चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ नोव्हेंबर २०१९

Updated On : Nov 27, 2019 | Category : Current Affairsटाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा : आनंदकडून निराशा; कार्लसन विजेता :
 • टाटा स्टील आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या अतिजलद (ब्लिट्झ) प्रकाराच्या नऊ लढतींपैकी अखेरच्या पाच लढतींमध्ये फक्त एक गुण कमावणाऱ्या भारताच्या विश्वनाथन आनंदला प्रतिष्ठेच्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी पात्र होण्यात अपयश आले.

 • मॅग्नस कार्लसनने मात्र वर्चस्वपूर्ण कामगिरीच्या बळावर एकूण विक्रमी २७ गुणांसह जेतेपदावर नाव कोरले. वर्षांच्या पूर्वार्धात अबिदजान (आयव्हरी कोस्ट) येथे झालेल्या स्पर्धेत कार्लसनने २६.५ गुण मिळवले होते. तो विक्रम कार्लसनने मोडीत काढला. अमेरिकेच्या हिकारू नाकामुराने २३ गुणांसह दुसरे स्थान मिळवले, तर वेस्ली सो (अमेरिका) आणि अनिश गिरी (नेदरलँड्स) या दोघांनी प्रत्येकी १८.५ गुणांसह तिसरे स्थान पटकावले.

 • भारताच्या आनंदला १६ गुणांसह सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले, तर पी. हरिकृष्णा आणि विदित गुजराथी यांना प्रत्येकी १४.५ गुणांसह आठवे स्थान मिळाले. आनंदला पात्रतेसाठी दीड गुण कमी पडले. लंडन येथे होणाऱ्या ग्रँड चेस टूर स्पर्धेसाठी कार्लसन, डिंग लिरेन, अरोनिय, मॅक्झिमे व्हॅचिएर-लॅग्रॅव्ह पात्र ठरले आहेत.

दहावी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत महाभरती; परीक्षा घेतली जाणार नाही :
 • सरकारी नोकरीसाठी संधीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे विभागातील चार हजार पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करण्यास अद्यापही संधी आहे. दक्षिण-मध्य रेल्वेने एकूण ४ हजार १०३ पदांसाठी अर्ज मागवलेले आहेत. इच्छुकांना ८ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

 • विशेष म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांसाठी आरक्षण देण्यात येणार आहे. इयत्ता दहावील गुणांच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेदवारांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही.

 • रेल्वेकडून ‘अप्रेंटिस’ पदाच्या एकूण ४ हजार १०३ पदांची भरती केली जात आहे. यासाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण व आयटीआय झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराचे किमान वय १५ असावे, तसेच ८ डिसेंबर २०१९ रोजी तो २४ वर्षांचा नसावा. कमाल वयोमर्यादेत एससी/एसटी प्रवर्गासाठी पाच वर्षांची तर ओबीसीसाठी तीन वर्षांची सूट देण्यात येणार आहे.

बगदादी विरोधातील मोहिमेतील ‘कॉनन’ श्वानाचा गौरव :
 • आयसिसचा प्रमुख अबु बक्र अल बगदादी याला ठार मारण्याच्या अमेरिकी कमांडोजच्या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणाऱ्या कॉनन या श्वानाचा अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सन्मान केला आहे. या मोहिमेत कॉनन हाच खरा नायक ठरला आहे कारण त्याने बगदादीचा त्याच्या लपण्याच्या जागी जाऊन पाठलाग करीत तो तेथे असल्याची खात्री अमेरिकी कमांडोजना करून दिली होती.

 • बगदादी (४८) हा ऑक्टोबरमध्ये मारला गेला होता. अमेरिकी कमांडोजनी त्याच्याविरोधात मोहीम सुरू केली असता त्याने आत्मघाती स्फोट करून स्वत:ला संपवले होते. सीरियातील इडलिब प्रांतात तो लपलेला होता. या मोहिमेत मोठी भूमिका पार पाडणारा कॉनन हा श्वान बगदादीचा माग काढताना जखमी झाला होता. या श्वानाला सोमवारी व्हाइट हाऊसमध्ये आणले गेले होते. ओव्हल कार्यालयात अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांचे स्वागत केले.

