चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० नोव्हेंबर २०१९

Date : 20 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राजस्थानमध्ये स्थानिक निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश : 
  • सत्ताधारी काँग्रेसने राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. काँग्रेसला ९६१ तर भाजपला ७३७ प्रभागांमध्ये विजय मिळाला. मंगळवारी हे निकाल जाहीर करण्यात आले. राज्यात ४९ पैकी २३ नगरपालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आली आहे, तर भाजपला सहा ठिकाणी सत्ता मिळाली आहे. इतरांना २० पालिकांमध्ये यश मिळाले आहे.

  • शनिवारी राजस्थानमधील ४९ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान झाले होते. एकूण २१०५ प्रभागांसाठी हे मतदान झाले. हे निकाल अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे. सरकारच्या कामगिरीवर जनतेने विश्वास ठेवल्याचे गेहलोत यांनी सांगितले.

  • बहुजन समाज पक्षाला १८ तर मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला तीन प्रभागांमध्ये विजय मिळवता आला. राजस्थानमधील ३३ जिल्ह्य़ांपैकी २४ जिल्ह्य़ांमध्ये निवडणूक झाली होती.  त्यात तीन महापालिका, १८ नगरपालिका व २८ नगर पंचायतींचा समावेश होता. महापौर, नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्ष निवड पुढील मंगळवार व बुधवारी होणार आहे.

भारत-पाक टपालसेवा पुन्हा सुरू : 
  • पाकिस्तानचा निर्णय; पार्सल सेवा बंदच :- पाकिस्तानने भारताबरोबरची थांबवलेली टपाल सेवा पुन्हा सुरू केली आहे, मात्र पार्सल सेवा अजूनही बंदच आहे. गेले तीन महिने ही सेवा बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला होता.

  • जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने टपाल सेवा बंद केली होती पण ती पुन्हा सुरू करण्यात आल्याचे वृत्तपत्रातील बातम्यात म्हटले आहे. ५ ऑगस्ट रोजी भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले होते. त्यानंतर  पाकिस्तानने भारताशी असलेले राजनैतिक संबंध निम्न स्तरावर आणून भारतीय उच्चायुक्तांना मायदेशी पाठवले होते. त्याचवेळी पाकिस्तानने भारताशी दळणवळण व इतर व्यापार संबंध तोडले होते.

  • पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे की ‘टपाल  सेवा आता सुरू करण्यात आली असून पार्सल सेवा अजूनही बंदच आहे. पाकिस्तानने टपाल सेवा अंशत सुरू केल्याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा मात्र केलेली नाही.’ फाळणी, युद्ध व सीमेवरील तणावाच्या सर्व काळात दोन्ही देशांतील टपाल सेवा सुरू होती पण आता ती बंद करण्याचा निर्णय हा अभूतपूर्व होता.

इस्रायली वसाहतींना अमेरिकेची मान्यता : 
  • धोरणातील बदलाने पॅलेस्टाइन नाराज :- पश्चिम किनारा भागातील इस्रायली वसाहती बेकायदा नसल्याचे जाहीर करून ट्रम्प प्रशासनाने आधीच्या धोरणात बदल केला आहे. इतके दिवस या वसाहती  आंतरराष्ट्रीय कायद्यातील निकषांशी सुसंगत नसल्याचे अमेरिकेचे मत होते, पण त्यातून मध्य पूर्वेत शांतता नांदण्यास मदत झाली नाही. त्यामुळे धोरणात बदल केल्याचे सांगण्यात आले.

  • अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी सोमवारी याबाबतची घोषणा करताना सांगितले की, यावरील कायदेशीर मुद्दय़ांचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. आमच्या मते पश्चिम किनारा भागातील इस्रायली नागरिकांच्या वसाहती या आंतरराष्ट्रीय कायद्यातील निकषांचे उल्लंघन करणाऱ्या नाहीत.  दरम्यान या धोरणात्मक बदलाचे इस्रायलने स्वागत केले असून पॅलेस्टाइनने त्यावर निषेध नोंदवला आहे.

