चालू घडामोडी आणि दिनविशेष - २० ऑक्टोबर २०१९

Date : 20 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महाराष्ट्रात ३,२३७ उमेदवारांपैकी महिला उमेदवार फक्त २३५ :
  • मागच्या चार विधानसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या वाढत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ३,२३७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात २३५ म्हणजे फक्त ७.३ टक्के महिला उमेदवार आहेत. महाराष्ट्रात एकूण २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात १५२ मतदारसंघातून महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. पण हे आरक्षण विधानसभा निवडणुकीला लागू होत नाही. पुरुष उमेदवारांच्या तुलनेत महिला उमेदवारांचे प्रमाण पाहिले तर हा आकडा उत्साहवर्धक वाटणार नाही. १९७२ साली एकूण ५६ महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. पण एकाही महिला उमेदवाराला विजय मिळवता आला नव्हता. पण आता परिस्थिती बदलतेय. विविध राजकीय पक्षातील महिला महापालिकेत, विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्यासाठी तिकीटाची मागणी करत आहेत. यावेळी राजकीय कुटुंबातील महिलांना मोठया प्रमाणावर उमेदवादी देण्यात आली आहे.

  • स्थानिक महिलांना कमी प्रमाणात तिकीटे मिळाली आहेत असे भाजपामधील एका महिला नेत्याने सांगितले. महाराष्ट्रात ८.९७ कोटी मतदार असून त्यात ४.३८ कोटी महिला मतदार आहेत. मुंबईत महिला मतदारांची संख्या लक्षणीय असली तरी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेतील त्यांचा सहभाग खूपच कमी आहे. 

हिटमॅन’ची गाडी सुस्साट, सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम मोडला :
  • सलामीवीर रोहित शर्माने झळकावलेल्या द्विशतकी खेळाच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांची कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना भारताचे ३ फलंदाज झटपट माघारी परतले होते. मात्र रोहित शर्माने आपला मुंबईकर साथीदार अजिंक्य रहाणेच्या साथीने द्विशतकी भागीदारी केली.

  • २१२ धावांवर रोहित कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर एन्गिडीकडे झेल देऊन माघारी परतला. या खेळीदरम्यान रोहितने ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रमही मोडला आहे.

  • घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये रोहितने ९९.८४ इतक्या सरासरीची नोंद केली आहे. रोहितने यादरम्यान डॉन ब्रॅडमन यांचा ९८.२२ च्या सरासरीचा विक्रमही मोडला.

  • दरम्यान षटकाराच्या सहाय्याने आपलं द्विशतक झळकावणारा रोहित शर्मा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

  • रोहित शर्माने २५५ चेंडूत २८ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने २१२ धावांची खेळी केली. दरम्यान आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत रोहितने सलामीवीर या नात्याने ५०० धावांचा टप्पाही पूर्ण केला.

कॉर्पोरेट करातील कपातीमुळे गुंतवणूक वाढेल, ‘आयएमएफ’ने केलं समर्थन :
  • केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी केलेल्या कंपनी करातील(कॉर्पोरेट टॅक्स) कपातीला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने(आयएमएफ) समर्थन दिले आहे. कॉर्पोरेट करामध्ये कपात करण्याचा निर्णय योग्य असून याचा भारतातील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम जाणवेल, असं आयएमएफनं म्हटलं आहे. तसंच, भारताने वित्तीय परिस्थितीची दीर्घकालीन स्थिरता सुरक्षित करावी असंही आयएमएफने नमूद केलं आहे.

  • भारताने कंपनी करात कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. या निर्णयाचा गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होईल, असे नाणेनिधीचे संचालक (आशिया पॅसिफिक विभाग) चांगयोंग री यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

  • भारताला अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मर्यादित वाव असल्याने त्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी, असेही चांगयोंग री म्हणाले. तर, भारतानं बिगर वित्तीय क्षेत्रातील मुद्द्यांवर उपाययोजना करायला हव्यात, असं मत आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या उपसंचालक अॅन्ने-मॅरी गुल्डे वॉफ यांनी व्यक्त केलं. याशिवाय, देशातील सध्याच्या मंदीच्या स्थितीमुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. हा दर सन २०२०मध्ये वाढून सात टक्के होऊ शकतो असा अंदाज आयएमएफने वर्तवला आहे.

