चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ डिसेंबर २०१९

Date : 19 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार :
  • नवी दिल्ली : समकालीन मराठी साहित्यात मोलाची भर घालणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाला हा पुरस्कार मिळाला आहे. मराठीसह २३ भाषांतील साहित्य पुरस्कारांची बुधवारी अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांनी घोषणा केली. एक लाख रुपयांच्या या पुरस्काराचे २५ फेब्रुवारी रोजी दिल्लीत वितरण होणार आहे.

  • इंग्रजीमध्ये शशी थरूर यांच्या ‘एरा - ऑफ डार्कनेस’ (कथेतर गद्य) पुस्तकाचीही साहित्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कोंकणीमध्ये नीलबा खांडेकर यांच्या ‘द वर्ड्स’ या कवितासंग्रहालाही पुरस्काराने नावाजण्यात आले.

  • सात कवितासंग्रह, सहा कथासंग्रह, तीन निबंध, एक कथेतर गद्य आणि एक आत्मचरित्र अशा पाच साहित्य प्रकारांना २०१९चा साहित्य पुरस्कार देण्यात आला आहे. मराठी साहित्यासाठी आसाराम लोमटे, लक्ष्मण माने आणि वासुदेव सावंत हे तिघे परीक्षक होते. नेपाळी भाषेतील पुरस्कार जाहीर झालेला नाही.

डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर : 
  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजुर करण्यात आला. या मुद्द्यावर बुधवारी तब्बल १० तास चर्चा करण्यात आली. २३० विरूद्ध १९७ मतांनी महाभियोग प्रस्ताव मंजुर करण्यात आला. सत्तेचा दुरूपयोग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रम्प यांच्याविरोधातील दुसरा प्रस्तावही सभागृहात मंजुर करण्यात आला.

  • हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आता सीनेटमध्ये हा प्रस्ताव नेण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यातच सीनेटमध्ये यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु सीनेटमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाचं बहुमत आहे. त्यामुळे या सभागृहात हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

  • बिदेन यांना निवडणुकीत हानी पोहोचवण्यासाठी ट्रम्प यांनी युक्रेनकडून मदत घेतली व नंतर त्यांना त्या बदल्यात अमेरिकेकडून वेगळ्या स्वरूपात मदत दिली. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही त्यामुळे यात अध्यक्षांना जबाबदार धरलेच पाहिजे. ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदायमीर झेलेनस्की यांच्यावर दबाव आणून त्यांना बिदेन व त्यांचे पुत्र हंटर यांची चौकशी सुरू करण्यास भाग पाडले. बिदेन व त्यांच्या मुलांचा युक्रेनमध्ये उद्योग व्यवसाय आहे याबाबत एका जागल्याने ट्रम्प यांनी २५ जुलैला झेलेन्स्की यांना केलेल्या फोन कॉलच्या आधारे तक्रार दिली होती.

आधी आपला देश सांभाळा; भारतानं इम्रान खान यांना खडसावलं : 
  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्यावर केलेल्या वक्तव्याचा भारतानं तीव्र शब्दात निषेध केला आहे. भारत सरकारनं उचललेल्या पावलांमुळे दक्षिण आशियाई क्षेत्रात शरणार्थ्यांची मोठी समस्या तयार होत असल्याचं इम्रान खान म्हणाले होते. यावर भारतानं तीव्र शब्दात निषेध करत आपला देश सांभाळण्याचा सल्ला दिला.

  • संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजीव चंदर यांनी इम्रान खान यांच्या या वक्तव्याचा निषेध केला. पाकिस्तान मानवाधिकाराचा समर्थक असल्याचा आव आणतो. परंतु पाकिस्तानात १९४७ मध्ये अल्पसंख्यांकांची संख्या २३ टक्के होती. परंतु आता ती ३ टक्क्यांवर आली आहे. पाकिस्तामधील काही कायदे, अल्पसंख्यांकांचा होणार छळ आणि सक्तीचं धर्मांतरण हे यामागील प्रमुख कारण असल्याचं ते म्हणाले.

  • भारतातील नागरिकांसाठी आणखी कोणी बोलण्याची गरज नाही. कमीत कमी द्वेषाच्या आधारावर ज्यांनी दहशतवादाचा उद्योग चालवला आहे, त्यांनी तरी यावर बोलू नये. आपला देश आणि देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणं हे इम्रान खान यांच्यासाठी चांगलं असेल, असंही राजीव चंदर यांनी नमूद केलं.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यासह देशभरात एल्गार : 
  • मुंबई : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात डाव्या संघटनांनी एल्गार पुकारला आहे. राज्यासह संपूर्ण देशभरात आज सीएए कायद्याविरोधात आंदोलन होणार आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात मोठा विरोध होणार आहे. तर उत्तर प्रदेशात समाजावादी पक्षाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आलं आहे. याशिवाय राजधानी दिल्लीमधील अनेक परिसरातही जमावबंदी लागू केली आहे. दुसरीकडे या कायद्यामुळे भारतात कोणाच्याही नागरिकत्वाला धोका नाही, असं आश्वासन केंद्र सरकारने दिलं आहे.

  • या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. जामियासारखी घटना घडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.

  • राज्याभरात एल्गार - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आज राज्यभरात एल्गार पुकारला जाणार आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात एनएसयूआय, छात्रभारती, एसएफआय, मसाला, एआयएसएफसारख्या 18 पेक्षा जास्त विद्यार्थी संघटना, टीस, आयआयटी मुंबई, मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी एकत्र येत नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), एनआरसी, जामिया, एएमयू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करणार आहेत.

१९ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.