चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ मार्च २०२०

Date : 18 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कॅँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा - अनिश, लिरेन यांचा  सलामीलाच पराभव : 
  • विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला जागतिक बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हानवीर ठरवणाऱ्या कॅँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेत सलामीला मंगळवारी हॉलंडचा अनिश गिरी आणि चीनचा डिंग लिरेन यांना पराभव पत्करावे लागले.

  • विजेतेपदाचा दावेदार अमेरिकेच्या फॅबियानो कॅरुआनाने त्याचा फ्रान्सच्या मॅक्सिम वॅशियर-लॅग्रेवविरुद्धचा पहिल्या फेरीतील डाव ४४ चालींमध्ये बरोबरीत सोडवला. अलेक्झांडर ग्रिशुक आणि किरिल अलेक्सिन्को या दोन रशियाच्या खेळाडूंमधील डावही ४१ चालींमध्ये बरोबरीत संपला.

  • अनिश गिरीला मात्र पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळूनही रशियाच्या इयन नेपोमनियाश्चीकडून ७३ चालींत पराभवाचा धक्का बसला. सुरुवातीला केलेल्या काही चुकांनंतर वेळ कमी पडत असूनही गिरीने झुंज दिली. मात्र त्याला अखेर पराभव मान्य करावा लागला. लिरेनचाही त्याच्याच देशाच्या वॅँग हाओकडून ४५ चालींत पराभव झाला. पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळण्याचा फायदा लिरेनला घेता आला नाही.

देशातील रूग्णांची संख्या १३८ वर : 
  • जगभरात, तसंच देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. केंद्र सरकार तसंच राज्यसरकारकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपययोजना करण्यात येत आहेत.

  • गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. तर खबरदारीचा उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालंय, मॉल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच देशातील करोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

देशात ५४ हजार लोक देखरेखीखाली : 
  • नवी दिल्ली : देशभर विविध ठिकाणी ५४ हजार लोकांना सामूहिक देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या आरोग्यासंदर्भात त्या-त्या विभागातील विलगीकरण कक्षांमधील वैद्यकीय कर्मचारी लक्ष ठेवून असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.

  • जगभरात करोना विषाणूंविरोधी लस निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याची अद्ययावत माहिती राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन केंद्रातील तज्ज्ञ घेत आहेत. तसेच, संशोधन प्रक्रिया होत असलेल्या संस्थांशी संपर्क ठेवून आहेत. अमेरिकेत नवी लस तयार करण्याचे काम केले जात असल्याचे ऐकले आहे. पण, लशीची चाचणी घेतल्याशिवाय त्याचा वापर करता येणार नाही. या चाचण्यांचे निष्कर्ष काय असतील, हेही पाहिले जात असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले.

  • देशातील विविध रुग्णालयातील विलगीकरण कक्षांमध्ये स्वत:चा जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका तसेच, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे हर्षवर्धन यांनी कौतुक केले. विरोधी पक्षांच्या सदस्यांनीही हर्षवर्धन यांच्या कौतुकाला पाठिंबा दिला.

  • राज्यसभेतील खासदारांना आपापल्या राज्यातील विलगीकरण कक्षांना भेट देऊन तेथील व्यवस्थेची माहिती घेण्याचे तसेच, या कक्षांची अवस्था काय आहे, त्यात कोणत्या सुधारणा अपेक्षित आहेत याची शहानिशा करावी, असे आवाहन हर्षवर्धन यांनी केले. काही विलगीकरण कक्षांमध्ये स्वच्छतेचा अभाव असल्याच्या तक्रारी असल्याची दखलही हर्षवर्धन यांनी घेतली. या तक्रारी अपवादात्मक आहेत पण, बहुतांश कक्षांमध्ये उत्तम उपचार पुरवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेकडून मोदी सरकारचे कौतुक, म्हणाले “भारताच्या कामगिरीने प्रभावित” : 
  • करोनामुळे जगभरामध्ये दहशत पसरली आहे. अनेक देशांनी मागील काही वर्षांमध्ये पाहिले नव्हते इतके मृत्यू या साथीच्या रोगामुळे झाले आहेत. अनेक देशांमधील सरकारी यंत्रणांनी करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु केलं आहे. मात्र करोनाग्रस्तांची जगभरातील संख्या एक लाख ८२ हजारहून अधिक झाली आहे. हा रोग आणखीन पसरु नये म्हणून वेगवेगळ्या देशांमधील अनेक शहरे पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

  • भारतामध्येही करोनाचे शंभरहून अधिक रुग्ण अढळून आले आहेत. मात्र भारत सरकारने करोनाला थांबवण्यासाठी सुरु केलेले प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाल्याची चिन्हे दिसत आहेत. यावरुनच आता जागतिक आरोग्य संघटनेचे भारतातील प्रतिनिधी हेन्क बेकेनडॅम यांनी करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी भारत सरकार करत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केलं आहे.

  • “या आजारासंदर्भात भारत सरकारने आणि पंतप्रधान कार्यालयाने घेतलेले निर्णय आणि सुरु असणारे काम हे प्रचंड मोठ आहे. या कामाने मी प्रभावित झालो आहे. याच निर्णयांमुळे करोनाला थांबवण्यात भारत अद्याप तरी यशस्वी ठरला आहे. प्रत्येक यंत्रणा काम करत आहे हे पाहून नक्कीच प्रभावित झालो आहे,” असं मत बेकेनडॅम यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केलं आहे. बेकेनडॅम यांनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची (आयसीएमआर) कौतुक केलं आहे.

  • “भारताकडे संशोधनाची चांगली क्षमता आहे. खास करुन आयसीएमआर आणि आरोग्य विभागाकडे आरोग्यसंदर्भात संशोधनाची क्षमता वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी या विषाणूवर संशोधन सुरु केलं आहे. आता भारत हा संशोधक देशांमध्ये गणला जाईल,” असा विश्वास बेकेनडॅम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.

लष्कराच्या एका जवानालाही करोनाची लागण; सैन्यातील पहिलीच घटना : 
  • भारतीय लष्करामधील एका जवानालाही करोना विषाणू संसर्ग झालेल्याचे समोर आले आहे. सैन्यातील जवानांना या आजाराची लागण होण्याची ही पहिलीच घटना आहे. लेहमध्ये हा जवान तैनात असून तो २५ फेब्रुवारीपासून १ मार्चपर्यंत सुट्टीवर होता. या काळातच त्या या विषाणूचा संसर्ग झाला आहे. या जवानाचे वडील इराणहून धार्मिक यात्रेवरुन परतले आहेत.

  • या जवानाला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येताच त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. इराणहून परतलेल्या या जवानाच्या वडिलांची करोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे.

  • नवा संसर्गजन्य आजार असलेल्या करोनाग्रस्तांचा देशातील आकडा १३८वर पोहोचला आहे. याचा संसर्ग वाढतच चालल्याने सरकारने कठोर निर्णय घेत देशाच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला तपासणीशिवाय देशात प्रवेश करता येणार नाही.

१८ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.