चालू घडामोडी - ०१ डिसेंबर २०१८

Date : 1 December, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
२७२ उपग्रह संपूर्ण जगाला देणार ‘फ्री वायफाय’ :
  • चीनची कंपनी लिंकश्योर नेटवर्क लवकरच संपूर्ण जगाला मोफत वायफाय सेवा देण्याची शक्यता आहे. कंपनीच्या मते, त्यांचे पहिले उपग्रह पुढीलवर्षी चीनमधील गासू प्रांतातील जिऊकुआं उपग्रह स्थानकावरुन ते लाँच केले जाईल आणि २०२० पर्यंत अंतराळात असे १० उपग्रह पाठवण्याचे नियोजन केले आहे. २०२६ पर्यंत अंतराळात लिंकश्योरचे असे २७२ उपग्रह कार्यरत राहतील. त्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला मोफत वायफाय नेटवर्क उपलब्ध होईल.

  • कंपनीचे सीईओ वाँग जिंगयिंग यांनी याबाबत माहिती दिली. ही योजना यशस्वी करण्यासाठी कंपनी ३ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. ही योजना यशस्वी झाल्यानंतर भविष्यात यातून मोठी कमाई होऊ शकेल. चीनमधील एका वृत्तपत्राच्या मते, अंतराळातून येणाऱ्या वायफाय नेटवर्कला लोकांना आपले स्मार्टफोन्स सहजपणे कनेक्ट करता येतील. इतकेच नव्हे जिथे टेलिकॉम नेटवर्कही पोहोचत नाही तिथेही याचे नेटवर्क जाईल.

  • एका अहवालानुसार, जगातील ३०० कोटीहून अधिक लोक अजूनही इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. याचवर्षी स्पेसएक्सला अंतराळात ७ हजार स्टारलिंक उपग्रह पाठवण्यास परवानगी मिळाली आहे. येणाऱ्या काळात स्पेसएक्स अंतराळातून पृथ्वीवर इंटरनेट सेवा पाठवणारे १६०० उपग्रह अंतराळात पाठवणार आहे.

  • स्पेसएक्स शिवाय गुगल, वनवेब आणि टेलिसॅटसारख्या कंपन्याही अशाच पद्धतीची योजना अंमलात आणण्याच्या प्रयत्नात आहेत. या कंपन्यांचे उपग्रह आणि बलून्सही अंतराळातून संपूर्ण पृथ्वीवर हायस्पीड वायफाय सेवा उपलब्ध करण्याचे काम करतील.

२०० वर्ष जुन्या लक्झरी ब्रँडचं इंग्लंडबाहेरचं पहिलं दुकान मुंबईत :
  • मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, दिवसागणिक याठिकाणी कोट्यवधींची उलाढाल होते. देशातीलच नाही तर जगभरातील कंपन्या आणि नामांकित ब्रँड आपला व्यवसाय भारतात विस्तारताना मुंबईला प्राधान्य देताना दिसतात. यामध्ये आणखी एक भर पडली आहे. इंग्लंडमध्ये जवळपास २०० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या एका ऐतिहासिक लक्झरी ब्रँडने आपले देशाबाहेरचे पहिले दुकान उघडण्यासाठी मुंबईला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे मुंबईच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. Thomas Goode & Co हे या ब्रँडचे नाव आहे. या कंपनीची स्थापना इंग्लंडमध्ये १८२७ मध्ये करण्यात आली होती.

  • राणी व्हिक्टोरियाबरोबरच त्यांनी प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस डायना यांचाही रॉयल कारभार सांभाळला. आता त्यांचे लंडनमध्ये १८०० स्क्वेअर फूटांचे जुन्या पद्धतीचे बांधकाम असलेले दुकान असून त्याठिकाणी असंख्य काचेच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आता या ब्रँडला आपला व्यवसायाचा विस्तार करायचा असून २०० वर्षांनी त्यांनी यादृष्टीने सकारात्मक पाऊल उचलले आहे.

