चालू घडामोडी - ०१ एप्रिल २०१८

Date : 1 April, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राज्यातील पहिल्या रेल्वे डब्यांच्या कारखान्याचं लातुरात भूमीपूजन :
  • लातूर : महाराष्ट्रातील पहिल्या रेल्वे डब्यांच्या कारखान्याचं लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते भूमीपूजन झालं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने गोंधळ सुरू केला. मुख्यमंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी तातडीने गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं.

  • रेल्वेतर्फे 500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून 25 ते 30 हजार रोजगार मिळतील, असा दावा करण्यात आला आहे. लातूरमध्ये कोच कारखाना उभारण्याचा निर्णय यावर्षी जानेवारीमध्ये घेण्यात आला. महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांनी 20 फेब्रुवारी 2018 रोजी सामंजस्य करार केला होता.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये

  • पहिल्या टप्प्यात प्रति वर्ष 250 डब्यांचं उत्पादन
  • दुसऱ्या टप्प्यात प्रति वर्ष 400 डब्यांपर्यंत उत्पादन क्षमता वाढवणे
  • जमीन क्षेत्र : 153.88 हेक्टर
  • अपेक्षित खर्च : 500 कोटी रुपये
  • ठिकाण : हरंगूल स्टेशनपासून 2.5 किमी अंतरावर
  • रेल्वे विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) द्वारे कारखाना बांधण्यात येईल
  • भूसर्वेक्षण पूर्ण करण्यात आलं आहे.
  • फॅक्टरी लेआऊट विकसित
  • 25 ते 30 हजार रोजगाराच्या संधी(source :abpmajha)
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तीन नवे नियम लागू :
  • मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांसाठी तीन नवे नियम लागू करणार आहे. या बदलांमुळे एसबीआयच्या 25 कोटी खातेधारकांवर परिणाम होणार आहे.

  • बचत खातं अर्थात सेव्हिंग्ज अकाऊण्टहोल्डर्सना एसबीआयने मोठा दिलासा दिला आहे. मिनिमम बॅलन्स न ठेवणाऱ्या खातेधारकांना लागणारा दंड 75 टक्क्यांनी कमी होणार आहे.

  • एसबीआयमध्ये समाविष्ट केलेल्या बँकांचे चेकबुक आजपासून ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामध्ये बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, भारतीय महिला बँक या बँकांचा समावेश आहे. 31 मार्चपूर्वी नवीन चेकबुक इश्यू करण्याबाबत एसबीआयने वारंवार सूचना दिल्या होत्या.

  • स्टेट बँकेच्या 11 शाखांमध्ये इलेक्‍टोरल बॉन्‍ड उपलब्ध होणार आहेत. एसबीआयला या सीरिजच्या विक्रीचे अधिकृत हक्क देण्यात आले आहेत. स्टेट बँकेत 2 ते 10 एप्रिल या कालावधीत निवडणूक करारपत्र मिळणार आहेत.(source :abpmajha)

१ एप्रिललाच का बनवलं जातं एकमेकांना मूर्ख :
  • नवी दिल्ली-  1 एप्रिलचा दिवस उजाडल्यानंतर अनेकांच्या व्हॉट्सअॅपवर एप्रिल फूलचे मेसेज पाठवले जातात. अर्थात यात समोरच्याला मूर्ख बनवण्याचा हेतू असतो. परंतु 1 एप्रिललाच मूर्ख बनवण्याची प्रथा कुठून आली हे तुम्हाला माहीत आहे का ?, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी मूर्ख का बनवलं जातं. तर त्याला कारणही तसंच आहे. एप्रिल फूल बनवण्याची प्रथा ही फ्रान्समधून उदयास आली आहे.

  • 1582मध्ये युरोपियनांना ज्युलियन दिनदर्शिकेऐवजी ग्रेगोरियन दिनदर्शिका वापरण्याचा सल्ला पॉप ग्रेगरी यांनी दिला. परंतु ग्रेगोरियन दिनदर्शिकेत 1 एप्रिलपासून नव्हे, तर 1 जानेवारीपासून नव वर्षाला सुरुवात होत असल्याचं युरोपियनांना समजलं. ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार 1 जानेवारीला सुरू होणारे नववर्ष अनेकांच्या पचनी पडले नाही आणि त्यातील काही जणांनी 1 एप्रिललाच नव वर्षाची सुरुवात होत असल्याचं मानण्यास सुरुवात केली.

  • त्यावर पॉप ग्रेगरी यांनी एक योजना आखली. त्यांनी 1 एप्रिलला नव वर्षं साजरे करणा-यांना एप्रिल फूल म्हणण्यास सुरुवात केली. त्यानंतर याच दिवशी लोक एकमेकांना मूर्खात काढू लागले. कालांतरानं ही प्रथा युरोपमध्येही पसरली. 

