चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ मार्च २०२०

Updated On : Mar 21, 2020 | Category : Current Affairsमध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार कोसळलं, कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा : 
 • काँग्रेसला मध्य प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. याचा शेवट अखेर आज झाला. मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे.  मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी होण्याआधीच आपण राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे.

 • दुपारी १ वाजता राज्यपालांची भेट घेऊन आपण राजीनामा सोपवणार आसल्याचं त्यांनी सांगितलं. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की, “मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहे. राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपवणार. मी कधीही सौदेबाजीचं राजकारण केलं नाही. मी नेहमी स्वच्छ राजकारण केलं. पूर्ण मीडिया आणि जनतेला माहिती आहे की, १५ वर्षाच्या कार्यकाळात कोणीही माझ्याकडे बोट दाखवू शकत नाही. मी कधीही कोणत्या मुख्यमंत्र्याला फोन केला नाही. कधी कोणासाठी शिफारस केली नाही. फक्त विकासाचं काम केलं,” असं कमलनाथ यांनी यावेळी सांगितलं.

 • भाजपाने मध्य प्रदेशातील जनतेसोबत विश्वासघात केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. ज्योतीरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे मध्य प्रदेश सरकार अस्थिर झालं होत. आज पाच वाजेपर्यंत सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार होतं. त्याआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कमलनाथ यांनी राजीनामा देत असल्याची घोषणा केली.

 • ‘लोकांनी मला पाच वर्षांसाठी बहुमत दिलं होतं. पण आमच्याविरोधात षडयंत्र रचत भाजपाने जनतेला धोका दिला आहे,’ असं सांगितलं. कमलनाथ यांनी यावेळी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला.

२०० नागरिकांच्या मृत्यूनंतर अमेरिकेने घेतला मोठा निर्णय :
 • करोना व्हायरसने अमेरिकेतही थैमान घातलं असून आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे. यामुळे अमेरिकन सरकारने लोकांना आपल्या घऱी परतण्याचा किंवा परदेशात अनिश्चित काळासाठी थांबण्यास सांगितलं आहे. दरम्यान करोनाचा सामना करण्यासाठी सरकारने एक ट्रिलियन डॉलर खर्च करण्याची योजना जाहीर केली आहे.

 • करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी अमेरिकन सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून लोकांच्या प्रवासावर निर्बंध आणण्यात आले आहेत. सीमारेषाही अमेरिकेकडून बंद केल्या आहेत. सर्वसामान्य जीवनावर परिणाम झाला असून शाळा तसंच अनेक व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. लाखो लोक घरुन काम करण्याला प्राधान्य देत आहेत.

 • अमेरिकेने आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या नागरिकांना स्पष्ट सांगितलं आहे की, “तुमची योजना विस्कळीत होऊ शकतो आणि कदाचित तुम्हाला अनिश्चित काळासाठी देशाबाहेर थांबावं लागू शकतं”. करोना व्हायरसचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही पडत असून स्टॉक मार्केटला मोठा फटका बसला आहे.

 • डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला करोनाकडे गांभीर्याने न पाहिल्याचे परिणाम दिसायला लागले असून त्यांनी आता तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील १२,२६० लोकांना करोनाची लागण झालेली असून आतापर्यंत २०० जणांचा बळी गेला आहे. करोनाचे सर्वात जास्त रुग्ण वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये आहेत. लॉस एंजेलिसमध्ये सर्व शॉपिंग सेंटर्स आणि महत्त्वाचे नसणारे सर्व व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच नागरिकांना १० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र जमू नये असा आदेश दिला आहे.

करोनाने घेतला आणखी एक बळी, देशात पाचव्या मृत्यूची नोंद : 
 • करोना व्हायरस रोखण्यासाठी प्रयत्न सुरु असताना देशात पाचव्या मृत्यूची नोंद झाली आहे. इटलीहून भारतात आलेल्या ६९ वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतात सापडलेल्या करोना रुग्णांच्या पहिल्या बॅचमध्ये या नागरिकाचा समावेश होता.

 • ह्दय बंद पडल्याने राजस्थानमधील जयपूरमध्ये या नागरिकाचा मृत्यू झाला. “६९ वर्षीय इटालियन नागरिकाचा ह्रदय बंद पडल्याने जयपूरमधील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे,” अशी माहिती पीटीआयने रुग्णालयातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे.

 • रुग्णालयाने दिलेल्या माहितीनसुार, रुग्णावर यशस्वी उपचार झाले होते आणि करोनातून त्यांची मुक्तता झाली होती. पण त्यांचा मृत्यू करोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्यसंबंधी कारणांमुळे झाला की नाही याबद्दल स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. 

 • आतापर्यंत भारतात करोनाची लागण झाल्याची २०४ प्रकरणं आली असून चार मृत्यूंची नोंद झाली आहे. हे चार मृत्यू दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये झाले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मृत्यू झालेल्या सर्व व्यक्ती ६० किंवा त्याहून जास्त वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत.

