चालू घडामोडी आणि दिनविशेष - ३० सप्टेंबर २०१९

Date : 30 September, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
भारताने जगाला युद्ध नाही बुद्ध दिला, नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला सूचक इशारा :
  • न्यूयॉर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सात दिवसीय अमेरिका दौरा संपवून भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. याआधी नरेंद्र मोदींनी संपूर्ण जगाला दहशतवादाविरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या 74 व्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी नाव न घेता भारताने जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला असं नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला सुनावलं.

  • दहशतवाद आज मानवजातीसमोरील आणि जगासमोरील मोठं आव्हान आहे. दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी संपूर्ण जगाने दहशतवादाविरोधात उभं राहण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी यावेळी केलं. यावेळी मोदींनी भारताचा इतिहास, परंपरा, सरकारने केलेली विकास कामं, पर्यावरण यावर बोलणं पसंत केलं.

  • नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात पाकिस्तानचं नाव न घेता पाकिस्तानवर निशाणा साधला. भारत जगभरात नेहमीच एकजुटीचा आणि शांतीचा संदेश देत आला आहे. यावेळी मोदींनी महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि कवी कणियन पूंगुन्ड्रनार यांच्या विचारांचा उल्लेख आवर्जुन केला. मोदींनी आपल्या भाषणात ग्लोबल वॉर्मिंग, सिंगल युज प्लास्टिक आणि टीबीचाही उल्लेख केला.

  • संयुक्त राष्ट्राच्या मंचावरुन मोदींनी भारत सरकारच्या विविध योजनांचीही माहिती दिली. यामध्ये जलसंधारण, हेल्थ इन्शुरन्स, शौचालय इत्यादींसाठीच्या भारत सरकारच्या महत्त्वाच्या योजनांची माहिती मोदींनी दिली. भारताने जगातील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम राबवून 11 कोटी शौचालये बांधली. 15 कोटी घरांमध्ये पाणी पुरवठा दिला. तर 2025 पर्यंत भारताला टीबी मुक्त करण्यासाठी काम करत असल्याचेही मोदींनी सांगितले, अशी माहिती मोदींनी दिली.

भारताला सॅफ चषकाचे जेतेपद :
  • भारतीय फुटबॉल संघाने रविवारी काठमांडू येथे रंगलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात बांगलादेशचा २-१ असा पराभव करत सॅफ चषक १८ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताने पहिल्यांदाच या चषकावर नाव कोरण्याची करामत केली.

  • विक्रम प्रताप सिंग याने दुसऱ्याच मिनिटाला भारताला आघाडीवर आणले होते. पण बांगलादेशने यीसिन अराफत याच्या गोलमुळे ४०व्या मिनिटाला सामन्यात बरोबरी साधली होती. अखेरच्या क्षणापर्यंत १-१ अशी बरोबरी असताना रवी बहादूर राणा याने अतिरिक्त वेळेत गोल करत भारताच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. भारताचा निंठोइंगानबा मीटेई या स्पर्धेतील सर्वोत्तम मौल्यवान खेळाडू ठरला.

  • दोन्ही संघाला २२व्या मिनिटापासूनच १० जणांसह खेळावे लागले. गुरकिरत सिंग आणि मोहम्मद फहीम यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यानंतर बांगलादेशचा कर्णधार यीसिन याला दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आल्यामुळे त्यांना ४०व्या मिनिटापासून नऊ जणांसह खेळावे लागले. भारताच्या या यशाची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल पटेल यांनीही दखल घेत खेळाडूंचे कौतुक केले आहे.

  • या स्पर्धेत भारत हा सर्वोत्तम संघ नव्हे तर सर्वोत्तम प्रभावी संघ ठरला आहे. युवा खेळाडूंच्या कामगिरीवर मी बेहद खूश आहे. त्यांचा त्याग आणि बांधिलकी वाखाणण्याजोगी आहे. अंतिम फेरीत छाप पाडण्याची हीच संधी आहे, असे मी खेळाडूंना सांगितले होते, रवी राणा याने अखेरच्या क्षणी गोल करत आपले कर्तृत्व दाखवून दिले.

