चालू घडामोडी - ०१ ऑगस्ट २०१८

Date : 1 August, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
कर्नाटक बेळगावला देणार दुसऱ्या राजधानीचा दर्जा :
  • उत्तर कर्नाटककडे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपांचं खंडन करताना कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी बेळगावला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा तसेच काही सरकारी आस्थापने बेळगावला हलवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. कानडी मराठी वादाची पेटती भट्टी असलेल्या बेळगावचं बेलगावी असं नामकरण करण्यात आलेलं आहे. तसेच या भागातील विकासाला चालना देण्यासाठी बेळगावला दुसरी राजधानी करण्याचा प्रस्ताव गेली 12 वर्षे विचाराधीन आहे.

  • “मी 2006मध्ये मुख्यमंत्री झालो तेव्हापासून बेलगावीला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. माझ्या नंतरच्या सरकारांनी या प्रस्तावाचा विचार केला नाही. परंतु आता मी पुन्हा या प्रस्तावाचा व तो अमलात आणता येईल का याचा विचार करत आहे,” कुमारस्वामी म्हणाले.

  • बेलगावीमध्ये काही सरकारी खाती सुरू करण्याचा आपला विचार असून लहान सहान कारणांसाठी कलबुर्गी, धारवाड, हुबळी इथल्या लोकांना बेंगळूरला यावं लागू नये असं ते म्हणाले. उत्तर कर्नाटकच्या 13 जिल्ह्यांमध्ये स्वतंत्र राज्याची मागणी करण्यात येत असून गुरूवारी बंदचं आवाहन करण्यात आलं आहे.

  • संयुक्त महाराष्ट्रवादी आंदोलकांची सीमाभागातील काही भाग महाराष्ट्रात सामील करण्याची अनेक दशकांची मागणी आहे. कानडी-मराठी असं यावादाचं स्वरूप असून अनेकवेळा ही आंदोलनं ताण-तणावाची झालेली आहेत.

  • महाजन आयोगाच्या अहवालाचा आधार घेत बेळगाव धारवाडसारखी अनेक मराठीबहुल शहरं कर्नाटकमध्ये सामील करण्यात आली. त्यावरून गेली अनेक दशकं हा वाद धगधगलेला राहिलेला आहे. सीमाभागातल्या मराठी शाळांची गळचेपी व कानडीची सक्तीसारख्या अनेक गोष्टी इथल्या मराठी जनतेवर लादण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याखेरीज आता उत्तर कर्नाटकातल्या 13 जिल्ह्यांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली असून कुमारस्वामी सरकारसाठी ही डोकेदुखी आहे. त्यामुळे बेलगावीला दुसऱ्या राजधानीचा दर्जा देऊन हे वाद शमवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.

राष्ट्र आणि देश यामध्ये नक्की फरक तरी काय :
  • मुंबई- बहुतांशवेळा आपण देश व राष्ट्र या संकल्पना समानार्थी आहेत असे समजून वापरत असतो. इंग्लिश भाषेत कंट्री, नेशन, स्टेट, नेशनस्टेट अशा संकल्पना आहेत. त्यांचा वेगवेगळ्या संदर्भात उल्लेख होत असतो, मात्र आपण त्याचा अर्थ देश असा घेतो. मात्र या सर्व संकल्पना वेगवेगळ्या आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे. 

  • एखाद्या लोकसमुहास एक सरकार नियंत्रित करत असेल तर त्यास देश असे म्हणतात, त्या लोकसमुहावर संबंधित सरकारचा अंमल चालतो. अशाप्रकारे देशाची व्याख्या करता येईल. देशामध्ये सर्व नियंत्रण करण्यासाठी एक राजकीय व्यवस्था असते.

  • मात्र राष्ट्र ही संकल्पना पूर्णतः वेगळी आहे. एखादा व्यक्तीसमूह समान भाषा, ओळख, वंश, इतिहासाने एकमेकांशी बांधला गेला असेल तर त्यास राष्ट्र असे म्हणतात. साधारणतः समान संस्कृती हे राष्ट्र तयार होण्यासाठी पोषक असते. जर एखादे राष्ट्र एखाद्या सरकारच्या नियंत्रणाखाली आले असल्यास त्यालाही देश असे म्हटले जाते.

  • याचाच अर्थ एका देशामध्ये अनेक राष्ट्रे असू शकतात. उदाहरण द्यायचे झाल्यास अमेरिकेतील अनेक मूळचे लोक स्वतःच्या गटांना राष्ट्र म्हणवतात. चेरोकी नेशन हे त्याचेच उदाहरण म्हणता येईल. असे असले तरी शेवटी ते अमेरिकेच्या संयुक्त राज्यसमुहांपैकी एक आहेत. त्यांच्यावर नियंत्रण अमेरिकन सरकारचेच आहे.

