चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ नोव्हेंबर २०१९

Date : 28 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
काटरेसॅट ३ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण :
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) बुधवारी  काटरेसॅट ३ या उपग्रहाचे ढगाळ वातावरण असतानाही यशस्वी प्रक्षेपण केले. पीएसएलव्ही सी ४७  या प्रक्षेपकाच्या मदतीने करण्यात आलेल्या उड्डाणात काटरेसॅट ३ उपग्रहाबरोबर अमेरिकेचे १३ नॅनो उपग्रह यशस्वीरीत्या अवकाशात सोडण्यात आले.

  • पृथ्वीचे प्रतिमा चित्रण तयार करण्याचे काम अधिक अचूकतेने करण्याचा उद्देश काटरेसॅट ३ उपग्रहातून  साध्य होणार आहे.  चांद्रयान २ मोहिमेच्या अपयशानंतर  इस्रोच्या चमूने नवी आव्हाने स्वीकारून ही काटरेसॅट ३ मोहीम यशस्वी केली आहे. या यशाबद्दल इस्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इस्रोच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

  • पीएसएलव्ही सी-४७ या प्रक्षेपकाने सकाळी ९.२८ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरून अवकाशात झेप घेतली. त्यानंतर अवघ्या सतरा मिनिटांत काटरेसॅट ३  उपग्रह ध्रुवीय सूर्य सापेक्ष कक्षेत प्रस्थापित करण्यात आला. अमेरिकेचे नॅनो उपग्रह पुढील दहा मिनिटांत त्यांच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. काटरेसॅट-३ उपग्रह पृथ्वीपासून ५०९ किलोमीटर उंचीवर आहे.

  • २०१९ मध्ये इस्रोने केलेले हे पाचवे प्रक्षेपण असून याआधी जुलै महिन्यात चांद्रयान-२ सोडण्यात आले होते. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी सांगितले की, ‘आताचे उड्डाण हे मोठे यश असून त्यात काटरेसॅट ३ सह अमेरिकेचे  १३ नॅनो उपग्रह अपेक्षित कक्षेत अचूकपणे प्रस्थापित करण्यात आले. काटरेसॅट हा गुंतागुंतीचा  प्रगत पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. मार्च महिन्यापर्यंत आणखी १३ मोहिमा होणार असून त्यात सहा प्रक्षेपक व सात उपग्रह मोहिमांचा समावेश आहे.

केंद्र सरकारी खात्यांमध्ये ६.८३ लाख जागा रिक्त :
  • केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये ६.८३ लाख जागा रिक्त आहेत असे लोकसभेत केंद्र सरकारच्या वतीने बुधवारी सांगण्यात आले. केंद्र सरकारमध्ये १ मार्च २०१८ अखेर ३८ लाख ०२ हजार ७७९ जागा होत्या त्यातील ३१लाख १८ हजार ९५६ भरण्यात आल्या आहेत. उर्वरित जागा रिक्त आहेत.

  • कार्मिक खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. खात्यांकडून मागणी आल्यानंतर काही नवीन पदे निर्माणही होतात. जर पद दोन किंवा तीन वर्षे भरले गेले नाही तर ते रद्द होते. अशी पदे कार्यात्मक समर्थनानुसार पुन्हा पुनरुज्जीवित करता येतात. रेल्वे खात्यात मात्र पदे आपोआप रद्द होण्याची कुठलीही व्यवस्था नाही.

  • कर्मचारी निवड आयोगाने २०१९-२० मध्ये १ लाख ०५ हजार ३३८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. रेल्वे खात्याने २०१७-१८ मध्ये आगामी दोन वर्षांचा विचार करून एक लाख २७ हजार ५७३ पदांची रोजगार अधिसूचना जारी केली होती ती क व वर्ग १ पदे होती.  २०१८-१९ मध्ये याच प्रवर्गातील १ लाख ५६ हजार १३८ पदांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली होती. टपाल खात्याने १९५२२ पदांसाठी परीक्षा घेतली आहे. कर्मचारी निवड आयोगाच्या माध्यमातून एकूण ४ लाख ०८ हजार ५९१ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राष्ट्रपती भवनातील चित्राबद्दल चित्रकार प्रणिता बोरा यांचा सन्मान :
  • नगर : नगरच्या नव्या पिढीतील चित्रकार प्रणिता प्रवीण बोरा यांना राष्ट्रपती भवनात मुक्काम करून चित्र साकारण्याची संधी मिळाली, त्यांचे चित्रही राष्ट्रपती भवनात कायमस्वरूपी लावले गेले आहे. प्रणिता यांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी प्रणिता बोरा यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान केला.

