चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० डिसेंबर २०१९

Date : 20 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय अजिंक्यपद  नेमबाजी स्पर्धा - राहीला सुवर्णपदक : 
  • आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या राही सरनोबतने ६३व्या राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारात बुधवारी सुवर्णपदक पटकावले. कनिष्ठ गटातील सुवर्णपदक विजेत्या मनू भाकरला वरिष्ठ गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

  • महिलांच्या वरिष्ठ गटात राहीने ५८९ गुण मिळवले, तर अंतिम फेरीत ४१ गुण मिळवले. मनूला प्राथमिक फेरीत ५८२ आणि अंतिम फेरीत ३२ गुण मिळाले. राहीने अंतिम फेरीत नऊ गुणांच्या फरकाने सुवर्णपदकावर वर्चस्व गाजवले. या गटातील कांस्यपदक महाराष्ट्राच्या अभिज्ञा पाटीलला मिळाले. प्राथमिक फेरीत तिला ५७५ आणि अंतिम फेरीत २७ गुण मिळाले. महाराष्ट्राला १७३८ गुणांसह सांघिक सुवर्णपदक मिळाले, तर हरियाणाला (१७०९ गुण) दुसरे स्थान मिळाले.

  • म्युनिच (जर्मनी) येथे मे महिन्यात झालेल्या ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना राहीने टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील २५ मीटर स्पोर्ट्स पिस्तूल प्रकारातील एक स्थान निश्चित केले होते.

हे आहेत Top 5 महागडे भारतीय खेळाडू : 
  • पियुष चावला – भारताचा अनुभवी फिरकीपटू पियुष चावला याला चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने खरेदी केले. पियुष चावलावर चेन्नईने ६ कोटी ७५ लाखांची बोली लावली आणि त्याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतला.

  • वरूण चक्रवर्ती – गेल्या हंगामात सर्वात महाग म्हणजेच ८ कोटी ४० लाख इतकी वरूण चक्रवर्ती याच्यावर बोली लागली होती. पण त्याला फारशी संधी मिळाली नाही. त्याला जितकी संधी मिळाली, त्यात त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. तरीदेखील त्याला यंदाच्या लिलावात त्याला ४ कोटींच्या बोलीसह कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपल्या संघात सामील करून घेतले.

  • रॉबिन उथप्पा – अनुभवी धडाकेबाज खेळाडू रॉबिन उथप्पा याला कोलकाता संघाने करारमुक्त केले. पण त्याला नवा संघ सापडला. ३ कोटींच्या बोलीसह राजस्थान रॉयल्सने त्याला आपल्या संघात स्थान दिले.

  • जयदेव उनाडकट – गेल्या हंगामात ८ कोटी ४० लाखांच्या सर्वाधिक बोलीसह तो राजस्थानच्या संघात होता. यंदाही त्याला राजस्थान रॉयल्सच्या संघाने विकत घेतले. त्याच्यावर ३ कोटींची बोली लावण्यात आली.

  • यशस्वी जैस्वाल – स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणारा यशस्वी जैस्वाल याला त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले. २ कोटी ४० लाखांच्या बोलीसह त्याला राजस्थान रॉयल्स संघाने ताफ्यात सामील करून घेतले.

पुढील आठवडय़ात मंत्रिमंडळाचा विस्तार : 
  • नागपूर : हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर दोन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होऊ  शकतो, असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजी झाल्यास २३ डिसेंबरलाही मंत्रिमंडळ विस्तार शक्य असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

  • राजकीय भूकंपासाठी ओळखल्या जाणाऱ्या नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा धोकादायक टप्पा महाविकास आघाडी सरकारने आता जवळपास ओलांडल्याचे चित्र असल्याने शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही घटक पक्षांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत.

  • महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी झाला असला तरी सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केवळ सात मंत्री काम करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हिवाळी अधिवेशनानंतरच मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. विधिमंडळाचे अधिवेशन संपताच दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे शरद पवार यांनी बुधवारीच जाहीर केले होते. त्यानंतर गुरुवारी दुपारी पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली.

ICSI ने कंपनी सेक्रेटरीच्या २० आणि २१ डिसेंबरला होणाऱ्या परीक्षा ढकलल्या पुढे : 
  • द इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने (आयसीएसआय) कंपनी सेक्रेटरीच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. संस्थेच्या परिपत्रकानुसार, (शुक्रवार) २० डिसेंबर आणि (शनिवार) २१ डिसेंबर रोजी देशभरात आणि परदेशांतील केंद्रांवर होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परिक्षांच्या पुढील तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

  • त्याचबरोबर संस्थेने स्पष्ट केले आहे की, (सोमवार) २३ डिसेंबरपासून सर्व केंद्रांवर होत असलेल्या परीक्षा मात्र नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पार पडतील. या परिक्षा पुढे ढकलण्यामागचे कारण मात्र संस्थेकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. डिसेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या सीएसच्या परिक्षांचा निकाल हा पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार आहे.

  • सीएस एक्झक्युटिव्ह आणि प्रोफेशनल कार्यक्रमांच्या परिक्षा उद्यापासून (२० डिसेंबर) सुरु होणार होत्या. मात्र, पुढील दोन दिवसांच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता या परिक्षा २३ डिसेंबरपासून सुरु होतील, असे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

२० डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.