  • पंचतारांकीत ऑबेरॉय हॉटेलमध्ये ते आपले दुकान सुरु करत आहेत. भारत हे सध्या दिवसेंदिवस वाढत असलेले आणि ताकदवान मार्केट आहे. त्यामुळे आम्ही भारतात विस्तार करायचा विचार करत आहोत असे ब्रिटीश इनव्हेस्टर आणि बिझनेसमन जॉनी सँडेलसन यांनी सांगितले.

  • या ब्रँडच्या टेबलवर वापरल्या जाणाऱ्या गोष्टी जास्त प्रसिद्ध असून त्या ब्रिटीश संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या आहेत. Fortnums आणि Smythson या स्पर्धक कंपन्यांनी मध्यमवर्गीयांना परवडेल अशी उत्पादने बाजारात आणली असताना Thomas Goode & Co यामध्ये मागे का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

.जी-२०: जपान, अमेरिका आणि भारत म्हणजे ‘जय’- पंतप्रधान नरेंद्र मोदी :
  • ब्यूनर्स आयर्स येथे आयोजित जी-२० शिखर परिषदेत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या त्रिपक्षीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत महत्वाचे जागतिक मुद्दे आणि आव्हानांवर चर्चा झाली. मोदी यांनी एकत्रित मूल्यांवर कार्यरत राहण्यावर जोर देत म्हटले की, ‘जेएआय’ची (जपान, अमेरिका, भारत) बैठक लोकशाहीच्या मूल्यांसाठी समर्पित आहे.

  • ‘जेएआय’चा अर्थ ‘जय’ असा होतो. भारतात जय म्हणजे यश, विजय असा होतो. यातून एक चांगला संदेश जातो, असेही ते म्हणाले. अमेरिका आणि जपान हे आमचे भागीदार असून दोन्ही नेते माझे चांगले मित्र असल्याची पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.

  • या त्रिपक्षीय बैठकीदरम्यान ट्रम्प यांनी भारताच्या विकासाचे कौतुक केले. तिन्ही नेत्यांनी संपर्क, स्थायी विकास, दहशतवाद विरोध, समुद्र आणि सायबर सुरक्षेसारख्या जागतिक व बहुपक्षीय हितांच्या सर्व मोठ्या मुद्यांवर तिन्ही देशांच्या सहकार्यावर जोर दिला.

  • ही बैठक अशावेळी झाली जेव्हा चीनचा दक्षिण चीन समुद्रात क्षेत्रीय वाद आणि पूर्व चीन समुद्रात जपानबरोबर वाद सुरु आहे. हे दोन्ही क्षेत्र खनिज, तेल आणि इतर नैसर्गिक साधनांनी समृद्ध आहेत.

  • चीन संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगत आहे. तर व्हिएतनाम, फिलिपाइन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान या जलमार्गावर आपला दावा करतात. यामध्ये या समुद्री मार्गाचा समावेश आहे. या मार्गावरुन प्रत्येकवर्षी ३ हजार अब्ज डॉलरचा जागतिक व्यापारी परिवहन होते.

योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी - मोदी :
  • आरोग्य व शांततेसाठी योग ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे सांगितले. मानवी आरोग्य व कल्याणासाठीच्या भारतातील योगपद्धतीचे फायदे त्यांनी या वेळी सांगितले.

  • येथे आयोजित करण्यात आलेल्या योग कार्यक्रमात त्यांनी योग हे प्रत्येकाला सुखासमाधानाशी जोडणारे एक साधन असल्याचे स्पष्ट केले. मोदी म्हणाले, की मी २४ तासात १५  हजार किलोमीटर्सचा प्रवास करून येथे काही तासांपूर्वीच आलो आहे, तुमचा उत्साह व प्रेम पाहून भारताबाहेर असल्याचे वाटत नाही.

