चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ नोव्हेंबर २०१९

Date : 21 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आसाममध्ये ‘एनआरसी’ची प्रक्रिया नव्याने करण्याची राज्य सरकारची मागणी : 
  • आसाममध्ये पार पडलेली राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) प्रक्रिया आपल्याला मान्य नसून, देशाच्या इतर भागांसोबत आसाममध्ये नव्याने एनआरसीची प्रक्रिया अमलात आणली जावी, अशी मागणी राज्य सरकारने गुरुवारी केली. आसामच्या अंतिम राष्ट्रीय नागरिक नोंदणीतून १९ लाखांहून अधिक लोक वगळण्यात आले असून, त्यांपैकी अनेक हिंदू असल्याबाबत भाजपने यापूर्वीच आवाज उठवला आहे.

  • केंद्र सरकारने आसामची अंतिम एनआरसी अमान्य करावी आणि संपूर्ण देशभर नव्याने एनआरसीची प्रक्रिया करावी, अशी मागणी आसामचे अर्थमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. ‘ही एनआरसी राज्य सरकार मान्य करू शकत नाही. एनआरसीत ज्यांचा समावेश करायला नको होता, त्यांचा करण्यात आला आहे आणि ज्यांना समाविष्ट करायला हवे होते, त्यांची नावे वगळण्यात आली आहेत,’ असे ते म्हणाले.

  • संपूर्ण देशभरात एनआरसीची प्रक्रिया अमलात आणण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचे सरमा यांनी स्वागत केले. मात्र, आधी आसाममधील सध्याची एनआरसी फेटाळायला हवी. त्यानंतर, राष्ट्रीय नागरिक नोंदणीची प्रक्रिया करून त्यात आसामला सहभागी करायला हवे. शक्य असेल, तर देशभरातील एनआरसीकरिता एकच पात्रता तारीख (कट-ऑफ डेट) असायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.

जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धा’ - सागर कातुर्डेला सुवर्णपदक : 
  • महाराष्ट्राच्या सागर कातुर्डे याने जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत ७५ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवत आपले स्वप्न साकार केले. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि वीरेश धोत्रे या शरीरसौष्ठवपटूंनीही रौप्यपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेत भारताच्या चित्रेश नटेशन याने सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

  • दक्षिण कोरियातील जेजू आयलंड येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत भारताने सर्वाधिक यश संपादन केले. सहावेळा ‘भारत श्री’ तसेच ‘महाराष्ट्र श्री’ आणि ‘मुंबई श्री’ किताब पटकावणाऱ्या सागरने आपल्या गटात भारताच्याच जयप्रकाश आणि सतीशकुमार यांच्यावर सरशी साधत सोनेरी यश संपादन केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याचे हे पहिलेच पदक ठरले.

  • १०० किलो वजनी गटात रोहित शेट्टीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या गटात भारताच्या दयानंद सिंगने सुवर्णपदक पटकावले. वीरेश धोत्रेनेही रौप्यपदकी कामगिरी साकारली.

शबरीमला मंदिराच्या प्रशासनासाठी वेगळा कायदा करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश :
  • शबरीमला मंदिराच्या प्रशासकीय बाबींसाठी वेगळा कायदा केरळ सरकारने करावा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला आहे. न्या. एन.व्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सांगितले की, या कायद्याचा मसुदा नवीन वर्षांत जानेवारीच्या तिसऱ्या आठवडय़ापर्यंत सादर करण्यात यावा.

  • शबरीमला हे प्राचीन देवस्थान असून भक्त कल्याणाच्या पैलूंसह अनेक बाबींच्या समावेशासह नवीन कायदा तयार करण्यात यावा असे न्यायालयाने म्हटले आहे.

  • राज्याच्या वकिलांनी बाजू मांडताना सांगितले की, ‘आम्ही सध्याच्या कायद्यात सुधारणा केल्या असून त्याच्या माध्यमातून मंदिर व इतर व्यवस्थापनाचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील. या मंदिराचे व्यवस्थापन त्रावणकोर देवासम मंडळ करीत आहे. नवीन कायद्यातील सुधारणांचा मसुदा  हा मंदिर सल्लागार समितीत एक तृतीयांश महिलांना समाविष्ट करण्यात येणार आहे.’

राष्ट्रीय नागरिक नोंदणी देशभरात : 
  • राष्ट्रीय नागरिक नोंदणीची (एनआरसी) प्रक्रिया देशभरात अमलात आणली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सांगितले. या प्रक्रियेत धर्माच्या आधारे कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • शहा यांनी देशव्यापी एनआरसी प्रक्रियेचे सूतोवाच केलेले असतानाच, आपण आपल्या राज्यात ही प्रक्रिया होऊ देणार नाही, असे आश्वासन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी लोकांना दिले. कुणाचाही धर्म लक्षात न घेता भारताच्या सर्व नागरिकांचा राष्ट्रीय नागरिक नोंदणी यादीत समावेश केला जाईल, असे शहा यांनी राज्यसभेत सांगितले. इतर धर्माच्या लोकांचा या यादीत समावेश करण्यात येणार नाही अशी कुठलीही तरतूद एनआरसीमध्ये नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • धार्मिक अत्याचारांमुळे पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान सोडून गेलेल्या हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती, शीख व पारशी या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळावे, अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे शहा म्हणाले.

बीएसएनएलच्या ७७ हजार कर्मचाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज : 
  • आर्थिक चणचणीत असलेल्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ (बीएसएनएल)ने आर्थिक मदतीची केंद्र सरकारने घोषणा केल्याच्या आठवड्याभरात कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणारी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजना जाहीर केली होती.

