चालू घडामोडी आणि दिनविशेष - २६ ऑक्टोबर २०१९

Date : 26 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
चॅम्पियन्स लीग फुटबॉल : क्रूसच्या निर्णायक गोलमुळे माद्रिदचा पहिला विजय :
  • इस्तंबूल : मध्यरक्षक टॉनी क्रूसने साकारलेल्या निर्णायक गोलच्या बळावर माजी विजेत्या रेयाल माद्रिदने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये ‘अ’ गटातील सामन्यात गॅलेटसॅरे संघाला १-० असे पराभूत केले. या हंगामातील माद्रिदचा हा पहिलाच विजय ठरला.

  • तुर्क टेलिकॉम एरिनावर रंगलेल्या या सामन्यात माद्रिदने लुका मॉड्रिचला विश्रांती दिली होती. परंतु एडिन हॅझार्ड, करिम बेन्झेमा यांसारख्या अनुभवी खेळाडूंच्या समावेशामुळे माद्रिदने नेहमीप्रमाणेच आक्रमणावर भर दिला. १८व्या मिनिटाला हॅझार्डने गोलजाळ्याच्या डाव्या दिशेने दिलेल्या पासचे क्रूसने अप्रतिमरीत्या गोलमध्ये रूपांतर करून माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

  • मध्यंतरानंतरही गॅलेटसॅरेला बरोबरी साधण्यात अपयश आल्यामुळे माद्रिदच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांपैकी एका लढतीत माद्रिदला पराभव पत्करावा लागला होता, तर एक सामना त्यांना बरोबरीत सोडवण्यात यश आले. या विजयासह माद्रिदचे तीन सामन्यांतून चार गुण झाले असून पॅरिस सेंट जर्मेनने सर्वाधिक नऊ गुणांसह गटात अग्रस्थान मिळवले.

राजीनामा न देण्यावर इम्रान खान ठाम :
  • इस्लामाबाद : विरोधी पक्षांकडून वाढता दबाव असला तरी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार न होण्याचा निर्धार इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांना पदावरून पायउतार करण्यासाठी पुढील आठवडय़ात विरोधी पक्षांनी मोठय़ा प्रमाणावर धरणे धरण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे, मात्र त्यामुळे भारतात आनंदाची लाट पसरली असल्याचे खान यांनी म्हटले आहे.

  • जमात-उलेमा-ए-इस्लामचे (जेयूआय-एफ) नेते फझलूर रेहमान यांच्या नेतृत्वाखाली ३१ ऑक्टोबर रोजी इस्लामाबादमध्ये आझादी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्याला पाकिस्तान मुस्लीम लीग-एन आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीसह सर्व महत्त्वाच्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.

  • पाकिस्तानमध्ये जुलै २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ पक्षाच्या विजयासाठी मोठय़ा प्रमाणावर गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप फझलूर यांनी केला असून इम्रान खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.फझलूर यांच्या आंदोलनामागे विशिष्ट हेतूने प्रेरित कारस्थान आहे, असे मत इम्रान खान यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषकांच्या बैठकीत व्यक्त केल्याचे जिओ न्यूजने म्हटले आहे. आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, आपण राजीनामा देणार नाही, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील दिवाळी म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याचे स्मरण- ट्रम्प  :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील हिंदू, जैन, शिख आणि बौद्ध धर्मीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अमेरिकेमध्ये दिव्यांचा उत्सव साजरा करणे म्हणजेच अमेरिकेच्या महत्त्वपूर्ण सिद्धांत धार्मिक स्वातंत्र्याचे स्मरण करणे होय, असे ट्रम्प म्हणाले.

  • दिवाळीच्या एक दिवस आधी ट्रम्प यांनी ओव्हल कार्यालयात अमेरिकी-भारतीयांबरोबर दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात प्रसिद्धी माध्यमांना प्रवेश नव्हता.

  • संपूर्ण अमेरिकेत दिवाळी साजरी होत आहे, हे म्हणजे अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्यतेचे द्योतक असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. भारतासह, अमेरिका आणि संपूर्ण जगभरात विखुरलेले भारतीय दिवाळी साजरी करत असताना ट्रम्प यांनी हे उद्गार काढले. अमेरिकी राज्यघटनेने या देशातील लोकांना दिलेल्या अधिकारांचे माझ्या प्रशासनाने रक्षणच केले आहे. या देशातील सर्व धर्मीयांना त्यांच्या प्रथा आणि विवेकानुसार पूजा करण्याचा अधिकार आहे. दिवाळी साजरी करणाऱ्यांना त्यांनी मेलानियांसह शुभेच्छा दिल्या.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय इंटरसेक्स जागृकता दिन

महत्वाच्या घटना 

  • १८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.

  • १९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.

  • १९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.

  • १९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.

  • १९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.

  • १९६२: रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.

  • १९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.

  • १९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे स्वर्णजयंती फेलोशिप जाहीर.

जन्म 

  • १२७०: संत नामदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १३५०)

  • १८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)

  • १८९१: सहकारी चळवळीचे प्रवर्तक वैकुंठ मेहता यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९६४)

  • १९००: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च १९९३)

  • १९१६: फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवाँ मित्राँ यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)

  • १९१९: शाह ऑफ इराण मोहम्मद रझा पेहलवी यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १९८०)

  • १९३७: संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म.

  • १९४७: अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म.

  • १९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)

  • १९७४: अभिनेत्री रवीना टंडन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९०९: जपानचे पहिले पंतप्रधान इटो हिरोबुमी यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८४१)

  • १९३०: प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १८६०)

  • १९७९: अर्थशास्त्रज्ञ चंदूलाल नगीनदास वकील यांचे निधन.

  • १९९१: स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक मराठवाडा चे संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)

  • १९९९: भारतीय-अमेरिकन लेखक आणि शिक्षक एकनाथ इशारानन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१०)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.