चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ डिसेंबर २०१९

Date : 23 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते जी. नंजुंदन घरात मृतावस्थेत : 
  • प्रख्यात अनुवादक आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते जी. नंजुंदन हे शनिवारी बंगळूरुतील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळले. बंगळूरु शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरु विद्यापीठात नोकरी करणारे नंजुंदन हे बुधवारपासून कामावर गेले नव्हते आणि तेव्हापासून त्यांचा भ्रमणध्वनीही बंद होता.

  • ५८ वर्षांचे नंजुंदन हे बंगळूरु विद्यापीठाच्या जननभारती परिसरात सांख्यिकी शास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करत होते आणि जवळच असलेल्या नागदेवनहळ्ळी भागात राहात होते. घरी ते एकटेच राहात होते. त्यांची पत्नी व मुलगा चेन्नईला राहतात, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

  • पोलिसांच्या सांगण्यानुसार, नंजुंदन यांच्या विभागातील एक सहाय्यक त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांच्या घरी गेला. ‘त्याला काही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हा त्याने प्राध्यापकांच्या चेन्नईतील कुटुंबाला कळवले. या कुटुंबाने आमच्याशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्यांच्या घरी जाऊन दार तोडले, तेव्हा नंजुंदन यांचा कुजलेला मृतदेह आत आढळला’, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.

  • निरनिराळ्या कन्नड लेखकांच्या कथांचे संकलन असलेल्या ‘अक्का’च्या तमिळमध्ये केलेल्या अनुवादासाठी नंजुंदन यांना २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. ज्ञानपीठ विजेते यू. आर. अनंतमूर्ती यांच्या ‘भावा’ आणि ‘अवस्थे’  यांच्यासह इतर अनेक कन्नड साहित्यकृतींचाही त्यांनी तमिळमध्ये अनुवाद केला होता.

महाराष्ट्रातील पहिले वृक्षसंमेलन बीडला : 
  • ‘मी अन् माझे’ इतकाच संकोचित विचार न करता प्रत्येकाने पर्यावरणाच्या समर्थनासाठी पुढाकार घेतला पाहिजे. झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन वृक्षलागवड करून ती जगवावीत, असे सांगत आणि ‘येऊन येऊन येणार कोण? झाडाशिवाय आहेच कोण!’ अशी घोषणा देत चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते सयाजी िशदे यांनी सह्यद्री देवराई प्रकल्पात वृक्ष संगोपनाची चळवळ गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच जानेवारीत शेवटच्या आठवडय़ात महाराष्ट्रातील पहिले वृक्ष संमेलन बीड येथे घेण्याची घोषणाही त्यांनी केली.

  • बीड  शहराजवळ पालवण येथील वनविभागाच्या दोनशे हेक्टर परिसरात मागील काही दिवसांपासून सह्यद्री देवराई हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प आकाराला आला आहे. अभिनेते सयाजी िशदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून या ठिकाणी काम सुरू केले आहे. विविध जातीच्या पावणे दोन लाख वृक्षांची या ठिकाणी लागवड करण्यात आली असून काही दिवसात हा ऑक्सिजन झोन तयार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  • २१ डिसेंबर रोजी सह्यद्री देवराई प्रकल्पात जाऊन सयाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी शासन आणि लोकसहभागातून प्रयत्न करण्याचा मनोदय व्यक्त केला. मी अन् माझे इतकाच संकोचित विचार न करता झाडांमुळे मिळणाऱ्या शुध्द हवेचे महत्त्व लक्षात घेऊन झाडे जगवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहन केले.

  • महाराष्ट्रातील पहिले वृक्ष संमेलन जानेवारी महिन्यातील शेवटच्या आठवडय़ात देवराई प्रकल्पात घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. या संमेलनाला राज्यभरातील पर्यावरण तज्ज्ञ उपस्थित राहणार असून वृक्ष पालखी काढण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अरिवद जगताप आदी उपस्थित होते.

आसाम - मूळ आसामींना जमीन हक्काची हमी; सरकार कायद्यात करणार सुधारणा : 
  • सुधारित नागरिकत्व कायद्याला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आसाम सरकारच्या मंत्रिमंडळाने शनिवारी अनेक दिलासादायक निर्णय घेतले. यामध्ये इथल्या आदिवासींना जमीन हक्काची हमी देखील सरकारने दिली आहे. यासाठी राज्यातील जुन्या जमीन हक्क कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. कॅबिनेट मंत्री हिमांता बिस्वा शर्मा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

  • शर्मा म्हणाले, “राज्य सरकार इथल्या मूळ लोकांसाठी कायद्यात बदल करणार आहे. या बदलानुसार, अशा मूळ स्थानिक आसामी लोकांसाठी जमिनीचे हक्क राखीव ठेवण्यात येणार आहेत. यासाठी जमीन हक्कांबाबतचे नवे सुधारित विधेयक पुढील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होऊन त्याची एकदा अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर केवळ या मूळ आसामी लोकांनाच इथल्या जमिनी विकता येतील तसेच विकत घेता येतील.”

