चालू घडामोडी आणि दिनविशेष - २८ सप्टेंबर २०१९

Date : 28 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दहशतवादाविरोधात जगाने एकजूट दाखवावी :
  • संयुक्त राष्ट्रे : दहशतवादाचा धोका कुणा एका देशालाच आहे अशातला भाग नाही, त्यामुळे या मोठय़ा आव्हानाला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजूट दाखवण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील बहुप्रतीक्षित भाषणात केले.

  • आमसभेच्या ७४ व्या अधिवेशनात मोदी यांनी दहशतवादाच्या विरोधात सदस्य देशांचे मतैक्य नसल्याबाबत खंत व्यक्त करतानाच संयुक्त राष्ट्रांची निर्मिती ज्या तत्त्वांच्या आधारे झाली त्यालाच खिंडार पाडले जात असल्याचे स्पष्ट केले.

  • दहशतवाद हे आजच्या काळातील मोठे आव्हान आहे, त्याचा धोका कुणा एका देशालाच आहे असे नाही, सगळे जग व मानवतेला त्याचा धोका आहे असे सांगून ते म्हणाले की, यावर आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजुटीने काम  केले पाहिजे.

  • मोदी यांनी हिंदीतून भाषण केले. आमसभेत आतापर्यंत त्यांचे हे दुसरे भाषण आहे. त्यांचे पहिले भाषण २०१४ मध्ये झाले होते. भारताने १९९६ मध्ये सर्वंकष आंतरराष्ट्रीय दहशतवाद जाहीरनाम्याचा मसुदा संयुक्त राष्ट्रांना सादर केला होता. पण संयुक्त राष्ट्रांचे त्यावर मतैक्य झालेले नाही. सर्व प्रकारच्या दहशतवादाला तसेच त्याला आश्रय देऊन अर्थपुरवठा करणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्याची शिफारस त्यात आहे.

जाणून घ्या, ३० सप्टेंबरपर्यंत पॅनकार्ड – आधार कार्ड जोडणी न केल्यास काय होणार :
  • जर तुम्ही ३० सप्टेंबरपर्यंत पॅनकार्ड व आधारकार्ड जोडणी केली नाही तर, तुमचे पॅनकार्ड वापरात राहणार नाही. या अगोदर असा नियम होता की जर ठरलेल्या मुदतीत तुम्ही पॅनकार्ड व आधार कार्ड जोडणी केली नाहीतर तुमचे पॅनकार्ड अवैध समजले जाईल. म्हणजेच तुमच्याकडे पॅनकार्ड नाही असे मानले जाईल. तर आता ते वापरात नसल्याचे मानले जाणार आहे. म्हणजेच १ ऑक्टोबरपासून जोपर्यंत तुम्ही पॅनकार्डला आधारकार्डशी जोडत नाहीत. तोपर्यंत तुम्ही प्राप्तिकर, गुंतवणूक किंवा कर्ज आदींशी निगडीत कोणतीही कामं करता येणार नाही.

  • केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत पॅनकार्डला आधारकार्डशी जोडण्याची मुदत दिली आहे व हे आवश्यक केले आहे. त्यामुळे जर पॅन-आधार जोडणी केलेली नसेल तर तुम्ही ती करून घेणे गरजेचे आहे.

  • केंद्र सरकारने मनी लॉन्ड्रिंग (पीएमएलए) कायद्याअंतर्गत बँक खाते, पॅनकार्डची आधारशी जोडणी करणे बंधनकारक केले आहे. जे कोणी असे करणार नाही त्यांचे पॅनकार्ड अवैध मानले जाणार आहे.

दहशतवादाबाबत परराष्ट्रमंत्र्यांचा सार्क परिषदेत पाकवर निशाणा :
  • न्यूयॉर्क : दक्षिण आशियातील फलदायी सहकार्यासाठी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा नायनाट करणे ही पूर्वअट आहे, असे सांगून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. सार्कची कालसुसंगतता ही केवळ दहशतवादाच्या समस्येवरील निर्णायक कृतीवर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  • दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संस्था (सार्क) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत त्यांनी सांगितले, की सार्क ही केवळ हुकलेल्या संधींची कहाणी नाही तर सहकार्याच्या वाटेत दहशतवादाच्या मार्गाने  हेतपुरस्सर आणण्यात आलेल्या अडथळ्यांचीही कहाणी आहे.