  • दिल्लीतील ललित कला अकादमीचे अध्यक्ष व प्रसिद्ध शिल्पकार उत्तम पाचर्णे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आर्टिस्ट इन रेसिडेन्स’ या उपक्रमांत राष्ट्रपती भवनात देशातील निवडक चित्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी दि. १० ते १७ नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रपती भवनातील मुक्कामात काही चित्रे साकारली.

  • राष्ट्रपती भवनातील ऐतिहासिक उपक्रमात निवडक कलावंतांमध्ये नगरच्या नव्या पिढीतील चित्रकार प्रणिता बोरा यांचा समावेश होता. चित्रकार बोरा यांच्या चित्रांमधील बारकावे समजून घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रणिता यांचे कौतुक केले. बोरा यांचे एक चित्र राष्ट्रपतींच्या दालनात कायमस्वरूपी असणार आहे तर एक चित्र ललित कला अकादमीच्या संग्रहात राहणार आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते प्रणिता यांचा गौरव करण्यात आला होता.

‘या’ आमदाराने ईश्वाराला नाही तर छत्रपती शिवाजी महारांजांना साक्ष ठेवत घेतली शपथ :
  • प्रहर जनशक्ती पक्ष आमदार बच्चू कडू यांनी तिरंग्याला साक्ष ठेऊन आमदारकीची शपथ घेतली.

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी देशातील जनतेला साक्ष ठेवून आपल्या नावामध्ये आईचा उल्लेख करत शपथ घेतली.

  • चंदगडचे राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांनी महाराष्ट्र- कर्नाटक सीमा लढय़ातील बांधवांना स्मरून शपथ घेतली

  • राष्ट्रवादीचे मावळमधील आमदार सुनील शेळके यांनी आई- वडिलांची शपथ घेऊन सदस्यत्वाची शपथ घेतली.

  • वांद्रे पूर्व मतदारसंघामधून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा परभाव करणाऱ्या काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

  • भाजपचे संजीव रेड्डी बोधकवार यांनी संस्कृतमधून शपथ घेतली.

  • उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी सिंधी भाषेतून सदस्यत्वाची शपथ घेतली.

  • कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मातृसाक्ष शपथ घेतली.

  • शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादामुळेच निवडून आल्याचे सांगत कुलदेवता काळूबाईच्या नावाने शपथ घेतली.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८२१: पनामाला स्पेनपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९३८: प्रभात चा माझा मुलगा हा चित्रपट रिलीज झाला.

  • १९६०: मॉरिटानियाला फ्रान्सपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९६४: नासा (NASA) चे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर निघाले.

  • १९६७: जोसेलिन बेल बर्नेल आणि अँटनी हेविश यांनी पल्सार तार्‍यांचे अस्तित्त्व सर्वप्रथम सिद्ध केले.

  • १९७५: पूर्व तिमोरला पोर्तुगालपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • २०००: तेलगू भाषेतील महाकवी गुर्रम जाशुवा यांच्या नावाने दिला जाणारा साहित्य पुरस्कार कवी नारायण सुर्वे यांना जाहीर.

जन्म 

  • १८५३: डॉक्टरेट मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १९४४)

  • १८५७: स्पेनचा राजा अल्फान्सो (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १८८५)

  • १८७२: गायक नट रामकृष्णबुवा वझे यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे १९४३)

  • १९६४: भारतीय अमेरिकन वकील आणि राजकारणी मायकल बेनेट यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९०: श्रेष्ठ समाजसुधारक जोतिराव गोविंदराव फुले ऊर्फ महात्मा फुले यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १८२७)

  • १८९३: ब्रिटिश अधिकारी सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १८१४)

  • १९३९: बास्केटबॉल चे निर्माते जेम्स नेस्मिथ यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८६१)

  • १९५४: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९०१)

  • १९६२: गायक, संगीत संयोजक व अभिनेते कृष्ण चंद्र तथा के. सी. डे यांचे निधन.

  • १९६३: इतिहासकार व लेखक त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचे निधन. (जन्म: २५ मे १८९५)

  • १९६७: सशस्त्र क्रांतिकारक पांडुरंग महादेव तथा सेनापती बापट यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १८८०)

  • १९६८: बालसाहित्यासाठी प्रसिद्ध असलेल्या इंग्लिश लेखिका एनिड ब्लायटन यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १८९७)

  • १९९९: अकादमी पुरस्कार विजेते बनारस घराण्याचे सारंगीवादक हनुमानप्रसाद मिश्रा यांचे निधन.

  • २००१: नाटक निर्माते अनंत काणे यांचे निधन.

  • २००८: भारतीय हवलदार गजेन्द्र सिंग यांचे निधन.

  • २००८: भारतीय सैनिक संदीप उन्नीकृष्णन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९७७)

  • २०१२: अमेरिकन लेखक झिग झॅगलर यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १९२६)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.