 • व्हाइट हाऊसच्या प्रसिद्धी सचिव स्टीफनी ग्रिश्ॉम, मेलनिया ट्रम्प व उपाध्यक्ष माइक पेन्स यांच्यासमवेत कॉननचे छायाचित्र घेतले गेले.  हा बेल्जियन मॅलीनॉइस प्रजातीचा श्वान असून त्याला आता जगात मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. कॉननला आपण मानपत्र दिले असे सांगून ट्रम्प म्हणाले की, तो अतिशय  बुद्धिमान व चतुर आहे. आयसिस प्रमुखाविरोधातील मोहीम त्याच्यामुळे सोपी झाली. त्याने अविश्वसनीय व फारच छान कामगिरी केली आहे.

घटनात्मक नैतिकतेचे पालन करण्याचे राष्ट्रपतींचे नागरिकांना आवाहन : 
 • घटनात्मक पदांवर असणाऱ्या व्यक्ती, समाजधुरीण आणि नागरिकांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन केले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी केले. संविधान दिनानिमित्त संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करताना ते बोलत होते.

 • हक्कांचा खरा स्रोत हे कर्तव्य आहे, हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असे कोविंद यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा उल्लेख करून सांगितले.

 • घटनात्मक नैतिकतेचे महत्त्व अधोरेखित करताना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की, घटना हीच सर्वोच्च आहे आणि घटनात्मक प्रक्रियेचा अवलंब करणे हे त्याचे सार आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. त्यामुळे घटनात्मक पदावर असलेली व्यक्ती, समाजधुरीण आणि सर्वसामान्य नागरिकांनी घटनात्मक नैतिकतेचे पालन करणे अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.

मोदी लाट ओसरली, दीड वर्षात ‘ही’ राज्ये झाली भाजपामुक्त :
 • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. यामुळे भाजपाच्या हातून आणखीन एक राज्य निसटले आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने देशभरातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ ४० टक्के भूभागावर भाजपाची सत्ता उरली आहे. २०१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती.

 • २०१४ साली भाजपा केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांची विजयी घौडदौड सुरु झाली होती. २०१४ साली केवळ सात राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपाने २०१८ च्या शेवटपर्यंत देशातील २२ राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. मोदी लाट आणि अमित शाह यांच्या चाणक्यनितीच्या जोरावर भाजपाने हे यश मिळवले. मात्र २०१८ च्या मध्यनंतर ही विजयी घौडदौड मंदावली.

 • २०१४ साली भाजपा गुजरात, मध्यप्रेधेस, राजस्थान, छत्तीसगड, गोवा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये थेट किंवा सहकारी पक्षांच्या सोबतीने सत्तेत होते. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात केवळ मोजकी राज्ये वगळल्यास देशभरात भाजपाचीच सत्ता होती.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १८१५: पोलंड राज्याच्या संविधान स्वीकारले गेले.

 • १८३९: बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स येथे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशन ची स्थापना.

 • १९४४: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या स्टॅफोर्डशायर येथील शस्त्रसाठ्यात स्फोट होऊन ७० जण ठार झाले.

 • १९९५: पाँडेचरीमधील व्हेक्टर कन्ट्रोल रिसर्च सेन्टर मधील शात्रज्ञांनी शोधलेले थोम्ब्रिनेज हे हृदयविकारावरचे आत्तापर्यंतचे सर्वोत्कृष्ट औषध ठरले.

 • १९९५: गझलांच्या दुनियेतील स्वामी तलत महमूद यांना मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

 • २०१६: निको रोसबर्ग २०१६ फोर्मुला १ चा चाम्पियान बनला.