  • ‘शांततेसाठी योग’ या कार्यक्रमाच्या आयोजकांना धन्यवाद देऊन त्यांनी सांगितले, की योगामुळे तुमचे मन व शरीर मजबूत होते. जी २० देशांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते येथे आले आहेत. जर मन शांत असेल तर कुटुंब, समाज, देश व जग शांत राहू शकते. योग ही भारताची जगाला देणगी असून त्यात आरोग्य, शांतता, सुख यांना प्राधान्य आहे. योगाने भारत व अर्जेंटिना यांच्यातील अंतर कमी झाले आहे.

  • अर्जेटिनाच्या फुटबॉलपटूंचे अनेक चाहते भारतात आहेत. नित्याच्या संभाषणात मॅराडोनाचा विषय कुठेना कुठे असतोच. हॉकी जागतिक करंडकाचा पहिला सामना अर्जेटिनाने जिंकला आहे त्याबद्दल त्या संघाचे आपण अभिनंदन करतो. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २०१४ मध्ये २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली होती.

चीनचा पाकला दणका; काश्मीर आणि POK सह अखंड भारताचा नकाशा प्रकाशित :
  • बीजिंग : चीनी सरकारच्या आखत्यारित असलेल्या माध्यमांनी एक अभूतपूर्व पाऊल उचलले आहे. त्यांनी तयार केलेल्या भारताच्या नकाशात काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरचा भारतात समावेश केला आहे. यामुळे भारताला याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. परंतु धूर्त चीनने असे पाऊल उचलण्यामागचे काय कारण असू शकते? यावर विचार केला जाऊ लागला आहे. परंतु चीनी माध्यमांच्या या नकाशामुळे चीनचा जवळचा मित्र असलेल्या पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला आहे.

  • दरम्यान, असा नकाशा प्रकाशित करुन त्यावर पाकिस्तानकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहण्यासाठी चीनने असे केले असल्याचे म्हटले जात आहे. तसेच 10 डिसेंबर रोजी भारत आणि चीन दोन्ही देशांमध्ये युद्ध सराव होणार आहे. त्यामुळे चीनने असे केले असावे, असेही म्हटले जात आहे.

  • या सर्व प्रकारामध्ये एक लक्ष वेधून घेणारी बाब अशी आहे की, 'बेल्ट अॅन्ड रोड' ही चीनची सर्वात महत्तवकांक्षी योजना आहे. या योजनेमुळे भारत-चीनमध्ये अनेकदा खटके उडाले आहेत. या योजनेमध्ये चीनला पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक रस्ता बांधायचा आहे. या रस्त्यावर भारताचा अक्षेप आहे. अशा परिस्थितीत चीनने प्रकाशित केलेला नकाशा अधिक विचार करायला लावणारा आहे.

  • दुसऱ्या बाजूला पाक हा चीनचा मित्र देश आहे. परंतु काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील कराची शहरात चीनच्या काऊन्सलेटवर हल्ला झाला. पाकिस्तानी सरकार चीनी लोकांची सुरक्षा करु शकले नाही. त्यामुळे चीन सध्या पाकिस्तानवर नाराज आहे. त्यामुळे दुखावलेल्या चीनने पाकव्याप्त काश्मीरचा भारताच्या नकाशात समावेश केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

शिखर परिषदेत नरेंद्र मोदी ट्रम्प आणि शिंजो आबेंसोबत करणार बैठक :
  • नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी तेराव्या जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये दाखल झाले आहेत. या परिषदेत नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, जापानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि इतर देशातील नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्याआधी मोदींनी 'योग फॉर पीस' या कार्यक्रमाला संबोधित केले.

  • योग कार्यक्रमात मोदी म्हणाले की, "शांतीसाठी योग हे नाव या कार्यक्रमासाठी अगदी योग्य आहे. योग आपल्याला मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतो. सोबतच आपल्या मनाला आणि शरीराला शांत ठेवण्याची शक्ती देतो. जर व्यक्तीचे मन शांत असेल तर कुटुंब, समाजासोबत, देशातही शांती कायम राहिल. आरोग्य, कल्याण आणि शांतीसाठी जगाला भारताकडून योग ही खास भेट आहे."