सौदी अरेबिया भारतात करणार शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक :
  • भारताच्या संभाव्य विकास वाढीची दखल घेत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा आणि खाण आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांमध्ये शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. सौदीचे ब्रँड अॅम्बेसेडरपदी डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

  • सऊद बिन मोहम्मद अल सती म्हणाले, “तेल, गॅस, खाण क्षेत्रांत सौदी अरेबियासाठी भारत हे आकर्षक गुंतवणुकीचे ठिकाण आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सौदी भारताकडे पाहत आहे. ऊर्जा, तेल शुद्धीकरण, पेट्रोकेमिकल्स, इन्फ्रास्ट्रक्चर, कृषि, खनिजे आणि खाण क्षेत्रात सौदी अरेबिया शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याच्या विचारात आहे,” असे डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती यांनी सांगितले.

  • पुढे बोलताना ते म्हणाले, “सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबरोबर प्रस्तावित भागीदारी दोन्ही देशांमधील वाढत्या उर्जा संबंधांचे धोरणात्मक स्वरूप प्रतिबिंबित करते. भारतातील तेल पुरवठा, वितरण, पेट्रोकेमिकल्स आणि ऑईल शृंखलांमध्ये गुंतवणूक करणे हा अरामकोच्या जागतिक नीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या पार्श्वभूमीवर सौदी अरामकोने भारतातील उर्जा क्षेत्रात केलेली ४४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि त्यामाध्यमातून वेस्ट कोस्ट रिफायनरी आणि महाराष्ट्रातील पेट्रोकेमिकल प्रकल्प यासारखी प्रस्तावित गुंतवणूकी आणि रिलायन्सबरोबर दीर्घावधी भागीदारी दोन्ही देशातील द्विपक्षीय संबंधातील महत्त्वपूर्ण टप्पे दर्शवितात,”डॉ. सऊद बिन मोहम्मद अल सती म्हणाले.

  • सौदी अरेबिया हा भारतासाठी ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचा देश आहे. भारताला १७ टक्के क्रुड ऑईल आणि ३२ टक्के एलपीजी गॅसचा पुरवठा सौदीकडून केला जातो.

मुलींचा जाहीर सन्मान करा :
  • आपल्या संस्कृतीत मुलींना ‘लक्ष्मी’ मानले जाते. समाजहितासाठी विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या अशा मुलींच्या सन्मानार्थ जाहीर कार्यक्रम आयोजित करावेत. त्याचबरोबर त्यांचे कार्य ‘भारत की लक्ष्मी’ या हॅशटॅगने सर्वांपर्यंत पोहोचवावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले.

  • ‘मन की बात’ या नभोवाणीवरील कार्यक्रमात मोदी यांनी, मुलींच्या सन्मानासाठी देशभर मोहीम राबवण्याचे आवाहन केले. लोकहितासाठी विविध क्षेत्रांत कर्तृत्वाचा

  • ठसा उमटवणाऱ्या मुलींच्या सन्मानार्थ शहरे आणि खेडय़ांमध्ये जाहीर कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली.

  • आपल्या लेकी-सुना समाजहितासाठी मोठे काम करीत असतात. काही जणी गरीब मुलांना शिकवतात, काही आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करतात, काही डॉक्टर, अभियंता आणि वकील आहेत. समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन, त्यांचा गौरव करावा, असे मोदी म्हणाले.

  • लक्ष्मी भरभराट आणि आनंद घेऊन येते, अशी श्रद्धा असल्याने दिवाळीत घरोघरी लक्ष्मीचे स्वागत केले जाते असे नमूद करून, ‘मुली आणि महिलांचे चांगले काम, त्यांच्या सन्मानाच्या गोष्टी ‘भारत की लक्ष्मी’ या हॅशटॅगने सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात,’ असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले. देशाच्या लक्ष्मींना प्रोत्साहन देणे म्हणजे देश आणि देशवासीयांच्या यशाचा मार्ग मजबूत करणे होय, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. ‘सेल्फी विथ डॉटर’ ही मोहीम यशस्वी ठरल्याची आठवणही मोदी यांनी भाषणात जागवली.

महाभियोगानंतर अमेरिका संकटात आल्याचा ट्रम्प यांचा इशारा :
  • विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने महाभियोग चौकशीचे हत्यार उगारल्यामुळे अस्वस्थ झालेले अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, देश कधी नव्हे एवढा संकटात असल्याचा इशारा आपल्या समर्थकांना दिला आहे.

