चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० डिसेंबर २०१९

Date : 30 December, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान : 
  • चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना भारतीय सिनेजगतातील सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला त्यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेकही उपस्थित होता.

  • चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. पण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं ते उपस्थित राहू शकले नाही.

  • त्यामुळे हा पुरस्कार आज (२९ डिसेंबर) प्रदान करणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. रविवारी सायंकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं.

पेजावर मठाचे प्रमुख विश्वेशा तीर्थ यांचे निधन : 
  • पेजावर मठाचे प्रमुख श्री विश्वेशा तीर्थ स्वामीजी यांचे रविवारी येथे अल्प आजाराने निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. दक्षिण भारतातील प्रमुख धर्मगुरूंपैकी ते एक होते. विश्व हिंदू परिषदेच्या रामजन्मभूमी चळवळीत ते आघाडीवर होते. त्यांनी पेजावर मठाच्या परिसरातच अखेरचा श्वास घेतला.

  • त्यांच्या निधनामुळे कर्नाटक सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून बंगळुरू येथे त्यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, असे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले.

  • विश्वेशा तीर्थ हे अष्टमठातील एक प्रमुख धर्मगुरू होते. अष्टमठांची स्थापना ८०० वर्षांपूर्वी द्वैत तत्त्वज्ञानी श्री माधवाचार्य यांनी केली होती. विश्वेशा तीर्थ यांना मणिपाल येथील केएमसी रुग्णालयात १९ डिसेंबर रोजी दाखल केले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या इच्छेनुसार पेजावर मठ येथे हलवण्यात आले. तेथून त्यांचे पार्थिव बांबूच्या पेटीतून आठ शतके जुन्या उडुपी श्रीकृष्ण मठात नेण्यात आले.   

  • येडीयुरप्पा यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या पार्थिवावर राष्ट्रध्वज ठेवला. त्यांच्या पार्थिवाला तुळशीच्या माळा घालण्यात आल्या. पोलिसांनी बंदुकांची सलामी दिली. भाजप व संघाच्या अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, स्वामीजी नेहमीच लाखो लोकांच्या हृदयात घर करून राहतील. त्यांनी समाजासाठी मोठे काम केले आहे.

सीएए, एनपीआरबाबत सकारात्मक चर्चा आवश्यक - उपराष्ट्रपती : 
  • सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर) यांसारख्या मुद्दय़ांवर प्रबोधनात्मक आणि सकारात्मक चर्चा होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी रविवारी केले. निदर्शनांमध्ये हिंसाचाराला स्थान नाही, यावरही त्यांनी भर दिला.

  • सीएए असो की एनपीआर, देशाच्या लोकांपुढे घटनात्मक सभागृहांमध्ये, बैठकांमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रबोधनात्मक, अर्थपूर्ण आणि सकारात्मक चर्चा व्हायला हवी. हे विषय का आले आणि त्यांचा परिणाम काय, त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे काय आणि असेल, तर त्याबाबतच्या सूचना काय याबद्दल चर्चा व्हावी, अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली. आपण याबाबत चर्चा करू, तरच आपल्या व्यवस्था बळकट होतील आणि लोकांचे प्रबोधन होईल, असे नायडू म्हणाले.

  • या मुद्दय़ांबाबत जे लोक मतभेद व्यक्त करतात, त्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी केंद्र सरकारनेही प्रयत्न करायला हवेत, असे एकीकृत आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री एम. चन्ना रेड्डी यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना उपराष्ट्रपतींनी सांगितले.

नौदलाकडून फेसबुक वापरावर बंदी : 
  • भारतीय नौदलाने फेसबुक वापरावर बंदीचा निर्णय घेतला आहे. तसेच, नौदलाचे तळ, डॉकयार्ड व युद्धनौकांवर स्मार्टफोन देखील वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे

  •  

  • काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या सात जवानांना नौदलाची संवेदनशील माहिती सोशल मीडियाद्वारे शत्रूच्या गुप्तचर संस्थांना पुरवताना पकडण्यात आले होते, या घटनेनंतर आता नौदलाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.

  • आंध्रप्रदेश पोलिसांनी २० डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या संपर्कात असलेल्या व हेरगिरी करणारे एक रॅकेट उद्धवस्त करत, यात सहभागी असल्याचे आढळलेल्या नौदलाच्या सात जवानांना अटक केली होती. आंध्रपदेश पोलिसांच्या गुप्तरच विभागाने केंद्रीय गुप्तचर संस्था व नौदलाच्या गुप्तचर विभागाच्या मदतीने ‘ऑपरेशन डॉल्फिन्स नोज’ राबवत हे रॅकेट उद्धवस्त केले होते.

३०डिसेंबर चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.