  • युनायटेड किंग्डमचे उदाहरण द्यायचे झाल्यास त्यामध्ये स्कॉटलंड, वेल्स, नॉर्दर्न आयर्लंड अशी राष्ट्रे म्हणजे नेशन्स सामावलेली आहेत. ही वेगवेगळी ओळख असणारी राष्ट्रे असली तरी युनायटेड किंग्डम या एका नावाखाली त्यांचे नियंत्रण केले जाते.

  • मात्र काही देशांना आपल्या राजकीय हद्दीमध्ये अनेक नेशन्स म्हणजे राष्ट्रे असणे पसंत नाही. त्यामुळेच इराकमध्ये कुर्दांना मान्यता दिली जात नाही. त्यामुळेच कुर्दांना स्वतःचा वेगळा देश आहे. कुर्द हे मध्यपूर्वेत इराक, सीरिया अशा अनेक देशांमध्ये पसरलेले आहेत. त्यामुळे त्यांना स्टेटलेस नेशन म्हणजे देश नसणारे राष्ट्र असे म्हटले जाते.

आधार क्रमांक सार्वजनिक करत असाल तर सावधान! UIDAIनं दिला सल्ला :
  • नवी दिल्ली - आधार क्रमांक सार्वजनिकरित्या जाहीर करणं किती धोकादायक ठरू शकते, हे  टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) चे प्रमुख आर. एस. शर्मा यांच्या 'आधार चॅलेंज'वरुन उघड झाले आहे. ट्राय प्रमुख आर.एस. शर्मा यांनी ट्विटरवर आपला आधार क्रमांक शेअर केला होता. त्यानंतर 'खासगी माहिती उघड करुन दाखवा', असे आव्हान देत आधार सुरक्षित असल्याचा दावा करणाऱ्या आर.एस.शर्मा यांच्या हे आधार चॅलेंज चांगलेच अंगलट आले.

  • एका हॅकरनं शर्मांची खासगी माहिती काही मिनिटांतच जाहीर केली. यावरुन आधार असुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, यानंतर मंगळवारी ( 31 जुलै ) UIDAI नं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन नागरिकांना आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर न करण्याची सूचना दिली.

  • शर्मा यांच्याप्रमाणेच एक अब्जाहून अधिक भारतीयांची आधारशी निगडित व्यक्तिगत माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे व ती चोरणे कोणालाही शक्य नाह, असा दावा आधार क्रमांक देणाऱ्या यूआयडीएआयनं केला होता. मात्र आता खुद्द यूआयडीएआयनं आधार क्रमांक सार्वजनिक करू नये, असा सल्ला देऊ केला आहे. 

  • शर्मा यांनी आधार क्रमांक ट्विटरवर जारी करुन याचा वापर करुन माझे नुकसान करुन दाखवा, असे खुले आव्हान देताच, असे धाडस करणे किती जोखमीचे आहे, हे सिद्ध करुन दाखवत, अनेकांनी त्यांचा मोबाइल फोन, पॅन क्रमांक अन्य खासगी माहिती उघड केल्याचा दावाही केला. इलियट एल्डरसन या टोपणनावाच्या फ्रेंच सुरक्षातज्ज्ञानं ट्विटर हॅंडलवर एकापाठोपाठ एक ट्विट करत सोशल मीडियावर शर्मा यांना आधार क्रमांक सार्वजनिक करणं अत्यंत जोखमीचे आहे, असा सल्ला देत, लोक तुमचा पत्ता, फोन नंबरसह इतर माहितीही मिळवू शकतात, असेही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. 

  • आर. एस. शर्मा यांच्या आधार क्रमांकावरून इथिकल हॅकर्सनी त्यांची १४ प्रकारची माहिती लीक केली आहे. एवढेच नव्हे, त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून, त्यापैकी एका खात्यात आधारशी संलग्न पेमेंट सर्व्हिसमधून त्यांनी एक रुपयाही जमा केला आहे. त्यामुळे स्वत:चा आधार क्रमांक जाहीर करून, तो किती सुरक्षित आहे, असे सांगण्याचा आर. एस. शर्मा यांच्या भलताच अंगाशी आला आहे. शिवाय आधारच्या सुरक्षिततेविषयीचा दावाही पूर्णत: फोल ठरला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणासाठी काय आहेत तुमच्या कल्पना - नरेंद्र मोदी :
  • मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या माझ्या भाषणासाठी तुमच्या काही कल्पना किंवा विचार असतील तर ते जरुर कळवा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे नागरिकांना केलं. मोदी आपल्या लाल किल्ल्यावरील भाषणात नागरिकांनी सुचवलेल्या मुद्द्यांचा समावेश करतील.

  • ‘माझ्या 15 ऑगस्टच्या भाषणासाठी तुमच्याकडे कोणत्या कल्पना किंवा विचार आहेत? हे जरुर शेअर करा. तुमच्या बहुमोल विचारांची मी वाट पाहत आहे,’ असं नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

  • ‘नरेंद्र मोदी अॅप’च्या आधारे तुम्ही तुमचे मुद्दे पाठवू शकता. तसंच  ‘MyGov’ या वेबसाईटवरुनही तुम्हाला तुमचे विचार पंतप्रधानांपर्यंत पोहचवता येतील.

