चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ ऑक्टोबर २०१९

Date : 24 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
रेन्डॉल्फ डिसोझा ‘नवयुग-श्री’ :
  • मुंबई : सुभाष मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जे.जे. नवयुग-श्री’  जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत श्री छत्रपती व्यायाम मंडळाच्या रेन्डॉल्फ डिसोझाने विजेतेपद मिळवले. सम्राट ढाले (टागोर नगर मित्र मंडळ) आणि प्रथमेश गांधी (पीसीसी नायगाव) यांनी सर्वोत्तम शरीरसंपदेचे पुरस्कार पटकावले.

  • स्पर्धेचा अंतिम निकाल - गट पहिला : १. सुरेश भाताडे, २. अक्षय सावंत, ३. अनिल जयस्वाल; गट दुसरा : १. मनिष मिश्रा, २. आयुष जाधव, ३. दिनेश कदम; गट तिसरा : १. ओमकार धामणस्कर, २. प्रशांत लाखण, ३. अमोल नवाल; गट चौथा : १. रेन्डॉल्फ डिसोजा, २. अक्षय मराठे, ३. नदीम शेख.

  • नदीम शेख ‘फ्युजन फिटनेस-श्री’ - मुंबई : टिळक नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘फ्युजन फिटनेस-श्री’ जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत जुहू व्यायाम शाळेच्या नदीम शेखने विजेतेपद मिळवले. सम्राट ढाले (टागोर नगर मित्र मंडळ) आणि संतोष पाटील (अपोलो जिम) यांनी सर्वोत्तम शरीरसंपदेचे पुरस्कार पटकावले.

एमटीएनएल-बीएसएनएलचे अखेर विलीनीकरण :
  • नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल) या सरकारी कंपन्या बंद केल्या जाणार नाहीत. या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करून सक्षम दूरसंचार कंपनीत रूपांतर करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती दूरसंचारमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

  • दोन्ही सरकारी कंपन्यांना खासगी दूरसंचार कंपन्यांच्या स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. सरकारी दूरसंचार कंपन्यांना सातत्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत असून, कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने व्यवस्थापनाविरोधात आंदोलनही केले गेले. दोन्ही कंपन्या खासगी कंपनीला विकल्या जाणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, या चर्चाना केंद्र सरकारने पूर्णविराम दिला आहे. या दूरसंचार कंपन्या खासगी क्षेत्राकडे सुपूर्द केल्या जाणार नाहीत किंवा या कंपन्यांमध्ये निर्गुतवणूक केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण रवीशंकर प्रसाद यांनी दिले.

  • बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या विलीनीकरणानंतर नवी कंपनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवण्यासाठी सार्वभौम कर्जरोख्यांच्या माध्यमातून १५ हजार कोटींचे आर्थिक बळ पुरवले जाणार आहे. पुढील चार वर्षांमध्ये दोन्ही कंपन्यांच्या मालकीची मालमत्ता विकून ३८ हजार कोटी रुपये उभे केले जातील. या निधीतून सरकारी दूरसंचार कंपनीचे अत्याधुनिकीकरण केले जाईल. कर्जाचे ओझे कमी करणे, कर्जरोख्यांवरील व्याजाची परतफेड, सेवांच्या विस्तारीकरणासाठी हा निधी वापरला जाईल. 

भारतीय संघाप्रमाणेच ‘बीसीसीआय’चे नेतृत्व करेन : 
  • मुंबई : भारतीय संघाप्रमाणेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नेतृत्व करेन. ‘भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वासाठी समान बीसीसीआय’ यासाठी मी वचनबद्ध राहीन, अशी तत्त्वप्रणाली अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सौरव गांगुलीने बुधवारी मांडली.

  • जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ असा लौकिक असलेल्या ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाची सूत्रे ४७ वर्षीय गांगुलीने बुधवारी स्वीकारली. २००० ते २००५ या कालखंडात देशाचे यशस्वी नेतृत्व सांभाळणाऱ्या गांगुलीने नव्या डावाला प्रारंभ करताना भारती क्रिकेट कर्णधाराचा गडद निळा कोट परिधान करून सर्वाचे लक्ष वेधले.

  • ‘‘मला जे योग्य वाटेल आणि ‘बीसीसीआय’च्या भल्याचे वाटेल ते करण्यासाठी मी सदैव तत्पर असेन. ‘बीसीसीआय’च्या विश्वासार्हतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वासाठी समानता हे धोरण मी राबवणार आहे. याच मार्गाने मला संघटनेला पुढे न्यायचे आहे,’’ असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजारांहून अधिक धावा करणाऱ्या गांगुलीने सांगितले.

