चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ डिसेंबर २०१९

Date : 28 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी; काय आहे शासन निर्णय : 
  • दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पावसाच्या दुष्टचक्रामुळे बळीराजा संकटात सापडला होता. अशातच शेतकरी कर्जमाफीची मागणी करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ची घोषणा करत शेतकऱ्यांसाठी २ लाख रूपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. परंतु आता ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप अनेक नेत्यांकडून केला जात आहे.

  • काही दिवसांपूर्वीच सरकारनं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ ची घोषणा केली होती. यासंदर्भातील अध्यादेश शासनानं काढला आहे. केवळ दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे. तर दोन लाखांपेक्षा एक रूपयाही अतिरिक्त कर्ज असल्यास तो शेतकरी या योजनेस पात्र ठरणार नाही.

  • या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत कर्ज घेतलं आहे त्यांच्या कर्ज खात्याचं व्याज आणि थकबाकी ही २ लाखांपर्यंत असावी, अशी अट यामध्ये घालण्यात आली आहे. तसंच अशा शेतकऱ्यांचे अल्प / अत्यल्प भूधारक याप्रकारे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्जखात्यात २ लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार असल्याचं अध्यादेशात म्हटलं आहे.

  • दरम्यान, ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यातील मुद्दल आणि व्याज मिळून २ लाखांपेक्षा अधिक असेल अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. तसंच एप्रिल २०१५ पूर्वीचे कर्ज असलेला शेतकरीही या योजनेस पात्र राहणार नाही.

एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी,आयसीआयसीआय बँक खातेधारकांनो लक्ष द्या : 
  • एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी व आयसीआयसीआय या बँकांचे डेबिट कार्ड जर आपण वापरत असाल व त्यात ईएमव्ही, मास्टरकार्ड व विसा नसेल, तर तुम्हाला नव्या वर्षाच्या सुरूवातीसच एटीएमधुन पैसे काढण्यास अडचण येऊ शकते. असे यामुळे होऊ शकते कारण, ३१डिसेंबर २०१९ नंतर तुमचे डेबिट कार्ड १ जानेवारी २०२० पासूनच ब्लॉक होऊ शकते.

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार सर्व भारतीय बँकांना आपल्या ग्राहकांना दिलेले मॅग्नेटिक डेबिट कार्ड बदलावे लागणार आहेत. बँकांना या कार्डच्या जागी नवे ईएमवी कार्ड द्यावे लागणार आहे. डेबिट कार्ड बदलण्याची ही प्रक्रिया अनिवार्य आहे. कारण, ती आंतरराष्ट्रीय पेंमेंट्सशी निगडीत आहे.

  • एसबीआय, पीएनबी, एचडीएफसी व आयसीआयसीआय बँक व अन्य बँकांचे जे ग्राहक जुने डेबिट कार्ड किंवा मग मॅग्नेटिक डेबिट कार्ड वापरत आहेत, त्यांनी वेळेतच आपले कार्ड बदलवून घ्यावेत. अन्यथा त्यांचे कार्ड बंद होऊ शकते. महत्वाची बाब ही आहे की, हे कार्ड नव्या वर्षाच्या प्रारंभीच बंद होऊ शकतात. त्यामुळे नववर्षाचे स्वागत करण्यात मग्न असलेल्यांना देखील याचा फटका बसू शकतो.आरबीआयकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, सर्व बँकांना सगळे मॅग्नेटिक चीप असलेल्या डेबिट कार्डला ईएमव्ही आणि पीन आधारीत कार्ड्सशी बदलून घ्यावी लागेल.

आगामी वर्षात ‘या’ दिवशी बँकांना असणार सुट्टी : 
  • प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट) व महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) यांच्यासह काही सणांच्यादिवशी शासकीय तसेच खासगी बँकांचे व्यवहार बंद असतील. तर, विविध राज्यांमधील महत्त्वपूर्ण सणांच्या दिवशी देखील तेथील महत्वानुसार सुट्टी असते. जसे की, आसाममध्ये बिहूच्या दिवशी तर केरळात ओनमला बँका उघडणार नाहीत.

