चालू घडामोडी आणि दिनविशेष - २७ सप्टेंबर २०१९

Date : 27 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून तिसऱ्यांदा मध्यस्थीची तयारी :
  • न्यू यॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आठवडय़ात तिसऱ्यांदा काश्मीरचा राग आळवला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांची भेट झाली त्यावेळी काश्मीर प्रश्नावर आपण त्यांच्याशी चर्चा केली, त्यावेळी या प्रश्नावर आपण लवाद अथवा मध्यस्थामार्फत मदतीचा प्रस्ताव दोन्ही देशांसमोर ठेवला असून त्यामधून या दोन्ही देशांनीच मार्ग काढावयाचा आहे, असे ट्रम्प म्हणाले.

  • भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे नेते आपले चांगले मित्र आहेत, यामधून मार्ग काढा असे आपण दोघांनाही सांगितले, त्यांनी यामधून मार्ग काढावयाचा आहे, असे ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा संदर्भ देऊन सांगितले.

  • न्यू यॉर्कमध्ये एका पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीर प्रश्नात मदत करण्याचा राग आळवला. ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर प्रथमच ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

  • या आठवडय़ात तिसऱ्यांदा ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्नामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव ठेवला. दोन्ही देशांची इच्छा असल्यास आपण मध्यस्थी करण्यास तयार आहोत, असे त्यापूर्वी ट्रम्प म्हणाले होते. मोदी आणि खान यांचे संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत भाषण होणार असून त्यापूर्वी एक दिवस अगोदर ट्रम्प यांनी प्रस्ताव ठेवला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी आपली फलदायी चर्चा झाल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. भारत-पाकचा सन्मान राखून आम्ही काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. आपण जेवढी मदत करू शकतो तेवढा प्रस्ताव ठेवला, लवाद असो वा मध्यस्थी किंवा अन्य काही,  शक्य तेवढी मदत करण्यास तयार आहोत, असे ट्रम्प म्हणाले.

अयोध्याप्रकरणी पुरातत्त्व अहवालावर मुस्लीम पक्षकारांचे घुमजाव :
  • नवी दिल्ली : अयोध्याप्रकरणी भारतीय पुरातत्त्व विभागाने (एएसआय) २००३ मध्ये दिलेल्या अहवालाच्या गोषवाऱ्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या मुस्लीम पक्षकारांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात घूमजाव केले आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालविल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. बाबरी मशिदीपूर्वी तेथे एक मोठे बांधकाम अस्तित्वात होते, असे अहवालामध्ये म्हटले आहे.

  • मुस्लीम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर सांगितले की, एएसआयच्या अहवालाच्या गोषवाऱ्यावर पक्षकारांना प्रश्नचिन्ह उपस्थित करावयाचे नाही. बाबरी मशिदीखाली कलाकृती, मूर्ती, खांब आणि अन्य घटक दिसले असे अहवालामध्ये म्हटले आहे त्यावरून तेथे एक मोठे बांधकाम अस्तित्वात होते, असे सूचित होत असल्याचे ते म्हणाले.

  • कायद्यानुसार तोडगा उपलब्ध होता त्याचा त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात वापर केला नाही. असे असताना एएसआयच्या अहवालास घेतलेल्या आक्षेपांबाबत या टप्प्यावर कसा विचार करणार, अशी विचारणा बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केली. त्यामुळे मुस्लीम पक्षकारांनी गुरुवारी नमूद केलेल्या बाबींना महत्त्व प्राप्त झाले आहे.

  • अहवालाच्या प्रत्येक पानावर स्वाक्षरी करणे अपेक्षित नाही, त्यामुळे अहवाल आणि गोषवारा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची गरज नाही, जर आम्ही न्यायालयाचा वेळ वाया घालविला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असे वकिलांनी सांगितले.

'ईडी’ म्हणजे काय? स्थापना कधी आणि का झाली? कोणते दिग्गज अडकले जाळ्यात
  • अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडी ही संस्था मागील अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या प्रकरणांसाठी चर्चेत आहे. मात्र अनेकांना ‘ईडी’ म्हणजे काय? या संस्थेची स्थापना कधी झाली? ही संस्था कशी काम करते? आतापर्यंत कोणत्या घोटाळ्यांची चौकशी ईडीने केली आहे? ईडीवर होणारे आरोप कोणते? ईडीचा रेकॉर्ड कसा आहे याबद्दल खूप कमी माहिती आहे. हेच सर्व जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न…

  • दरम्यान, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘ईडी’ची नोटीस आल्याच्या चर्चांमुळे ही संस्था विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आहे.

जाक शिराक यांचे निधन :
  • पॅरिस : फ्रान्सचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले जाक शिराक यांचे गुरुवारी वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. ज्यूंच्या नरसंहारात फ्रान्सच्या भूमिकेची कबुली देणारे पहिले नेते असलेल्या चिराक यांनी २००३ साली अमेरिकेने इराणवर केलेल्या आक्रमणाचा उद्दामपणे विरोध केला होता.

  • शिराक यांनी त्यांच्या प्रियजनांच्या सहवासात शांततेने चिरनिद्रा घेतली, असे त्यांचे जावई फ्रेडरिक सालत- बरॉ यांनी वृत्तसंस्थेला सांगितले, मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण नमूद केले नाही. २००७ साली अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर शिराक यांना आरोग्यविषयक अनेक त्रास होते.

