चालू घडामोडी आणि दिनविशेष - २९ सप्टेंबर २०१९

Date : 29 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अजून एक बँक संकटात, ९३ वर्षे जुन्या बँकेवर RBI चे निर्बंध :
  • खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेच्या संचालकांविरुद्ध दिल्लीच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार करण्यात आल्याच्या दोन दिवसांनंतर लगेचच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक अनियमिततेचे कारण देऊन लक्ष्मीविलास बँकेवरही (एलव्हीबी) आर्थिक निर्बंध (पीसीए) घातले आहेत.  त्यामुळे आता नव्याने कर्जे देणे, लाभांश जाहीर करणे आणि शाखांचा विस्तार करण्यात लक्ष्मीविलास बँकेला अडचणी येणार आहेत.

  • पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवरील रिझव्‍‌र्ह बँकेच्या आर्थिक र्निबधानंतर देशातील सहकार क्षेत्रात गुंतवणूकदार, ग्राहक, खातेदारांमध्ये संतापाची भावना असतानाच लक्ष्मी विलास बँकेच्या घडामोडींची भर पडली आहे. लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध घालण्यामागे, कोणत्याही आर्थिक संकटाशी सामना करण्याची कुवत नसणे,  मोठ्या प्रमाणातील थकीत कर्जे आणि दोन वर्ष सातत्त्याने ‘अॅसेट क्वालिटी’त झालेली घसरण ही तीन मुख्य कारणं असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे.

  • बँकेकडे असलेल्या मुदत ठेवीतील रकमेचा गैरवापर केल्याचा आरोप या प्रकरणातील तक्रारदार रेलिगेअर फिनव्हेस्ट कंपनीने केला आहे.आघाडीची गुंतवणूकदार कंपनी असलेल्या रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडच्या लक्ष्मी विलास बँकेत ७९० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

  • त्यातील रकमेचा बँकेच्या संचालकांनी परस्पर संमतीने गैरवापर केल्याची तक्रार करण्यात आली आहे. दरम्यान, या घडामोडीचा परिणाम बँकेच्या समभागमूल्यावरही दिसून आला असून बँकेचा समभाग देखील आपटला आहे. चेन्नईत मुख्यालय असलेल्या ९३ वर्षे जुन्या लक्ष्मी विलास बँकेच्या देशभरात ५६९ शाखा आहेत. बँकेने जून २०१९ अखेर ४९,५३६ कोटी रुपयांचा व्यवसाय नोंदविला आहे.

चीनकडून काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित :
  • चीनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून हा तंटा संयुक्त राष्ट्र संहिता व सुरक्षा मंडळ ठराव तसेच द्विपक्षीय करारांच्या  मदतीने शांततामय मार्गाने सोडवावा, असा सल्ला दिला आहे.

  • पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र असलेल्या चीनने संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा प्रश्न उपस्थित करताना भारताने जम्मू काश्मीरच्या स्थितीत एकतर्फी बदल करू नयेत, असेही म्हटले आहे.

  • चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी सांगितले,की काश्मीर प्रश्न हा भूतकाळातील काही घटनांमुळे मागे राहिलेला तंटा आहे. हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संहिता, द्विपक्षीय करार व सुरक्षा मंडळाच्या ठरावांच्या आधारे सोडवावा. जम्मू काश्मीरची स्थिती  बदलणारे कुठलेही निर्णय एकतर्फी घेण्यात येऊ नयेत. भारत व पाकिस्तान यांचा शेजारी देश म्हणून हा प्रश्न प्रभावी मार्गाने हाताळून दोन्ही देशातील संबंध सुरळित व्हावेत अशीच चीनची इच्छा आहे.

  • भारताने पाच ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरसाठीचा अनुच्छेद ३७० रद्द करून  विशेष दर्जा रद्द केला होता.

अनुच्छेद ३७० बाबत १ ऑक्टोबरपासून सुनावणी :
  • जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिकांवर पाच न्यायाधीशांचे घटनापीठ १ ऑक्टोबरपासून सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या घटनापीठाची स्थापना शनिवारी केली असून त्याचे नेतृत्व न्या. एन. व्ही.रमण हे करणार आहेत.

  • केंद्र सरकारने ५ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द केल्यानंतर त्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. न्या. एस. के. कौल, न्या. आर. सुभाष रेड्डी, न्या. बी.आर गवई व न्या. सूर्यकांत यांचाही या घटनापीठात समावेश आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ ऑक्टोबरपासून या याचिकांची सुनावणी करण्यात येणार आहे.

  • पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून हे कलम रद्द करण्याच्या निर्णयाची तसेच राष्ट्रपतींनी जारी केलेल्या अध्यादेशांची वैधता तपासली जाणार आहे.

पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवली :
  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याला केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. हे क्रमांक जोडण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१९ रोजी संपणार होती, ती आता ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली आहे. सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने (सीबीडीटी) एक परिपत्रक काढून हे जाहीर केले आहे.

  • जर नागरिकांनी आपले पॅन आणि आधार क्रमांक नव्या मुदतीपर्यंत जोडले नाहीत तर ते चालू स्थितीत राहणार नाहीत. त्यामुळे या क्रमांकांच्या मदतीने होणारे आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत, असे सीबीडीटीने स्पष्ट केले आहे.

  • पॅन आणि आधार क्रमांक प्राप्तिकर विभागाच्या वेबसाईटवरुन किंवा एसएमएसच्या सहाय्याने लिंक करता येईल. मात्र, हे क्रमांक जोडताना नाव, जन्मतारिख बरोबर आहे की नाही याची पडताळणी करुन घेणे गरजेचे आहे. जर यामध्ये चूक असेल तर आधी ते दुरुस्त करुन घ्यावे लागेल. आधारमध्ये चूक असेल तर यूआयडीएआय आणि पॅनमध्ये बदल करायचा असेल तर इन्कम टॅक्स विभागाशी संपर्क साधून त्यात दुरुस्ती करता येईल.

  • प्राप्तिकर विभागाच्या माहितीनुसार, ८.४७ कोटी नोंदणीकृत युजर्सपैकी ६.७७ कोटी युजर्सने पॅन क्रमांक आधारशी लिंक केला आहे. १ एप्रिल २०१९ पासून इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी आधार-पॅन लिंक करणे गरजेचे आहे.

आयआयटीतून M.Tech करणं आता महागणार; फीमध्ये होणार तब्बल ९०० टक्क्यांनी वाढ :
  • इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (आयआयटी) M.Tech करणं आता महागणार आहे. कारण, आयआयटीमध्ये M.Tech या कोर्ससाठीच्या फीमध्ये आता ९०० टक्के वाढ होणार आहे. आयआयटीजच्या परिषदेने शुक्रवारी M.Tech कोर्सची फी B.Tech कोर्सच्या फी इतकी करण्यास मंजुरी दिली आहे. B.Techच्या कोर्सेसची फी वार्षिक सुमारे २ लाख रुपये इतकी आहे.

  • देशभरातील आयआयटीजमध्ये सध्या एमटेकची अॅडमिशन आणि ट्युशन फी प्रति सेमिस्टर ५,००० ते १०,००० रुपये इतकी आहे. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्या अध्यक्षतेखाली आयआयटीज परिषदेची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत नव्या प्राध्यापकांच्या पाच वर्षांच्या समिक्षेच्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता पाच वर्षांनंतरच नव्या प्राध्यापकांची नोकरी पुढे कायम राहिल की नाही हे निश्चित होईल. या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विद्यावेतनही बंद करण्याचे सुचवण्यात आले आहे.

  • गेट स्कोअरच्या धर्तीवर ज्या विद्यार्थ्यांना M.Techला प्रवेश मिळत होता. त्यांना प्रत्येक महिन्याला १२, ४०० रुपयांचे विद्यावेतन मिळत होते. आता हे विद्यार्थीवेतन बंद करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तसेच फी वाढीबरोबरच गरजवंत विद्यार्थ्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर किंवा शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून केली जावी, असाही प्रस्ताव विचाराधीन आहे.

समुद्रातील सर्वात मोठ्या ‘ड्राय डॉक’चे संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन :
  • मुंबईतील नौदल गोदीत नौदलाच्या विमानवाहू नौका दुरूस्त करण्यासाठी समुद्रातील सर्वात मोठा ‘ड्राय डॉक’ (दुरुस्ती तळ) उभारण्यात आला आहे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने हा दुरूस्ती तळ उभारला असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज (शनिवार) या ड्राय डॉकचं उद्घाटन करण्यात आलं. समुद्रातील पाण्यावर तब्बल 5.68 कोटी घन मीटरचे हे बांधकाम करण्यात आलं आहे.

