चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ मार्च २०२०
Updated On : Mar 27, 2020 | Category : Current Affairs
-
सध्या जगभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतासह जगाच्या वेगवेगळया भागांमध्ये या व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. युरोपातील इस्तोनिया या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत करोना व्हायसरवर चर्चेची मागणी केली होती. तसा रितसर प्रस्तावही त्यांनी दिला होता. पण चीनने UNSC मध्ये आपल्या विशेषधिकाराचा वापर करुन करोना व्हायरसच्या विषयावर चर्चा होऊ दिली नाही. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
-
इस्तोनिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य आहे. मागच्या आठवडयात त्यांनी करोना व्हायरसवर चर्चेची मागणी केली होती. करोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे इस्तोनियाने म्हटले होते. इस्तोनियाने आपल्या प्रस्तावात करोना व्हायरससंबंधी सर्व माहिती पारदर्शकतेने मांडावी अशी मागणी केली होती. पण चीन त्यासाठी तयार नव्हता असे काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.
-
करोना व्हायरस या आजाराचे मूळ चीनमध्ये आहे. चीनच्या वुहान शहरात करोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. तिथूनच संपूर्ण जगभरात या आजाराचा फैलाव झाला. करोना व्हायरससंबंधीची माहिती लपवल्याचा चीनवर आरोप होत आहे. चीनने वेळीच माहिती दिली असती तर या व्हायरसचा प्रादूर्भाव मोठया प्रमाणावर रोखणे शक्य झाले असते असे तज्ञांचे मत आहे.
-
देशभरात करोनाचा फैलाव वाढताना दिसतो आहे. कारण एक दिवसात संपूर्ण देशात ८८ नवे करोनाग्रस्त आढळले आहेत. त्यामुळे देशातल्या करोनाग्रस्तांची संख्या ६९४ वर गेली आहे. तर करोनामुळे भारतात १६ जणांचा मृत्यू झाला आहे.
-
गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये तीन मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. तर कर्नाटकात दोघांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेश, तामिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, हिमाचाल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला.
-
महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १३० वर पोहचली आहे. गुरुवारी पाच रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातलीही करोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाग्रस्त आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
-
लोकांना सर्वतोपरी काळजी घेण्याचं आवाहन उद्धव ठाकरे सरकारने वारंवार केलं आहे. सुरुवातीला काहीशी संभ्रमाची स्थिती होती. मात्र आता लोक सोशल डिस्टंस, गरज असेल तरच बाहेर पडणं या गोष्टी पाळू लागले आहेत.
-
जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या करोना व्हायरसचा धोका देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ओदिशा सरकार देशातील सर्वात मोठं ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारणार आहे. या भव्य रुग्णालयात तब्बल एक हजार खाटांची व्यवस्था असणार आहे.
-
ओदिशा सरकार, कार्पोरेट्स व वैद्यकीय महाविद्यालयांच्या समन्वयातून एक हजार खाटांची व्यवस्था असणारे हे देशातील पहिले भव्य असे ‘COVID-19 ट्रिटमेंट’ रुग्णालय उभारले जात आहे. यासाठी एका त्रिपक्षीय सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी देखील करण्यात आली आहे.
-
ओदिशा सरकार या रुग्णालयाच्या निर्मितीसाठी तयारीला लागले आहे. ओदिशा देशातील पहिले राज्य ठरणार आहे. ज्या ठिकाणी COVID-19 च्या रुग्णांसाठी एवढे मोठे रुग्णालय उभारले जात आहे. विशेष म्हणजे ओदिशा राज्यात आतापर्यंत करोनाचे केवळ दोन रुग्ण आढळलेले आहेत. रुग्णालय ओदिशात नेमके कुठं उभारले जाणार हे अद्यापर्यंत स्पष्ट झालेले नाही.
-
दुसरीकडे आसाम सरकारने देखीळ करोना व्हायरसच्या संकटाला तोंड देण्यासाठी गुवाहाटीमधील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयसोलेशन सेंटरची निर्मिती करण्यास सुरुवात केलेली आहे. आसाममध्ये आतापर्यंत करोनाची बाधा झालेला एकहीजण आढळलेला नाही.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केलं आहे. २१ दिवसांच्या या लॉकडाउनमधील आज (गुरुवार) दुसरा दिवस आहे. हा लॉकडाउन १४ एप्रिलपर्यंत सुरु असणार आहे. तर दुसरीकडे जगभऱातील करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. जगभरामध्ये करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६० हजारहून अधिक झाली आहे.
-
देशातील करोनाग्रस्तांची संख्या ६४९ असून मागील २४ तासांमध्ये ४२ नवीन प्रकरणे समोर आली आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्र्यालयाचे जॉइन्ट सेक्रेट्री लव अग्रवाल यांनी दिली आहे.
-
चीनमधून जगभरामध्ये प्रादुर्भाव झालेल्या करोना विषाणुने आता युरोपियन देशांमध्ये थैमान घातलं आहे. युरोपमधील इटली, स्पेन आणि फ्रान्स या देशांना करोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसला आहे.
-
स्पेनमध्ये करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या चार हजारांहून अधिक झाली आहे. तर संसर्ग झालेल्या रुग्णांची स्पेनमधील संख्या ५६ हजारहून अधिक आहे. त्यातच आता स्पेनच्या उपपंतप्रधान कारमेल कॅल्वो यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. कॅल्वो याच्या करोनाच चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
-
कॅल्वो यांची पहिली करोना चाचणी मंगळवारी घेण्यात आली होती. त्यामध्ये त्यांना करोना झाल्याचे अढळून आलं नाही. त्यांनंतर बुधवारी घेण्यात आलेल्या दुसऱ्या चाचणीमध्ये त्यांना करोनाचा संसर्ग झाला असून त्यांच्याल सूक्ष्म लक्षणं दिसून आली. त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्पेन सरकारने जारी केलेल्या पत्रकानुसार कॅल्वो यांची प्रकृती स्थिर आहे. त्या ६२ वर्षांच्या आहेत.
-
स्पेनमध्ये मागील २४ तासांमध्ये ६५५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या ५६ हजार १८८ इतकी आहे. त्यापैकी ३१ हजार ९१२ जणांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये करोनाचा संसर्गामुळे प्रकृती चिंताजनक असल्याने तीन हजार ६७९ जण आयसीयुमध्ये भरती असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. स्पेनमधील ७ हजार १५ रुग्ण आजारामधून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आलं आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत करोनामुळे चार हजार ८९ मृत्यू झाले आहेत. हा आकडा चीनमध्ये झालेल्या मृत्यूच्या आकड्यांहूनही अधिक आहे. करोनामुळे स्पेनपेक्षा अधिक मृत्यू केवळ इटलीत झाले आहेत.