चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० मार्च २०२०

Date : 20 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
करोना किटसाठी इस्त्राइलच्या मोसादचं मिशन, दोन दिवसांत मिळवले एक लाख टेस्ट किट : 
  • इस्त्राइलमध्ये करोना व्हायरसचा सामना करण्यासाठी गुप्तचर संघटना मोसाद देखील सहभागी झाली आहे. मोसादने करोना व्हायरसशी सामना करण्यासाठी एक लाख टेस्ट किट मिळवले असून रात्रभर सुरु असलेल्या मोहिमेअंतर्गत हे सर्व किट देशातील वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आले आहेत.

  • हे सर्व किट परदेशातून मिळवले असून येत्या काही दिवसांत अजून लाखो किट मिळवण्याचा मोसादचा प्रयत्न आहे. पण हे किट किती उपयोगाचे आहेत यासंबंधी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

  • मोसाद शक्यतो कोणत्याही खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सहभागी होत नाही. पण देशात किटचा तुटवडा झाला असल्याने मोसादची मदत घेतली जात आहे. ज्या देशांशी आपले राजनैतिक संबंध नाहीत अशा देशांमधून हे किट मिळवण्यात आले आहेत अशी माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये ४० लाख किट मिळवण्याचा मोसादचा प्रयत्न असणार आहे. मोसादचे संचालक स्वत: या सर्व मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.

जाणून घ्या काय आहे निर्भया प्रकरण ? 
  • दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली निर्भया ही तिच्या मित्रासोबत सिनेमा पाहून घरी परतत होती. नवी दिल्ली येथील मुनीरकापासून द्वारका या ठिकाणी जाण्यासाठी या दोघांनी बस पकडली. या बसमध्ये बसल्यावर फक्त पाच ते सात प्रवासी असल्याचं या दोघांना लक्षात आलं.

  • प्रवास सुरु झाल्यानंतर बसलेल्या इतरांनी निर्भयासोबत छेडछाड केली. यामध्ये तिच्या मित्राने हस्तक्षेप केला तेव्हा त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहारण करण्यात आली. यानंतर सहा आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तिचा अमानुषपणे लैंगिक छळही केला. यानंतर विविस्त्र अवस्थेत निर्भया आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून देण्यात आलं.

  • या सगळ्या प्रकारानंतर निर्भयाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिला पुढील उपचारांसाठी सिंगापूरलाही नेण्यात आलं. मात्र तिथेच २९ डिसेंबर २०१२ ला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी राम सिंह याने तिहार तुरुंगात २०१३ मध्ये आत्महत्या केली. ऑगस्ट २०१३ मध्ये अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. सप्टेंबर २०१३ मध्ये चार मुख्य आरोपींना १३ अपराधांसाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाने दोषी ठरवलं. १३ सप्टेंबर २०१३ रोजी या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

रविवारी ‘जनता संचारबंदी’ची हाक :
  • नवी दिल्ली : करोनाने अवघ्या मानवजातीला घेरले असून, संपूर्ण जग आपत्तीला सामोरे जात आहे. भारतासारख्या १३० कोटींच्या, विकासाकडे वेगाने धाव घेणाऱ्या देशाला बेफिकीर राहता येणार नाही. या साथरोगाचा सामना करण्यासाठी नागरिकांनी काही संकल्प करण्याची गरज आहे. त्यानुसार रविवारी २२ मार्चला लोकांनी स्वत:च घराबाहेर न पडता ‘जनता कर्फ्यू’ पाळावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.

  • करोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाटय़ाने होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री आठ वाजता देशाला उद्देशून भाषण केले. या साथरोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने या विषाणूपासून स्वत:चे रक्षण करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन मोदी यांनी केले.

  • करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रविवारी, २२ मार्च रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ  वाजेपर्यंत जनतेने स्वत:हून संचारबंदी पाळावी, असे आवाहन पंतप्रधानांनी देशवासीयांना केले. ‘जनता संचारबंदी’च्या काळात कोणीही घरातून बाहेर पडू नका. चौकाचौकात एकत्र येऊ  नका. बाजारात विनाकारण फिरू नका. घराच्या-सोसायटीच्या आवारातही एकत्र येऊ  नका’, अशी सूचना मोदींनी केली.

जागतिक पुरस्काराच्या नामांकन यादीत सोलापूरमधील शिक्षक : 
  • सोलापूर : जगातील सर्वोत्तम ५० शिक्षकांसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराच्या नामांकन यादीत तीन भारतीय शिक्षक असून त्यात सोलापूरच्या जिल्हा परिषद शाळेतील रणजितसिंह डिसले यांचा समावेश आहे.

