चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ ऑक्टोबर २०१९

Date : 22 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास सरकारी नोकरी नाही :
  • दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास यापुढे सरकारी नोकरीला मुकावं लागणार आहे. आसाममधील भाजपा सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आसाममधील वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. ज्यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना १ जानेवारी २०२१ नंतर सरकारी नोकरीमध्ये सामावून घेतलं जाणार नाही. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आसामच्या जनसंपर्क विभागानं या निर्णयासंबंधी माहिती दिली.

  • छोटं कुटुंब पद्धतीनुसार १ जानेवारी २०२१ नंतर ज्या कुटुंबांमध्ये दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावं लागणार असल्याचं निर्णयात म्हटलं आहे. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अन्य मुद्द्यांवरही निर्णय घेण्यात आले. या अंतर्गत जमीन धोरणही मंजुर करण्यात आलं. भूमिहीन लोकांना शेतजमीन आणि घरं बांधण्यासाठीदेखील जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • यापूर्वी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती. तसंच वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी पुढील पिढीनं विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला होती. वाढती लोकसंख्या हे आपल्या देशापुढील मोठं आव्हान आहे.

  • छोटं कुटुंब असणं हीदेखील देशभक्ती असल्याचं मत पंतप्रधानांनी बोलताना व्यक्त केलं. ज्यांच कुटुंब लहान आहे ते सन्मानाचे मानकरी आहेत. वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी जनजागृती होणं आवश्यक आहे. यासाठी सामाजिक स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन केलं पाहिजे, असंही त्यांनी नमूद केलं होतं.

सियाचीन पर्यटकांसाठी खुलं; संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची घोषणा :
  • जगातील सर्वांत उंचावरील युदधभूमी असलेल्या सियाचीन ग्लेशरचा भाग हा पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी याची अधिकृत घोषणा केली. सियाचीन बेस कॅम्प ते कुमार पोस्टपर्यंतचा सर्व भाग हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

  • लडाखमधील श्योक नदीवरील कर्नल चेवांग रिंचेन पुलाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राजनाथ म्हणाले, “लडाखमध्ये पर्यटनासाठी प्रचंड वाव आहे. लडाखमधील उत्तम कनेक्टिव्हीटी पर्यटकांना नक्कीच मोठ्या संख्येने इकडे खेचून घेऊन येईल. हा नवा पूल सर्व प्रकारच्या वातावरणातील बदलतातही या भागाला जोडून ठेवेल. तसेच सीमाभागात एक मोक्याची जागा म्हणून तो नावारुपाला येईल.”

  • भारत-चीन संबंधांवर बोलताना राजनाथ म्हणाले, “भारताने चीनसोबत सहकार्याचे संबंध प्रस्थापित केले आहेत. येथे फक्त दोन्ही देशांच्या दृष्टीकोनात फरक आहे. दोन्ही देशांमध्ये सीमेवरुन वाद आहेत मात्र, हे वाद योग्य समज आणि जबाबदारीने हाताळले जात आहेत.”

  • काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे चीननेही मान्य केले आहे त्यामुळेच चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी काश्मीरचा विषय काढला नाही, असेही यावेळी राजनाथ सिंह म्हणाले.

गुड न्यूज… जवान कुटुंबासोबत दरवर्षी घालवणार शंभर दिवस; अमित शाहांचे दिवाळी गिफ्ट :
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना एक महत्वाचा आदेश दिला आहे. सीआरपीएफच्या जवानांना कमीत कमी १०० दिवस आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल अशापद्धतीने त्यांची नियुक्त करा असं शाह यांनी सांगितले आहे.

  • २३ सप्टेंबर रोजी अमित शाह यांनी पोलीस टू डिव्हिजनची कामे काय असतात यासंदर्भात झालेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रेझेंटेशनदरम्यान त्यांनी या सूचना केल्या. या प्रेझेंटेशनमध्ये केंद्रीय सुरक्षादलाच्या जवानांची नेमणूक दिर्घकाळासाठी घरापासून दूरवर केल्यास त्यांना काय काय त्रास होतो यासंदर्भात भाष्य करण्यात आले होते. शाह यांनी एक सॉफ्टवेअर निर्माण करण्याचा सल्ला दिला आहे.