जन्म 

 • १७०१: स्वीडिश खगोलशास्त्र व संशोधक अँडर्स सेल्सियस यांचा जन्म.

 • १८७१: इटालियन भौतिकशास्रज्ञ जियोव्हानी जॉर्जी यांचा जन्म.

 • १८५७: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जैवरसायनशात्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९५२ – इस्ट्बोर्न, ससेक्स, लंडन, इंग्लंड)

 • १८७०: इतिहास संशोधक दत्तात्रय बळवंत तथा द. ब. पारसनीस यांचा जन्म.

 • १८७४: इस्त्राएलचे पहिले राष्ट्राध्यक्ष चेम वाइझमॅन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९५२)

 • १८७८: भारतीय कवि आणि समीक्षक जतिंद्रमोहन बागची यांचा जन्म. (मृत्यू: १ फेब्रुवारी १९४८)

 • १८८१: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट १९३७)

 • १८८८: भारतीय लोकसभेचे पहिले सभापती गणेश वासुदेव मावळंकर यांचा जन्म.

 • १८९४: पॅनासोनिक चे संस्थापक कोनसुके मात्सुशिता यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल १९८९)

 • १९०३: नोबेल पारितोषिक विजेते नॉर्वेचे रसायनशास्त्रज्ञ लार्स ऑन्सेगर यांचा जन्म.

 • १९०७: विख्यात हिंदी साहित्यिक हरीवंशराय बच्चन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जानेवारी २००३)

 • १९०९: रशियन गणितज्ञ अनातोली माल्त्सेव यांचा जन्म.

 • १९१५: मराठी कथा कादंबरीकार दिगंबर बाळकृष्ण उर्फ दी. बा. मोकाशी यांचा उरण, रायगड येथे जन्म. (मृत्यू: २९ जून १९८१)

 • १९४०: अमेरिकन अभिनेता आणि मार्शल आर्ट तज्ञ ब्रूस ली यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७३)

 • १९५२: भारतीय गायक-गीतकार आणि निर्माते बॅप्पी लाहिरी यांचा जन्म.

 • १९८६: भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचा जन्म.

मृत्यू 

 • १७५४: फ्रेन्च गणिती अब्राहम डी. मुआव्हर यांचे निधन. (जन्म: २६ मे १६६७)

 • १९५२: तत्वचिंतक अहिताग्नी राजवाडे यांचे निधन. (जन्म: २३ ऑक्टोबर १८७९)

 • १९६७: गॅबॉन देशाचे पहिले अध्यक्ष लेओन मब्बा यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९०२)

 • १९७५: गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स चे सहसंस्थापक रॉस मॅक्वाहिरटर यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)

 • १९७६: प्रसिद्ध मराठी पत्रकार. समीक्षक, कादंबरीकार ग. त्र्यं. माडखोलकर तथा गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १८९९)

 • १९७८: भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापक लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९०५)

 • १९९४: स्वातंत्र्यसेनानी, रायगड मिलिटरी स्कूल चे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०७ – महाड, रायगड)

 • १९९५: दूरदर्शन व चित्रपट कलावंत संजय जोग यांचे निधन.

 • २०००: साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतकचे पहिले संपादक बाळकृष्ण दत्तात्रेय तथा बा. द. सातोस्कर यांचे निधन. (जन्म: २६ मार्च १९०९)

 • २००२: भारतीय कवी आणि शैक्षणिक शिवमंगल सिंग सुमन यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १९१५)

 • २००७: गेटोरेड चे सहनिर्माते रॉबर्ट केड यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९२७)

 • २००८: भारताचे ७ वे पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांचे निधन. (जन्म: २५ जून १९३१)

 

Marathi Newspapers


लोकसत्ता महाराष्ट्र टाईम्स सकाळ लोकमत
पुढारी माझा पेपर सामना ABP माझा
झी २४ तास प्रहार सर्व मराठी वर्तमानपत्र >>

टिप्पणी करा (Comment Below)