चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० नोव्हेंबर २०१९

Date : 30 November, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
सीबीएसई बोर्ड परीक्षा- २०२० साठी करण्यात आले मोठे बदल :
  • केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे जे विद्यार्थी जे २०२० मध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परिक्षेस पात्र आहेत, ते आता या परीक्षा पद्धतीमधील मोठ्या बदलाचे साक्षीदार होणार आहेत. बोर्ड प्रत्येक विषयात अंतर्गत मुल्यांकन आणत आहे, जे बोर्डाच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्यास सुलभता आणेल.

  • नव्या नियमांनुसार, सीबीएसई शाळांमध्ये गणित, भाषा, राज्यशास्त्र या विषयांसह विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मुल्यांकनावर भर दिला आहे. हे बोर्डाच्या परीक्षेतील अधिक वस्तूनिष्ठ प्रकराच्या प्रश्नांसाठी मार्ग मोकळा करेल.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या cbseacademic.nic.in या अधिकृत वेबसाइटवर २०२० बोर्डाच्या परीक्षेसाठी नमुना पेपर आणि गुणांकन पद्धत देखील जारी केली आहे.

  • सीबीएसईच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना धडे आठवत बसण्यापासून थांबवण्यासाठी, विश्लेषणात्मक कौशल्ये विकसीत करण्यासाठी, तर्क क्षमता विकसीत करणे आणि संस्थांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ही पावलं उचलल्या गेली आहेत.

श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्ष यांनी भारतात केली ‘ही’ महत्वपूर्ण घोषणा :
  • श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष भारत दौऱ्यावर आले आहेत. हा त्यांचा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतरचा पहिला परदेश दौरा आहे. आपल्या पहिल्या परदेश दौऱ्यासाठी त्यांनी भारताची निवड केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर त्यांची आज(शुक्रवार) द्विपक्षीय चर्चा पार पडली.

  • यावेळी दहशतवादाबरोबच व्यापारासह अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर आयोजित संयुक्त पत्रकारपरिषदेत त्यांनी श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या भारतीय बोटींची मुक्तता केली जाणार असल्याचे घोषणा केली. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, भारत सर्वप्रकारे दहशतवादाचा विरोध करत आहे व दहशतवादाविरोधातील आमची लढाई सुरूच राहील. या लढाईत भारत श्रीलंकेला साथ देत राहील, असे सांगितले.

  • याप्रसंगी श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्ष यांनी हे देखील सांगितले की, दहशतवादाविरोधातील लढाईत आम्हाला भारताची साथ मिळालेली आहे. आम्हीपण सर्वच मुद्यांवर भारताबरोबर आहोत. भारताबरोबचे आमचे संबंध अत्यंत महत्वपूर्ण आहेत. भारतीय उपखंडात शांतता रहावी यासाठी सुरक्षेच्या मुद्यावर भारताबरोबर आम्ही काम करणार आहोत. तसेच, द्विपक्षीय बैठकीत मच्छिमारांबाबतही बरीच चर्चा झाली. मासेमारी करताना अनेकदा मच्छिमार भटकत श्रीलंकेच्या हद्दीत पोहचतात, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे  लागते.

आर्थिक आघाडीवर निराशा! विकास दर पोहोचला ४.५ टक्क्यांवर : 
  • आर्थिक आघाडीवर वाईट बातमी आहे. देशाच्या विकासाचा वेग मंदावला आहे. दुसऱ्या तिमाहीत विकास दर घटून ४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सहा वर्षात विकास दर सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर ५ टक्के होता.

  • सरकारने शुक्रवारी संध्याकाळी आकडे जाहीर केले. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळया पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत. तरीही विकास दराला गती मिळू शकलेली नाही. कृषी, उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टरमध्येही घट झाली आहे.