  • आपल्याकडे पंतप्रधानांनी 15 ऑगस्टला  लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित करण्याची मोठी परंपरा आहे.  या भाषणात पंतप्रधान देशातील महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य करत असतात. तसंच आपल्या कामाचा लेखाजोखा लोकांसमोर ठेवत असतात. दरम्यान,पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरील हे पाचवं भाषण आहे.

इमरान खान यांच्या शपथविधीसाठी मोदींना निमंत्रण :
  • मुंबई : पाकिस्तानमधील निवडणुकीत इमरान खान यांच्या ‘तहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. इमरान खान 11 ऑगस्टला पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतील. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना निमंत्रित केलं जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • “इमरान खान यांच्या शपथविधीला नरेंद्र मोदी यांच्यासह सार्क (SAARC) देशांच्या प्रमुखांनाही बोलावलं जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदींनी इमरान खान यांचं विजयाबद्दल फोनद्वारे अभिनंदन केलं. हे एक चांगलं पाऊल आहे,” असं तहरीक-ए-इन्साफच्या एका नेत्याने म्हटलं आहे.

  • दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी 2014 साली आपल्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला सार्क देशांच्या प्रमुखांना निमंत्रित केलं होतं. मोदींच्या शपथविधीला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ हेदेखील उपस्थित राहिले होते.

  • पाकिस्तान निवडणुकीत काय झालं - पाकिस्तानात 25 जुलैला 270 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत इमरान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाला सर्वाधिक 116 जागा मिळाल्या. इमरान यांनी स्वत: पाच जागांवर निवडणूक लढवली. या पाचही जागांवर त्यांचा विजय झाला.

  • दरम्यान, इमरान खान यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 137 जागा त्यांना मिळू शकलेल्या नाहीत. त्यामुळे बहुमताचा मॅजिकल आकडा गाठण्यासाठी सध्या त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

दिनविशेष :

महताच्या घटना

  • १७७४: जोसेफ प्रिस्टले, कार्ल शील या शास्त्रज्ञांनी ऑक्सिजन हे मूलद्रव्य वेगळे केले.

  • १८७६: कोलोरॅडो अमेरिकेचे ३८ वे राज्य बनले.

  • १९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने रशिया विरुद्ध युद्ध पुकारले.

  • १९४४: पोलंडची राजधानी वॉर्सॉमधे नाझींविरुद्ध सशस्त्र उठाव झाला.

  • १९६०: इस्लामाबाद पाकिस्तानची राजधानी झाली.

  • १९८१: अमेरिकेत एम.टी.व्ही. चे प्रसारण सुरु झाले.

  • १९९४: भारतातील रेल्वे प्रवाशांसाठी विमा योजना लागू झाली.

  • १९९६: कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेते निर्माते डॉ. राजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.

  • २००१: सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली.

  • २००८: अकरा पर्वतारोहणांचा के२ या जगातील दुसरया उंच शिखरावर मृत्यू झाला.

जन्म

  • १७४४: लॅमार्क फ्रेंच शास्त्रज्ञ जीन बाप्टिस्टे यांचा जन्म. (मृत्यू: १८ डिसेंबर १८२९)

  • १८८२: भारतरत्‍न, राष्ट्रभाषा हिन्दीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तम दास टंडन यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)

  • १८९९: जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९३६)

  • १९१३: चित्रपट अभिनेते दिग्दर्शक भगवान आबाजी पालव ऊर्फ मास्टर भगवान यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी२००२)

  • १९१५: कथाकार कादंबरीकार श्री. ज. जोशी यांचा जन्म.

  • १९२०: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव सांगली येथे जन्म. (मृत्यू: १८ जुलै १९६९)

  • १९२४: वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू सर फ्रँक वॉरेल यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १९६७)

  • १९३२: हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री मीना कुमारी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७२)

  • १९४८: मार्वल स्टुडिओचे संस्थापक एव्ही अराद यांचा जन्म.

  • १९५२: क्रिकेटपटू यजुर्वेंद्र सिंग यांचा जन्म.

  • १९५५: क्रिकेटपटू समालोचक अरुण लाल यांचा जन्म.

  • १९६९: इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहॅम थॉर्प यांचा जन्म.

मृत्यू

  • ११३७: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १०८१)

  • १९२०: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८५६ – रत्‍नागिरी)

  • १९९९: बंगाली साहित्यिक निराद सी. चौधरी यांचे निधन. (जन्म: २३ नोव्हेंबर १८९७ – किशोरगंज, म्यामेनसिंग, बांगला देश)

  • २००५: सौदी अरेबियाचा राजा फहाद यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९२१)

  • २००८: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते हरकिशन सिंग सुरजित यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१६)

  • २००८: क्रिकेटपटू अशोक मंकड यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.