  • शिक्षण क्षेत्रातील नोबेल पारितोषिक म्हणून  ‘ग्लोबल टीचर प्राइझ’ ओळखले जाते. दहा लाख अमेरिकन डॉलर असे त्याचे स्वरूप आहे. लंडन येथे होणाऱ्या ग्लोबल एज्युकेशन अ‍ॅन्ड स्किल फोरम या कार्यक्रमात निवड झालेल्या शिक्षकांना पुरस्कार दिला जाणार आहे. अवघ्या देशभरातून सोलापूरचे रणजितसिंह डिसले यांच्यासह विनिता गर्ग (नवी दिल्ली) व शुवजीत पायने (राजस्थान) या तिघा शिक्षकांना या पुरस्कारासाठी मानांकन मिळाले आहे.

  • सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) शाळेत मागील अकरा वर्षांपासून रणजितसिंह डिसले गुरुजी हे शैक्षणिक तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगामुळे जगभर ओळखले जातात. त्यांनी तयार केलेली ‘क्यूआर कोड’ शैक्षणिक पाठय़पुस्तके सध्या अकरा देशांतील दहा कोटींपेक्षा जास्त मुले वापरत आहेत. ‘व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप’ या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून डिसले गुरुजी दीडशेपेक्षा जास्त देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.

परदेशातून आलेल्या प्रवाशांनी नोंद न केल्यास गुन्हा दाखल करणार : 
  • रत्नागिरी  : रत्नागिरी शहर आणि जिल्ह्यात करोना या संसर्गजन्य रोगाच्या साथीला आळा घालण्यासाठी गेल्या पंधरा दिवसात परदेशातून आलेल्या प्रवाशांनी स्वत:हून पोलीस किंवा आरोग्य विभागाकडे नोंद केली नाही तर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिला आहे.

  • रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील एका व्यक्तीचा करोना चाचणी अहवाल काल रात्री सकारात्मक आल्यामुळे आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन या रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून विविध उपाययोजना केल्या आहेत.

  • आत्तापर्यंतच्या माहितीनुसार गेल्या पंधरा दिवसात परदेशातून आलेल्या व्यक्तिंमार्फत या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यामुळे त्याबाबत प्रशासनाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चीन, अमेरिकेसह मध्यपूर्वेतील देशांमधून आलेल्या प्रवाशांची तातडीने नोंद करून वैद्यकीय तपासणी अनिवार्य केली आहे. तसे न करणारी व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबियांविरूध्दही गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी मिश्रा यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.

कोण आहे फाशी देणारा जल्लाद आणि कशी देतो फाशी : 
  • फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर जल्लादना तुरूंगात बोलावण्यात येतं. कैद्यांचे पाय कसे बांधायचे, फाशीचा दोर कसा बांधायचा हे त्यावेळी ठरवण्यात येतं असं पवन जल्लाद यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. फाशी देण्याच्या १५ मिनिट पूर्वी त्यांना फाशी देण्यात येणार असल्याच्या ठिकाणी नेण्यात येतं. फाशीपूर्वीच्या एकूण प्रक्रियेला दीड तासांचा कालावधी लागतो, असंही त्यांनी सांगितलं. आरोपींना फाशी देण्यापूर्वी त्यांचे हात मागे बांधले जातात. तसंच दोन पोलीस शिपाई त्यांना फाशीच्या ठिकाणापर्यंत घेऊन येतात. फाशीघर किती लांब आहे, यावर ही सर्व प्रक्रिया किती वेळापूर्वी करायची हे ठरत असतं, असंही त्यांनी सांगितलं.

  • फाशी देताना त्या ठिकाणी ४ ते ५ पोलीस शिपाई असतात. ते आरोपींना फाशी देण्याच्या ठिकाणी आणण्याच्या ठिकाणी उभं करतात. त्यावेळी कोणीही काहीही बोलत नाही. फाशीच्या एक दिवस पूर्वी एक मीटिंग घेण्यात येते. फाशीच्या ठिकाणी तुरूंग अधीक्षक, डिप्टी जेलर आणि डॉक्टरही उपस्थित असतात. फाशी देण्याची पूर्ण प्रक्रिया १० ते १५ मिनिटांमध्ये पूर्ण होते. यादरम्यान, आरोपींचे हात बांधलेले असतात. तसंच त्यांचे पायही बांधले जातात. त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर कपडा घातला जातो. काम पूर्ण झाल्यावर जल्लाद लिव्हरकडे पोहोचतात. त्यानंतर तुरूंग अधीक्षक अंगठा दाखवतात. त्यानंतर लिव्हर खेचण्याची तयारी होते, असंही त्यांनी सांगितलं.

  • आरोपींना उभं करण्यात येणाऱ्या ठिकाणी एक गोल निशाण तयार करण्या येतो. त्याच्या आतमध्ये आरोपींचे पाय असतात. जेल अधीक्षकानं सांगितल्यानंतर लिव्हर खेचलं जातं. फाशी दिल्यानंतर डॉक्टर त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे हृदयाचे ठोके तपासतात. त्यानंतर त्यांचं शरीर खाली उतरवलं जातं, असंही त्यांनी बोलताना सांगितलं.

२० मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.