  • ‘‘मी जेव्हा भारताचा कर्णधार झालो, तेव्हा हा कोट मला मिळाला होता. परंतु हा सैल होता, हे तेव्हा मला लक्षात आले नव्हते. परंतु आज महत्त्वाची जबाबदारी स्वीकारताना तो परिधान करण्याचा मी निर्णय घेतला,’’ असे गांगुलीने सांगितले.

कार्यकारी प्रमुख कॅरी लॅम यांना हटवणार : 
  • बीजिंग : हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थकांचे आंदोलन सुरू असताना तेथील चीन समर्थक मुख्य कार्यकारी प्रमुख प्रमुख कॅरी लॅम यांना पदावरून हटवण्यात येणार असल्याचे वृत्त ‘दी फायनान्शियल टाइम्स’ने बुधवारी दिले आहे. गेले पाच महिने हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थनार्थ निदर्शने सुरू आहेत. त्याला अलीकडच्या काळात हिंसक वळणही लागले होते.

  • चीन समर्थक असलेल्या कॅरी लॅम यांच्यावर निदर्शकांनी नेहमीच टीका केली असून हाँगकाँग हे निम्न स्वायत्त शहर  मानले जाते. चीनच्या सरकारने आतापर्यंत लॅम यांना पाठिंबा दिला होता, निदर्शक हे दंगलखोर असल्याचे सांगून चीनने हिंसाचाराचा निषेधही केला होता.

  • ‘दी फायनान्शियल टाइम्स’च्या वृत्तानुसार सरकार पातळीवर या सगळ्या प्रकरणावर चर्चा झाली असून त्यात कॅरी लॅम यांना पदावरून हटवण्याचे  ठरले असून हंगामी कार्यकारी प्रमुखांची नेमणूक केली जाणार आहे. असे असले तरी या निर्णयाची अंमलबजावणी परिस्थितीवर विसंबून आहे.

  • आधी हाँगकाँग मधील परिस्थिती स्थिर करून मगच नवीन नेमणूक केली जाणार आहे. चीनने हिंसाचारापुढे मान तुकवली असे चित्र निर्माण होऊ  नये यासाठी मोठय़ा खुबीने नवीन व्यक्तीला पदावर आणावे लागणार आहे. कॅरी लॅम यांच्या कार्यालयाने या वृत्तावर काही प्रतिक्रिया दिलेली नाही. हॉँगकाँगमध्ये गेले वीस आठवडे आंदोलन सुरू असून तेथे कुठलाही राजकीय तोडगा अजून दृष्टिपथात आलेला नाही.

दिनविशेष :
  • संयुक्त राष्ट्र दिन / जागतिक विकास माहिती दिन / जागतिक पोलियो दिन

महत्वाच्या घटना 

  • १६०५: मुघल सम्राट जहांगिर यांचा राज्याभिषेक झाला.

  • १८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.

  • १९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.

  • १९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.

  • १९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.

  • १९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.

  • १९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.

  • १९६४: उत्तर र्‍होडेशियाला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.

  • १९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी सकाळ रिलीफ फंड या संस्थेतर्फे दत्तक बैल योजना सुरू करण्यात आली.

  • १९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.

  • १९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

  • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.

  • २००२: सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.

  • २००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.

  • २०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.

जन्म 

  • १७७५: दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)

  • १८६८: औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार भवानराव श्रीनिवासराव तथा बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचा जन्म. (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)

  • १८९४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९८७)

  • १९१०: मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री लीला ऊर्फ माई भालजी पेंढारकर यांचा जन्म.

  • १९१४: आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन लक्ष्मी सहगल यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २०१२)

  • १९२१: व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)

  • १९२६: सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर केदारनाथ सहानी यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर २०१२)

  • १९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.

  • १९६३: भारतीय अमेरिकन उद्योगपती अरविंद रघुनाथन यांचा जन्म.

  • १९७२: अभिनेत्री व मॉडेल रीमा लांबा ऊर्फ मल्लिका शेरावत यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८३९)

  • १९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७)

  • १९७९: अबारथ कंपनी चे संस्थापक कार्लो अबारट यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९०८)

  • १९९१: स्टार ट्रेक चे निर्माते जीन रोडडेबेरी यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९२१)

  • १९९१: ऊर्दू कथा व पटकथा लेखिका इस्मत चुगताई यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९१५)

  • १९९२: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)

  • १९९५: पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष माधवराव साने यांचे निधन.

  • २०११: लिस्प प्रोग्रॅमिंग लँग्वेज चे जनक जॉन मॅककार्थी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९२७)

  • २०१३: पार्श्वगायक प्रबोधचंद्र तथा मन्ना डे यांचे निधन. (जन्म: १ मे १९१९)

  • २०१४: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते एस. एस. राजेंद्रन यांचे निधन.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.