चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ ऑक्टोबर २०१९

Date : 17 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अयोध्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण, १५ नोव्हेंबरपूर्वी होणार अंतिम निर्णय :
  • नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टामध्ये अयोध्या-बाबरी मशीद प्रकरणाची आज सुनावणी पूर्ण झाली. तब्बल 40 दिवस याप्रकरणी रोज सुनावणी सुरु होती, आज अंतिम सुनावणी होऊन दोन्ही पक्षांचा युक्तीवाद आज पूर्ण झाला.

  • सुनावणी सुरु होताच एका वकिलाने अधिकची मुदत मागितली असता सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आजच सुनावणी पूर्ण होईल असं सांगता वकिलाचा हस्तक्षेप फेटाळला. कोर्टात सुनावणी सुरु असता अखिल भारतीय हिंदू महासभेचे वकील विकास सिंह यांनी सादर केलेला नकाशा ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी फाडला. राजीव धवन हे मुस्लिम पक्षाचे वकील आहेत.

  • किशोर कुणाल यांच्या अयोध्या रिविजिटेड या पुस्तकातील हा राम मंदिराचा नकाशा होता. या नकाशाच्या मदतीने विकास सिंह त्यांचा मुद्दा मांडत असता नकाशा फाडण्यात आल्याने कोर्टात वादविवाद झाला. मध्यस्थ समितीकडून सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करण्यात आला.

  • हा खटला संवेदनशील असल्याने अयोध्येत कलम 144 लागू करण्यात आला आहे, तर 200 शाळा दोन महिने बंद राहणार आहेत. वृत्तवाहिन्यांवरील चर्चांवरही बंदी घालण्यात आली आहे. अयोध्या प्रकरणी 17 नोव्हेंबरपूर्वी येण्याची शक्यता आहे. 23 दिवसांनी या प्रकरणाचा अंतिम निर्णय होणार आहे. सुनावणी ज्या सरन्यायाधीसांसमोर सुरु आहे त्या खंडपीठाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे 17 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.

आशियातील सर्वात लांब ‘चेनानी-नाशरी’ बोगद्याला श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देणार :
  • केंद्र सरकारने आशियातील सर्वात लांब बोगदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘चेनानी-नाशरी’ बोगद्यास जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी गडकरी यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय महामार्ग-४४ वर तयार करण्यात आलेला या बोगद्याला आता श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव दिले जाणार आहे. ज्यांनी देशासाठी ‘एक निशान, एक विधान व एक प्रधान’ हा मंत्र दिला होता.

  • जम्मू – श्रीनगर महामार्गावरील रामबन जवळ असलेल्या चेनानी-नाशरी बोगद्याचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते २०१७ मध्ये झाले होते. तर, या बोगद्याच्या निर्मिती कार्याची सुरूवात, २३ मे २०११ रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात करण्यात आली होती.

  • २०१७ मध्ये याचे काम पूर्ण झाल्यानंतर हा आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा राष्ट्राला अर्पण करण्यात आला होता. तब्बल १ हजार २०० मीटर उंचीवर व साधारण ९.०२ किलोमीटर लांब असलेल्या या बोगद्यामुळे जम्मू आणि श्रीनगरमधील अंतर ४० किलोमीटरने कमी झाले आहे. म्हणजेच प्रवासाचा वेळ साधारण दोन तासांनी वाचत आहे.

‘दारिद्रय़ाचा दर कमी करण्यात भारताला लक्षणीय यश’ :
  • वॉशिंग्टन : दारिद्राचा दर १९९०  पासून  निम्म्यावर आणण्यात भारत  यशस्वी झाला असून आर्थिक वाढीचा दरही गेल्या पंधरा वर्षांत सात टक्कय़ांपेक्षा अधिक राखण्यात यश आले आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

  • जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्या संयुक्त वार्षिक बैठकीत असे सांगण्यात आले,की  भारताने जागतिक पातळीवर हवामान बदला विरोधातील लढय़ात पुढाकार घेतानाच  दारिद्रय़ाचे प्रमाण कमी करण्यात यश मिळवून मोठी कामगिरी केली आहे.

  • गेल्या पंधरा वर्षांत  भारताने सात  टक्क्य़ांहून अधिक विकास दर कायम राखला होता, त्याच बरोबर  १९९०  पासून दारिद्रय़ाचा दरही निम्म्यावर आणला आहे, त्यामुळे मानवी विकासाच्या पातळीवर भारताने चांगली प्रगती केली आहे.

