चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ नोव्हेंबर २०१९

Date : 29 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेचे कुटुंब-पुरस्कृत ‘ग्रीन कार्ड’ मिळवण्यासाठी २.२७ लाख भारतीय प्रतीक्षेत :
  • वॉशिंग्टन : अमेरिकेचे कायम नागरिकत्व मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कुटुंब- पुरस्कृत ‘ग्रीन कार्ड’ मिळवण्याकरिता अमेरिकेतील २ लाख २७ हजारांहून अधिक भारतीय प्रतीक्षेत असून, मेक्सिकोनंतर प्रतीक्षा यादीतील ही दुसऱ्या क्रमांकाची संख्या असल्याचे ताज्या आकडेवारीत म्हटले आहे.

  • कुटुंब- पुरस्कृत ग्रीन कार्डासाठी अमेरिकी काँग्रेसने वर्षांला कमाल १ लाख २६ हजार इतकी संख्या निश्चित केली असली, तरी सध्या सुमारे ४० लाख लोक हे कार्ड मिळण्याची वाट पाहात आहेत.

  • प्रतीक्षा यादीत सर्वाधिक, म्हणजे १५ लाख लोक अमेरिकेचा दक्षिणेकडील शेजारी असलेल्या मेक्सिकोतील आहेत. याखालोखाल  इच्छुक भारतीयांची संख्या २ लाख २७ हजार, तर चीनची संख्या १ लाख ८० हजार इतकी आहे, असे अंतर्गत सुरक्षा विभागाने म्हटले आहे.

  • कुटुंब- पुरस्कृत ग्रीन कार्डाच्या प्रतीक्षा यादीपैकी बहुतांश हे अमेरिकी नागरिकांचे भाऊबंद आहेत. सध्याच्या कायद्यानुसार, अमेरिकी नागरिक हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि रक्ताच्या नातेवाईकांना ग्रीन कार्ड किंवा कायदेशीरदृष्टय़ा कायम नागरिकत्वासाठी पुरस्कृत करू शकतात.

मालदीवचे माजी अध्यक्ष गयूम यांना ५ वर्षांचा कारावास :
  • माले : मालदीवचे माजी अध्यक्ष यामीन अब्दुल गयूम यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या (मनी लाँडरिंग) आरोपाखाली दोषी ठरवून देशातील एका न्यायालयाने त्यांना ५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. गयूम यांनी ५० लाख डॉलरचा दंड भरावा, असाही आदेश पाच सदस्यांच्या एका फौजदारी न्यायालयाने दिला.

  • गुरुवारी दिलेल्या आदेशानुसार, न्यायालयाने यामीन यांनी सरकारी खजिन्यातील १० लाख डॉलर रकमेचा वैयक्तिक कामासाठी गैरव्यवहार केल्याचा निर्णय न्यायालयाने दिला.

  • यामीन यांनी २०१३ ते २०१८ या काळात मालेचे नेतृत्व केले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचार, माध्यमांची मुस्कटदाबी करणे, आणि राजकीय विरोधकांना हद्दपार करणे असे आरोप लावण्यात आले होते. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष इब्राहिम मोहमद सोली यांनी त्यांचा पराभव केला होता.

…म्हणून परदेश दौऱ्यादरम्यान मोदी विमानतळावरच राहतात: अमित शाह :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावर असताना विमानांच्या तांत्रिक थांब्यादरम्यान पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याऐवजी विमानतळावरच राहतात अशी माहिती गृहमंत्री आणि त्यांचे जवळचे सहकारी असणाऱ्या शाह यांनी दिली आहे. पंतप्रधान हे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याऐवजी विमानतळावरच राहतात तेथेच अंघोळ करतात आणि पुढच्या दौऱ्याला रवाना होतात. सामान्यपणे जगभरातील वेगवेगळ्या देशातील पंतप्रधान परदेश दौऱ्यादरम्यानच्या तांत्रिक थांब्याच्या वेळी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहतात. यावर होणारा खर्च टाळण्यासाठी मोदी विमातळावरच राहतात असं शाह यांनी सांगितलं आहे.

  • अनेकदा मोदींच्या परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चावरुन टीका केली जाते याच पार्श्वभूमीवर एका प्रश्नाला उत्तर देताना शाह यांनी मोदींच्या परदेश दौऱ्यासंदर्भातील माहिती सभागृहामधील सदस्यांना दिली. मोदी हे कमी खर्चात परदेश दौऱ्यावर जास्त भर देतात असंही शाह यांनी सांगितलं. रात्रीच्या वेळी विमानांच्या तांत्रिक थांब्यादरम्यान मोदी आणि त्यांचे सहकारी पंचतारांकित हॉटेलमध्ये न जाता विमानतळावरच थांबतात असं शाह यांनी सांगितलं आहे.

  • “मोदी हे त्यांच्या खासगी आणि सार्वजनिक जिवनामध्ये वावरताना खूप शिस्त पाळतात. उदाहरण द्यायचे झाल्यास मोदी परदेश दौऱ्यावर स्वत:बरोबर केवळ २० टक्के कर्चमारी घेऊन जातात. त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्याही मर्यादीत असते. आधी प्रत्येक अधिकारी वेगळी गाडी वापरायचा आता तसं होतं नाही. आता सर्वजण एका मोठ्या गाडीत किंवा बसने प्रवास करतात,” अशी माहिती शाह यांनी दिली. विशेष सुरक्षा गट (सुधारणा) कायदा २०१९ संदर्भातील प्रश्नाला शाह उत्तर देताना शाह हे बुधवारी लोकसभेमध्ये बोलत होते.

