चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ एप्रिल २०१९

Date : 1 April, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
निवडणूक चिन्हांवर डिजिटल साधनांचा प्रभाव :
  • लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. १९८ निवडणूक चिन्हे ‘मुक्त चिन्हे’ घोषित करण्यात आली असून त्यामध्ये डिजिटल साधनांचा मोठय़ा प्रमाणावर समावेश आहे.

  • राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. ती चिन्हे वगळून आणि नव्याने मुक्त चिन्हांचा समावेश करून या निवडणुकीत १९८ मुक्त चिन्हे अन्य पक्ष व अपक्ष उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

  • २०१४ च्या निवडणुकांमध्ये ८७ मुक्त चिन्हे होती. आयोगाने नवीन मुक्त चिन्हांमध्ये दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रांतील साधनांचा समावेश केला आहे. जुन्या काळातील वाळूचे घडय़ाळ, दळणाचे जाते, उखळ, नरसाळे, धान्य पाखडण्याचे सूप, ग्रामोफोन, टाईपरायटर, डिझेल पंप तर आजच्या आधुनिक काळातील लॅपटॉप, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राइव्ह, रोबोट, हेडफोन यांचा समावेश निवडणूक चिन्हांमध्ये आहे.

  • त्याचबरोबर टूथब्रश, टूथपेस्ट, रेझर, चप्पल, बूट, मोजे, उशी आदी व्यक्तिगत वापराच्या वस्तूंनाही चिन्हांमध्ये स्थान मिळाले आहे. मुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचाही समावेश करण्यात आला आहे.

  • कृषी क्षेत्रालाही मुक्त चिन्हांमध्ये स्थान आहे. त्यामध्ये ऊस लागवड करणारा शेतकरी, नारळाची बाग, डिझेल पंप, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशा चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर स्वयंपाकघरातील वस्तूही चिन्ह रूपाने निवडणुकीत अवतरल्या आहेत. गॅस सिलेंडर, गॅस शेगडी, फ्रिज, मिक्सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, फ्राय पॅन, काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ आणि खलबत्ता अशी निवडणूक चिन्हे आहेत.

महाराष्ट्रातील पहिल्या सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले मराठीत ट्विट, म्हणाले… :
  • लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील पहिली प्रचारसभा सोमवारी वर्धा येथे होत असून या पार्श्वभूमीवर मोदींनी सकाळी मराठीत ट्विट केले आहे. “केंद्र आणि राज्य सरकारने जी लोकाभिमुख कामे केली, त्यातून महाराष्ट्रातील जनता पुन्हा एकदा भाजपा-शिवसेना-रिपाई(आठवले गट) महायुतीला भक्कम आशीर्वाद देतील, हा मला विश्वास आहे”, असे मोदींनी म्हटले आहे.

  • लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात चार टप्प्यांत मतदान होत असून प्रत्येक टप्प्यात दोन अशा रीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रात आठ प्रचारसभा होण्याची शक्यता आहे. यातील पहिली सभा आज (सोमवारी) वर्धा येथे होत आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी मराठीतून ट्विट केले.

  • “महाराष्ट्रातील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींना नमस्कार, आज मी महाराष्ट्राला भेट देणार आहे. महात्मा गांधीजी यांच्या जीवनदर्शनाची साक्ष देणाऱ्या वर्ध्यात संवाद साधणार आहे”, असे त्यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘इस्रो’च्या शिरपेचात मानाचा तुरा, एमीसॅटसह २८ नॅनोउपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण :
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात सोमवारी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे २८ नॅनो उपग्रहांचे सोमवारी श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

  • एमीसॅट आणि नॅनो उपग्रह एकाच वेळी अंतराळात पाठवण्याची ऐतिहासिक कामगिरी ‘इस्रो’ने सोमवारी केली. सकाळी ९ वाजून २७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपक एमीसॅट व २८ नॅनो उपग्रहांना घेऊन झेपावले. पीएसएलव्ही प्रक्षेपकाने चांद्रयान २००८ व मंगळ ऑर्बिटर २०१३ या दोन्ही मोहिमांत मोठी भूमिका पार पाडली होती. यात अमेरिकेतील २४, लिथुआनियातील ११ ,स्पेनमधील १ तर स्वित्झर्लंडमधील एका उपग्रहाचा समावेश आहे.