  • मोदींची सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुतारेस यांच्यासोबतही बैठक झाली. या वर्षात सौदी अरेबिया आणि भारताचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. भारताला अर्थव्यवस्था, ऊर्जा आणि सुरक्षा क्षेत्रात सौदी अरेबियाचे सहकार्य मिळाले, अशी माहिती पीएमओ कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळत आहे.

  • महत्वाच्या असलेल्या हिंद-प्रशांत महासागराच्या क्षेत्रात चीनचा दबदबा वाढत असल्याच्या मुद्यावर नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प आणि शिंजो आबे यांच्यात त्रिपक्षीय बैठक होणार आहे. ही बैठक शिखर परिषदेच्या व्यतिरिक्त पार पडणार आहे.

दिनविशेष :
  • जागतिक एड्स दिन

महत्वाच्या घटना 

  • १८३५: हान्स क्रिस्चीयन अँडरसन च्या परीकथांचे पहिले पुस्तक प्रकाशित.

  • १९४८: एस. एस. आपटे यांनी हिन्दुस्तान समाचार ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.

  • १९६३: नागालँड भारताचे १६ वे राज्य झाले.

  • १९६४: मालावी, माल्टा आणि झांबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.

  • १९६५: भारतीय सीमा सुरक्षा दल (बोर्डर सिक्युरिटी फोर्से – बिएसएफ) ची स्थापना झाली.

  • १९७६: अंगोलाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९८०: मराठी विश्वकोश मंडळाची पुनर्रचना करण्यात आली.

  • १९८१: AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.

  • १९९२: कलाक्षेत्रात केलेल्या प्रदीर्घ व अविस्मरणीय कामगिरीबद्दल गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा गदिमा पुरस्कार गायिका आशा भोसले यांना जाहीर.

  • १९९२: ज्यूडी लेदेन या ब्रिटिश महिलेने ३९७० मीटर (१३०२५ फूट) उंचीवरुन हँग ग्लायडर चालवून उंचीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित केला.

  • १९९९: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वूमन ऑफ द मिलेनियम म्हणून मानांकित करण्यात आले.

  • २०१५: ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुझफ्फर हुसैन यांना लोकमान्य टिळक जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला.

जन्म :

  • १०८१: फ्रान्सचा राजा लुई (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट ११३७)

  • १७६१: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १८५०)

  • १८८५: साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्यिक आचार्य काका कालेलकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट१९८१ – संनिधि आश्रम, नवी दिल्ली)

  • १९०९: मराठी नवकाव्याचे प्रणेते बाळ सीताराम मर्ढेकर उर्फ बी. सी. मर्ढेकर यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च१९५६)

  • १९११: पत्रकार, कथाकार, कवी आणि समीक्षक अनंत बाळकृष्ण अंतरकर यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑक्टोबर१९६६)

  • १९५०: भारतीय जीवशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मंजू बन्सल यांचा जन्म.

  • १९५५: पार्श्वगायक उदित नारायण यांचा जन्म.

  • १९६०: भारतीय-इंग्रजी राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक शिरिन एम. राय यांचा जन्म.

  • १९६३: श्रीलंकेचा क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांचा जन्म.

  • १९८०: भारतीय क्रिकेटपटू मोहोम्मद कैफ यांचा जन्म.

मृत्यू 

  • ११३५: इंग्लंडचा राजा हेन्री पहिला यांचे निधन.

  • १८६६: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचे निधन. (जन्म: ४ जुलै १७९०)

  • १९७३: इस्रायल देशाचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांचे निधन. (जन्म: १६ ऑक्टोबर १८८६)

  • १९८५: स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचे निधन. (जन्म: १८ जून १८९९)

  • १९८८: प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांचे निधन.

  • १९९०: राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी विजयालक्ष्मी पंडीत यांचे निधन. (जन्म: १८ ऑगस्ट १९००)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.