  • जपान आणि जर्मनीमध्येही एप्रिल फूलचं लोण पसरलं, तसेच एप्रिल फूलची प्रथा स्कॉटलंडमध्ये दोन दिवस साजरी केली जातो. त्यामुळे आता भारतासह इतर देशांतही 1 एप्रिलला फूल(मूर्ख) बनवलं जातं. तर फ्रान्समध्ये 1 एप्रिलच्या दिवसाला ‘फिश डे’ असंही संबोधलं जातं. यादिवशी चिमुरडे कागदी मासे एकमेकांच्या पाठीवर चिटकवून 1 एप्रिलचा दिवस साजरा करतात.(source :lokmat)

‘खेलो इंडिया चॅम्पियन्स’ राष्ट्रकुल पदार्पणास सज्ज :
  • नवी दिल्ली : युवा खेळाडू मनू भाखर आणि श्रीहरी नटराजन हे आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदार्पण करण्यास सज्ज असून, देशासाठी पदक जिंकण्याचा निर्धारही या खेळाडूंनी व्यक्त केला. केंद्र शासनाच्यावतीने नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतून हे खेळाडू चॅम्पियन होऊन बाहेर आले, हे विशेष.

  • मनूने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात २४१.१ गुण संपादन करीत सुवर्ण पदक जिंकले आहे. याआधी डिसेंबरमध्ये तिने राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत २४०.५ गुणांसह राष्ट्रीय विक्रम मोडला होता.

  • जलतरणपटू श्रीहरीने खेलो इंडिया स्पर्धेत १०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात राष्टÑीय विक्रम मोडताना सहा सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले होते. दोन वर्षांचा असताना जलतरणाला सुरुवात करणारा श्रीहरी म्हणाला, खेलो इंडियातील सहभाग राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेचा सराव होता.

  • मनूच्या नेमबाजी खेळाला तर दोन वर्षांआधीच सुरुवात झाली. स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावरील सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर ती विश्व स्पर्धांमध्ये पदक विजेती कामगिरी करण्यात यशस्वी ठरली आहे.

  • मेक्सिकोत झालेल्या सिनियर विश्वचषकात दोन सुवर्ण आणि आयएसएसएफ विश्वचषकात तीन सुवर्ण जिंकल्यामुळे मनूकडे राष्टÑकुलची संभाव्य पदक विजेती म्हणून पाहिले जात आहे. श्रीहरी राष्टÑकुलच्या ५०, १०० आणि २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात सहभागी होणार आहे. जलतरणात तो प्रशांत करमाकरच्या सोबतीने सहभागी होणार आहे.(source :lokmat)

भारतीय टपाल खात्यातही आजपासून बँकेच्या सर्व सुविधा मिळणार :
  • नवी दिल्ली : भारतीय टपाल खातं देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक बनण्यासाठी सज्ज झालं आहे. 1 एप्रिल म्हणजे आजपासून देशातील सर्वात मोठी पेमेंट बँक आपल्या अनेक सेवांना सुरुवात करणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना अनेक सेवा मोफत दिल्या जातील.

  • देशातील सर्व टपाल खात्यांमध्ये बँकिंग सेवा सुरु केली जाणार आहे. देशात सध्या 1.55 लाख पोस्ट ऑफिस आहेत. व्यवहारासाठी 650 पेमेंट बँक त्यांना मदत करतील. याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचं बचत खातं, 25 हजार रुपयांवर 5.5 टक्के व्याज, चालू खातं आणि थर्ड पार्टी इन्शूरन्स अशा सुविधा मिळतील.

  • तुमचा आधार नंबर हाच पेमेंट अॅड्रेस असेल. सेवा सुरु झाल्यानंतर आयपीपीबी देशातील सर्वात मोठं बँकिंग जाळं म्हणून समोर येईल. पोस्टमन आणि ग्रामीण टपाल सेवक शहरी आणि ग्रामीण भागात डिजिटल पेमेंट सेवा पोहोचवणार आहेत. 2015 मध्ये भारतीय टपाल खात्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेमेंट बँक म्हणून काम करण्यासाठी मान्यता दिली होती.(source :abpmajha)

दिनविशेष :
  • एप्रिल फूल दिन

महत्वाच्या घटना

  • १६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.

  • १८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

  • १९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.

  • १९३५: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.

  • १९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.

  • १९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.

  • १९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.

  • २००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

जन्म

  • १५७८: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १६५७)

  • १६२१: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५)

  • १८१५: जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १८९८)

  • १८८९: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९४०)

  • १९०७: भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.

  • १९१२: हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)

  • १९३६: आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.

  • १९४१: भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.

मृत्यू

  • १९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र)

  • १९८९: समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)

  • १९९९: भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.

  • २०००: कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)

  • २००३: गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.

  • २००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९२५)

  • २०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९२१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.