  • इस्रायली नागरिकांच्या पश्चिम किनारा भागातील वसाहती बेकायदा ठरवून त्याचा काही फायदा झालेला नाही. त्यातून शांतता प्रस्थापित होऊ शकली नाही. कारण यामुळे इस्रायल व पॅलेस्टाइन यांच्यात शांतता चर्चा सुरू होण्यास प्रोत्साहन मिळणे अपेक्षित होते पण तसे घडले नाही.

काटरेसॅट ३ उपग्रहाचे २५ नोव्हेंबरला प्रक्षेपण : 
  • भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रो येत्या २५ नोव्हेंबर रोजी काटरेसॅट-३ हा पृथ्वी प्रतिमा व नकाशा निर्मिती उपग्रह प्रक्षेपित करणार असून त्यासमवेत अमेरिकेचे १३ व्यावसायिक नॅनो उपग्रह  सोडण्यात येणार आहेत.

  • उपग्रह भारताच्या पीएसएलव्ही सी ४७ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात येणार असून आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश  केंद्रावरून हे उड्डाण होणार आहे. २५ नोव्हेंबरला सकाळी ९.२८ वाजता हे प्रक्षेपण अपेक्षित असून हवामान प्रतिकूल राहिल्यास ते लांबणीवर पडू शकते.

  • काटरेसॅट हा प्रगत उपग्रह असून त्याच्या मदतीने अधिक सुस्पष्ट छायाचित्रे घेता येतील. ५०९ किमीच्या कक्षेत तो पाठवण्यात येणार असून पीएसएलव्ही सी ४७ प्रक्षेपकाचे हे २१ वे उड्डाण आहे. पीएसएलव्ही एक्सएल या नव्या प्रक्षेपकात सहा घन इंधन मोटारी आहेत. पीएसएलव्ही सी ४७ आणखी १३ व्यावसायिक नॅनो उपग्रह घेऊन झेपावणार आहे, ते सर्व अमेरिकेचे आहेत. श्रीहरिकोटा येथून होणारे हे ७४ वे उड्डाण असणार आहे.

सुरक्षा रक्षकांसमोर नक्षलवाद्यांचे नवे आव्हान; पहिल्यांदाच ड्रोन्सचा वापर : 
  • तंत्रज्ञानाचे जसे फायदे असतात तसे तोटे देखील असतात. यानुसार, देशातील जहाल नक्षलवादी चळवळीने सुरक्षा रक्षकांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. कारण, छायाचित्रणासाठीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या ड्रोन्सचा वापर आता नक्षलवाद्यांनीही सुरु केला आहे. पहिल्यांदाच ड्रोन्सच्या माध्यमातून ते सुरक्षा रक्षकांवर लक्ष ठेवत आहेत.

  • छत्तीसगडमधल्या रेड कॉरिडॉरमधील किस्तराम भागातील सुरक्षा रक्षकांना आपल्या कँपच्या ठिकाणांवर कॅमेरे बसवलेले ड्रोन्स रात्रीच्या वेळी घिरट्या घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा प्रकारे सुरक्षा रक्षकांच्या कँपवरुन ड्रोन उडवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. टाइम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.

  • याप्रकरणी छत्तीसगडचे पोलीस महासंचालक पी. सुंदरराज म्हणाले, छत्तीसगडच्या रेड कॉरिडॉरमधील काही ठिकाणं ही ‘नो फ्लाईंग झोन’ म्हणून घोषीत करण्यात आली आहेत. गेल्या काही महिन्यांत काही संशयास्पद ड्रोन्स सुकमा जिल्ह्यात आढळून आली होती त्यानंतर जवळच्या भागात याबाबत शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.

