चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० ऑक्टोबर २०१९

Date : 30 October, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
फडणवीस पुन्हा येणार; शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार :
  • राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे शिवसेनेने सत्ता स्थापनेत पन्नास टक्के वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरही दावा केला आहे. तसंच लोकसभेपूर्वी पन्नास पन्नास टक्के फॉर्म्युलावर एकमत झाल्याचंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं.

  • परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान आपण असं कोणतंही आश्वासन शिवसेनेला दिलं नसून पुढील पाच वर्ष आपणच मुख्यमंत्री राहणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता आणखी एक नवी माहिती समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस शुक्रवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदावर केलेला दावा आणि ५० टक्के मंत्रिपदांची मागणी सोडेल अशी अपेक्षाही भाजपाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २०१४ प्रमाणेच आपल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. तसंच शिवसेना भाजपासोबत सत्तेत सहभागी होईल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

  • भाजपाचे वरिष्ठ नेते सध्या शिवसेनेची मनधारणी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस हे ३१ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती एका नेत्यानं दिली. तसंच शिवसेनाही सत्तेत सहभागी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

फेडररचे १०वे विजेतेपद :
  • स्वित्र्झलडचा मातब्बर टेनिसपटू रॉजर फेडररने रविवारी स्विस बॅसेल खुल्या टेनिस स्पर्धेचे १०व्यांदा विजेतेपद मिळवले, तर एकूण कारकीर्दीतील त्याचे १०३वे विजेतेपद ठरले.

  • ३८ वर्षीय अग्रमानांकित फेडररने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनॉरला ६-२, ६-२ अशी सरळ दोन सेटमध्ये धूळ चारली. विशेष म्हणजे या संपूर्ण स्पर्धेत फेडररने एकही सेट गमावला नाही.

  • २००६मध्ये वयाच्या २५व्या वर्षी फेडररने पहिल्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले होते. तर गेल्या पाच वर्षांत (२०१४ पासून) चौथ्यांदा त्याने जेतेपदाचा चषक उंचावला. पुरुषांमध्ये सर्वाधिक विजेतेपदे मिळवणाऱ्यांच्या यादीत फेडरर दुसऱ्या स्थानी असून जिमी कॉनर्स १०९ विजेतेपदांसह अग्रस्थानी आहे.

युरोपियन युनियन प्रतिनिधीमंडळाच्या काश्मीर दौऱ्यावरुन विरोधकांची सरकारवर टीका :
  • कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारने आपल्या धोरणामध्ये नरमाई दाखवत युरोपियन युनियनच्या प्रतिनिधीमंडळाला काश्मीर दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार, युरोपच्या २३ खासदारांचे शिष्टमंडळ मंगळवारी दुपारी श्रीनगर येथे पोहोचले. हे लोक काश्मीरच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पाकिस्तानकडून वारंवार काश्मीरच्या स्थितीबाबत अनेक दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर जगाला काश्मीरचे सत्य सांगण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न आहे. मात्र, विरोधीपक्षांनी परदेशी खासदारांच्या या काश्मीर दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले की, “काश्मीरमध्ये युरोपियन खासदारांना फिरायला आणि हस्तक्षेपाला परवानगी दिली जाते. मात्र, भारतीय खासदारांना आणि नेत्यांना विमानतळांवरुनच परत पाठवले गेले. हा अजब राष्ट्रवाद आहे.

  • ” यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यावर प्रश्न उपस्थित केले होते. राहुल गांधींनी ट्विटद्वारे म्हटले होते की, “युरोपच्या खासदारांचे जम्मू-काश्मीर दौऱ्यावर स्वागत आहे. मात्र, भारतीय खासदारांना येथे प्रवेशाला बंदी आहे. त्यामुळे यामध्ये काहीतरी काळंबेरं आहे.”