  • ट्विटरवर त्यांनी शनिवारी टाकलेल्या चित्रफीत संदेशात म्हटले आहे, की ‘२०२० मधील अध्यक्षीय उमेदवारीचे दावेदार जो बिदेन यांना घोटाळ्याच्या प्रकरणात अडकवण्यासाठी  युक्रेनच्या अध्यक्षांना दूरध्वनी केल्याच्या प्रकरणात विरोधी डेमोक्रॅट्सनी महाभियोग चौकशी सुरू करून व्हाइट हाऊसवर दबाव वाढवला. त्यामुळे अमेरिकेत डेमोक्रॅट सदस्यांनी लोकांचे हक्कच धोक्यात आणले असून ते तुमच्या बंदुका, आरोग्य सेवा, तुमची निवडणुकीतील मते, तसेच स्वातंत्र्यही हिरावून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. पण आम्ही हे होऊ देणार नाही.

  • यात देशाचे सर्वस्व पूर्वी कधी नव्हे असे पणाला लागले आहे. मी तुमच्यासाठी लढतो आहे, त्यामुळे विरोधक हात धुवून मागे लागले आहेत पण मी त्यांना हार जाणार नाही. विरोधकांनी सुरू केलेली महाभियोग चौकशी हा सूडाचा भाग असून महाभियोग चौकशीत प्रमुख असलेले डेमोक्रॅटिक सदस्य अ‍ॅडम शिफ यांनी मला बदनाम केले. त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला पाहिजे.’

सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांचा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा :
  • सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंह तमंग यांचा अपात्रता कालावधी निवडणूक आयोगाने पाच वर्षे कमी केला आहे. त्यामुळे तमंग यांना विधानसभा निवडणूक लढवता येईल.

  • त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे निवडणूक लढविण्यास बंदी होती. १० ऑगस्ट २०१८ रोजी हा कालावधी सुरू होत होता. त्याच दिवशी भ्रष्टाचार प्रकरणातील खटल्यात कारावासाची शिक्षा त्यांनी पूर्ण केली होती. २०२४ रोजी हा कालावधी संपणार होता. मात्र निवडणूक आयोगाने शिक्षेचा कालावधी एक वर्ष एक महिना शिक्षा इतका ठेवला आहे. त्यामुळे १० सप्टेंबरला हा कालावधी संपला आहे.  आता त्यांना निवडणूक लढविता येईल.

  • तमंग यांच्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने एप्रिलमध्ये विधानसभा निवडणूक जिंकली होती. २७ मे रोजी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. त्यांना सहा महिन्यांत निवडणूक लढविणे बंधनकारक आहे. १९९० मध्ये पशुसंवर्धन मंत्री असताना सरकारी निधी अपहार केल्यावरून तमंग हे दोषी आढळले. २००३ मध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन

महत्वाच्या घटना 

  • १३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.

  • १८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.

  • १८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले.

  • १८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.

  • १९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.

  • १९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.

  • १९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.

  • १९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.

  • १९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.

  • १९९३: किल्लारी भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.

  • १९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.

  • १९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.

  • २०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फेम हा विशेष पुरस्कार जाहीर.

जन्म 

  • १२०७: फारसी मिस्टीक आणि कवी रूमी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १२७३)

  • १८३२: मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९०५)

  • १९००: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)

  • १९२२: चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)

  • १९३४: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१५)

  • १९३९: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ ज्याँ-मरी लेह्न यांचा जन्म.

  • १९४१: ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.

  • १९४३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझेनहॉफर यांचा जन्म.

  • १९४५: इस्रायलचे १२वे पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांचा जन्म.

  • १९५५: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक अँनी बेचोलॉल्म्स यांचा जन्म.

  • १९६१: क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म.

  • १९३३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)

  • १९७२: पार्श्वगायक शंतनू मुखर्जी ऊर्फ शान यांचा जन्म.

  • १९८०: स्विस लॉनटेनिस खेळाडू मार्टिना हिंगीस यांचा जन्म.

  • १९९७: डच फॉर्मुला १ ड्रायव्हर मॅक्स वर्स्टॅपन यांचा जन्म.

मृत्यू 

  • १२४६: रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा) यांचे निधन.

  • १६९४: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी यांचे निधन. (जन्म: १० मार्च १६२८)

  • १९८५: अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिच्टर यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९००)

  • १९९२: लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)

  • १९९८: भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.

  • २००१: केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)

  • २०१४: भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९४३)

 

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.