गांधी कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी जादा बटालियनची मागणी’ :
  • काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य यांच्या सुरक्षेच्या नव्या व्यवस्थेबद्दल केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठविले आहे. या कामासाठी किमान आणखी एक बटालियन वाढवून द्यावी, अशी मागणी सीआरपीएफ लवकरच करणार आहे, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा यांना दिलेले विशेष संरक्षण दलाचे संरक्षण काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आणि त्याऐवजी त्यांना सीआरपीएफची झेड-प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला.

  • या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी शस्त्रसज्ज वाहने घेण्यासाठी मंजुरी द्यावी, अशी मागणीही या निमलष्करी दलाच्या वतीने केली जाणार आहे. सीआरपीएफने गृहमंत्रालयाद्वारे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नव्या व्यवस्थेबद्दलची माहिती दिली आहे.

सावरकरांना भारतरत्न देण्यासाठी शिफारशीची गरज नाही; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण : 
  • मागील अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी शिफारस करण्याची गरज नसल्याचा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्राने सावरकरांना भारतरत्न देण्यासंदर्भातील सूचक वक्तव्य केले.

  • सावरकरांना ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे आली आहे का? यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्राने महत्त्वाचा खुलासा केला आहे.

  • केंद्राकडे अनेकदा वेगवेगळ्या माध्यमातून भारतरत्न देण्यासंदर्भातील शिफारशी केल्या जातात. मात्र भारतरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्याची आवश्यकता असते असं नाही. शिफारस  केली नसतानाही हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. भारतरत्न देण्यासंदर्भातील निर्णय योग्य वेळी घेतला जातो. असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय बाल दिन

महत्वाच्या घटना 

  • १७८९: न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.

  • १९१७: युक्रेन प्रजासत्ताक बनले.

  • १९४५: न्युरेम्बर्ग ट्रायल्स – दुसर्‍या महायुद्धातील गुन्ह्यांसाठी २४ जणांवर खटला सुरू झाला.

  • १९५९: युनायटेड नेशन्सने बालहक्कांच्या घोषणापत्राची दखल घेतली.

  • १९८५: मायक्रोसॉफ्ट विंडोज १.० प्रकाशीत झाले.

  • १९९४: भारताची ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड किताबाची मानकरी बनली.

  • १९९७: अमेरिकेच्या कोलंबिया या अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.

  • १९९८: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.

  • १९९९: आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर.

जन्म 

  • १८९२: इंसुलिन चे सह्संशोधक जेम्स कॉलिप यांचा जन्म. (मृत्यू:  १९ जून १९६५)

  • १९०५: संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित मिनोचर रुस्तुम तथा मिनू मसानी यांचा जन्म. (मृत्यू: २७ मे १९९८)

  • १९१०: डच भौतिकशास्त्र विलेम जेकब व्हान स्टाॅकम यांचा जन्म.

  • १९२४: फ्रेंच गणितज्ञ बेनुवा मँडेलब्रॉट यांचा जन्म.

  • १९२७: न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा जन्म.

  • १९३९: साहित्यिक वसंत पोतदार यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल २००३ – नाशिक)

  • १९४१: उर्दू लेखिका हसीना मोईन यांचा जन्म.

  • १९६३: इंग्लिश गणितज्ञ तिमोथी गॉवर्स यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८५९: स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन यांचे निधन. (जन्म: ६ ऑक्टोबर १७७९)

  • १९५४: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाइड व्हर्नन सेसेना यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १८७९)

  • १९७०: ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचे निधन. (जन्म: १४ जुलै १८८४)

  • १९७३: पत्रकार व समाजसुधारक केशव सीताराम ठाकरे यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८८५)

  • १९८४: लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९११)

  • १९८९: किरण घराण्याच्या प्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०५ – बडोदा)

  • १९९७: स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

  • २००३: सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचे पहिले राष्ट्राध्यक्ष डेव्हिड डेको यांचे निधन. (जन्म: २४ मार्च १९३०)

  • २००७: रोडेशिया देशाचे पहिले पंतप्रधान इयान स्मिथ यांचे निधन. (जन्म: ८ एप्रिल १९१९)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.