चालू घडामोडी आणि दिनविशेष - २५ नोव्हेंबर २०१९

Date : 25 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
किपचोगे, मुहम्मद जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटू :
  • दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा पहिला धावपटू ईलूड किपचोगे आणि ४०० मीटर अडथळा शर्यतीमधील विश्वविजेती डॅलिया मुहम्मद यांना जगातील सर्वोत्तम अ‍ॅथलेटिक्सपटूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

  • जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेतर्फे मोनॅको येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात ३५ वर्षीय किपचोगेला सन्मानित करण्यात आले. त्याने गेल्या महिन्यात ४२.१९५ किलोमीटरचे मॅरेथॉन शर्यतीचे अंतर एक तास ५९ मिनिटे आणि ४०.२ सेकंदांत पूर्ण करून इतिहास घडवला.

  • अमेरिकेच्या डॅलियानेही जुलै महिन्यात लोवा येथे अमेरिकन चाचणी शर्यतीत ५२.२ सेकंदांचा विश्वविक्रम नोंदवला. मग दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने ५२.१६ सेकंदांचा नव्या विश्वविक्रम साकारला.

राम मंदिराबाबत नरेंद्र मोदींची मन की बात : 
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिल्यानंतर जनतेनं शांती, एकतेचं दर्शन घडवलं, असं म्हणत मोदी यांनी सर्वांचे आभार मानले.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा ५९वा भाग आज प्रसारित झाला. या कार्यक्रमात मोदींनी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणावर दिलेल्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया दिली. अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला.

  • अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर होईल, तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकर जागा देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. या निर्णयावर मोदी यांनी भाष्य केलं.

महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सुप्रीम कोर्टात सकाळी १०:३० वाजता सुनावणी : 

 

  • नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयात रविवारी झालेल्या सुनावणीनंतर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी आज सकाळी करण्याचे आदेश दिले आहेत.

  • त्यामुळे या पॉलिटिकल नाट्याचा दुसरा अंक पाहायला मिळणार आहे. कारण सुप्रीम कोर्टानं महाधिवक्ते तुषार मेहता यांना सरकार स्थापनेबाबतची महत्त्वाची कागदपत्रं आज सकाळी 10.30 वाजता कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

  • सुप्रीम कोर्टानं महाधिवक्त्यांना राज्यपालांनी भाजपला सरकार बनवण्यासाठी निमंत्रित केलेलं पत्र आणि फडणवीस यांनी दिलेलं त्यांच्याकडील बहुमताचा दावा करणारं पत्र आजच्या सुनावणीपूर्वी सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तातडीनं विधीमंडळात बहुमत सादर करण्याची विरोधकांची मागणी कोर्टाने मान्य केलेली नाही.

तापमान वाढ असह्य; २०१९ दुसरे सर्वाधिक ‘उष्ण’ वर्ष :
  • मुंबई : गेल्या काही वर्षांपासून ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्ण वर्षांच्या नोंदीत भर पडत आहे. १९९८ पासून जागतिक पातळीवर नोंदविलेल्या उष्ण वर्षांपैकी २०१६ नंतर २०१९ हे दुसरे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याची नोंद नॅशनल ओशिएन अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनने केली. १९९८सह २००५, २००९, २०१०, २०१३, २०१४, २०१५, २०१६, २०१७, २०१८ या वर्षांची उष्ण वर्ष म्हणून नोंद झाली.

  • नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायर्नमेंटल इन्फॉर्मेशनकडील माहितीनुसार, अल निनोसह तत्सम घटकांमुळे तापमानात उत्तरोत्तर वाढ होत आहे. मुळात जमिनीसह समुद्रावरील वाढते तापमान, ग्लोबल वॉर्मिंगसह प्रदूषणात पडणारी भर; असे अनेक घटक वाढत्या उष्ण वर्षांस कारणीभूत आहेत. नॅशनल ओशिएन अँड अ‍ॅटमॉसफेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशननेही २०१९ सालच्या सात महिन्यांतील तापमानाची नोंद घेत, त्याची १८८० सालापासून आतापर्यंत म्हणजे १४० वर्षांतील माहितीसोबत तुलना केली. त्यावेळी तापमानवाढीतील फरक समोर आला.

