चालू घडामोडी आणि दिनविशेष - १९ ऑक्टोबर २०१९

Date : 19 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
केवळ महिलांचा सहभाग असलेला ऐतिहासिक स्पेसवॉक :
  • वॉशिंग्टन : अवकाश इतिहासात प्रथमच अमेरिकेच्या दोन महिलांनी एकाचवेळी स्पेसवॉक केले. आतापर्यंत महिलांनी स्पेसवॉक केले नाही अशातला भाग नाही, पण आताच्या स्पेसवॉकमध्ये केवळ महिलाच होत्या.

  • या दोन महिलांमध्ये ख्रिस्तिना कॉच, जेसिका मेयर यांचा समावेश आहे. शुक्रवारी या दोन महिलांच्या जोडीने स्पेस वॉक केले. गेल्यावेळी स्पेससूटमध्ये समस्या निर्माण झाल्याने हा ऐतिहासिक स्पेस वॉक रद्द करावा लागला होता.

  • ख्रिस्तिना, तू मोठा तिढा दूर केलास, असा संदेश अवकाशयानाच्या संदेशकर्त्यां स्टीफनी विल्सन यांनी दिला. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या पॉवर कंट्रोलरची दुरूस्ती करण्यासाठी या दोघी अवकाशस्थानकाबाहेर पडल्या. प्रमाणित सुरक्षा तपासणी करून त्यांनी अवकाशस्थानकाबाहेर पाऊल ठेवले.

  • नासाचे प्रशासक जिम ब्रिडेनस्टाइन यांनी सांगितले, की केवळ महिलांचा सहभाग असलेला स्पेसवॉक ही ऐतिहासिक कामगिरी आहे. कॉच या विद्युत अभियंता असून, मेयर या सागरी जीवशास्त्रात पीएचडी आहेत. सोविएत रशियाची व्हॅलेंतिना तेरेश्कोवा ही १९६३ मध्ये पहिली महिला अवकाशयात्री ठरली होती. १९८२ मध्ये स्वेतलाना सावित्स्काया ही पहिली महिला स्पेसवॉकर ठरली होती.

काही सेंकद आधी भूकंपाची सूचना देणारे अ‍ॅप :
  • लॉसएंजल्स : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात भूकंपाचा इशारा देणारी सूचना यंत्रणा अ‍ॅपच्या स्वरूपात विकसित करण्यात आली असून त्यामुळे भूकंपाच्या आधी सूचना मिळू शकेल, त्यातून थोडय़ा प्रमाणात प्राणहानी टाळणे शक्य होणार आहे.

  • लोमा प्रिटा येथील  भूकंपाला ३०वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले असून माणसाला भूकंपाची जी जाणीव होते त्याच्या काहीकाळ आधी त्याचा इशारा यातून मिळणार आहे. गव्हर्नर गॅव्हीन न्यूसम यांनी सांगितले,की भूकंपाच्या वेळी थोडा काळ आधी माहिती मिळणेही फायद्याचे ठरू शकते, या भागात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियातील प्रत्येक व्यक्तीने हे उपयोजन डाऊ नलोड करावे. त्यातून त्यांच्या कुटुंबाला जीव वाचवण्याची संधी मिळू शकेल.

  • सेलफोनवरील या अ‍ॅपचे नाव ‘मायशेक’ असे आहे. त्यातून काही सेकंद आधी भूकंपाचा इशारा मिळतो. जमिनीत जेव्हा भूकंपलहरी उमटू लागतात तेव्हा लगेच हा संदेश हा मिळतो.  त्यामुळे प्राण वाचू शकतात. यातील इशारा सूचना ही ‘शेकअलर्ट’ या सम्ॉफ्टवेअरच्या मदतीने जारी केली जाते.  हे सॉफ्टवेअर  अमेरिकी भूगर्भशास्त्र संस्थेचे आहे, त्यात कॅलिफोर्नियातील भूकंपांशी निगडित भूगर्भ हालचालींचे विश्लेषण केले जाते.    लहरी सुरू होताच त्यांची तीव्रता मापली जाते व त्याचा इशारा दिला जातो.

देशभरात एनआरसीची अंमलबजावणी करा :
  • सरकारने देशपातळीवर राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) प्रक्रियेची अंमलबजावणी केली पाहिजे, देशाबाहेरून आलेल्यांना परदेशी नागरिक गणले पाहिजे आणि त्यांना भारतीय नागरिकांप्रमाणे हक्क देऊ नयेत, असे रा. स्व. संघाचे सरचिटणीस सुरेश भय्याजी जोशी यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.

  • अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीनंतर जोशी यांनी वार्ताहरांना सांगितले की, एनआरसीचा प्रयोग केवळ आसाममध्येच करण्यात आला आहे, सरकारने योजना तयार केली तर त्याची अंमलबजावणी देशात करू शकतात आणि ती केली पाहिजे.

  • जे भारतीय नागरिक नाहीत त्यांना नागरिकांचे हक्क दिले जाऊ नयेत, ही आमची भूमिका फार पूर्वीपासूनची आहे, केवळ जे देशात येतात ते नागरिक नव्हेत, त्यांना परकीय नागरिक म्हणूनच गणले पाहिजे, त्यांच्याबाबत काय निर्णय करावयाचा ते सरकारच्या धोरणावर अवलूंन आहे. येथील नागरिकांच्या हक्कांपासून त्यांना दूर ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.

  • दरम्यान, राम मंदिराबाबत हिंदू जनतेला अनुकूल असलेला निकाल लागेल, अशी अपेक्षा जोशी यांनी व्यक्त केली. राम मंदिराच्या उभारणीत येणारे अडथळे दूर केले पाहिजेत हे आमचे अनेक वर्षांपासूनचे म्हणणे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१ नोव्हेंबरपासून ७ कोटी मोबाइल क्रमांक होणार बंद :
  • जर तुम्ही एअरसेल आणि डिशनेट वायरलेसचे युझर्स असाल तर ३१ ऑक्टोबरनंतर तुमचा मोबाइल क्रमांक बंद होणार आहे. तसंच आपली सेवा सुरू ठेवण्यासाठी या कंपनीची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना ३१ ऑक्टोबरपूर्वी आपला क्रमांक दुसऱ्या सर्व्हिस प्रोव्हायडर्सवर पोर्ट करावा लागणार आहे. ट्रायच्या अहवालानुसार या कंपन्यांचे सध्या ७ कोटी ग्राहक आहेत. अखेरच्या तारखेपूर्वी मोबाइल क्रमांक पोर्ट न केल्यास संबंधित क्रमांक कायमचा बंद होणार आहे.

  • रिलायन्स जिओच्या बाजारातील एन्ट्रीनंतर अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तर काही कंपन्या बंदही झाल्या होत्या. २०१६ ते २०१७ या कालावधीत तग धरल्यानंतर २०१८ च्या सुरूवातीला एअरसेलनं आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर एअरसेलनं ट्रायचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर कंपनीनं आपल्या युझर्ससाठी युनिक पोर्टिंग कोडची सुविधा दिली होती. पंरतु आता ३१ ऑक्टोबरपर्यंतच एअरसेलला सेवा देता येणार असल्याचं ट्रायनं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर मोबाइल क्रमांक कायमचा बंद होणार आहे.

  • २०१८ मध्ये एअरसेलने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी कंपनीकडे तब्बल ९ कोटी ग्राहक होते. ट्रायच्या अहवालानुसार, २८ फेब्रुवारी ते ३१ ऑगस्टदरम्यान केवळ १.९ कोटी ग्राहकांनीच आपले क्रमांक पोर्ट केले, तर ७ कोटी ग्राहकांकडे अद्यापही एअरसेलचीच सेवा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीनं आपली सेवा बंद करण्यापूर्वी अनिल अंबानी यांच्या आरकॉममध्ये आपली कंपनी मर्ज करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही तांत्रिक कारणामुळे ते शक्य झालं नव्हतं.

ब्रेग्झिट समझोता कराराची आज ब्रिटनच्या संसदेत परीक्षा :
  • ब्रसेल्स : युरोपीय समुदायाच्या नेत्यांनी अतिशय कष्टाने तयार केलेल्या ब्रेग्झिट समझोत्यास मान्यता दिली, पण असे असले तरी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यापुढे हा समझोता करार संसदेत मंजूर करून आणणे हे मोठे आव्हान आहे.