  • दहशतवादाचा नायनाट ही केवळ फलदायी सहकार्यासाठीच नव्हे तर दक्षिण आशियाच्या अस्तित्वासाठी पूर्वअट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

  • पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी यांनी जयशंकर यांच्या काश्मीरविषयक वक्तव्यावर आक्षेप घेतला. कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय ही भारताची अंतर्गत बाब असल्याचे जयशंकर यांनी म्हटले होते. सार्क नेत्यांच्या बैठकीत जयशंकर यांनी २०१४ मधील काठमांडू जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. सार्क प्रादेशिक जाहीरनाम्यात असे म्हटले होते, की दहशतवाद नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर कायदे करण्यात यावे.

  • जयशंकर यांनी सांगितले, की सार्क देशांनी दहशतवादाविरोधात उपाययोजना केल्या, तरच या चळवळीचे महत्त्व राहील. त्यातूनच हा सहप्रवास फलदायी होईल. प्रादेशिकतावाद हा आता जगात सगळीकडेच आहे, सार्क देशांनी जर व्यापार व दळणवळण सुविधा सुरळीत ठेवल्या नाहीत तर ते मागे पडतील. मोटार वाहन व रेल्वे करारात त्यांनी पुढाकार घेतला नाही, हे दुर्दैव आहे. सार्क प्रादेशिक हवाई सेवा करारावर काहीच प्रगती झालेली नाही.

अयोध्याप्रकरणी पुरातत्व अहवाल अभ्यासपूर्णच :
  • नवी दिल्ली : रामजन्मभूमी-बाबरी प्रकरणी २००३ मधील भारतीय पुरातत्त्व विभागाचा (एएसआय) अहवाल म्हणजे सर्वसामान्य मत नव्हते. उत्खननातून जे साहित्य मिळाले त्याबाबत पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची मते काय आहेत हे स्पष्ट करण्याचे आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले होते. त्यांच्या वतीने हे अधिकारी काम करीत होते, असे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

  • एएसआयच्या अहवालातून जे अनुमान काढण्यात आले ते सुसंस्कृत आणि अभ्यासपूर्ण मनाने काढण्यात आले होते, असे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने म्हटले आहे.

  • एएसआयचा अहवाल हे केवळ पुरातत्त्व अधिकाऱ्यांचे मत आहे, वादग्रस्त ठिकाणी राम मंदिर अस्तित्वात होते हे सिद्ध करण्यासाठी या मताच्या पुष्टय़र्थ पूरक पुरावे देण्याची गरज आहे, असे मुस्लीम पक्षकारांच्या वकील मीनाक्षी अरोरा यांनी सांगितल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदविले. हा अहवाल पूरक पुरावा म्हणून ग्राह्य़ धरता येऊ शकत नाही, असेही अरोरा म्हणाल्या.

  • एएसआयचा २००३ चा अहवाल हा कमकुवत पुरावा आहे, त्याच्या पुष्टय़र्थ पूरक पुरावा देणे गरजेचे आहे, हा अहवाल म्हणजे केवळ सल्ला आहे त्यामुळे तो न्यायालयास बंधनकारक नाही. अहवाल म्हणजे केवळ मत आहे, त्यामधून निश्चित निष्कर्ष काढता येऊ शकत नाही. त्या ठिकाणी राम मंदिर अस्तित्वात होते की नाही याबाबत पुरातत्त्व अधिकाऱ्यांना अहवाल देण्यास सांगितले होते, असे मत मुस्लीम पक्षकारांच्या वकील अरोरा यांनी व्यक्त केले होते.

एससी, एसटी कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनात वाढीव लाभ :
  • देशातील खासगी क्षेत्रातील कंपन्या, आस्थापनांमधील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील (एससी, एसटी) कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात १.१ टक्के अधिकचा निधी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

  • त्यासाठी खासगी क्षेत्रातील एकूण कर्मचाऱ्यांमध्ये एससी, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रमाण किती आहे, याची माहिती जमा करण्याचे आदेश देशातील सर्व राज्यांमधील विभागीय भविष्य निर्वाह निधी कार्यालयांना देण्यात आले आहेत.

