चालू घडामोडी - ०१ जानेवारी २०१९

Updated On : Jan 01, 2019 | Category : Current Affairsनववर्षाचं गिफ्ट, आजपासून ‘या’ २३ गोष्टी स्वस्त :
 • आजपासून सिनेमा तिकीट, मानिटर स्क्रीन, पावर बँक आणि ३२ इंचाच्या टीव्ही संचासह २३ वस्तू स्वस्त करण्यात आल्या आहेत. २२ डिसेंबर रोजी जीएसटी परिषदने २३ वस्तूवरील कर कमी केला होता. आजपासून ही आमंलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे नववर्षात सर्वसामान्य व्यक्तींना गिफ्ट मिळाले आहे.

 • डिजिटल कॅमेरा, मोबाइलच्या पॉवर बँक, व्हिडीओ कॅमेरा रेकॉर्डर्स, व्हिडीओ गेम कन्सोल्स, वाहनांचे ट्रान्समिशन शाफ्ट्स आणि क्रँक्स, गिअर बॉक्स, पुनप्र्रक्रिया केलेले टायर आदी वस्तूंवर आता २८ टक्क्यांऐवजी १८ टक्के जीएसटी करण्यात आला आहे.

 • १०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सिनेमा तिकिटांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के, तर १०० रुपयांपेक्षा कमी मूल्याच्या तिकिटांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे या सर्व वस्तू आता स्वस्त झाल्या आहेत.

ऋषभ पंतचा विश्वविक्रम, सर्वाधिक कॅच घेण्याचा पराक्रम :
 • मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतानं 137 धावांनी विजय मिळवला. या मालिकेत भारताचा विकेटकीपर ऋषभ पंतनं एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. पंत एखाद्या कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला आहे.

 • ईशांत शर्माच्या गोलंदाजीवर ऋषभ पंतने नॅथन लियोनची कॅच घेत तिसऱ्या कसोटी सामन्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऋषभची पंत  मालिकेतील ही 20 वी कॅच होती. या कॅचनंतर ऋषभ एखाद्या मालिकेत सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला. पंतने नरेन तम्हाने आणि सय्यद किरमानीचा विक्रम मोडला.

 • तम्हाने आणि किरमानी यांनी एखाद्या सीरिजमध्ये सर्वाधिक 19-19 कॅच घेतल्या आहेत. तम्हाने यांनी पाकिस्तानविरोधात 1954-55 मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत 19 कॅच घेतल्या होत्या. तर किरमानी यांनी पाकिस्तानविरोधातच 1970-80 मध्ये सहा सामन्यांच्या मालिकेत 19 कॅच घेतल्या होत्या. मात्र पंतने 20 विकेट घेत तम्हाने आणि किरमानी यांनी मागे टाकलं आहे.

ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन :
 • मुंबई : ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे कॅनडातील टोरंटो येथे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. ते दीर्घ आजारानं ग्रस्त असल्याने बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडात उपचार सुरु होते. कादर खान यांचा मुलगा सरफराज याने ही माहिती दिली. मागील  16-17 दिवसांपासून त्यांच्यावर कॅनडातील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांना कॅनडाची नागरिकता मिळाली होती. 2015-16 साली ते कॅनडामध्ये स्थायिक झाले होते. तिथेच्या त्यांच्या पार्थिव देहावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.

 • कादर खान यांच्या निधनाची बातमी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वायरल होत होती.  मागील काही दिवसांपासून कादर खान यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑल इंडिया रेडीओने आपल्या ट्विटरवर त्यांचं निधन झालं असल्याचं ट्वीट केल्याने कादर खान यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली होती.

 • यापूर्वीही अनेक वेळा कादर खान यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. पुन्हा  या गोष्टीची पुनरावृती झाल्याने संताप व्यक्त केला जात होता.

 • प्रोग्रेसिव सुप्रान्यूक्लियर पाल्सी डिसऑर्डर या आजारामुळे 81 वर्षीय कादर खान यांचा मेंदूने काम करणं बंद केलं होतं.  गेल्या वर्षी कादर खान यांच्या गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यामुळे त्यांना चालणेही कठीण झाले होते. चालल्यास आपण खाली पडू याची भीती कादर खान यांना वाटत होती. त्यानंतर सातत्यानं त्यांची प्रकृती खालावत गेली होती. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा :
 • नवी दिल्ली - सरत्या वर्षाला निरोप देत जगभरात मोठ्या उत्साहात नवीन वर्ष 2019 चे स्वागत करण्यात आले आहे. जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, गोवा, दिल्ली या शहरांसह देशामध्ये अनेक ठिकाणी आकर्षक रोषणाई आणि आतषबाजी करत नववर्षाचे स्वागत करण्यात आले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'नववर्षात सर्वांना सुख-समृद्धी, सदृढ आरोग्य लाभो', अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन दिल्या आहेत.  

 • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील नवीन वर्षाच्या देशवासियांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ''सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! वर्ष 2019 देशवासियांना व संपूर्ण जगातील समुदायांच्या जीवनात सुख-समृद्धी, शांती व आनंद लाभत राहो''.असे ट्विट करत राष्ट्रपती कोविंद यांनी देशवासियांनी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह अनेक दिग्गजांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 • जगभरात नववर्षाचा उत्साह पाहायला मिळला. टोंगा आयलँडने सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत केले. न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे स्वागत करण्यात आले. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलिया, कोरिआ,जपान, चीन, दुबई, रशिया, ग्रीस, फ्रान्स या देशांसह जगभरात नव्या वर्षाचे आगमन झाले. टि्वटरवरून #हॅप्पी न्यू ईअर २०१९, #न्यू ईअर, #गुडबाय २०१८, # वेलकम २०१९ असे हॅशटॅग वापरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

२०१९ ठरणार राजकीय घडामोडींचे वर्ष, लोकसभेबरोबरच या राज्यांमध्ये होणार विधानसभा निवडणुका :
 • मुंबई - 2019 या नववर्षाला आजपासून सुरुवात झाली आहे. हे नवे वर्ष राजकीय, सामाजिक, क्रीडाक्षेत्रासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. विशेषत: लोकसभा निवडणूक आणि विविध राज्यातील विधानसभा निवडणुकांमुळे नवे वर्ष हे राजकीय घडामोडींचे वर्ष ठरणार आहे.

 • लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होईल. या आठ राज्यांपैकी चार राज्यांमध्ये सध्या भाजपाची तर इतर तीन राज्यात प्रादेशिक पक्षांची सत्ता आहे. 

 • यावर्षी होणारी 17व्या लोकसभेची निवडणूक हे भारतातील राजकीय क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची घटना ठरणार आहे. मार्च ते मे महिन्यांदरम्यान लोकसभा निवडणुकीची घोषणा, मतदान आणि मतमोजणी आदी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.  

 • नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सत्तेवर असलेले भाजपा सरकार आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेली महाआघाडी यांच्यात सत्तेसाठी लढाई रंणारा आहे. या निवडणुकीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीचे निकाल त्रिशंकू लागल्यास गैर भाजपा आणि गैर काँग्रेसी नेत्यालाही पंतप्रधान पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. 

वेलकम २०१९... देशभरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत :
 • मुंबई : 2018 च्या शेवटच्या रात्री बाराचं ठोका पडला आणि सगळा आसमंत फटाक्याच्या रोषणाईने उजळून निघाला. सरलेल्या वर्षाला निरोप देत नवीन स्वप्ने आणि आव्हाने घेऊन येणाऱ्या नववर्षाचे मध्यरात्री जल्लोषात स्वागत करण्यात आले. नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह संपूर्ण देशात उत्साह पाहायला मिळाला. मुंबईच्या मरीन ड्राईव्हला संध्याकाळपासूनच लोकांनी गर्दी केली होती. दरवर्षी प्रमाणे यंदाही मरीन ड्राईव्ह लोकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. अगदी उत्साहाच्या भरात मुंबईकरांनी सरत्या वर्षाला निरोप देत नव वर्षाचं स्वागत केलं.

 • गेट ऑफ इंडियावर विद्युत रोषणाई : नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारताचं प्रवेशद्वार असलेल्या मुंबईतील गेट ऑफ इंडियावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईमुळे गेट वे अतिशय आकर्षक दिसत होतं. तर गेट वे शेजारील ताज हॉटेलच्या इमारतही रोषणाईने उजळली होती. याशिवाय सीएसएमटी स्थानकावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली.

 • सिद्धीविनायक मंदिरात भक्तांची मांदियाळी : मुंबईतल्या सिद्धीविनायक मंदिरातही भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. नववर्षाच्या सुरुवातीला आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी रात्री पासूनचं भाविकांनी गर्दी करायला सुरुवात केली. नववर्षाच्या पहिल्या काकड आरतीसाठी अनेक ठिकाणांहून भाविक या ठिकाणी येत असतात. सिद्धीविनायकचं दर्शन घेत अनेकांनी आपल्या नव्यावर्षाची सुरुवात केली.

 • भाविकांची सकाळपासूनच शिर्डीत गर्दी : सकाळपासूनच शिर्डीत भाविकांनी गर्दी केली होती. देशभरातून साई भक्तांसह परदेशातील साईभक्तांनी साई नगरीत नवर्षाचं स्वागतं केलं. भक्तांच्या सोईसाठी मंदीर रात्र भर खुलं ठेवण्यात आलं होतं. तर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षी प्रमाणे शिर्डीत हजेरी लावत नववर्षाची सुरुवात केली. विरोधीपक्ष नेते राधकृष्ण विखे पाटील यांनीही शिर्डीच्या साईं समाधीचं दर्शन घेतलं.

 • शेगावमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक दाखल : दरम्यान विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यातील शेगावमध्ये हजारोंच्या संख्येने भाविक दाखल झाले. श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक आल्याने भक्त निवास, लॉजेसदेखील हाऊसफुल्ल झाले आहेत.

