चालू घडामोडी - ०१ डिसेंबर २०१७

Date : 1 December, 2017 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतरावेळी बौद्ध धम्माची दीक्षा देणारे भन्ते प्रज्ञानंद यांचे निधन :
  • राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६१ वर्षांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. या धर्मांतराच्या मुख्य सोहळ्यात सहभागी झालेल्या सात बौद्ध धर्मगुरुंपैकी एक असणारे भन्ते प्रज्ञानंद यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला, ते ९० वर्षांचे होते.

  • वृद्धापकाळामुळे गेल्या दोन वर्षांपासून भन्ते प्रज्ञानंद हे श्वासाच्या विकाराने त्रस्त होते. तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्यांना त्रास होता.

  • दरम्यान, ताप आणि छातीत दुखत असल्याने त्यांना २६ नोव्हेंबरपासून लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिवर्सिटीमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक प्रा. एस. एन. शंखवार यांनी सांगितले.

  • भन्ते प्रज्ञानंद हे लखनऊ येथील बुद्ध विहाराची व्यवस्था पाहणारे सर्वात वरिष्ठ भन्ते होते. त्यांचे शिष्य भन्ते सुमन यांनी ही माहिती दिली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी नागपुरातील दीक्षाभूमीवर केलेल्या धर्मांतरावेळी त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणाऱ्या सात भन्तेंपैकी ते एक होते, असे भन्ते सुमन यांनी सांगितले.

‘यलो’ फेम गौरी गाडगीळला राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर :
  • नवी दिल्ली- जागतिक अपंग दिनानिमित्त दिल्या जाणा-या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारासाठी यलो फेम गौरी गाडगीळची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारांमध्ये यंदा महाराष्ट्रातील 5 दिव्यांगांना पुरस्कार प्राप्त  झाले आहेत. या राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कारांचं वितरण ३ डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे. 

  • सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत हे पुरस्कार देण्यात येतात. दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, उत्कृष्ट कर्मचारी, दिव्यांगांसाठी कार्यरत असणा-या संशोधन संस्था अशा प्रकरच्या श्रेणीमध्ये हे पुरस्कार दिले जातात.

  • मुंबईतील प्रणय बुरडे आणि पुण्यातील गौरी गाडगीळ या दोघांना मानसिक दुर्बलता व मानसिक स्थूलता या क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुण्यातील गौरी गाडगीळ ही डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त आहे.  

  • गौरीने या परिस्थितीशी दोन हात करत स्विमिंगमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. गौरीची जिद्द आणि तिचा प्रवास यावर 2014 साली ‘यल्लो’ नावाचा चित्रपटही प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटासाठी गौरीला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं.

‘पॉझिटिव्ह’ जनजागृतीमुळे एचआयव्हीचे प्रमाण घटले, सहा वर्षांतील आकडेवारी :
  • मुंबई : एड्ससारख्या प्राणघातक रोगाला इलाज नसतो, एकदा तो झाला की मृत्यू ठरलेलाच... अशा सुरुवातीच्या गैरसमजांमुळे समाजात भीती निर्माण झाली होती. मात्र मागील काही वर्षांत सामाजिक आणि शासकीय यंत्रणांच्या पातळीवर एचआयव्हीसंदर्भात मुंबईत पॉझिटिव्ह अर्थात सकारात्मक जनजागृती केल्यामुळे एचआयव्हीची लागण झालेल्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

  • गेल्या सहा वर्षांत मुंबई शहर-उपनगरातील एड्सचे रुग्ण १४ हजारांवरून ६,७७२ वर येऊन ठेपले आहे. २०१०-११ साली मुंबईत एड्स रुग्ण १४ हजार २९१ होते, तर २०१६-१७ साली ६ हजार ७७२ आहेत. मुंबईतील एड्स रुग्णांचे प्रमाण ५६ टक्क्यांनी घटले आहे, अशी माहिती मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीने दिली आहे.

  • सरकारी आणि सामाजिक संस्थांनी सातत्याने केलेल्या जनजागृतीमुळे मुंबई शहरातील एड्सचे प्रमाण कमी झाले आहे. जनजागृतीमुळे तपासणी करून घेण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. २०१०-११मध्ये गर्भवती महिलांमधील एड्सचे ४६६ रुग्ण होते, तर २०१६-१७ मध्ये हे रुग्ण केवळ १६२ एवढे कमी झाले.

