चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ फेब्रुवारी २०२०

Date : 18 February, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धा - हम्पीला विजेतेपद : 
  • जागतिक जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेचे डिसेंबरमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या कोनेरू हम्पीने केर्न्‍स चषक बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. याबरोबरच दोन महिन्यांत दुसरे विजेतेपद हम्पीला तिच्या नावे करता आले. हम्पीला त्यामुळे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरा क्रमांक मिळवता आला. कारण तिच्या खात्यात पाच गुणांची भर पडली.

  • स्पर्धेत अखेरच्या म्हणजेच नवव्या फेरीत हम्पीने भारताच्या द्रोणावल्ली हरिकाविरुद्धचा डाव बरोबरीत सोडवला. परिणामी, सहा गुणांसह हम्पीने केर्न्‍स चषकावर नाव कोरले.

  • ही स्पर्धा जिंकण्यासाठी हम्पीला अखेरच्या डावात बरोबरी म्हणजेच अर्धा गुण पुरेसा होता. त्याप्रमाणे हरिकाविरुद्ध खेळताना ३२ वर्षीय हम्पीने बरोबरी स्वीकारण्यावर भर दिला. याच स्पर्धेत विजेतेपदाची आणखी एक दावेदार विश्वविजेती वेंजून जू हिला ५.५. गुणांसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. वेंजून जू हिने रशियाच्या अलेक्झांड्रा कोस्टेनियूकविरुद्ध विजय मिळवला. कोस्टेनियूकला स्पर्धेत चौथे स्थान मिळाले. भारताच्या हरिकाला ४.५ गुणांसह पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.

‘डायमंड प्रिन्सेस’वरील रुग्णसंख्येत वाढ : 
  • जपानमधील सागरात नांगर टाकून असलेल्या डायमंड प्रिन्सेस या क्रूझ जहाजावरील करोना संसर्ग झालेल्या प्रवाशांची संख्या आता ४५४ झाली असून ९९ जणांच्या चाचण्या सकारात्मक आल्याने ही वाढ झाली आहे.

  • सोमवारी जपानी प्रसारमाध्यमांनी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एकूण रुग्णांची संख्या ४५४ असल्याचे स्पष्ट केले आहे. अमेरिकेच्या १४ जणांना विषाणूची लागण झाली होती, तरी त्यांना विमानाने मायदेशी जाऊ देण्यात आले. या १४ जणांचा समावेश या ४५४ मध्ये आहे की नाही हे समजलेले नाही.

  • डायमंड प्रिन्सेस जहाज हे टोकियोजवळ योकोहामा येथे असून चीनबाहेर करोना रुग्णांची संख्या तेथेच सर्वाधिक आहे. ५ फेब्रुवारीपासून या जहाजावरील प्रवाशांना वेगळे ठेवण्यात आले आहे. जहाजावरील कुणालाच उतरवून घेण्यात आले नाही. त्यांना केवळ  मास्क लावून डेकवर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी विलगीकरणाचा काळ संपत असून काही देशांनी त्यांच्या नागरिकांना परत नेण्याचे ठरवले आहे. अमेरिकेने त्यांच्या प्रवाशांना मायदेशी नेले आहे.

दिल्लीतील उद्याच्या शिवजयंती राष्ट्रोत्सव सोहळ्यात १० देशांचे राजदूत : 
  • नवी दिल्ली : दिल्लीत बुधवारी होणाऱ्या शिवजयंती राष्ट्रोत्सवात विविध देशांचे राजदूत आणि उच्चायुक्त सहभागी होणार आहेत.  इस्रायल, पोलंड, बल्गेरिया, स्पेन, रोमानिया, चीन, इजिप्त, कॅनडा, ट्युनिशिया, सायप्रस या दहा देशांच्या राजदूतांनी शिवजयंती सोहळ्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.

  • त्यापैकी पोलंडचे राजदूत हिंदीतून भाषण करतील. शिवजयंती राष्ट्रोत्सवाचे यंदाचे तिसरे  वर्ष असून या वर्षीपासून छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार दिला जाणार असून पहिला पुरस्कार बीव्हीजी उद्योग समुहाचे प्रमुख हणमंतराव गायकवाड यांना प्रदान केला जाईल, अशी माहिती खासदार संभाजी राजे यांनी सोमवारी दिली.

  • शाहिरी, पोवाडे, शौर्यगाथा, शिवकालीन युद्धकलांचे सादरीकरण असा शानदार कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रोत्सवाच्या पहिल्या वर्षी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत, नौदलप्रमुख सुनील लांबा तर, दुसऱ्या वर्षी लोकसभेच्या तत्कालीन अध्यक्ष सुमित्रा महाजन सहभागी झाल्या होत्या.

आता रेल्वे स्थानकांवर नाही मिळणार Google ची फ्री WiFi सेवा : 
  • Google कडून रेल्वे स्थानकांवर मिळणारी मोफत WiFi ची सेवा आता मिळणार नाही. ‘पाच वर्षांपूर्वी ही सेवा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ऑनलाईन जाणे खूप सोपे आणि स्वस्त झाले आहे’, असे म्हणत गुगलने मोफत वायफाय सेवा पुरवणारा ‘Google Station’हा प्रकल्प भारतासह अन्य देशांमध्येही बंद करत असल्याची माहिती सोमवारी दिली.

  • ‘आता बहुतांश ठिकाणी इंटरनेट डेटा स्वस्त आणि अगदी सहजपणे उपलब्ध आहे. सरकारकडून सगळ्यांना इंटरनेटची सेवा मिळावी यासाठी पावलं उचलली जात आहेत. इंटरनेटबाबतच्या परिस्थितीत कमालीची सुधारणा झाली आहे. तर, काही देशांमध्ये या प्रोजेक्टसाठी तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागतोय, यामुळे हा प्रोजक्ट बंद करण्यात येत आहे’,  असे कारण गुगलकडून देण्यात आले आहे.

  • गुगलने भारतात 2015 मध्ये RailTel सोबत हा प्रकल्प सुरू केला होता. गुगलने हा प्रकल्प बंद केल्यानंतरही भारतात रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फायची सेवा सुरूच असेल असं समजतंय. कारण, RailTel कडून ही सेवा सुरू राहील आणि देशभरातील 5,600 पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा पुरवले जाईल अशी माहिती आहे.

१८ फेब्रुवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.