 • धुळ्यात रक्तदान करून नववर्षाचे स्वागत : धुळ्यात रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. धुळे शहरातील युवक बिरादरी तसेच रक्ताश्रय संस्था यांच्या वतीनं नवीन वर्षाचं स्वागत रक्तदान करून करण्याचं हे 34 वे वर्ष आहे. या रक्तदानावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे उपस्थित होते. या रक्तदानाला युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

 • ठाणेकरांकडून नवीन वर्षाचा जल्लोष : दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणेकरांनी मासुंदा तलाव येथे एकत्रित येत नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी 12 वाजण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या ठाणेकरांनी बरोबर बारा वाजताच आकाशात फुगे सोडून फटाक्यांच्या आतिषबाजीत नवीन वर्षाचे स्वागत करत एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

 • बीडमध्ये व्यसनमुक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन : बीडमध्ये व्यसनमुक्ती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाडा लोकविकास मंच सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन आणि कै. अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठाणच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसंग्राम संघटनेच्या वतीने व्यसनमुक्त बीड हा उपक्रम राबवला गेला. तर संगीत रजनी कार्यक्रमामध्ये अभिनेत्री सांस्कृती बालगुडे, स्मिता तांबे, माधवी कुलकर्णी, मीरा जोशी, गायिका कविता पौडवाल, वैशाली माडे, अभिनेता अभिजीत केळकर, गायक ऋषिकेश रानडे, कौस्तुभ गायकवाड, हास्य कलाकार कमलाकर सातपुते, अरुन कदम यांनी बीडकरांचे मनोरंजन केले.

 • गोव्यात गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकली : सेलिब्रेशनसाठी हक्काचं आणि आवडतं ठिकाण म्हणजे गोवा. सरत्या वर्षाला निरोप देताना गोव्यात हरियाणातली प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीनं आपल्या नृत्यानं तर प्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांनी आपल्या गायिकीनं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. गोव्यात बॉलिवूड गाण्यांच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसून आली. अनेक ठिकाणी परदेशी कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं.

 • विदेशातही नवीन वर्षाचं हर्षोल्हासात स्वागत : विदेशातही नवीन वर्षाचं अगदी हर्षोल्हासात स्वागत करण्यात आलं. नवीन वर्षाचं सर्वात पहिलं स्वागत न्यूझीलंडमध्ये उत्साहात झालं. ऑकलंडच्या स्काय टॉवरवर नयनरम्य रोशनाई आणि आतषबाजी करून 2019 चं स्वागत करण्यात आलं. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्या मोठ्या घड्याळामध्ये रात्री बारा वाजल्यानंतर तुफान आतषबाजीला सुरुवात झाली, सर्वात पहिल्या नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जगभरातील पर्यटकांनी न्यूझीलंडमध्ये धाव घेतली. न्यूझीलंड पाठोपाठ ऑस्ट्रेलियातील सिडनीत देखील नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर आणि ऑपेरा हाऊस परिससरात नववर्षानिमित्त फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. तिकडे दक्षिण कोरियाच्या सीओई  एक्स मॉलबाहेर लेझर शो चा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर जोरदार आतषबाजीनं नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. त्यामागोमाग हाँगकाँगच्या व्हिक्टोरिया हार्बरवरही आतषबाजीनं 2019 चं स्वागत करण्यात आलं.

दिनविशेष :

महत्वाच्या घटना 

 • १७५६: निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना न्यू डेन्मार्क असे नाव देण्यात आले.

 • १८१८: भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या २५,००० सैन्याचा पराभव केला.

 • १८४२: बाबा पद्मनजी यांचे ज्ञानोदय वृत्तपत्र सुरू झाले.

 • १८४८: महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी भिडे वाडा पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली.

 • १८६२: इंडियन पिनल कोड अस्तीत्वात आले.

 • १८८०: विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूल ची स्थापना केली.

 • १८८३: पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना.

 • १९००: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.

 • १९०८: संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ललित कलादर्श ही नाटक कंपनी स्थापन केली.

 • १९१९: गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.

 • १९२३: चित्तरंजन दास आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वराज्य पार्टीची स्थापना केली.

जन्म

 • १८७९: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचा जन्म. (मृत्यू: ७ जून १९७०)

 • १८९२: स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक महादेव देसाई यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)

 • १८९४: भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)

 • १९०२: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)

 • १९१८: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी शांताबाई दाणी यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)

 • १९४३: शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा जन्म.

 • १९५१: अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्म.

मृत्यू

 • १८९४: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)

 • १९४४: दिल्लीचे नगररचनाकार सर एडविन लुटेन्स यांचे निधन. (जन्म: २९ मार्च १८६९)

 • १९५५: भारतीय रसायनशास्त्रज्ञ डॉ. शांतिस्वरूप भटनागर यांचे निधन.

 • १९७५: उद्योजक, साहित्यिक व चित्रकार शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांचे निधन. (जन्म: ८ ऑक्टोबर १८९१)

 • १९८९: समाजवादी विचारवंत व पत्रकार दिनकर साक्रीकर यांचे निधन.

 • २००९: संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान रामाश्रेय झा यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)

टिप्पणी करा (Comment Below)