चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ डिसेंबर २०१९

Date : 24 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
इटालियन सुपर चषक फुटबॉल : लॅझिओचे पंचतारांकित विजेतेपद : 
  • ख्रिस्तियानो रोनाल्डोसारख्या नामांकित खेळाडूंभोवती बचावपटूंचा सापळा रचल्यावर आक्रमणपटूंनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर लॅझिओने सोमवारी इटालियन सुपर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युव्हेंटसला ३-१ अशी धूळ चारून पाचव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले.

  • कोपा इटालिया आणि सेरी ए फुटबॉल स्पर्धेतील विजेत्यांमध्ये इटालियन चषक खेळवण्यात येतो. सौदी अरेबिया येथील किंग सौद युनिव्हर्सिटी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात १६व्या मिनिटाला लुईस अल्बटरेने लॅझिओसाठी पहिला गोल केला. मात्र मध्यंतरापूर्वीच्या अखेरच्या मिनिटाला पावलो डिबेलाने (४५) गोल नोंदवून युव्हेंटसला १-१ अशी बरोबरी साधून दिली.

  • दुसऱ्या सत्रातही लॅझिओच्याच खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले. ७३व्या मिनिटाला सीनॅड लुसिचने लॅझिओसाठी दुसरा गोल केला. भरपाई वेळेतील अखेरच्या मिनिटात (९०+४) डॅनिलो कॅटाल्डीने तिसरा गोल साकारून लॅझिओच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

कोपरगावच्या दोन तरूणींची न्यायाधीशपदी निवड : 
  • कोपरगाव : येथील सामाजिक माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्करराव काळे यांची कन्या अश्विनी ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश परीक्षेत राज्यात नवव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  संवत्सर गावची ही कन्या आता मुंबई येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर जिल्हा स्तरावर न्यायाधीश होणार आहे. कोपरगावची प्रियंका काजळे ही देखील दिवाणी न्यायाधीश परीक्षेत उत्तीर्ण झाली आहे.

  • राज्यात दिवाणी न्यायाधीश परीक्षेत १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यात अश्विनी काळे ही ९ व्याय स्थानावर राहिली आहे. तिने यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एलएलएम  परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला होता. तिचे प्राथमिक शिक्षण जंगली महाराज आश्रम, अकरावी बारावी सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय कोपरगाव तर कायदेविषयक शिक्षण मराठवाडा मित्र मंडळ शिवाजी शिक्षण महाविद्यालय, पुणे येथे झाले.   तिला प्राध्यापक गणेश शिरसाठ , अक्षय  ईनामके, वडील संजय काळे, आई माधुरी काळे,  भाऊ  अजिंक्य काळे यांचे मार्गदर्शन लाभले.

  • कान्हेगावची कन्या प्रियंका मच्छिंद्र काजळे दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन कान्हेगाव बरोबर कोपरगाव वकील संघाचे नाव राज्यातउज्ज्वल  केले. मच्छिंद्र जयराम काजळे व सुशीला काजळे या शेतकरी दामपत्यांची ही लेक असून कायद्याच्या परीक्षेत वयाच्या २८ व्या वर्षी प्रथम प्रयत्नात यशस्वी ठरली आहे. 

“आजपासून या राज्यासाठी नवा अध्याय सुरू” : 
  • आजपासून या राज्यासाठी नवा अध्याय सुरू होत आहे. मी नागरिकांना विश्वास देतो की, कोणाचाही अपेक्षाभंग होणार नाही. सर्वांची काळजी घेतली जाईल, अशी प्रतिक्रिया झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमेंत सोरेन यांनी राज्यात त्यांची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर पत्रकारपरिषदेत व्यक्त केली.

  • यावेळी बोलताना हेमंत सोरेन म्हणाले की, आज लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा संकल्प घेण्याचा दिवस आहे. हा विजय शिबू सोरेन यांच्या परिश्रमांमुळे दिसत आहे. राजद – काँग्रेसने आमच्याबरोबर निवडणुक लढवली, ज्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. उद्देशासाठी या राज्याची निर्मिती करण्यात आली होती, तो पूर्ण करण्याची वेळ आली आहे.

  • पुढील धोरण सहकारी पक्षांशी चर्चा केल्यानंतर निश्चित होईल, यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींचे आभार व्यक्त केले. बहुमत मिळत असल्याचे व राज्यात आपले सरकार येत असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्यावर हेमंत सोरेन यांनी आनंद व्यक्त करत, त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात सायकलवर चक्कर देखील मारली.

हर्षवर्धन शृंगला नवे परराष्ट्र सचिव : 
  • नवी दिल्ली : अनुभवी राजनैतिक अधिकारी हर्षवर्धन शृंगला यांची सोमवारी नवे परराष्ट्र सचिव म्हणून दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. ते विजय गोखले यांची जागा घेतील.

  • भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) १९८४ च्या तुकडीचे अधिकारी असलेले शृंगला भारताच्या शेजारी देशांबाबतचे तज्ज्ञ मानले जातात. सध्या ते अमेरिकेत भारताचे राजदूत म्हणून काम पाहात आहेत.

  • वर्चस्ववादी ट्रम्प प्रशासन, लष्करी व आर्थिक प्रभाव वाढवण्याचा चीनचा प्रयत्न, अशी परराष्ट्र धोरणविषयक आव्हाने भारताला भेडसावत असताना शृंगला यांची नियुक्ती झाली आहे. भारताच्या नव्या नागरिकत्व कायद्यावर अनेक देशांकडून टीका होत असताना, या संदर्भात जास्तीत जास्त देशांशी राजनैतिक मार्गाने संपर्क साधणे, हे शृंगला यांच्यापुढील तातडीचे काम राहील अशी अपेक्षा आहे.

‘ओआयसी’चा भारताला धोक्याचा इशारा : 
  • अयोध्या वादावरील न्यायालयीन निकालाबाबतही चिंता व्यक्त :– ऑर्गनायझेशन ऑफ  इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) या संस्थेने रविवारी भारतातील सुधारित नागरिकत्व कायद्यावर चिंता व्यक्त करून या घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचे म्हटले आहे.

  • अयोध्येतील रामजन्मभूमी वादाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरही या संघटनेने चिंता व्यक्त केली.  ओआयसी ही ५७ मुस्लीम बहुल देशांची संघटना असून त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. या संघटनेने नेहमीच पाकिस्तानची बाजू घेतली आहे. ओआयसीच्या सचिवालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, भारतातील अल्पसंख्याक मुस्लीम समुदायावर परिणाम करणाऱ्या नागरिकत्व कायद्यासह सर्व घटनांवर आमचे बारीक लक्ष आहे. नागरिकत्व अधिकार व न्यायालयाने बाबरी मशीद प्रकरणी दिलेला निकाल या घटना चिंताजनक आहेत.

  • ओआयसीने निवेदनात पुढे म्हटले आहे की, भारत सरकारने मुस्लीम अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी व त्यांच्या धार्मिक स्थळांना संरक्षण द्यावे. संयुक्त राष्ट्रांच्या संहितेनुसार काही महत्त्वाची तत्त्वे व नियमांचे पालन केले पाहिजे. अल्पसंख्याकांशी कुठलेही भेदाभेद न करता अधिकार दिले पाहिजेत. या तत्त्व व नियमांच्या विरोधात काही वर्तन केले गेले तर त्यामुळे तणाव निर्माण होऊन या भागातील शांतात व सुरक्षा यावर गंभीर परिणाम होतील.

२४ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.