  • वर्ष २०२० मध्ये या दिवशी बँकांना आहे सुट्टी – १ जानेवारी, बुधवार – (नववर्ष आरंभ दिन), १५ जानेवारी, बुधवार – (पोंगल, दक्षिणेकडील राज्यांसाठी), २६ जानेवारी, रविवार (प्रजासत्ताक दिन ), ३० जानेवारी, गुरूवार – (वसंत पंचमी), २१ फेब्रवारी, शुक्रवार – (महाशिवरात्र), १० मार्च, मंगळवार – (होळी), २५ मार्च, बुधवार- (उगादी, मध्यप्रदेश), २ एप्रिल, गुरूवार- (राम नवमी), ६ एप्रिल, सोमवार – (महावीर जयंती), १० एप्रिल, शुक्रवार – (गुड फ्रायडे), १४ एप्रिल, मंगळवार – (डॉ.आंबेडकर जयंती), १ मे, शुक्रवार – (महाराष्ट्र दिन, कामगार दिवस), ७ मे, गुरूवार – (बुद्ध पोर्णिमा), ३१ जुलै, शुक्रवार -(बकरी ईद), ३ ऑगस्ट, सोमवार – (रक्षाबंधन), ११ ऑगस्ट, मंगळवार – (जन्माष्टमी), १५, शनिवार ऑगस्ट- (स्वातंत्र्य दिन), ३० ऑगस्ट, रविवार – (मोहरम), २ ऑक्टोबर, शुक्रवार – (महात्मा गांधी जयंती), २६ ऑक्टोबर, मंगळवार – (विजयादशमी), ३० ऑक्टोबर, शुक्रवार – (ईद ए मिलाद), १४ नोव्हेंबर, शनिवार – (दिवाळी), १६ नोव्हेंबर, सोमवार – (भाऊबीज), ३० नोव्हेंबर सोमवार – (गुरूनानक जयंती), २५ डिसेंबर, शुक्रवार – (ख्रिसमस)

मुंबई हल्ल्यानंतर पाकवर हवाई हल्ल्याचा प्रस्ताव तत्कालीन सरकारने नाकारला - धनोआ : 
  • मुंबईवर झालेल्या (२६/११) हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यासाठी भारतीय हवाई दल तयार होते. मात्र, पाकिस्तानवर हल्ला करण्याचा हवाई दलाचा प्रस्ताव तत्कालिन सरकारने नाकारला, असा खुलासा माजी हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांनी केला आहे.

  • मुंबईत एका महाविद्यालयाच्या वार्षिक समारंभात ते बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. धनोआ म्हणाले, पाकिस्तानात कुठल्या ठिकाणी दहशतवादी कँप आहेत, हे आम्हाला माहिती होतं आणि आम्ही कारवाईसाठी तयार होतो. मात्र, या दहशतवादी कँपवर हल्ला करायचा की नाही हा राजकीय निर्णय होता.

  • त्यानुसार सरकारने हल्ल्याचा आमचा प्रस्ताव नाकारला. धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात हवाई दलाचे प्रमुख होते.

आंध्रच्या तीन राजधान्यांचा विषय लांबणीवर : 
  • आंध्र प्रदेश राज्याच्या तीन राजधान्या निर्माण करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी तूर्तास लांबणीवर टाकला. या संदर्भात कोणतीही घाई नाही, असे त्यांनी शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्पष्ट केले.

  • विशाखापट्टणम येथे प्रशासकीय, अमरावती विधिमंडळ तर कुडप्पा न्यायालयीन राजधानीची शहरे असतील, असे मुख्यमंत्री जगनमोहन  यांनी अलीकडेच विधानसभेत जाहीर केले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर आज शिक्कामोर्तब करण्यात येणार होते. यामुळे अमरावती शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. आंदोलनासाठी जाणाऱ्या तेलुगू देसमच्या खासदारांना रोखण्यात आले. तीन राजधान्या करण्यास राजकीय तसेच लोकांनीही विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर जगनमोहन यांनी सावध भूमिका घेतली.

  • तेलंगणा राज्याच्या निर्मितीनंतर हैदराबाद शहर हे आंध्र आणि तेलंगणाची पुढील दहा वर्षे संयुक्त राजधानी राहिल ही तरतूद होती. चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्रिपदी असताना त्यांनी अमरावती हे शहर राजधानी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार काम सुरू होते. सिंगापूरसह काही परदेशी कंपन्यांनी कोटय़वधी डॉलर्सची गुंतवणूक केली होती. सत्ताबदल होताच जगनमोहन सरकारने परदेशी कंपन्यांचे करार रद्द केले. सिंगापूरच्या कंपन्यांनी याला आक्षेपही घेतला. परदेशात भारताबद्दलची प्रतिमाही खराब झाली.

२८ डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.