  • फ्रान्सच्या पुराणमतवादी उजव्या पक्षाचे नेते असलेले शिराक हे सुमारे दोन दशके पॅरिसचे महापौर होते. त्यांचा करारीपणा व महत्त्वाकांक्षा यामुळे त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला त्यांना ‘ला बुलडोझर’ असे नाव मिळाले होते. १९९५ ते २००७ या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत ते परिपूर्ण असे जागतिक राजनीतिज्ञ होते, मात्र अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्यात किंवा २००५ साली पोलीस व अल्पसंख्याक युवक यांच्यातील चकमकींचे देशभरात दंगलीत रूपांतर झाल्यानंतर तणाव निवळण्यात ते अपयशी ठरले होते.

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज :
  • मुंबई : इंडोनेशियातील बटाम येथे २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱ्या ५३व्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ६५ जणांचा भारतीय संघ गुरुवारी इंडोनेशियाला रवाना झाला असून अनेक शरीरसौष्ठवपटूंकडून सुवर्णपदकाच्या अपेक्षा बाळगल्या जात आहेत.

  • सहा वेळा जागतिक विजेता बॉबी सिंग तसेच सबरे सिंग, जयप्रकाश, वैभव महाजन या भारतीय रेल्वेच्या खेळाडूंसह रामा मूर्ती (सेनादल), चैत्रेशन नतेशन (केरळ) आणि टी. कँडी रियाज (मणिपूर) या शरीरसौष्ठवपटूंकडून भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत. महाराष्ट्राच्या रोहित शेट्टी आणि रोहन धुरी यांच्याकडूनही भरीव कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. महिलांच्या शरीरसौष्ठवमध्ये अमला ब्रह्मचारी (महाराष्ट्र), माधवी बिलोचन (उत्तराखंड) तर फिजिक स्पोर्ट्स प्रकारात महाराष्ट्राच्या निसरीन पारीख, मंजिरी भावसार आणि आदिती बंब या सहभागी होत आहेत.

  • ‘‘गेल्या वर्षीपासून भारतीय खेळाडू तज्ज्ञ प्रशिक्षक आणि माजी शरीरसौष्ठवपटूंच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते. त्याचा नक्कीच फायदा भारतीय खेळाडूंना होणार आहे. गेल्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानणारा भारतीय संघ या वेळी विजेतेपद संपादन करील,’’ असा विश्वास भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे अध्यक्ष आणि पद्मश्री पुरस्कार विजेते प्रेमचंद डेग्रा यांनी व्यक्त केला.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १७७७: लँकेस्टर शहर फक्त एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी बनले.

  • १८२१: मेक्सिकोला स्पेनपासून स्वातंत्र्य.

  • १८२५: द स्टॉक्टन अँड डार्लिंग्टन रेल्वेने जगातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वे वाहतूक सुरू केली.

  • १८५४: एस. एस. आर्क्टिक बोट अटलांटिक महासागरात बुडून ३०० लोक ठार झाले.

  • १९०५: आइन्स्टाइनने E=mc² हे समीकरण पहिल्यांदा मांडले.

  • १९०८: फोर्ड मॉडेल टी गाडीचे उत्पादन सुरु झाले.

  • १९२५: डॉ. केशव हेडगेवार द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आरएसएसची स्थापना.

  • १९४०: जर्मनी, इटली व जपानने होन्शू बेटावरील टायफूनमध्ये ५,००० लोक ठार झाले.

  • १९५८: मिहीर सेन हे इंग्लिश खाडी पार करणारे पहिला आशियाई जलतरणपटू बनले.

  • १९६१: सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९९६: तालिबानने काबूल जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुरहानुद्दीन रब्बानी पळाले तर नजीबुल्लाहला रस्त्यात फाशी देण्यात आली.

जन्म 

  • १६०१: फ्रान्सचा राजा लुई (तेरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १६४३)

  • १७२२: अमेरीकन क्रांतिकारी सॅम्एल अॅडम्स यांचा जन्म.

  • १९०७: भारतीय क्रांतिकारी भगत सिंग यांचा जन्म.

  • १९०७: संगीत समीक्षक वामनराव देशपांडे यांचा जन्म.

  • १९३३: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर २०१२)

  • १९५३: भारतीय धर्मगुरू माता अमृतानंदमयी यांचा जन्म.

  • १९६२: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू गेव्हिन लार्सन यांचा जन्म.

  • १९७४: भारतीय क्रिकेट खेळाडू पंकज धर्माणी यांचा जन्म.

  • १९८१: भारतीय क्रिकेट खेळाडू लक्ष्मीपती बालाजी यांचा जन्म.

  • १९८१: न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रॅन्डन मॅककलम यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८३३: समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे जनक राजा राममोहन रॉय यांचे निधन. (जन्म: २२ मे १७७२)

  • १९१७: फ्रेंच चित्रकार एदगा देगास यांचे निधन.

  • १९२९: लेखक व पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन. (जन्म: २७ जून १८६४)

  • १९७२: भारतीय गणितज्ञ एस. आर. रंगनाथन यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)

  • १९७५: रसायन शास्त्रज्ञ तिरूवेंकट राजेंद्र शेषाद्री यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)

  • १९९२: पद्मश्री पुरस्कृत समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांचे निधन. (जन्म: १७ मार्च १९१०)

  • १९९६: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नजीबुल्लाह यांचे निधन.

  • १९९९: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचे निधन. (जन्म: २६ डिसेंबर १९३५)

  • २००४: शास्त्रीय गायिका शोभा गुर्टू यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)

  • २००८: पार्श्वगायक महेन्द्र कपूर यांचे निधन. (जन्म: ९ जानेवारी १९३४ – अमृतसर)

  • २०१२: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक संजय सूरकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९५९)

  • २०१५: भारतीय लेखक आणि राजकारणी सय्यद अहमद यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९४५)

  • २०१५: भारतीय कार्यकर्ते आणि लेखक कॉलन पोकुकुडन यांचे निधन.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.