चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ ऑक्टोबर २०१९

Date : 28 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अयोध्या नगरी ५ लाख ५१ हजार दिव्यांनी उजळली, गिनीज बुकमध्ये झाली नोंद :
  • दिवाळीनिमित्त अयोध्या नगरी ५ लाख ५१ हजार दिव्यांच्या रोषणाईने झगमगून निघाली आहे.शनिवारी संध्याकाळी शरयू घाट ते राम पायडीपर्यंत ५ लाखांहून अधिक पणत्या व दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे दीपोत्सवासाठी अयोध्या व शेजारील फैजाबाद शहर दिव्यांनी रंगून गेले. यासोबतच अयाेध्येने २०१८ चा ३.५१ लाख दिवे लावण्याचा आपला स्वत:चाच विक्रम माेडला. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही याची नोंद झाली.

  • शनिवारी संध्याकाळी शरयू नदीचा किनारा लाखो पणत्यांनी लखलखला.  दिवे लावण्यासाठी ६ हजार विद्यार्थी, २२० प्राध्यापक व व्याख्याते सहभागी झाले होते. दीपोत्सवासाठी अयोध्या आणि फैजाबाद परिसरात तसेच शरयू नदीच्या तीरावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांबरोबरच धडक कृती दल, प्रांतिक सशस्त्र दलाचे जवान तैनात आहेत.

  • दीपोत्सवासाठी अयोध्येत येणाऱ्यांच्या मार्गांत अडथळा येऊ नये, यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यावेळी बोलताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, आधीची सरकारे अयोध्येत येण्याची भीती बाळगत होती. परंतु मी गेल्या अडीच वर्षात कितीतरी वेळा अयोध्येत आलोय.  केंद्रात मोदी सरकार आल्यापासून भारताचा जगात सांस्कृतिक सन्मान पुन्हा प्रस्थापित झाला आहे. अयोध्येत अशी दिवाळी साजरी करण्यास ७० वर्षे लागली.

‘मराठी’ पाऊल पडते पुढे!, UPSC परिक्षेत सोलापुरचा हर्षल देशात पहिला :
  • केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या इंडियन इंजिनिअरिंग सव्‍‌र्हिसेसच्या (आयईएस) परीक्षेत सोलापूर जिल्ह्य़ातील मंगळवेढय़ाचा हर्षल ज्ञानेश्वर भोसले यांने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात हे धवल यश मिळविले. लहानपणीच वयाच्या पाचव्या वर्षीच वडिलांचे छत्र हिरावले गेलेल्या हर्षलने गरिबीचे चटके सहन करीत गाजविलेल्या कर्तत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे गेल्या जानेवारीत इंडियन इंजिनिअरिंग सव्‍‌र्हिसेसची (आयईएस) परीक्षा घेतली होती. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये मुलाखती घेण्यात आल्या असता त्यात मंगळवेढय़ाच्या हर्षल भोसले याने देशात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. या परीक्षेंतर्गत ५११ जागा रिक्त होत्या. यात स्थापत्य अभियांत्रिकीच्या १६१, यंत्र अभियांत्रिकीच्या १३६, विद्युत अभियांत्रिकीच्या १०८ व अणुविद्युत आणि दूरसंचार अभियांत्रिकीच्या १०६ जागांचा समावेश होता.

  • हर्षल हा पाच वर्षांचा असतानाच त्याचे पित्रुछत्र हिरावले होते. त्यानंतर आईने शेतीमध्ये काबाडकष्ट करून हर्षलचे शिक्षण पूर्ण केले. शालेय शिक्षण मंगळवेढय़ाच्या इंग्लिश स्कूल व देगावच्या आश्रमशाळेत पूर्ण झाले् होते. तर बीड येथील शासकीय तंत्रनिकेतनमधूुन अभियांत्रिकी पदविका संपादन केल्यानंतर कराड येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल पदवी घेतली. त्याला मुंबईत भाभा अणुसंधान संशोधन संस्थेत नोकरी मिळाली होती. परंतु त्याने पुढचे ध्येय गाठले होते. पुण्यात ऑईल अॅनन्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनमध्ये सेवेत असतानाच त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभियांत्रिकी परीक्षा दिली.

तीन दशकात पहिल्यांदाच सोन्याची विक्री? आरबीआयने दिलं स्पष्टीकरण :
  • तब्बल तीन दशकांनंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पहिल्यांदाच सोन्याची विक्री सुरू केली असून बँकेने जालान समितीच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून सोन्याच्या ट्रेडिंगमध्येही सक्रीय झाल्याचं वृत्त दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहे. त्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

  • “आरबीआय सोन्याची विक्री किंवा व्यापार करत असल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलंय. पण आरबीआयकडून अशाप्रकारे कोणतंही सोनं विकण्यात आलेलं नाही किंवा सोन्याचा व्यापार देखील आरबीआय करत नाही”, असं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ट्विटरद्वारे आरबीआयने हे स्पष्टीकरण दिलं. अशाप्रकारचं वृत्त म्हणजे केवळ अफवा असल्याचं बँकेने स्पष्ट केलं आहे.

  • ‘आरबीआयने जुलै महिन्यापासून एकूण ५.१ अब्ज डॉलरचं सोनं खरेदी केलंय, तर १.१५ अब्ज डॉलर सोन्याची विक्री केली आहे. आरबीआयकडे ऑगस्टच्या अखेरपर्यंत १९.८७ दशलक्ष औंस कोटी सोनं होतं. तर, ११ ऑक्टोबर रोजी फॉरेक्स रिझर्व्हमध्ये केवळ २६.७ अब्ज डॉलर सोनं होतं’, असं दोन दिवसांपूर्वी आलेल्या वृत्तात म्हटलं होतं. 

महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री :
  • विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत, मात्र मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर सगळं घोडं अडलं आहे. कारण शिवसेनेने सगळं काही समसमान या लोकसभेच्या वेळी ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता हा फॉर्म्युला महाराष्ट्रात लागू होणार की नाही याची चर्चा सुरु असतानाच शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे, असं भाजपाच्या एका विश्वसनीय सूत्राकडून समजतं आहे.

  • इंडियन एक्स्प्रेसने या संदर्भातले वृत्त दिले आहे. नेमकं काय घडणार हे सोमवारनंतर म्हणजेच आजचा दिवस गेल्यावरच ठरणार आहे. तूर्तास तरी भाजपाचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असं सूत्र ठरण्याची शक्यता आहे.

  • २४ ऑक्टोबरला जेव्हा विधानसभा निवडणूक निकाल लागले त्याचदिवशी उद्धव ठाकरेंनी 50:50 फॉर्म्युल्याची आठवण भाजपाला करुन दिली. इतकंच नाही तर शनिवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या विजयी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीतही या ठरावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आणि भाजपाकडून तसं लेखी आश्वासन घेण्यात यावं अशीही मागणी शिवसेना आमदारांनी उद्धव ठाकरेंकडे केली.

  • निवडणुकीपूर्वी भाजपाचाच मुख्यमंत्री होणार असं म्हणणारे भाजपाचे नेतेही आता महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे म्हणत आहेत. त्यामुळे नेमका मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार? भाजपाचा की शिवसेनेचा हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशातच आता भाजपाकडे मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेकडे उपमुख्यमंत्रीपद असं सत्तेचं सूत्र ठरल्याची माहिती भाजपातल्याच एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे.

अयोध्या निकालानंतर देशात संयमाची पंतप्रधानांना आशा :
  • राम जन्मभूमी— बाबरी मशीद जमीन वादाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात नोव्हेंबरमध्ये लागण्याची शक्यता असून त्यानंतर देशात कुठल्याही प्रकारे असंतोष न पसरवता शांतता पाळावी, असा अप्रत्यक्ष संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात दिला.

  • ते म्हणाले की, सप्टेंबर २०१० मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने राम जन्मभूमी प्रकरणात निकाल दिला होता, त्यावेळी हितसंबंधी लोकांनी संघर्षांची भाषा करून अशांतता माजवण्याचा प्रयत्न केला. त्यात काही वाचाळांचा केवळ प्रकाशझोतात राहण्याचा संकुचित हेतू होता. त्यावेळी काही दिवस तणावाचे वातावरण राहिले. पण, जेव्हा प्रत्यक्षात निकाल आला तेव्हा संत, सामाजिक संघटना, धर्मगुरू, सर्वधर्मीय नेते यांच्या प्रयत्नातून  न्यायालयीन निकालाचा आदर करण्यात आला. त्यावेळी सर्वानी समतोल अशी वक्तव्ये केली. त्यातून सामाजिक- राजकीय तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तसेच न्यायव्यवस्थेचा सन्मान करीत एकता व अखंडतेची परंपरा अधिक दृढ करण्यात आली होती. त्या काळात कुठेही संतप्त भावना उमटल्या नाहीत. किंवा कुठे तणावही निर्माण झाला नव्हता.

  • सर्वोच्च न्यायालयात नोव्हेंबरमध्ये  अयोध्या प्रकरणी निकाल लागणार असून त्यावेळी देशात शांतता राखण्यात सामाजिक संघटना व संत, धार्मिक नेते यांनी मदत करावी, असा अप्रत्यक्ष संदेश मोदी यांनी दिला आहे.

भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु यांना भारतरत्न द्या, काँग्रेस नेत्याची मागणी :
  • काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांनी, शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना ‘भारतरत्न’ या भारताच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात यावं अशी मागणी केली आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत तिवारी यांनी पत्र लिहिलं असून त्यामध्ये, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांना भारतरत्न पुरस्कारासह अधिकृतरित्या ‘शहीद-ए-आजम’ म्हणून घोषित करावं, अशी मागणीही तिवारी यांनी केली आहे. याशिवाय, “पंजाबमधील मोहालीस्थित विमानतळाचं ‘शहीद-ए-आजम भगतसिंग विमानतळ’ असं नामकरण करावं, यामुळे १२4 कोटी भारतीयांना आनंद होईल”, असंही तिवारी म्हणालेत. पंतप्रधान मोदींना पाठवलेलं हे पत्र तिवारी यांनी ट्विटरवरही शेअर केलं आहे.

  • महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून करण्यात आलेली ही मागणी अधिक महत्त्वाची ठरते.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.

  • १४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.

  • १६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना.

  • १८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.

  • १९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.

  • १९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.

  • १९४०: दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.

  • १९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले.

जन्म 

  • १८६७: स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९११)

  • १८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)

  • १९३०: हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय तथा अंजान यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७)

  • १९५५: मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेटस् यांचा जन्म.

  • १९५५: भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी इन्द्रा नूयी यांचा जन्म.

  • १९५६: ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदिनेजाद यांचा जन्म.

  • १९५८: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जन्म.

  • १९६७: अमेरिकन अभिनेत्री ज्यूलिया रॉबर्टस यांचा जन्म.

  • १९७९: युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.

मृत्यू 

  • १६२७: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचे निधन. (जन्म: ३१ ऑगस्ट १५६९)

  • १८११: राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १७७६)

  • १९००: जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १८२३)

  • १९४४: डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला हेलन व्हाईट यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)

  • २००२: एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)

  • २०१०: ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)

  • २०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.