चालू घडामोडी - ०१ फेब्रुवारी २०१९

Date : 1 February, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटूंसाठी शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण :
  • देशाच्या कानाकोपऱ्यातील युवा खेळाडूंना आपल्यातील कलागुण दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेमुळेच भारताला भविष्यातील तारे गवसत आहेत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी व्यक्त केली. याबरोबरच राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या राज्यातील क्रीडापटूंसाठी यापुढे शासकीय नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण देण्यात येईल. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेत्या खेळाडूंना थेट शासकीय नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

  • पुणे येथे नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ८५ सुवर्ण, ६२ रौप्य व ८१ कांस्य अशा एकूण २२८ पदकांवर नाव कोरत अग्रस्थान मिळवले. या सर्व खेळाडूंचा मुंबईत गुरुवारी सत्कार करण्यात आला. त्या वेळी खेलो इंडियाच्या अभूतपूर्व यशाबद्दल तावडे म्हणाले, ‘‘खेलो इंडियात सहभागी झालेल्या तसेच सर्व पदकविजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. भविष्यात देशाला आणखी गुणवान खेळाडू मिळावेत, यासाठी खेलो इंडिया नेहमीच तत्पर राहणार आहे. यांसारख्या स्पर्धामुळे खेळाडूला त्यांच्यातील कलागुण राष्ट्रीय स्तरावर दाखवण्याची संधी मिळते. मात्र या स्पर्धेतील यशामुळे हुरळून न जाता पुढील स्पर्धामध्येही खेळाडूंनी उत्तम कामगिरीचे ध्येय बाळगावे.’’

  • ‘‘शालेय शिक्षण घेत असताना विविध स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्यामुळे यापुढे राष्ट्रीय व राज्य स्तरावर खेळणाऱ्या क्रीडापटूंसाठी अभ्यासात क्रीडागुण दिले जातील. तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांना ५, तर जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना अनुक्रमे १०, १५ व २० गुण दिले जातील,’’ असे तावडे यांनी जाहीर केले. प्रशिक्षक व मार्गदर्शकांचेही कौतुक करताना त्यांनी भविष्यात अशाचप्रकारे उदयोन्मुख खेळाडू घडवण्यासाठी प्रोत्साहित करावे, असा सल्ला तावडे यांनी दिला.

मुकेश अंबानींची मुले इशा आणि आकाशचा जन्म आयव्हीएफ तंत्राने :
  • मागच्याच महिन्यात इशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा भव्य शाही विवाह सोहळा पार पडला. पुढचे काही महिने किंवा वर्ष माध्यमांमध्ये या विवाहाची चर्चा होत राहील. कारण दशकातील हा सर्वात मोठा डोळे दिपवून टाकणारा लग्नसोहळा ठरला. देशातील श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुलीच्या लग्नात कुठलाही कमतरता ठेवली नाही.

  • लग्नाच्या महिन्याभरानंतर आता इशा अंबानीने वोग्यू इंडिया नियतकालिकाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्याबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी सांगितल्या आहेत. अंबानी कुटुंबात लहानाचे मोठे होतानाच अनुभव कसा होता हे सांगताना इशाने तिचा आणि जुळा भाऊ आकाश दोघांचा जन्म आयव्हीएफ तंत्राने झाल्याचे सांगितले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

  • लग्नानंतर सात वर्षांनी माझा आणि आकाशचा आयव्हीएफ तंत्राने जन्म झाला असे इशाने सांगितले. आमच्या जन्मानंतर आईने आमच्या संगोपनासाठी पूर्ण वेळ दिला. आम्ही पाच वर्षांचे झाल्यानंतर ती पुन्हा कामात सक्रिय झाली. अजूनही ती वाघिणीसारखी आमच्या पाठिशी असते असे इशाने मुलाखतीत सांगितले.

  • आज रिलायन्स जिथे आहे तिथवर पोहोचण्यासाठी स्वप्नांच्या पूर्ततेसाठी मेहनत, कष्ट करताना मी माझ्या वडिलांना पाहिले आहे. ते कामात कितीही व्यस्त असले तरी आम्हाला जेव्हा गरज असायची तेव्हा ते आमच्यासोबत असायचे असे इशाने सांगितले. आमचे आई-वडिल ज्या पद्धतीने लहानाचे मोठे झाले त्यांनी आम्हाला सुद्धा तीच मुल्य शिकवली. माणूसकी, कष्ट आणि पैशांची किंमत आम्हाला कळली पाहिजे याकडे त्यांनी लक्ष दिले असे इशाने सांगितले.

सरकारने देशातील जनतेचा विश्वास संपादन केला - राष्ट्रपती :
  • नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात झाली असून आज संसदेच्या दोन्ही सभागृहांना राष्ट्रपतींनी संबोधित केले. सरकारने देशातील जनतेचा विश्वास संपादन केला असून मूलभूत सोयी सुविधा देण्यासाठी सरकारने प्राथमिकता दिली असल्याचे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केले.