  • दुसऱ्या तिमाहीत मायनिंगमध्ये ०.१ टक्के, बांधकामात ८.५ टक्क्यांवरुन ३.३ टक्के, उत्पादन क्षेत्र ६.९ टक्क्यांवरुन एक टक्का, सर्व्हिस सेक्टर ७.३ टक्क्यावरुन ६.८ टक्क्यापर्यंत घट झाली आहे. विकास दरात सातत्याने घसरण होत असून बेरोजगारी वाढत आहे. बँकिंग आणि गृहनिर्माण क्षेत्र अडचणीत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे.

FASTag प्रणालीची मुदत केंद्र सरकारने १५ डिसेंबरपर्यंत वाढवली :
  • फास्टॅग प्रणालीची मुदत केंद्र सरकारने १ डिसेंबरऐवजी १५ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आली आहे. १ डिसेंबरपासून ही प्रणाली अनिवार्य करण्यात आली होती. मात्र ही मुदत आता १५ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबतची घोषणा केली होती.

    नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियानं देशभरतील सर्व टोल प्लाझांवर इलेक्ट्रॉनिक टोल घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठी वाहन चालकांना आपल्या गाड्यांवर ‘फास्टॅग’ लावावं लागणार आहे. हा ‘फास्टॅग’ अधिकृत टॅग विक्रेते किंवा बँकेतून विकत घेता येऊ शकतो. काही ठिकाणी पेट्रोल पंपांवरदेखील हा टॅग विकत घेता येणार आहे. टोल प्लाझावर ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शनसाठी विंड स्क्रिनवर ‘फास्टॅग’ लावावा लागणार आहे.

  • यामध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFDI) देण्यात येते. वाहन टोल प्लाझावर पोहोचल्यावर त्या ठिकाणी लावण्यात आलेला सेन्सर ‘फास्टॅग’ स्कॅन करतो. त्यानंतर ‘फास्टॅग’च्या अकाऊंटमधून पैसे वजा होतील.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

  • १८७२: हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.

  • १९१७: कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.

  • १९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.

  • १९६६: बार्बाडोसला युनायटेड किंगडमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

  • १९९५: ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म संपल्याची अधिकृत घोषणा.

  • १९९६: ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान.

  • १९९८: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन अमेरिकन डॉलर्स चा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी तयार झाली.

  • २०००: पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन एन्डेव्हर या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.

जन्म 

  • १६०२: जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचा जन्म. (मृत्यू: २१ मे १६८६)

  • १७६१: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १८१५)

  • १८३५: विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचा जन्म. (मृत्यू: २१ एप्रिल १९१०)

  • १८५८: भारतीय वनस्पती शास्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस यांचा जन्म. (मृत्यू: २३ नोव्हेंबर १९३७)

  • १८७४: ब्रिटनचे माजी पंतप्रधान सर विन्स्टन चर्चिल यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६५)

  • १९१०: गोमंतकीय कवी बाकीबाब उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचा खावार्डे, गोवा येथे जन्म. (मृत्यू: ९ जुलै १९८४)

  • १९३५: मराठी लेखक आनंद यादव यांचा जन्म.

  • १९३६: युथ इंटरनॅशनल पार्टीचे संस्थापक ऍबी हॉफमन यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९८९)

  • १९४५: पार्श्वगायिका वाणी जयराम यांचा जन्म.

  • १९६७: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचा जन्म. (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१०)

मृत्यू 

  • १९००: सुप्रसिद्ध लेखक कवी आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८५४)

  • १९७०: जन्माने इटालियन असलेल्या फ्रेंच फॅशन डिझायनर निना रिकी यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८८३)

  • १९८९: कॅमेरून देशाचे पहिले अध्यक्ष अहमदिऊ आहिदो यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १९२४)

  • १९९५: साहित्यिक वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे यांचे निधन. (जन्म: १६ जुलै १९१४)

  • २०१०: सामाजिक कार्यकर्ता राजीव दिक्षीत यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १९६७)

  • २०१२: भारताचे १२ वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १९१९)

  • २०१४: अरुणाचल प्रदेशचे ७वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन यांचे निधन. (जन्म: १६ एप्रिल १९६१)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.