गुजरातच्या कंपनीला करोना व्हायरसचे टेस्ट किट बनविण्याचा परवाना : 
 • अहमदाबाद येथील कोसारा डायग्नोस्टिक या कंपनीला सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) कडून करोनाव्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळाला आहे. भारतात करोना व्हायरस टेस्ट किट बनविण्याचा परवाना मिळवणारी ही पहिलीच कंपनी आहे. या किटवद्वारे अडीच तासामध्ये करोना व्हायरस संबधित चाचणी होवू शकते असा दावा या कंपनीने केला आहे. कोसारा डायग्नोस्टिक्स ही कंपनी अमेरिकेच्या को-डायग्नोस्टिक्स इंक आणि भारतीय अंबालाल साराभाई एंटरप्रायजेस या अन्य कंपन्यासोबत काम करते.

 • कोसारा डायग्नोस्टिक्सने परवाना मिळवण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे एका महिन्यापूर्वी अर्ज केला होता. मंगळवारी त्यांना याचा परवाना मिळाला. अहमदाबाद मिररने या संदर्भात वृत्त दिले आहे.

 • कोविड १९ वर कोणतीही लस आतापर्यंत उपलब्ध नसल्याने त्याचे निदान करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या किटची मागणी पूर्ण करण्याची क्षमता आमच्य़ाकडे आहे अशी माहिती को. डायग्नोस्टिक्स इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ड्वेइट इगन यांनी दिली आहे.

महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे निधन : 
 • भारताचे महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पावला आणि पूर्णा या मुली तसेच धाकटा भाऊ व तृणमूल काँग्रेसचा खासदार प्रसून बॅनर्जी असा परिवार आहे.

 • भारतीय फुटबॉलचा सुवर्णकाळ अनुभवताना आघाडीवीर म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. १९६२च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली होती. बॅनर्जी हे बऱ्याच काळापासून न्यूमोनियामुळे श्वसनासंबंधीच्या आजाराने त्रस्त होते. पार्किन्सनच्या आजारामुळे त्यांना हृदयासंबंधीच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. २ मार्चपासून त्यांना जीवनप्रणालीवर ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

 • पश्चिम बंगालमधील जलपायगुरी येथे २३ जून १९३६ जन्मलेल्या बॅनर्जी यांचे कुटुंब फाळणीच्या आधी जमशेदपूर येथे राहात होते. १९६०च्या रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रान्सविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सोडवणारा गोल लगावला होता. त्याचबरोबर १९६२च्या जकार्ता आशियाई स्पर्धेत त्यांनी भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.

 • भारतीय फुटबॉलमधील उल्लेखनीय योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) बॅनर्जी यांचा २०व्या शतकातील भारताचे महान खेळाडू म्हणून गौरव केला होता. तसेच त्यांना विशेष सन्माननीय पदकही फिफाकडून देण्यात आले होते.

अमेरिकन ग्रँडस्लॅमनंतर फ्रेंच स्पर्धेचे आयोजन गैरसोयीचे : 
 • न्यूयॉर्क : फ्रेंच ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा पुढे ढकलून अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा झाल्यानंतर घेण्याच्या योजनेमुळे वाद निर्माण झाला असून, मातब्बर टेनिसपटूंनी त्याला विरोध के ला आहे.

 • करोनामुळे मे महिन्यात होणारी फ्रेंच ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा २० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान आयोजित करणार असल्याचे घोषित करण्यात आले. मात्र या तारखा म्हणजे २४ ऑगस्ट ते १३ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या अमेरिकन खुली ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा संपल्यानंतर एका आठवडय़ानंतरच्या आहेत. या स्पर्धेनंतर अमेरिकेतील बोस्टन येथे लेव्हर चषक टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यात स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररसारखे अव्वल खेळाडू सहभागी होणार आहेत.

 • लेव्हर चषक टेनिस स्पर्धेदरम्यानच फ्रेंच ग्रॅँडस्लॅम टेनिस स्पर्धा आयोजित करण्याचे संकेत दिल्यामुळे टीकेची झोड उठली आहे. २४  मेपासून प्रस्तावित असणाऱ्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या आयोजकांनी कोणाशीही चर्चा न करता थेट स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.  त्यातच व्यावसायिक पुरुष टेनिस संघटना (एटीपी)  आणि महिला टेनिस संघटनेच्या (डब्ल्यूटीए) स्पर्धा याआधीच एप्रिल आणि मेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. 

 • फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या आयोजकांनी थेट स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असला तरी अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या आयोजकांनी तसा निर्णय दिलेला नाही. ‘‘करोनामुळे अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा सध्या तरी विचार नाही,’’ असे अमेरिकन टेनिस संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

२१ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)