  • बीएसएनएलचे ७० ते ८० हजार कर्मचारी योजनेत पात्र ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तसेच, यातून कंपनीला वर्षांला ७,००० कोटी रुपयांच्या वेतन खर्चात बचत शक्य होणार असल्याचेही सांगण्यात आले होते. यानंतर आतापर्यंत स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेल्या कर्मचाऱ्यांचा आकडा ७७ हजारांवर गेला आहे. सध्या बीएसएनएलमध्ये १ लाख ५० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी १ लाख कर्मचारी व्हीआरएसच्या कक्षेत येतात. ३ डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार आहे.

  • बीएसएनएलच्या अधिकारी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ७७ हजार पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय निवडला आहे.कर्मचारी स्वेच्छानिवृत्ती योजना ४ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, ३ डिसेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.

‘एमटीएनएल’च्या १३ हजार ५३२ कर्मचाऱ्यांचे ‘व्हीआरएस’साठी अर्ज : 
  • भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) नंतर आता महानगर टेलीफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)च्या कर्मचाऱ्यांकडून देखील स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) योजनेस मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आतापर्यंत एमटीएनएलच्या तब्बल १३ हजार ५३२  कर्मचाऱ्यांकडून व्हीआसएससाठी अर्ज करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

  • किमान १३ हजार ५०० कर्मचारी व्हीआरएस घेतील असा एमटीएनएलला अंदाज होता. मात्र आता हा आकडा त्यापेक्षाही पुढे गेल्याचे दिसत आहे. व्हीआरएससाठी अर्ज करण्याची मुदत संपण्यास अद्याप दोन आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ३ डिसेंबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

  • एमटीएनएलचे अध्यक्ष सुनील कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, आम्हाला मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. कंपनीकडून होईल तितक्या कर्मचाऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आम्हाला अपेक्षित होते त्यापेक्षा अधिक कर्मचाऱ्यांकडून अर्ज आले आहेत, हा आकडा किमान १४ ते १५ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. एकूण १६ हजार ३०० कर्मचारी व्हीआरएससाठी पात्र आहेत.

राष्ट्रीय टेबल  टेनिस स्पर्धा - महाराष्ट्राला एक सुवर्ण, दोन कांस्यपदके : 
  • महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडूंनी यूटीटी कॅडेट आणि उपकनिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत एक सुवर्ण व दोन कांस्यपदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या उपकनिष्ठ मुलांच्या संघाने तामिळनाडूवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले.

  • आदिल आनंद आणि राजवीर शाह यांनी चमकदार कामगिरी करत महाराष्ट्राला तमिळनाडूवर ३-२ असा विजय मिळवून दिला. आदिलने अरुण शनमुगमला ३-० असे हरवले. त्याआधी राज प्रेयेश सुरेश याने तामिळनाडूसाठी ३-० असा विजय नोंदवला.

  • आदिलने हविश असरानीसह खेळताना राज व अरुण जोडीला ३-१ असे नमवत महाराष्ट्राला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. आदिलला राजकडून ०-३ असे पराभूत व्हावे लागल्याने सामना २-२ असा रंगतदार स्थितीत पोहोचला. पण राजवीरने संयमाने खेळ करत अरुणवर ३-१ असा विजय नोंदवत महाराष्ट्राला जेतेपद मिळवून दिले.

  • दरम्यान तनिशा कोटेचा, पृथा वर्थीकर व संपदा भिवंडकर या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला उपांत्य फेरीत हरयाणाच्या सुहाना सैनी, प्रेक्षा वोहराकडून १-३ असे पराभूत व्हावे लागले. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने कर्नाटकला ३-२ असे पराभूत केले होते.

दिनविशेष :
  • जागतिक टेलीव्हिजन दिन

महत्वाच्या घटना 

  • १८७७: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफ शोधाची घोषणा केली.

  • १९११: संसदेच्या निवडणुकीत  उभे राहता यावे आणि मतदानाचा अधिकार मिळावा म्हुणुन लंडनमध्ये स्त्रियांनी केलेल्या मोर्च्यावर व्हाईट हॉल येथे घोडेस्वार पोलिसांनी लाठी हल्ला केला.

  • १९५५: संयुक्त महाराष्ट्रसाठी लढा पुकारला.

  • १९६२: भारताचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती झाली.

  • १९६२: भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.

  • १९७१: भारीतय वायुदलाची पाकिस्तानी सैन्याशी बांगलादेश मुक्ती युद्धातील गरीबपुरच्या लढाईत पहिली चकमक. पाकिस्तानचा सपशेल पराभव.

जन्म 

  • १६९४: फ्रेंच तत्त्वज्ञानी व्हॉल्तेर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १७७८)

  • १८९९: ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री हरेकृष्णा महाबत यांचा जन्म. (मृत्यू: २ जानेवारी १९८७)

  • १९१०: चीनी भाषेतील लेखक छ्यान चोंग्शू यांचा जन्म.

  • १९२६: हिंदी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते प्रेम नाथ यांचा जन्म. (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)

  • १९८७: भारतीय बुद्धीबळपटू ईशा करवडे यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९०८: देशभक्त सत्येंद्रनाथ बोस यांना अलीपूर कारागृहात फाशी.

  • १९६३: प्रसिद्ध विनोदी लेखक चिंतामण विनायक जोशी यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १८९२)

  • १९७०: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकटरमण (सी. व्ही. रमण) यांचे निधन. (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)

  • १९९६: भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते एकमेव पाकिस्तानी डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम यांचे निधन. (जन्म: २९ जानेवारी १९२६ – संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)

  • १९९७: आचार्य बाळाराव सावरकर यांचे निधन.

  • २०१५: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि राजकारणी अमीन फहीम यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १९३९)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.