  • ‘इस्रो’ची ही ४७ वी पीएसएलव्ही मोहीम असून सोमवारची मोहीम चार टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे. एमीसॅट उपग्रह हा विद्युत चुंबकीय मापनासाठी काम करणार आहे. प्रक्षेपक अंतराळात ७४९ किमीवर एमीसॅट उपग्रह सोडेल आणि ५०४ किमी ऑर्बिटमध्ये इतर उपग्रहांना प्रक्षेपित करणार आहे.

खूशखबर! पॅन कार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत सरकारने वाढवली :
  • नवी दिल्ली : केंद्र सरकारने पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या (जोडण्याच्या) मुदतीत वाढ केली आहे. केंद्रीय थेट कर मंडळाने (सीबीडीटी - सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस) याबाबतची माहिती दिली आहे.

  • पॅन कार्ड आधारला लिंक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 मार्च 2019 ही अंतिम तारीख दिली होती. परंतु यासाठी 30 सप्टेंबर 2019 पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी पॅन-आधार लिंक केलेले नाही. त्यांना अजून एक संधी मिळाली आहे.

  • पॅन आधार लिंकसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली असली तरी उद्यापासून (सोमवार, 1 एप्रिल) उत्पन्नाचा परतावा भरताना आधार नंबर देणे आणि लिंक करणे बंधनकारक असल्याचे सीबीडीटीने जाहीर केले आहे. पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची ही सहावी वेळ आहे. जून 2018 मध्ये सीबीडीटीने 31 मार्च 2019 ही अंतिम तारीख जाहीर केली होती.

  • सीबीडीटीच्या नियमांनुसार आयकर भरताना आधार कार्ड क्रमांक देणे सक्तीचे करण्यात आले आहे. बनावट पॅन कार्डद्वारे होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॅन कार्ड आधार कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे.

सत्तेत आल्यास २०२० पर्यंत २२ लाख सरकारी रिक्त जागा भरणार, राहुल गांधींची घोषणा :
  • नवी दिल्ली : निवडणुका म्हटलं की राजकीय पक्षांकडून घोषणांचा पाऊस पडणारच. सत्तेत असलेल्या भाजप आणि सत्तेत येण्यासाठी धडपड करत असलेल्या काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठी आश्वासनं दिली जात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'न्याय' योजनेनंतर आणखी एक मोठं आश्वासन मतदारांनी दिलं आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास रिक्त  असलेली 22 लाख सरकारी पदे भरण्यात येतील असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे.

  • सध्या भारतात तरुण मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. या तरुण वर्गाला आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहे. बेरोजगारी ही देशातील आजची सर्वात मोठी समस्या आहे, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचं राहुल गांधींनी दाखवलं आहे. काँग्रेस सत्तेत आल्यास सध्या रिक्त असलेल्या 22 लाख सरकारी जागा भरण्यात येतील, असं राहुल गांधींनी सांगितलं.

  • राहुल गांधींनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. राहुल गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "आज 22 लाख सरकारी जागा रिक्त आहेत. या जागा 31 मार्च 2020 पर्यंत भरण्यात येतील. आरोग्य, शिक्षण इत्यादी केंद्र सरकारच्या विविध राज्यातील जागा भरण्यात येतील."

'या' तारखेला होणार भारताचा वर्ल्ड कप संघ जाहीर, प्रसाद यांची घोषणा :
  • मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12 व्या मोसमाचा ज्वर आता चढू लागला आहे, परंतु यात वर्ल्ड कप संघाबाबतची चर्चा कुठेतरी मागे पडताना दिसत आहे. पण, भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघाच्या निवडीबाबत मोठी घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली वर्ल्ड कप स्पर्धेत कोणते पंधरा शिलेदार भारताचे प्रतिनिधित्व करतील याच्या घोषणेची तारीख प्रसाद यांनी सांगितली. इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे ते 14 जुलै या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

  • आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदाचा प्रमुख दावेदार मानला जात आहे. भारतीय संघाने मागील वर्षभरात देशात-परदेशात वन डे क्रिकेटमध्ये अविश्वसनीय कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड सारख्या प्रतिस्पर्धींना विराटसेनेनं त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करण्याचा पराक्रम गाजवला. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. संघातील एखादी जागा सोडल्यास वर्ल्ड कपसाठीचे शिलेदार जवळपास निश्चितच आहेत आणि त्याची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. ही घोषणा 20 एप्रिलला किंवा त्याआधी होण्याची माहिती, प्रसाद यांनी दिली.