  • शर्मा म्हणाले, “राज्य सरकारकडून असमी भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. सर्व भारतीय राज्यांची निर्मिती ही मूळतः भाषेच्या आधारावरच करण्यात आली होती. मात्र, विस्थापनामुळे राज्यांची भाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी होऊ शकते. त्यामुळे भाषिक राज्यांच्या निर्मितीच्या आधारवर इथली भाषा असमीच असणे महत्वाचे आहे. त्यामुळे याबाबत राज्याच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेण्यात आला की, भारताच्या संविधानातील कलम ३४५ मध्ये सुधारणा करुन केंद्र सरकारने असमी भाषेला बराक घाटी, बीटीएडी विभाग आणि डोंगराळ भागातील जिल्ह्यांसाठी वगळता उर्वरित आसाममध्ये राज्य भाषा म्हणून मान्यता द्यावी.”

कर्नाटक, गोव्यापेक्षाही महाराष्ट्रातील बंदरे प्लास्टिकग्रस्त : 
  • कर्नाटक व गोव्याच्या सागरी बंदरांपेक्षा महाराष्ट्रातील बंदरांवर प्लास्टिक प्रदूषण अधिक आहे असे एका अभ्यासात दिसून आले आहे. या प्लास्टिकचे स्वरूप ‘सूक्ष्म’ व ‘स्थूल’ प्लास्टिक असे आहे. सागर किनारी असलेल्या प्लास्टिक उद्योगांमुळे हे प्रदूषण होत असून त्यात पर्यटनामुळे भर पडत आहे.

  • गोव्यातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी या संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील बंदरांवर भरतीच्या वेळी मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक घटक दिसून आले आहेत त्या तुलनेत कर्नाटक व गोव्यातील बंदरांवर हे प्रमाण कमी होते. महाराष्ट्रातील बंदरानजीक पेट्रोलियम उद्योग, प्लास्टिक उद्योग आहेत शिवाय पर्यटकही मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिक कचरा टाकत असतात. त्यामुळे हे प्रदूषण जास्तच आहे.

  • ‘अ‍ॅसेसमेंट ऑफ मॅक्रो अँड मायक्रो प्लास्टिक अँलाँघ दी वेस्ट कोस्ट ऑफ इंडिया- अ‍ॅबंडन्स, डिस्ट्रीब्यूशन, पॉलिमर टाइप अँड टॉक्सिसिटी,’ हा संशोधन अहवाल नेदरलँडस येथील ‘केमोस्फिअर’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. सूक्ष्म व स्थूल प्लास्टिक घटकांचे निरीक्षण गेली दोन वर्षे पश्चिम भारतातील दहा किनाऱ्यांवर करण्यात आले व त्याचे सागरी जीवांवर होणारे विषारी परिणामही तपासण्यात आले. प्लास्टिक प्रदूषक घटकात रंगीबेरंगी प्लास्टिक घटक सापडले असल्याचे एनआयओच्या वैज्ञानिक महुआ साहा व दुष्यमंत महाराणा यांनी म्हटले आहे.

शहांच्या भूमिकेला नरेंद्र मोदींचा छेद : 
  • राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी)संसदेतच नव्हे, तर मंत्रिमंडळातही चर्चा झाली नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रामलिला मैदानावरील जाहीर सभेत स्पष्ट केले. सुधारित नागरिकत्व कायद्यापाठोपाठ देशभर ‘एनआरसी’ राबवण्याच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याला त्यांनी छेद दिला.

  • देशभर ‘एनआरसी’ राबवणारच असे गृहमंत्री शहा लोकसभेत आणि झारखंडमधील निवडणूक प्रचारसभेतही म्हणाले होते. पंतप्रधानांनी मात्र ‘एनआरसी’बाबत संसदेत चर्चा झाली नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार केवळ आसाममध्ये ‘एनआरसी’ राबवण्यात आली, असे स्पष्ट केले. ‘एनआरसी’विषयी असत्य माहिती पसरवण्यात येत असल्याचे भाष्य करत, मुळात ही कल्पना आधीच्या काँग्रेस सरकारचीच आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • सुधारित नागरिकत्व कायदा आणि ‘एनआरसी’बद्दल भारतीय मुस्लिमांनी भीती बाळगण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करून मोदी म्हणाले, माझे विरोधक मला लक्ष्य करण्यासाठी लोकांना भडकावून देशात दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिमांना स्थानबद्धता छावण्यांमध्ये (डिटेन्शन सेंटर्स) पाठवण्यात येईल, अशी अफवा काँग्रेस, काँग्रेसचे मित्रपक्ष आणि शहरी नक्षलवादी पसरवत असल्याचा आरोप मोदी यांनी केला.

२३ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.