दिल्लीत महिलांसाठी  मोफत बससेवा सुरू :
  • दिल्लीतील  सार्वजनिक बस वाहतुकीत महिलांना मोफत प्रवासाची योजना ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी यांना लागू करण्याचा विचार सुरू आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सूचित केले. दिल्लीत पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या दृष्टीने त्यांचे कल्याणकारी योजना लागू करण्याचे प्रयत्न आहेत. महिलांसाठीची मोफत बस योजना मंगळवारी भाऊबिजेच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली.

  • महिलांना मोफत प्रवासाची योजना महिलांच्या सक्षमीकरणास फायद्याची असून त्यातून समाजातील लिंगभेद दूर होण्यास मदत होईल असे सांगून केजरीवाल म्हणाले की, भावाकडून बहिणींना ही भाऊबीजेची भेट समजा. एके अ‍ॅपवर केजरीवाल यांनी या योजनेबाबत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

  • प्रवासाचा खर्च न झेपल्याने ज्या मुली व महिलांना शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण सोडावे लागले, त्यांना आता त्यांच्या शिक्षणाचा बळी द्यावा लागणार नाही. त्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत बस प्रवास करता येणार आहे. ज्या महिला नोकरी निमित्ताने बाहेर पडतात, त्यांनाही लाभ मिळेल, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

‘अलिबाबा’प्रमाणे वर्चस्वाची अंबानींची तयारी, १.६ लाख कोटींची योजना तयार :
  • रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी हे आता ई-कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्याच्या तयारीत असून, चीनमधील ऑनलाइन रिटेल क्षेत्र (किरकोळ विक्री क्षेत्र) गाजवणाऱ्या अलिबाबा समूहाप्रमाणे ई-कॉमर्स कंपनी सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे. यासाठी अंबानींनी ‘डिजिटल सर्विस होल्डिंग कंपनी’ उभारण्याची 24 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1.6 लाख कोटी रुपयांची योजना देखील तयार केल्याचं वृत्त आहे.

  • रिलायन्स कंपनी टेक व इंटरनेट क्षेत्रात गुंतवणूक आणि अधिग्रहण वाढवण्यावर भर देतेय कारण, जिओच्या माध्यमातून मोठ्या संख्येत ग्राहकवर्गापर्यंत पोहोचल्यानंतर ई-कॉमर्स सारखी सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मंडळाने 15 बिलियन डॉलर्स पूर्णपणे मालकीच्या सहाय्यक कंपनीत गुंतवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

  • ई-कॉमर्स कंपनीद्वारे रिलायन्स भारतात इंटरनेट शॉपिंगमध्येही वर्चस्व स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहे. ऑनलाइन किरकोळ बाजारपेठेत रिलायन्सने प्रवेश केल्यास देशातील 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ई-कॉमर्स बिझनेस मार्केटवर परिणाम होईल , असे तज्ज्ञांचे मत आहे.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिचारिका दिन

महत्वाच्या घटना 

  • १९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.

  • १९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला.

  • १९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.

  • १९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.

  • १९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.

  • १९९५: कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.

  • २०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला.

जन्म

  • १७३५:अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचा जन्म. (मृत्यू: ४ जुलै १८२६)

  • १८८७: बंगाली साहित्यिक आणि संदेश या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक सुकुमार रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)

  • १९०९: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)

  • १९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)

  • १९४९: केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २००६)

  • १९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.

  • १९६०: अर्जेंटिनाचे फूटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)

  • १९७४: गझल, दादरा आणि ठुमरी गायिका बेगम अख्तर यांचे निधन. (जन्म: ७ ऑक्टोबर १९१४)

  • १९९०: चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचे निधन. (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)

  • १९९०: अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)

  • १९९४: केन्द्रीय मंत्री सरदार स्वर्ण सिंग यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)

  • १९९६: लेखक, पत्रकार प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)

  • १९९८: लेखक व दिग्दर्शक विश्राम बेडेकर यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)

  • २००५: भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.

  • २०११: उद्योगपती अरविंद मफतलाल यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९२३)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.