  • केंद्र सरकारने गुंतवणूक आणि उत्पादनवाढीसाठी काही दिवसांपूर्वी कंपनी करात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विकास दरात घट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यानुसार, सवलत न घेणाऱ्या देशांतर्गत कंपन्यांना २२ टक्के आणि अधिभार आणि सेस मिळून एकूण २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. यापूर्वी कंपन्यांना ३० टक्के कर द्यावा लागत होता.

SBI च्या कोट्यवधी खातेदारांना झटका, एक नोव्हेंबरपासून ‘हा’ महत्त्वाचा बदल :
  • देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या बचत खात्यावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी SBI च्या कोट्यवधी खातेदारांना मोठा धक्का बसणार आहे.

  • व्याज दरातील कपात एक नोव्हेंबरपासून लागू होईल असं एसबीआयकडून सांगण्यात आलं आहे. बँक 1 लाख रुपयांच्या ठेवींवर पाव टक्क्यांनी कपात करणार आहे. परिणामी, नव्या नियमानुसार बचत खातेदारांना 1 लाख रुपयांच्या ठेवीवर मिळणारं व्याज साडेतीन टक्क्यांवरुन सव्वातीन टक्क्यांनी मिळेल. म्हणजेच व्याज दरात 0.25 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे.

  • यापूर्वी याच महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या रेपो रेटमध्ये कपात केली. त्यानंतर एसबीआयनेही आपल्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

कॉर्पोरेट करातील कपातीमुळे गुंतवणूक वाढेल, ‘आयएमएफ’ने केलं समर्थन :
  • केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी केलेल्या कंपनी करातील(कॉर्पोरेट टॅक्स) कपातीला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने(आयएमएफ) समर्थन दिले आहे. कॉर्पोरेट करामध्ये कपात करण्याचा निर्णय योग्य असून याचा भारतातील गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम जाणवेल, असं आयएमएफनं म्हटलं आहे. तसंच, भारताने वित्तीय परिस्थितीची दीर्घकालीन स्थिरता सुरक्षित करावी असंही आयएमएफने नमूद केलं आहे.

  • भारताने कंपनी करात कपात करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो. या निर्णयाचा गुंतवणुकीवर सकारात्मक परिणाम होईल, असे नाणेनिधीचे संचालक (आशिया पॅसिफिक विभाग) चांगयोंग री यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

  • भारताला अर्थव्यवस्था सावरण्यासाठी मर्यादित वाव असल्याने त्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी, असेही चांगयोंग री म्हणाले. तर, भारतानं बिगर वित्तीय क्षेत्रातील मुद्द्यांवर उपाययोजना करायला हव्यात, असं मत आशिया आणि पॅसिफिक विभागाच्या उपसंचालक अॅन्ने-मॅरी गुल्डे वॉफ यांनी व्यक्त केलं. याशिवाय, देशातील सध्याच्या मंदीच्या स्थितीमुळे चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ६.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे. हा दर सन २०२०मध्ये वाढून सात टक्के होऊ शकतो असा अंदाज आयएमएफने वर्तवला आहे.

१९ वर्षांच्या मेहनतीला यश, अमोल यादव यांच्या विमानाच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा :
  • नवी दिल्ली : मराठमोळे वैमानिक अमोल यादव यांची 19 वर्षांची मेहनत आणि संघर्ष अखेर फळाला आला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेलं पहिलं मेड इन इंडिया 6 सीटर विमानाला आज (19 ऑक्टोबर) डीजीसीएकडून प्रमाणपत्र मिळालं आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी 19 वर्षांच्या मेहनतीने हे विमान तयार केलं आहे. आता ते उड्डाण आणि चाचणीसाठी तयार आहे. एखाद्या भारतीयाने बनवलेल्या विमानाला 'स्पेशल परमिट टू फ्लाय'चं प्रमाणपत्र मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं अमोल यादव यांनी सांगितलं.

  • हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अमोल यादव आता स्वत: बनवलेल्या विमानाची चाचणी करु शकणार आहेत. यानंतर डीजीसीएच्या नियमानुसार विमानाची चाचणी घ्यावी लागेल आणि त्यानंतर त्याची बाजारात विक्री केली जाईल. "या वर्षाअखेरीस टेस्ट फ्लाय आणि इतर चाचण्यांची सर्व औपचारिकता पूर्ण करुन विमान बाजारात आणेन," असं अमोल यादव यांनी सांगितलं.

  • या स्पेशल परमिट टू फ्लायनंतर उड्डाणासाठी अमोल यादव यांना 14 दिवसांचा टेस्ट कोर्स करावा लागणार आहे, त्यानंतरच ते उड्डाण करु शकतात. महाराष्ट्र सरकारने धुळ्यात उपलब्ध करुन दिलेल्या एअर स्ट्रिपमध्ये अमोल आपल्या विमानाची चाचणी करतील. मागील 19 वर्षात अमोल यांनी आपली कमाई आणि कुटुंबाच्या मदतीने कोट्यवधी रुपये खर्च करुन हे विमान बनवलं आहे.

दिनविशेष :
  • जागतिक ऑस्टियोपोरोसिस दिन / जागतिक सांख्यिकी दिन

महत्वाच्या घटना 

  • १९४७: अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यात (पहिल्यांदाच) राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९५०: कृ. भा. बाबर यांनी समाजशिक्षणमाला स्थापन केली.

  • १९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.

  • १९६२: चीनने भारतावर आक्रमण केल्या मुळे चीन-भारत युद्धास सुरवात.

  • १९६९: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची (PDKV) अकोला येथे स्थापना.

  • १९७०: हरितक्रांतीचे जनक डॉ. नॉर्मन बोरलॉग यांना नोबेल पारितोषिक जाहीर.

  • १९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.

  • १९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.

  • १९९५: ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना मॅन ऑफ द सेंचुरी हा सन्मान जाहीर.

  • २००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना विष्णुदास भावे गौरवपदक जाहीर.

  • २०११: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.

जन्म 

  • १८५५: गुजराथी लेखक गोवर्धनराम त्रिपाठी यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई)

  • १८९१: अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चॅडविक यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै १९७४)

  • १८९३: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमो केन्याटा यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)

  • १९१६: लोकशाहीर मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख यांचा जन्म. (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)

  • १९२०: भारतीय वकील आणि राजकारणी सिद्धार्थ शंकर रे यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर २०१०)

  • १९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७)

  • १९६३: क्रिकेटपटू, समालोचक व खासदार नवजोत सिंग सिद्धू यांचा जन्म.

  • १९७८: भारतीय फलंदाज वीरेन्द्र सहवाग यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९०: ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर सर रिचर्ड बर्टन यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १८२१)

  • १९६४: अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष हर्बर्ट हूव्हर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८७४)

  • १९७४: प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८९८)

  • १९८४: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ पॉल डायरॅक यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)

  • १९९९: समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार माधवराव लिमये यांचे निधन.

  • २००९: गुप्तहेरकथालेखक वीरसेन आनंदराव तथा बाबा कदम यांचे निधन. (जन्म: ४ मे १९२९)

  • २०१०: क्रिकेटपटू पार्थसारथी शर्मा यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १९४८)

  • २०११: लिबीयाचे हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचे निधन. (जन्म: ७ जून १९४२)

  • २०१२: पृथ्वी दिनाची सुरवात करणारे जॉन मॅककनेल यांचे निधन. (जन्म: २२ मार्च १९१५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.