  • भाषणाच्या सुरुवातीला राष्ट्रपती कोविंद म्हणाले की, हे वर्ष देशासाठी अत्यंत महत्वाचे वर्ष आहे. यावर्षी महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आपण साजरी करत आहोत. आपला देश  महात्मा गांधीजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर पुढे चालला असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती कोविंद यांनी केले.

  • 2014 च्या निवडणुकीआधी देश अनिश्चिततेच्या काळात होता मात्र यानंतर देश विकासाच्या वाटेवर चालला आहे. नवा भारत साकारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या सरकारने लोकांना सकारात्मक दिशा दिली आहे. सरकारने मूलभूत सुविधांना प्राथमिकता दिली आहे. सोबत सरकारी योजनांना नवी गती सरकारने दिली आहे, असेही राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

  • सरकारकडून 9  लाख कोटी शौचालयांची निर्मिती झाली आहे. गरिबांपर्यंत योजना पोहोचविण्याचा सरकारचा संकल्प आहे. सरकारकडून 6 कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. आयुष्य योजनेच्या अंतर्गत 50 कोटींहून अधिकांना लाभ झाला आहे.

योगा स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व :
  • औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या खेळाडूंनी १७ वर्षांखालील वर्चस्व राखले आहे.

  • दुसऱ्या दिवसअखेर सांघिक प्राथमिक फेºयांत महाराष्ट्राचा संघ १७ वर्षांखालील मुलांच्या गटात अव्वल स्थानावर आहे, तर पश्चिम बंगाल दुसºया व दिल्ली तिसºया क्रमांकावर आहे. मुलींच्या गटात या तिन्ही संघांतच चुरस रंगली आहे.

  • वैयक्तिक १७ वर्षांखालील मुलींच्या योगा प्रकारातही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपला विशेष ठसा उमटवला आहे. त्यात महाराष्ट्राच्या साक्षी काटे, तनुश्री पळंदूरकर, प्राप्ती किनारे, गौरी डावके, तन्वी कुंभार यांनी पात्रता फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पश्चिम बंगालच्या अद्रिता सरकार, ज्योती शुवरा, स्नेहल दास, सी.आय.एस.ई.ची सुब्रना मैती, दिल्लीची खुशी, भूमिका साहू, संजना, त्रिपुराची शैली देबनाथ यांनीही अंतिम फेरी गाठली आहे.

  • मुलांच्या गटात ऐश्चिक योगासन प्रकारात महाराष्ट्राच्या मनन कासलीवाल, प. बंगालचा सोमीनाथ मुखर्जी, संतान डे, संदीप साहू, महाराष्ट्राचा आयुष गोरे, अभिजित सावंत, दिल्लीचा नकुल मान, महाराष्ट्राचा सुमित पोटे, प. बंगालचा साहित्य प्रतिहार, दिल्लीचा मोहंमद अरमान, त्रिपुराचा दीपजॉय दास, तन्मय दास यांनी पात्रता फेरीतून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उद्याच्या सत्रात १४ व १७ वयोगटातील सांघिक व अंतिम स्पर्धा रंगणार आहे. रिदमिक व आर्टिस्टिक प्रकाराच्या प्राथमिक फेरीस सुरुवात होईल, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांनी कळवले आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात सरकारच्या ५ वर्षांची विकास गाथा :
  • नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलचे वातावरण आशा-आकांक्षा व उत्कंठेने भारले होते. लोकसभा निवडणुकीआधी, मोदी सरकार देशाला नेमके काय सांगू इच्छिते? याविषयी संसद सदस्यांच्या चेहऱ्यांवर उत्सुकता होती. अशा भारलेल्या वातावरणात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाला. या अभिभाषणाचा मथितार्थ सांगायचा झाला, तर मोदी सरकारच्या ५ वर्षांच्या कारकीर्दीची विकास यात्रा असा करता येईल. सरकारच्या विविध क्षेत्रांतील ५० यशस्वी योजनांचा गौरवपूर्ण उल्लेख राष्ट्रपतींनी अभिभाषणात केला.

  • राष्ट्रपती कोविंद म्हणाले की ‘गेल्या ४ वर्षांत जगभर भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. जगात ६ व्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनण्याचे शिखर भारताने गाठले आहे. देशात २०१४ पूर्वी निराशेचे वातावरण होते. त्यानंतर जनतेच्या वेदनांची जाणीव असणारे सरकार सत्तेवर आल्यामुळे भारतात नव्या आशांचा संचार झाला आहे.