  • सध्या भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडमध्ये एकमेव युद्धनौका कार्यरत आहे. कारवारमध्ये या युद्धनौकेचा तळ असला तरी दुरूस्तीसाठी मात्र या युद्धनौकेला कोचीनच्या जहाजबांधणी कारखान्यात जावं लागतं. यासाठीच मुंबईत ड्राय डॉकची उभारणी करण्यात आली आहे. पश्चिम कमांडच्या मुख्यालयात हा ड्राय डॉक उभारण्यात आला आहे. 281 मीटर लांब, 45 मीटर रुंद व 17 मीटर खोल असा तळ उभारण्यात आला आहे. या तळाच्या उभारणीसाठी समुद्राच्या तळाशी विशिष्ट प्रकारचे सिमेंट टाकण्यात आले असून दोन्ही बाजूंनीही सिमेंटच्या ठोकळ्यांची भिंत उभारण्यात आली आहे. ‘आयएनएस विक्रमादित्य’ ही विमानवाहू नौकाही याठिकाणी दुरुस्त होऊ शकते.

  • तसंच या ठिकाणी दुरूस्तीसाठी आवश्यक असलेली यंत्रणा, पाणी काढण्यासाठी मोठे पंपही लावण्यात आले आहेत. तसंच जर आग लागण्याची घटना घडली तर त्यासाठी अग्नीशमन यंत्रणा तळाशी उभारण्यात आलेल्या भितींमध्ये बसवण्यात आली आहे. हा तळ उभारण्यासाठी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीला तब्बल 9 वर्षांचा कालावधी लागला आहे.

दिनविशेष :
  • जागातिक हृदय दिन

महत्वाच्या घटना 

  • १८२९: लंडनच्या मेट्रोपॉलिटन पोलिसांची स्थापना झाली.

  • १९१६: जॉन डी. रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश ठरले.

  • १९१७: मुंबईतील दादर येथे इंडियन एज्युकेशन सोसायटीची पहिली शाळा किंग जॉर्ज हायस्कूल सुरू झाली.

  • १९४१: दुसरे महायुद्ध – किएव्हमध्ये नाझींनी ३३,७७१ ज्यूंना ठार मारले.

  • १९६३: बिर्ला तारांगण हे आशियातील पहिले तारांगण कोलकाता येथे सुरू.

  • १९९१: हैतीमध्ये लष्करी उठाव.

  • २००८: लेहमन ब्रदर्स व वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचा निर्देशांक एका दिवसात ७७८ ने कोसळला. अमेरिकन शेअर बाजारातील सर्वाधिक घट होती.

  • २०१२: अल्तमस कबीर भारताचे ३९ वे सरन्यायाधीश झाले.

जन्म 

  • १७८६: मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती ग्वाडालुपे व्हिक्टोरिया यांचा जन्म. (मृत्यू: २१ मार्च १८४३)

  • १८९०: पंचांगकर्ते ल. गो. तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म.

  • १८९९: बॉलपोइंट पेनचे संशोधक लस्झो बियो यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९८५)

  • १९०१: नोबेल पारितोषिक विजेते इटालियन अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एनरिको फर्मी यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९५४)

  • १९२५: समाजसेवक डॉ. शरदचंद्र गोखले यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१३)

  • १९२८: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर २०१२)

  • १९३२: विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मेहमूद यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुलै २००४)

  • १९३२: मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू हमीद दलवाई यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७७)

  • १९३३: मोजाम्बिक देशाचे पहिले राष्ट्रपती समोरा महेल यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९८६)

  • १९३६: इटली देशाचे पंतप्रधान सिल्व्हियो बेर्लुस्कोनी यांचा जन्म.

  • १९३८: नेदरलँड्स देशाचे पंतप्रधान विल्यम कॉक यांचा जन्म.

  • १९४३: नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष लेक वॉलेसा यांचा जन्म.

  • १९४७: भारताचे ३८वे सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी २०१६)

  • १९५१: चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष मिशेल बाशेलेट यांचा जन्म.

  • १९५७: इंग्लिश क्रिकेटपटू व पंच ख्रिस ब्रॉड यांचा जन्म.

  • १९७८: अमेरिकन कसरतपटू मोहिनी भारद्वाज यांचा जन्म.

मृत्यू 

  • १५६०: स्वीडनचा राजा गुस्ताव (पहिला) यांचे निधन.

  • १८३३: स्पेनचा राजा फर्डिनांड (सातवा) यांचे निधन. (जन्म: १४ ऑक्टोबर १७८४)

  • १९१३: डिझेल इंजिनचे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १८५८)

  • १९८७: अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड दुसरा यांचे निधन.

  • १९९१: आग्रा घराण्याच्या ११व्या पिढीतील गायक उस्ताद युनूस हुसेन खाँ यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९२७)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.