चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ मार्च २०२०

Date : 23 March, 2020 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षा ढकलली पुढे :
  • करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मार्चपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

  • यामध्ये ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि ३ मे रोजी होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ५ एप्रिल रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. याची दखल घेऊन आयोगाने या दोन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घोषित केला आहे.

भारतात होणार करोनावर संशोधन आणि औषधांची चाचणी : 
  • राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळांना करोना संदर्भातील वैद्यकीय चाचणी करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय, राज्य आणि खासगी रुग्णालयांनी प्रयोगशाळांना आवश्यक नमुने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

  • केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांच्याकडून हे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन ॲण्ड रिसर्चमधील (आयआयएसईआर) प्रोफेसर संजीव गालांडे यांनी आपणदेखील यामध्ये सहभागी होण्यास इच्छुक असून राष्ट्रीय प्रयोगशाळांना सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे.

  • केंद्र सरकारने करोना विषाणू संसर्ग चाचणीसाठी सरकारी मान्यताप्राप्त खासगी प्रयोगशाळांना परवानगी दिल्यानंतर या चाचण्यांसाठी प्रत्येकी ४५०० ते ५००० रुपये आकारण्यास अनुमती देणार आहे अशी माहिती भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने दिली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत मंगळवारी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. करोना विषाणूची चाचणी करण्याची मुभा खासगी प्रयोगशाळांना देण्यात येईल, पण कुणीही ही चाचणी मोफत करण्याची तयारी दर्शवलेली नसल्याने त्यासाठी आता ४५०० ते ५००० रुपये इतके शुल्क आकारण्याची मर्यादा घालून देण्यात आली आहे. एकूण ५१ खासगी प्रयोगशाळांना ही चाचणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

महाराष्ट्रच आयसोलेशनमध्ये? राज्यानं केलं स्वत:चं विलगीकरण : 
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यामध्ये सोमवारपासून कलम १४४ लागू होत असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यामध्ये ३१ मार्चपर्यंत कोणत्याही परदेशी विमानांना उतरण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यामधील राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या बसेसही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

  • केंद्र सरकारनेही ३१ मार्च पर्यंत सर्व प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळेच परराज्यातील लोकांना महाराष्ट्रात येणं किंवा बाहेर जाणं कठीण होणार आहे. एकंदरीतच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांवरुन महाराष्ट्राने करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वत:च विलगीकरणामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र दिसत आहे.

  • केंद्र सरकारने करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत सर्व प्रवासी वाहतूक सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधून बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. केंद्र सरकारने ही घोषणा केल्यानंतर लगेचच मध्य रेल्वेनेही मुंबईतील लोकल ट्रेन्सची वाहतूक पुढील ९ दिवसांसाठी म्हणजेच ३१ मार्चपर्यंत बंद ठेवणार असल्याची घोषणा केली आहे.

देशभरात जनता संचारबंदी यशस्वी : 
  • करोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागरिकांना रविवारी चौदा तास जनता संचारबंदी पाळण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनास मोठा प्रतिसाद मिळाला असून देशभरात बहुतांश सर्वच नागरिकांनी घरात राहून संयम दाखवला.

  • तुरळक वाहने रस्त्यांवर धावत होती. काही राज्यांनी ही जनता संचारबंदी आता सोमवारी पहाटेपर्यंत वाढवली आहे. १४ तासांची ही जनता संचारबंदी सामाजिक अंतर राखण्यासाठी फायद्याची ठरली आहे. त्यामुळे विषाणूचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे.

  • मोदी यांनी गुरुवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात करोना विषाणूला रोखण्यासाठी २२ मार्च रोजी सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत जनता संचारबंदीचे आवाहन केले होते. जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवून सामाजिक अंतर राखण्याचा हेतू त्यात होता.

  • या आरोग्य आपत्तीच्या काळातही अत्यावश्यक सेवा देणारे डॉक्टर्स, परिचारिका व इतर संबंधितांचे घरोघरी सज्जांमध्ये किंवा व्हरांडय़ात जाऊन थाळ्या व टाळ्या वाजवून आभार मानण्यात आले. आपत्ती काळात सेवा बजावणाऱ्या या लोकांबाबत अशा पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले होते. त्यालाही जनतेने मोठा प्रतिसाद दिला.

२३ मार्च चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.