  • उज्ज्वला योजनेपासून जनधन योजनेपर्यंत, सर्जिकल स्ट्राईकपासून स्वच्छ भारत अभियानाच्या शौचालय निर्मितीपर्यंत, अनेक यशस्वी योजनांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आयुष्मान जनारोग्य योजनेला अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद, काश्मीर ते गुजरातपर्यंत नव्या एम्सची निर्मिती, पंतप्रधान विमा योजना, ग्रामीण गृहबांधणी (आवास) योजनेत १ कोटी ३० लाख नव्या घरांची निर्मिती, १८ हजार नव्या गावांना वीजपुरवठा, मानवरहित रेल्वे क्रॉसिंग्ज,४ कोटींहून अधिक स्टार्टअपस् ६०० जिल्ह्यांत नवी औषध केंद्रे, १ रुपया प्रीमियमद्वारे २१ कोटी लोकांना आयुर्विमा योजनेचा लाभ, अशी विविध वैशिष्ट्येही राष्ट्रपतींनी नमूद केली.

  • वन रँक वन पेन्शनद्वारे माजी सैनिकांना १० हजार ७०० कोटी रुपयांच्या पेन्शनची थकबाकीही देणे, जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी ८० हजार कोटींचे पॅकेज, पूर्व भारतात १९ नवी विमानतळे, अशी पायाभूत सुविधांची कामे मोदी सरकारने सुरू वा पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले.

मध्यमवर्ग, महिला, उद्योग आणि शेतकऱ्यांना मिळणार का दिलासा :
  • नवी दिल्ली : अर्थमंत्री पीयूष गोयल आज सकाळी 11वाजता लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विविध क्षेत्रांतील लोकांना दिलासा देणाऱ्या घोषणा या अंतरिम अर्थसंकल्पात केल्या जाण्याची शक्यता आहे. 

  • शेतकरी, महिला, जेष्ठ नागरीक आणि छोटे व्यापारी यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून नव्या तरतूदी करण्यात येतील, अशी अपेक्षा आहे. तसेच, मध्यमवर्गीय नोकरदार आणि चाकरमान्यांना यंदा प्राप्तिकरातील सूट देण्यासाठी असलेली मर्यादा वाढवली जाण्याची आशा आहे.

  • प्राप्तिकरात सूट देण्याच्या दृष्टीने सध्या असलेली 2.5 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा 5 लाख करण्यात यावी, अशी मागणी नोकरदार आणि व्यावसायिकांतून दीर्घ काळापासून होत आहे. या अर्थसंकल्पात मोदी सरकार याकडे लक्ष देऊ शकते. तसेच, कॉर्पोरेट टॅक्सही 30 वरून 25 टक्के करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. 

  • याशिवाय, शेतकरी व ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी ग्रामीण भागावर करावयाच्या खर्चाची तरतूद 16 टक्के वाढवली जाण्याची शक्यता आहे. अंतरिम अर्थसंकल्पात ग्रामीण भागासाठी मोदी सरकार 1.3 लाख कोटी रुपये देण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी 1.12 लाख कोटी रुपये ग्रामीण भागासाठी देण्यात आले होते.

दिनविशेष :
  • जागतिक बुरखा/हिजाब दिन

महत्वाच्या घटना 

  • १६८९: गणोजी शिर्के यांच्या मदतीने मुघल सरदार शेख नजीबखान याने छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले.

  • १९४१: डॉ. के. बी. लेले यांनी गुरुकिल्ली हे जादुविद्येला वाहिलेले मराठी भाषेतील पहिले नियतकालिक सुरू केले.

  • १९५६: सुधी रंजन दास यांनी भारताचे ५वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९६४: प्र. बा. गजेन्द्रगडकर यांनी भारताचे ७वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९६६: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अन्नपाणी व औषधे वर्ज्य करुन प्रायोपवेशनास प्रारंभ केला.

  • १९७९: १५वर्षे विजनवासात काढल्यानंतर ईराणचे आयातुल्ला खोमेनी तेहरानला परतले.

  • १९९२: भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अ‍ॅंडरसन याला फरारी घोषित केले.

जन्म 

  • १८८४: महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९८४)

  • १९१२: संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार राजा बढे यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १९७७)

  • १९१७: चित्रपट अभिनेते व स्वातंत्र्यसैनिक ए. के. हनगल यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट २०१२)

  • १९२७: ज्येष्ठ समीक्षक मधुकर दत्तात्रय तथा म. द. हातकणंगलेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी २०१५ – सांगली)

  • १९२९: ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक जयंत साळगावकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)

मृत्यू 

  • १९७६: क्‍वांटम मॅकॅनिक्स मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वेर्नर हायसेनबर्ग यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०१)

  • १९८१: डग्लस एअरक्राफ्ट कंपनी चे संस्थापक डोनाल्ड विल्स डग्लस सिनियर यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १८९२)

  • १९९५: नाटककार, चित्रपट दिग्दर्शक व पत्रकार मोतीराम गजानन तथा मो. ग. रांगणेकर यांचे निधन. (मृत्यू: १० एप्रिल १९०७)

  • २००३: भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला यांचे निधन. (जन्म: १ जुलै १९६१)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.