ज्येष्ठ शिलालेख अभ्यासक आनंद कुंभार यांचे निधन :
  • सोलापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ऐतिहासिक मंदिरांसह प्राचीन घडामोडींवरील भाष्यकार, ज्येष्ठ शिलालेख अभ्यासक आनंद कुं भार (वय ८०) यांचे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापुरात राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्राला धक्का बसला आहे.

  • कुं भार यांच्या पत्नीचे गेल्याच वर्षी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पूर्व भागातील अशोक चौकात त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

  • कुं भार यांनी मराठी व कन्नडसह विविध भाषांतील शिलालेखांवर संशोधन करून अनेक ऐतिहासिक घडामोडींवर प्रकाश टाकला होता. विशेषत: सोलापूरजवळ हत्तरसंग येथे भीमा व सीना नदी संगमावर हजार वर्षांंपूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या संगमेश्वर मंदिरातील मराठी शिलालेख सर्वप्रथम कुं भार यांनी शोधून काढला होता.

  • इतिहासात मराठीतील पहिला शिलालेख कर्नाटकातील श्रवणबळगोळ येथील बाहुबली मंदिरात असल्याचा सार्वत्रिक समज होता. परंतु हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिरातील मराठीतील शिलालेख शके  ९४० कालयुक्त संवत्सर माघ शुध्द प्रतिपदा म्हणजे फेब्रुवारी १०१९ या काळात लिहिला गेला आहे. ‘वांछितो विजया हाऐवा’ ही मराठी भाषेतील ओळ या शिलालेखावर सापडली. मराठीत अस्तित्वात असलेला हा पहिलाच शिलालेख असण्याबाबत नंतर शिक्कामोर्तब झाले. याकामी कुं भार यांनी केलेले संशोधनकार्य इतिहासात नोंद घ्यावी, असेच झाले आहे.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७७: थॉमस एडिसन यांनी पहिल्यांदा फोनोग्राफचे प्रात्यक्षिक केले.

  • १९४५: युगोस्लाव्हिया प्रजासत्ताक बनले.

  • १९६३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांनी जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी वॉरन समिती नेमली.

  • १९७२: अटारी यांनी पोंग हा गेम प्रकाशित केला.

  • १९९६: नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांची मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्‍च नागरी पुरस्कार गोल्डन ऑनर जाहीर.

  • २०००: शास्त्रीय गायक गुलाम मुस्तफा खाँ आणि घटमवादक टी. एच. विक्‍कू विनायक राम यांना उस्ताद हफीज अली खाँ स्मृती पुरस्कार जाहीर.

  • २०००: दक्षिण अफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ. नेल्सन मंडेला व बांगलादेशच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १८०३: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ क्रिस्चीयन डॉपलर यांचा जन्म.

  • १८४९: ब्रिटीश भौतिकशास्त्रज्ञ सर जॉन अँब्रोझ फ्लेमिंग यांचा जन्म.

  • १८६९: समाजसेवक अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर ऊर्फ ठक्कर बाप्पा यांचा जन्म. (मृत्यू: २० जानेवारी १९५१)

  • १८७४: नोबेल पारितोषिक विजेते सेरेब्रल एँजिओग्राफी तंत्राचे निर्माते अंतोनियो मोनिझ यांचा जन्म.

  • १९०७: प्रसिद्ध लेखक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून २०००)

  • १९०८: तमिळ चित्रपट अभिनेता एन. एस. क्रिश्नन यांचा जन्म.

  • १९१९: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग अँड फिटनेसचे सहसंस्थापक जोई वीडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१३)

  • १९२०: स्पॅनडेक्सचे निर्माते जोसेफ शेव्हर्स यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर २०१४)

  • १९२६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑक्टोबर १९९६)

  • १९३२: फ्रान्सचे ३२ वे राष्ट्रपती जाक्स शिराक यांचा जन्म.

  • १९६३: भारतीय उद्योगपती ललित मोदी यांचा जन्म.

  • १९७७: पाकिस्तानी क्रिकेटपटू युनिस खान यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९२६: ग्रंथकार, संपादक, टीकाकार, कवी व चित्रकार, केरळ कोकिळ या मासिकाचे संस्थापक व संपादक कृष्णाजी नारायण आठल्ये यांचे निधन.

  • १९३९: मराठी भाषेतील कवी आणि रविकिरण मंडळाचे संस्थापक माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १८९४)

  • १९५०: महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या पत्नी बाया कर्वे यांचे निधन.

  • १९५९: मराठी इतिहासकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन. (जन्म: १७ मे १८६५)

  • १९९३: जे. आर. डी. टाटा तथा जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचे निधन. भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक व भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते. (जन्म: २९ जुलै १९०४)

  • २००१: बीटल्स चा गिटारवादक, संगीतकार, गायक आणि गीतलेखक जॉर्ज हॅरिसन यांचे निधन. (जन्म: २५ फेब्रुवारी १९४३)

  • २०११: आसामी साहित्यिक व कवियत्री इंदिरा गोस्वामी यांचे निधन.

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.