  • या एड्सच्या रुग्णांमध्ये ६५ टक्क्यांनी घट झाली आहे. एड्सबाधित असणाºया ७९ टक्के रुग्णांचा वयोगट हा १५ ते ४९ हा आहे, तर त्यातील ३६ टक्के या महिला व तरुणी आहेत. एड्सबाधित रुग्णांपैकी ९३ टक्के रुग्णांना असुरक्षित शारीरिक संबंधामुळे एचआयव्हीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

एक रुपयाच्या नोटेने केली तब्बल शंभर वर्षे पूर्ण, निळा रंग कायम, पण तब्बल २८ वेळा बदलले आपले रूप :
  • मुंबई : भारताच्या कागदी चलनात एक रुपयाची नोट येऊन आज, गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. या शंभर वर्षांत या नोटेचे डिझाइन २८ वेळा बदलले. परंतु तिचा निळा रंग मात्र कायम राहिला आहे.

  • देशात एक रुपयाच्या किती नोटा आहेत याची नोंद रिझर्व्ह बँकेच्या ‘नोट््स इन सर्क्युलेशन’ अहवालात नाही. ही नोट रिझर्व्ह बँकेतर्फे नव्हे तर भारत सरकारतर्फे जारी केली जाते.

  • हल्ली एक रुपयाची नोट व्यवहारांत अभावानेच वापरली जाते.मात्र पूजा व धार्मिक विधीच्या वेळी दान-दक्षिणा देताना किंवा कोणत्याही शुभ व्यवहारासाठी बयाणा देताना ११, २१, ५१, असे आकडे पवित्र मानले जातात.

  • भारत सरकारने या नोटेची छपाई सन १९९५ मध्ये बंद केली होती. परंतु जनतेच्या मागणीवरून २० वर्षांनी सन २०१५ मध्ये एक रुपयांच्या नव्या नोटा पुन्हा छापल्या गेल्या.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलर्सन यांच्या गच्छंतीचे संकेत!
  • वॉशिंग्टन : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टीलर्सन यांना पदावरून दूर  करण्याच्या हालचाली सुरु असून, बहुदा जानेवारी महिन्यात त्यांची गच्छंती होईल, असे संकेत अमेरिकेच्या प्रसिद्धी माध्यमांनी दिले आहे. परराष्ट्र डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी टीलर्सन यांचे अनेक मुद्यांवर मतभेद आहे.

  • उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र चाचणी आणि इराणच्या अणूचाचणीवरुन दोघांमधील वेगवेगळे विचार  समोर आले होते. टीलर्सन यांनी एका खासगी कार्यक्रमात  ट्रम्प यांना मंदबुद्धीचे  असे म्हटले होते.

  • या सर्व पार्श्वभूमीवर व्हाइट हाउस टीलर्सन यांना पदावरुन दूर करण्यावर जवळपास निश्चित झाले असून, त्यांच्या जागेवर सीआयएचे प्रमुख माईक पॉम्पीओ यांच्या नावावर विचार सुरु आहे.

दिनविशेष :

जागतिक दिवस

  • जागतिक एड्स दिन

महत्वाच्या घटना

  • १८३५: हान्स क्रिस्चीयन अँडरसन च्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.

  • १९१७: कोल्हापूरमधील पॅलेस थिएटरमधे श्रीपतराव काकडे, दामलेमामा, फत्तेलाल, बाबा गजबर, ज्ञानबा मेस्त्री, पंत धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत बाबूराव पेंटर यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.

  • १९४८: एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.

  • १९६४: मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.

  • १९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

  • १९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.

  • १९९३: प्राच्यविद्या विशारद डॉ. रा. ना. दांडेकर, वेदविद्या पारंगत डॉ. चिं. ग. काशिकर आणि प्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्माननीय डी. लिट. पदवी जाहीर.

  • १९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.

  • २०१५: ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.

जन्म

  • १०८१: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट ११३७)

  • १७६१: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १८५०)

  • १८८५: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९८१ – संनिधि आश्रम, नवी दिल्ली)

  • १९०९: मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी. सी. मर्ढेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च १९५६)

  • १९११: पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर १९६६)

  • १९५०: भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मंजू बन्सल यांचा जन्म.

  • १९५५: पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म.

  • १९६०: भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक शिरिन एम. राय यांचा जन्म.

  • १९६३: श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचा जन्म.

  • १९८०: भारतीय क्रिकेटपटू मोहोम्मद कैफ यांचा जन्म.

मृत्य

  • ११३५: इंग्लंडचा राजा हेन्री पहिला यांचे निधन.

  • १८६६: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १७९०)

  • १९७३: इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८८६)

  • १९८५: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म: १८ जून १८९९)

  • १९८८: प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन.

  • १९९०: राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९००)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.