  • जुलैमध्ये युरोपसह ग्रीनलँड उष्णतेच्या लाटेने होरपळून निघाला. जुलैमध्ये अलास्का, पश्चिम कॅनडा, मध्य रशिया येथील तापमान हे सरासरी तापमानापेक्षा ३ अंशांनी अधिक होते. जानेवारी ते जुलै, २०१९ हा काळ तिसरा उष्ण काळ ठरला. दरम्यान, जागतिक तापमानवाढ १.५ अंश सेल्सिअसच्या पुढे जाता कामा नये, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कैलाश जोशी यांचे निधन, आज अंत्यसंस्कार : 
  • भोपाळ : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश जोशी यांचे प्रदीर्घ आजारामुळे बन्सल रुग्णालयात रविवारी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. त्यांच्या मागे तीन मुले व तीन मुली, असा परिवार आहे.

  • ते हृदयविकार व मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त होते अशी माहिती त्यांचे पुत्र व माजी मंत्री दीपक जोशी यांनी दिली. कैलाश जोशी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांना आदरांजली वाहताना मोदी यांनी म्हटले आहे की, जनसंघ व भाजपला मजबूत करण्यात कैलाश जोशी यांचे मोठे योगदान आहे.

  • मध्यप्रदेशच्या विकासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कैलाश जोशी यांच्या पत्नीचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर मध्यप्रदेशमधील देवास जिल्ह्यातल्या हतपिपाल्या या गावी सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रुग्णालयात जाऊन अंतिम दर्शन घेतले.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय महिला विरुद्ध हिंसा निर्मूलन दिन

महत्वाच्या घटना 

  • १६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.

  • १९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.

  • १९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.

  • १९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९८१: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.

  • १९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनतर्फे देण्यात येणारा राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार जाहीर.

  • १९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

  • २०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा तानसेन सन्मान जाहीर.

जन्म 

  • १८४१: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.

  • १८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)

  • १८७२: ख्यातनाम नाटककार व पत्रकार, केसरी चे संपादक, नवाकाळ चे संस्थापक कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)

  • १८७९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)

  • १८८२: मराठी चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १९६८)

  • १८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.

  • १९२१: नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.

  • १९२६: भारताचे २१ वे सरन्यायाधीश रंगनाथ मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)

  • १९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.

  • १९३७: शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.

  • १९३९: मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादकउस्ताद रईस खान यांचा जन्म.

  • १९५२: पाकिस्तानचा क्रिकेटपटू इम्रान खान यांचा जन्म.

  • १९७२: भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.

  • १९८३: भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८५: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)

  • १९२२: प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचे निधन. (जन्म: २० मे १८८४ – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)

  • १९६०: प्राच्यविद्यापंडित अनंत सदाशिव अळतेकर यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)

  • १९६२: आधुनिक संतकवी गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू महाराज यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८६८ – अकोळनेर, अहमदनगर)

  • १९७४: संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस उ. थांट यांचे निधन. (जन्म: २२ जानेवारी १९०९)

  • १९८४: भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९१३)

  • १९९७: लोकमत चे संस्थापक, संपादक, माजी मंत्री व स्वातंत्र्य सेनानी जवाहरलालजी दर्डा यांचे निधन.

  • १९९७: मलावी देशाचे पहिले अध्यक्ष हेस्टिंग्ज बांदा यांचे निधन. (जन्म: १४ मे १८९८)

  • १९९८: प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)

  • २०१३: बालसाहित्यिका लीला पोतदार तथा लीलावती भागवत यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२०)

  • २०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९२०)

  • २०१६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९२६)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.