  • भारताचा हा विकास असाच सुरू राहण्याची अपेक्षा असून दशकभरात देशातील टोकाचे दारिद्रय़  कायमचे मिटवण्यात यश येण्याची शक्यता आहे. असे असले तरी यात अनेक आव्हाने असून साधनांची कमतरता हा मोठा अडथळा ठरू शकतो. जमिनीचा वापर शहरात अतिशय परिणामकारकरीत्या करण्याची गरज आहे. त्याचबरोबर पाण्याचे व्यवस्थापन हा भारतासाठी पुढील काळात महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे,  त्यासाठी पाणीवाटपाच्या धोरणात बदल करावे लागतील.

सचिन पुन्हा मैदानात उतरतोय….चाहत्यांसाठी आनंदाची बातमी : 
  • २०१३ साली सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आजही भारतात अनेक घरांमध्ये केवळ सचिन खेळतो म्हणून क्रिकेट पाहणारे चाहते भेटतील. सचिन तेंडुलकरच्या अशाच चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सचिन तेंडुलकर वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा आणि श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन यांच्यासोबत टी-२० च्या मैदानात उतरणार आहे. आगामी वर्षात रस्ते सुरक्षाविषयक जागतिक स्पर्धेत सचिन दिग्गज खेळाडूंसह मैदानात उतरेल.

  • या स्पर्धेत भारताव्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिज या संघाचे माजी खेळाडू खेळताना दिसतील. भारतात २ ते १६ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, विरेंद्र सेहवाग, तिलकरत्ने दिलशान आणि जाँटी ऱ्होड्ससह अनेक दिग्गज माजी क्रिकेटर खेळताना दिसतील.

  • सचिननं आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ एक टी-20 सामना खेळला आहे. ४६ वर्षीय सचिन कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. २४ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये सचिननं ३४ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. यात १०० शतकांचा समावेश आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिन

महत्वाच्या घटना 

  • १८३१: मायकेल फॅरॅडे यांनी विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा (Electro Magnetic Induction) गुणधर्म प्रयोगाद्वारे सिद्ध केला.

  • १८८८: थॉमस एडिसन यांनी ऑप्टिकल फोनोग्राफ (प्रथम चित्रपट) साठी पेटंट दाखल केले.

  • १९१७: पहिले महायुद्ध – इंग्लंडने जर्मनीवर पहिला बॉम्बहल्ला केला.

  • १९५६: पहिले व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र अधिकृतपणे ईंग्लंडमध्ये सुरु झाले.

  • १९६६: बोटस्वाना आणि लेसोथो यांचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९७९: मदर तेरेसा यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला.

  • १९९४: पुणे येथील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेतर्फे (NIV) विषाणू विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बेल्लूर येथील डॉ. टी. जेकब जॉन यांना डॉ. शारदादेवी पॉल पारितोषिक जाहीर.

  • १९९६: अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांना मध्यप्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

  • १९९८: आंध्रप्रदेशात समाजसेवेचा आदर्श प्रकल्प उभारणार्‍या फातिमा बी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पुरस्कार प्रदान.

जन्म 

  • १८१७: भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते सर सय्यद अहमद खान यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १८९८)

  • १८६९: भारत गायन समाज या संस्थेचे संस्थापक गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९२२)

  • १८९२: कृषी शिरोमणी, पहिले मराठी साखर कारखानदार नारायणराव सोपानराव बोरावके यांचा जन्म. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९६८)

  • १९१७: वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोर यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९९४)

  • १९३०: अटकिन्स आहार चे निर्माते रॉबर्ट अटकिन्स  यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००३)

मृत्यू 

  • १७७२: अफगणिस्तानचे राज्यकर्ता अहमदशाह दुर्रानी (दुराणी) यांचे निधन.

  • १८८२: इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार व धर्मसुधारक दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८१४)

  • १८८७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ गुस्ताव्ह किरचॉफ यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८२४)

  • १९०६: जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी व कवी स्वामी रामतीर्थ यांनी जलसमाधी घेतली. (जन्म: २२ ऑक्टोबर १८७३)

  • १९८१: भारतीय लेखक, कवी आणि गीतकार कन्नादासन यांचे निधन. (जन्म: २४ जून १९२७)

  • १९९३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक विजयशंकर जग्नेश्वर तथा विजय भट यांचे निधन. (जन्म: १२ मे १९०७ – पालिताणा, गुजराथ)

  • २००८:  ललित लेखक रविन्द्र पिंगे यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १९२६)

  • २००८: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस चे सहसंस्थापक बेन व्हिडर यांचे निधन. (जन्म: १ फेब्रुवारी १९२३)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.