  • ते म्हणाले,''आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ दमदार कामगिरी करेल, हा विश्वास आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा 20 एप्रिल किंवा त्याआधीच होणार आहे. भारताला वर्ल्ड कप जिंकून देणारे तगडे खेळाडू या संघात असतील. मागील दीड वर्ष आम्ही त्यावर काम करत आहोत आणि त्यानुसारच हा संघ निवडला जाईल. संघावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि भारतीय संघच वर्ल्ड कप जिंकेल. ''  

आजपासून नवं आर्थिक वर्ष लागू, काय स्वस्त आणि काय महाग :

मुंबई : 1 एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होत आहे. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि जीएसटी परिषदेत घेतलेल्या निर्णयांची आज म्हणजे 1 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर काही गोष्टी स्वस्त होणार आहेत तर काही महागणार आहेत. सर्वसामान्यांसाठी दिलासादायक म्हणजे घरांच्या किंमती आता कमी होणार आहेत. तर गॅसच्या किंमती वाढणार आहेत.

काय स्वस्त, काय महाग?

  • केंद्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनुसार करमुक्त उत्पन्नाची मर्यादा आजपासून पाच लाख रुपये होणार आहे.

  • जीएसटीच्या नव्या नियमानुसार निर्माणाधीन घरांचा कर 12 वरुन 5 टक्क्यांवर आला आहे. तर परवडणाऱ्या घरांचा कर 8 टक्क्यांवरुन 1 टक्का झाला आहे.

  • एकाच व्यक्तीच्या नावावर असलेली दोन घरं आजपासून करमुक्त होणार आहेत. पूर्वी एखादा व्यक्ती दुसऱ्या घराच्या भाड्यावर पैसे कमवत असल्याचं समजून त्याच्याकडून कर वसूल केला जात होता.

  • टीडीएसची मर्यादा वाढवून 40 हजार करण्यात आली आहे. बँकेत आणि पोस्टात पैसे गुंतवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा फायदा होणार आहे.

  • ईपीएफओच्या नव्या नियमांनुसार नोकरी बदलल्यास पीएफ खातं आपोआप ट्रान्सफर होणार आहे.

  • नॅशनल पेन्शन स्कीमला EEE म्हणजेच एग्जेंप्ट-एग्जेंप्ट-एग्जेंप्ट दर्जा मिळणार आहे. याचा अर्थ नॅशनल पेंशन स्कीममध्ये गुंतवलेले पैसे, त्यावर मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटी पिरीयड पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या पैशावर कोणताही कर लागणार नाही.

  • गॅसच्या किंमतीत आजपासून 10 टक्क्यांची वाढ होणार आहे. गेल्या तीन वर्षातली ही सर्वाधिक दरवाढ आहे. यामुळे सीएनजी आणि स्वयंपाक घरातील पाईप गॅसही महाग होणार आहे.

  • टाटा आणि महिंद्राच्या गाड्यांच्या किंमतीतही 25 हजारांपर्यंत दरवाढ करण्यात आली आहे.

  • रेल्वेत आजपासून संयुक्त पॅसेंजर नेम रेकॉर्ड म्हणजेच पीएमआर मिळणार आहे. ज्यानुसार एखादा प्रवासी एका मागोमाग दुसरा रेल्वे प्रवास करणार असेल तर एकच पीएनआर असणार आहे.

  • देना बँक आणि विजया बँक आज बँक ऑफ बडोदामध्ये विलीन होणार आहेत. यामुळे बँक ऑफ बडोदा देशातली तिसरी सर्वात मोठी बँक होणार आहे.

दिनविशेष : 

महत्वाच्या घटना 

  • १८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

  • १८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.

  • १९२४: रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.

  • १९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.

  • १९३५: भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली.

  • १९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.

  • १९३७: रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.

  • १९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.

  • १९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.

  • १९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.

  • १९७६: ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.

  • १९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.

  • २००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

जन्म 

  • १५७८: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १६५७)

  • १६२१: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंबर १६७५)

  • १८१५: जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १८९८)

  • १८८९: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९४०)

  • १९०७: भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.

  • १९१२: हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)

  • १९३६: आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.

  • १९४१: भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र)

  • १९८९: समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू श्रीधर महादेव जोशी यांचे निधन. (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)

  • २०००: कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)

  • २००३: गायक आणि नट प्रकाश घांग्रेकर यांचे निधन.

  • २००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर याचं निधन. (जन्म: ११ डिसेंबर १९२५)

  • २०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे याचं निधन. (जन्म: १८ मार्च १९२१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.