चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जानेवारी २०२०

Updated On : Jan 18, 2020 | Category : Current Affairsखेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा - जलतरणात तीन सुवर्णपदके : 
 • गुवाहाटी : महाराष्ट्राने ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेतून सोनेरी कामगिरी सलग आठव्या दिवशी सुरू ठेवली. जलतरणात राज्याच्या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकवले. त्याशिवाय वेटलिफ्टिंगमध्ये एक सुवर्णपदक मिळाले. अपेक्षेप्रमाणे खो-खोमध्ये महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या चारही संघांनी उपांत्य फेरी गाठली आहे.

 • महाराष्ट्राला जलतरणातून तीन सुवर्णपदकांची कमाई एका दिवशी करता आली. महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मिहीर आम्ब्रेने ५० मीटर बटरफ्लाय आणि एरॉन फर्नाडिसने २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत सुवर्णपदके पटकवली. मुलींमध्ये करिना शांताने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले.

 • १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य आणि कांस्यदेखील महाराष्ट्राच्या मुलींनाच मिळाली. अपेक्षा फर्नाडिसने रौप्य आणि झारा जब्बरने कांस्यपदक मिळवले. कियारा बंगेराने (१७ वर्षांखालील) २०० मीटर फ्रीस्टाइल शर्यतीत रौप्यपदक मिळवले. ५० मीटर बटरफ्लायमध्ये महाराष्ट्राला आणखी एक रौप्यपदक केनिशा गुप्ताने (१७ वर्षांखालील) मिळवून दिले.

 • खो-खोमध्ये महाराष्ट्राने चारही गटात उपांत्य फेरी गाठली. १७ वर्षांखालील वयोगटांच्या लढतींमध्ये मुलींमध्ये महाराष्ट्राने गुजरातचा १०-६ असा पराभव केला. याच वयोगटात मुलांमध्ये महाराष्ट्राने कर्नाटकवर १०-४ मात केली.

महात्मा गांधींना भारतरत्न; सर्वोच्च न्यायालय म्हणतं… : 
 • महात्मा गांधी यांना भारतरत्न द्या अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. आपल्या देशाच्या जनतेने महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी दिली आहे. एवढंच नाही तर महात्मा गांधींबाबत प्रत्येक भारतीयांच्या मनात आदर आहे. राष्ट्रपिता उपाधी सगळ्या देशानं त्यांना देणं हा सर्वोच्च सन्मान आहे.

 • अशा महात्मा गांधींना भारतरत्न द्या असे निर्देश केंद्र सरकारला देणं हा न्याय योग्य विषय नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

 • महात्मा गांधी यांना देश राष्ट्रपिता मानतो. ही त्यांना देण्यात आलेली सर्वोच्च उपाधी आहे. यासंबंधी केंद्र सरकारने अहवाल सादर करावा असं आम्ही सांगू शकतो. मात्र त्यांना भारतरत्न द्या असे निर्देश आम्ही देऊ शकत नाही. महात्मा गांधी यांना अधिकाधिक उपाधी दिल्या जाव्यात या याचिकेशी कोर्ट सहमत आहे असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.

 • वढंच नाही तर महात्मा गांधी हे भारतरत्न पुरस्कारापेक्षाही मोठे आहेत. फक्त भारतातच नाही तर जगभरात महात्मा गांधी यांची ख्याती आहे. त्यामुळे महात्मा गांधींना भारतरत्न द्या अशी मागणी करणारी जनहित याचिका आम्ही फेटाळून लावत आहोत असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. 

देशात आंतरजाल अधिक गतीमान : 
 • बंगळुरू : ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण केले आहे. जीसॅट-३० या उपग्रहामुळे इंटरनेट क्षेत्रात क्रांती होणार असून त्यामुळे इंटरनेट अधिक गतीने चालणार आहे.

 • यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ ए या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याची मर्यादा आता संपुष्टात आली असल्याने जीसॅट-३० हा दूरसंचार उपग्रह इस्रोने प्रक्षेपित केला आहे. इनसॅट-४ ए ऐवजी आता जीसॅट-३० हा उपग्रह काम करणार आहे.

 • जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहामुळे तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती होणार आहे, व्हीसॅट नेटवर्क, टेलिव्हिजन अपलिंकिंग, टेलिपोर्ट सेवा, डिजिटल सॅटेलाइट, डीएसएनजी, डीटीएच सेवा यासाठी या उपग्रहाचा वापर होणार आहे. जलवायुमध्ये होणारे बदल आणि हवामानाचा अंदाजही वर्तविण्यासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.

 • या दूरसंचार उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून एरियन ५ प्रक्षेपकाच्या मदतीने शुक्रवारी पहाटे यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले.

ट्रम्प यांच्याविराधात महाभियोग सुनावणी सुरू : 
 • वॉशिंग्टन : अमेरिकी सिनेटने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधातील महाभियोग सुनावणीची प्रक्रिया गुरुवारी फारसा गाजावाजा न करता सुरू केली आहे.

 • निवडणूक वर्षांतच ट्रम्प यांना महाभियोगास  सामोरे जावे लागत असून या सुनावणीत सहभागी होणाऱ्या सिनेटर्सनी निष्पक्ष न्याय देण्याची शपथ घेतली. सभागृहाच्या अभियोक्तयांनी ट्रम्प यांच्यावरील आरोपांचे वाचन केले, या सुनावणीच्या अध्यक्षस्थानी सरन्यायाधीश जॉन रॉबर्टस होते. अमेरिकी लोकशाहीच्या इतिहासात आतापर्यंत महाभियोगाची कारवाई अध्यक्षांवर होण्याची ही तिसरी वेळ आहे.

 • जे चार सिनेटर ट्रम्प यांची सुनावणी करणार आहेत ते यंदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी शर्यतीत आहेत. गुरुवारी दुपारी सुनावणीची प्रक्रिया सुरू झाली. सर्वच सिनेटर्स सभागृहात उपस्थित होते.

 • सहसा सगळे जण कधी उपस्थित नसतात पण महाभियोगाची सुनावणी असल्याने उपस्थिती पूर्ण होती. यावेळी मोबाइलवर बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. या महाभियोगात अमेरिकेतील लोकशाहीच्या कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधिमंडळ या सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली. या  सुनावणीसाठी सरन्यायाधीश रॉबर्ट्स यांचे आगमन झाल्यानंतर सिनेटर्सनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.

१८ जानेवारी चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)