  • युरोपीय समुदायाच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष  डोनाल्ड टस्क यांनी सांगितले, की  २७ नेत्यांनी समझोता करारास मान्यता दिली आहे, त्यामुळे आम्ही अंतिम टप्प्यात आहोत. शनिवारी ब्रिटनच्या संसदेची विशेष बैठक होत असून त्यात आम्ही हा समझोता करार मंजूर करणार नाही, अशी कडवट भूमिका ब्रिटनमधील विरोधकांनी घेतली आहे. जर हा समझोता करार संसेदत बारगळला तर पंतप्रधान जॉन्सन यांना युरोपीय समुदायाकडे ब्रेग्झिटला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची मागणी करावी लागेल. प्रत्यक्षात त्यांनी ३१ ऑक्टोबर रोजी ब्रिटनला युरोपीय समुदायातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते.

  • युरोपीय आयोगाचे अध्यक्ष जीन क्लॉद जंकर यांनी सांगितले, की जर ब्रिटिश संसदेने समझोता करार फेटाळला तर परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होणार आहे, त्या परिस्थितीत काय प्रतिसाद द्यायचा हे आपण सदस्यांशी चर्चा करून ठरवू. ब्रिटनचे संसद सदस्य या समझोता करारास पाठिंबा देतील अशी आशा जॉन्सन यांनी व्यक्त केली आहे. पण सत्ताधारी आघाडीतील पक्ष व विरोधकांनी हा करार फेटाळण्याचा इशारा जॉन्सन यांना दिला आहे. जंकर यांनी म्हटले आहे, की आम्ही आताचा समझोता करार व्यवस्थित केला आहे, त्यामुळे आता ब्रेग्झिटला विलंब लागण्याची खरेतर गरज नाही.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १२१६: इंग्लंडचा राजा जॉन मृत्यूमुखी पडल्यामुळे त्याचा ९ वर्षाचा मुलगा हेन्‍री हा राजेपदी आरुढ झाला.

  • १८१२: नेपोलियन बोनापार्टने मॉस्कोच्या सीमेवरुन माघार घेतली.

  • १९३३: जर्मनी लीग ऑफ नेशन्स (League of Nations) मधून बाहेर पडले.

  • १९३५: इथिओपियावर आक्रमण केल्यामुळे राष्ट्रसंघाने (League of Nations) इटलीवर आर्थिक निर्बंध घातले.

  • १९४४: दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजा फिलीपाइन्सला पोचल्या.

  • १९७०: भारतीय बनावटीचे पहिले मिग लढाऊ विमान हवाईदलाकडे सुपुर्द.

  • १९९३: पुण्याजवळील महारेडिओ दुर्बिण (GMRT) प्रकल्पाचे जनक आणि शास्त्रज्ञ प्रा. गोविंद स्वरुप यांना सर सी. व्ही. रामन पदक जाहीर.

  • १९९४: रुद्रवीणावादक उस्ताद असद अली खाँ यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार जाहीर.

  • २०००: पार्श्वगायिका आशा भोसले यांना राज्यशासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

  • २००५: मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी सद्दाम हुसेन यांच्याविरुद्ध खटला सुरू झाला.

जन्म 

  • १९०२: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे १९७३ – हैदराबाद, आंध्र प्रदेश)

  • १९१०: तार्‍यांचे आयुर्मान व त्यांचा शेवट यावरील संशोधनासाठी १९८३ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले भारतीय- अमेरिकन खगोल वैज्ञानिक सुब्रमण्यन चंद्रशेखर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९९५)

  • १९२०: कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २००३)

  • १९२५: वनस्पतीशास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक डॉ. वामन दत्तात्रय तथा वा. द. वर्तक यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल २००१)

  • १९३६: गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ जुलै २००९)

  • १९५४: रंगभूमी, चित्रपट व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या प्रिया तेंडुलकर यांचा जन्म. (मृत्यू: १९ सप्टेंबर २००२)

  • १९६१: अभिनेते अजय सिंग देओल ऊर्फ सनी देओल यांचा जन्म.

मृत्यू 

  • १२१६: इंग्लंडचा राजा जॉन यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर ११६६)

  • १९३४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचे निधन. (जन्म: २४ डिसेंबर १८६४)

  • १९३७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १८७१)

  • १९८६: मोझांबिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९३३)

  • १९५०: पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक विष्णू गंगाधर तथा दादासाहेब केतकर यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८८७)

  • १९९५  बाल कलाकार व अभिनेत्री सलमा बेग ऊर्फ बेबी नाझ यांचे निधन.

  • २००३: बोत्सिया व हर्जेगोविना देशाचे पहिले अध्यक्ष अलिजा इझेटबेगोविच यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९२५)

  • २०११: भारतीय लेखक कक्कणदन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १९३५)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.