  • केंद्र सरकारने असंघटित तसेच, लघु व सूक्ष्म उद्योगांमधील कामगार-कर्मचाऱ्यांसाठी विविध सामाजिक सुरक्षा योजना सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर रोजगार निर्मितीसाठी लहान उद्योगांची संख्या वाढविण्याकरिता ‘पंतप्रधान रोजगार निर्मिती’ ही प्रोत्साहनपर योजना सुरू करण्यात आली आहे. त्यात काम करणाऱ्या कामगारांची भविष्य निर्वाह निधीचे पहिल्या तीन वर्षांचे हप्ते केंद्र सरकार भरणार आहे. आता केंद्र सरकारने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या एससी व एसटी कर्मचाऱ्यांसाठी विशेष योजना सुरू करण्याचे ठरवले आहे. मात्र खासगी क्षेत्रातील एससी व एसटी कर्मचाऱ्यांची नेमकी आकडेवारी सरकारकडे नाही.

  • देशात भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ६ कोटीहून अधिक आहे. मात्र त्यात एससी, एसटी कर्मचाऱ्यांची संख्या किती याची वेगळी नोंद नाही. त्यामुळे आता नव्याने त्यांची माहिती घेण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातील कंपन्या, आस्थापनांना तशी पत्रे पाठविण्यात येत आहेत.  . मुंबईतील विभागीय भविष्य निधी कार्यालयातून त्याला दुजोरा देण्यात आला आहे. केंद्रीय श्रम मंत्र्यालयाकडून अशा प्रकारचे पत्र प्राप्त झाले आहे,  असे या कार्यालयातून सांगण्यात आले.

दिनविशेष :
  • जागतिक रेबीज दिन / आंतरराष्ट्रीय माहिती जाणून घेण्याचा हक्क दिन / आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन

महत्वाच्या घटना 

  • १९२४: पहिली पृथ्वी प्रदक्षिणा करणारी विमान फेरी पूर्ण झाली.

  • १९२८: सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जिवाणूंची वाढ होताना आढळली. यातूनच पुढे पेनिसिलिन या प्रतिजैविकाचा शोध लागला.

  • १९३९: दुसरे महायुद्ध – वॉर्साने नाझी जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

  • १९५०: इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९५८: फ्रान्स देशाने नवीन संविधान स्वीकारले.

  • १९६०: माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.

  • १९९९: आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर.

  • २०००: नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर.

  • २००२: सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँडक्रुझर गाडीचा वांद्रे येथे अपघात, अपघातात १ मृत्यू टर ४ गंभीर जखमी. सलमान खानच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. पोलिसांकडून अटक व जमीन वर सुटका.

  • २००८: स्पेसएक्स कंपनी ने फाल्कन १ हे पहिले खाजगी अंतराळयान प्रक्षेपित केले.

जन्म 

  • १८०३: फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्त्वज्ञ प्रॉस्पर मेरिमी यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १८७०)

  • १८३६: बॉलकोक चे संशोधकथॉमस क्रैपर यांचा जन्म. (मृत्यू: २७ जानेवारी १९१०)

  • १८६७: जपानी पंतप्रधान कीचिरो हिरानुमा यांचा जन्म.

  • १८९८: स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्म.

  • १९०७: क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च १९३१)

  • १९०९: हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी. जयराज यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट २०००)

  • १९२५: अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ सेमूर क्रे यांचा जन्म.

  • १९२९: जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म.

  • १९४६: पाकिस्तानी क्रिकेट कप्तान माजिद खान यांचा जन्म.

  • १९४७: बांगलादेशच्या १०व्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्म.

  • १९६६: भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्म.

  • १९८२: ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म.

  • १९८२: चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८९५: रेबीज किंवा हैड्रोफोबिया रोगावर लस शोधणारें रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १८२२)

  • १९३५: कायनेटोस्कोप चे संशोधक विल्यम केनेडी डिक्सन यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८६०)

  • १९५३: अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ एडविन हबल यांचे निधन. (जन्म: २० नोव्हेंबर १८८९)

  • १९५६: बोइंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोइंग यांचे निधन. (जन्म: १ ऑक्टोबर १८८१)

  • १९७०: इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासर यांचे निधन.

  • १९८१: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष रोम्लो बेटानको यु र्ट यांचे निधन.

  • १९८९: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९१७)

  • १९९१: अमेरिकन जॅझ संगीतकार माइल्स डेव्हिस यांचे निधन.

  • १९९२: पानशेत पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ लढा देणारे मेजर ग. स. ठोसर यांचे निधन.

  • १९९४: भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के. ए. थांगवेलू यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९१७)

  • २०००: सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधरपंत दाते यांचे निधन.

  • २००४: इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९०५)

  • २०१२: चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक एम. एस. शिंदे यांचे निधन.

  • २०१२: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचे निधन. (जन्म: २९ सप्टेंबर १९२८)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.