चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ मार्च २०२०

Date : 19 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
लोकसंख्या १.३ अब्ज, चाचणीसाठी भारतात फक्त ५२ प्रयोगशाळा : 
  • करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी भारतात सार्वजनिक ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. तीर्थस्थळं, चित्रपटगृह, जीम, जलतरण तलाव, शाळा, कॉलेजेस बंद आहेत. कारण या ठिकाणी विद्यार्थी, नागरिक मोठया संख्येने एकत्र येतात. करोना व्हायरस संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही पावले उचलणे आवश्यक आहे.

  • क्वारॅनटाइनमध्ये असणाऱ्या संशयितांच्या हातावर छापे मारण्यात येत आहेत. जेणेकरुन इतरांनी अशी व्यक्तींपासून दूर रहावे. उपचारांपेक्षाही आजार फैलावू नये, यासाठी उचलण्यात आलेली ही पावले महत्वपूर्ण आहेत. भारतासारख्या महाकाय देशात करोनाने हात-पाय पसरल्यास त्याला रोखणे कठिण बनून जाईल. म्हणून सध्या उचललेली पावले योग्यच आहेत.

  • परदेशातून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात आल्यामुळे भारतात करोना रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्याच्या घडीला भारतात १४५ पेक्षा जास्त करोनाचे रुग्ण असून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.

आखाती देशातून येणार २६ हजार भारतीय; मुंबईत ठेवण्याची तयारी : 
  • देशात करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १५० च्या पुढे गेली आहे. तर महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रूग्ण सापडले आहेत. यादरम्यान, संयुक्त अरब अमिराती, कुवेक आणि ओमानसारख्या आखाती देशातून २६ हजार भारतीय नागरिक मुंबईत दाखल होणार आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

  • मुंबई महानगपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार या देशांमधून दररोज २३ विमानं भारतात येत असतात. केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशानुसार संयुक्त अरब अमिराती, कुवेक आणि ओमान यादेशातून आलेल्या प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवणं अनिवार्य आहे. १८ मार्चपासून हा आदेश लागू झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

विदर्भासाठी सौर कृषिपंप योजना अव्यवहार्य : 
  • अकोला : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना दरवर्षी एक लाख सौर कृषिपंप देण्याचे जाहीर करण्यात आले. सिंचनाची अत्यंत गरज असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी मात्र सौर कृषिपंप योजना आतापर्यंत अव्यवहार्य ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा विशेष लाभ झाला नाही.

  • पाण्याची पातळी खालावल्याने पाणी ओढणे सौर कृषिपंपाद्वारे शक्य होत नाही. तसेच त्याच्या सुरक्षेचादेखील गंभीर प्रश्न आहे. आताही याचा विदर्भात कितपत फायदा होतो, यावर प्रश्नचिन्हच आहे.  राज्यात कृषिपंपाचा मोठा जटिल प्रश्न आहे. पैसे भरूनही अनेक शेतकरी अद्यापही प्रतीक्षा यादीतच आहेत.

  • राज्यातील स्थिती - महाराष्ट्रात ४२ लाख ५० हजारांवर कृषिपंपधारक आहेत. सुमारे ९० टक्के कृषिपंपधारकांकडून वीज देयकांचा नियमित भरणाच होत नसल्याने कोटय़वधी रुपयांची थकबाकी आहे. शेतीसाठी रात्री वीजपुरवठा करण्यात येत असल्याने अनेक अडचणी येतात. कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा व्हावा व थकबाकीची डोकेदुखी नको म्हणून सौर कृषिपंप योजना आणली. केंद्र शासनाचीही सौर ऊर्जाची योजना आहे. त्यामध्येही महाराष्ट्राचा वाटा आहेच.

  • फडणवीस सरकारच्या कार्यकाळात अटल व मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना राबविण्यात आल्या. नव्या सरकारनेही तोच कित्ता गिरवत आगामी पाच वर्षांत पाच लाख सौर कृषिपंप देण्याची घोषणा केली. त्यासाठी सन २०२०-२१ साठी ६७० कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित करण्यात आले.

१९ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.