधव नारायण तथा माधवराव जोशी यांचे निधन.

  • १९५०: अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक वि. गं. तथा दादासाहेब केतकर यांचे निधन.

  • १९५१: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांची भर सभेत गोळ्या घालून हत्या. (जन्म: १ ऑक्टोबर १८९५)

  • १९८१: इस्त्रायलचे परराष्ट्रमंत्री, कृषीमंत्री आणि संरक्षणमंत्री, इस्रायली सेना प्रमुख मोशे दायान यांचे निधन. (जन्म: २० मे १९१५)

  • १९९७: मराठी चित्रपटसृष्टीतील छायालेखक दत्ता गोर्ले यांचे निधन.

  • २०१३: भारतीय नाटककार गोविंद पुरुषोत्तम देशपांडे यांचे निधन.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.