  • या सॉफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करण्यात येणाऱ्या जवानांची सर्व माहितीचा आढावा घेतला जाईल. या माहितीच्या आधारे त्यांची नियुक्ती अशापद्धतीने केली जाईल की त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर महिन्यातले कमीत कमी शंभर दिवस तरी एकत्र राहता येईल. सध्या वापरण्यात येणाऱ्या लेखी नियुक्तीपेक्षा या सॉफ्टवेअरच्या मदतीने कोणत्या जवानाला कुठे नियुक्त करावे हे अगदी सोप्या पद्धतीने ठरवता येईल.

  • केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सीआरपीएफ, इंडो तिबेटीयन पोलिस दल (आयटीबीपी), राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी), सीमा सुरक्षा दल (एसएसबी), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना पत्र लिहून यासंदर्भातील सूचना केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले आहेत.

महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र!’ साध्वींचे वादग्रस्त वक्तव्य :
  • भोपाळ : वादग्रस्त विधाने करून पक्षाला अडचणीत आणणाऱ्या भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म. गांधीजींचा ‘राष्ट्रपिता’ऐवजी ‘राष्ट्रपुत्र’ असा उल्लेख केल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची लक्षणे दिसत आहेत.

  • म. गांधीजी हे राष्ट्रपुत्र असून देश त्यांच्यावर कायम प्रेम करीत राहील, असे ठाकूर यांनी भोपाळमध्ये माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. म. गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त भाजपने मध्य प्रदेशात गांधी संकल्प यात्रेचे आयोजन केले होते, मात्र ठाकूर त्यामध्ये सहभागी झाल्या नव्हत्या. त्यानंतर त्यांनी हे विधान केले आहे. त्या म्हणाल्या, की गांधीजी हे राष्ट्राचे पुत्र आहेत, त्यांच्याबद्दल आपल्या मनात आदराचीच भावना आहे, त्यामुळे आता कसलेही स्पष्टीकरण देण्याची आपल्याला गरज नाही, देशासाठी ज्यांनी काम केले ते सर्वजण आपल्यासाठी आदरणीय आहेत.

  • म. गांधीजींनी सांगितलेल्या मार्गावर आपण कायम चालत राहू, असे यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म. गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याचा राष्ट्रभक्त असा उल्लेख केला होता. त्यावरून गदारोळ माजला होता.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय बोबडी बोली जागरूकता दिन / आंतरराष्ट्रीय कॅप्स लॉक दिन

महत्वाच्या घटना 

  • १६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.

  • १७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.

  • १९२७: निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.

  • १९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.

  • १९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.

  • १९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.

  • १९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल कोट ऑफ आर्म्स पुरस्कार जाहीर.

  • २००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.

  • २००८: भारताने पहिल्या मानवविरहित चांद्रयान-१ चे प्रक्षेपण केले.

जन्म 

  • १६८९: पोर्तुगालचा राजा जॉन (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १७५०)

  • १८७३: अमृतानुभवी संत तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ स्वामी रामतीर्थ यांचा जन्म. (मृत्यू: १७ ऑक्टोबर १९०६)

  • १९००: भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)

  • १९४२: आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार रघूवीर सिंह यांचा जन्म. (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ – न्यूयॉर्क)

  • १९४७: भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक दीपक चोप्रा यांचा जन्म.

  • १९४८: इंग्लंडचा गोलंदाज माईक हेंड्रिक यांचा जन्म.

  • १९८८: भारतीय अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९१७: इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचे निधन.

  • १९३३: थोर देशभक्त बॅ. विठ्ठलभाई पटेल यांचे निधन. (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)

  • १९७८: साहित्यिक व वक्ते नारायण सीताराम तथा ना. सी. फडके यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)

  • १९९१: देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक ग. म. सोहोनी यांचे निधन.

  • १९९८: हिंदी चित्रपटांतील खलनायक अजित खान ऊर्फ अजित यांचे निधन. (जन्म: २७ जानेवारी १९२२)

  • २०००: अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती अशोक मोतीलाल फिरोदिया यांचे निधन.

  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.