चालू घडामोडी - ०१ जुलै २०१८

Date : 1 July, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र प्रणाली घेणार भारत :
  • नवी दिल्ली- रशियाकडून अत्याधुनिक S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासाठी भारतानं एक पाऊल पुढे टाकलं आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या दबावाला झुगारून भारतानं हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेकडून निर्बंध लादले जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असतानाच भारताचं संरक्षण मंत्रालय 39 हजार कोटी रुपयांच्या S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी कराराच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

  • सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदे(DAC)नं गुरुवारी रशियाकडून क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यास अनुकूलता दर्शवली आहे. रशियाबरोबर झालेल्या व्यावसायिक चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्यासंदर्भातील हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील संरक्षण प्रकरणातील निर्णय हाताळणा-या कॅबिनेट समितीकडे पाठवण्यात येणार आहे. देशातील सर्वोच्च नेतृत्व यावर अंतिम निर्णय घेणार आहे.

  • अमेरिकेनं भारताबरोबरची 'टू-प्लस-टू' बैठक रद्द केल्यानंतर डीएसीची बैठक झाली आहे. या बैठकीत रशियाकडून S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली घेण्याचा ठराव झाला आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान 6 जुलै रोजी बैठका आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामण सहभागी होणार होत्या. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ऐन वेळी या बैठका रद्द करण्यात आल्या. S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीच्या मुद्द्यावरून त्या बैठका रद्द केल्याची आता चर्चा आहे.

  • भारतानं S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली मिळवण्यासाठी एक योजना बनवली होती. या क्षेपणास्त्र प्रणालीच्या माध्यमातून शत्रूंची युद्धजहाजे, हेरगिरी करणा-या नौका, मिसाइल आणि ड्रोनला 400 किलोमीटरच्या टप्प्यात असताना हवेच्या 30 किलोमीटर वरच नेस्तनाबूत करता येणार आहे. भारताच्या संरक्षण दलात  S-400 ट्रायम्फ एअर डिफेंस क्षेपणास्त्र प्रणाली गेमचेंजर ठरणार आहे.

हज यात्रेसाठी यंदा विमान भाडय़ाचा खर्च ५७ कोटींनी कमी :
  • हज यात्रेकरूंच्या विमान भाडय़ापोटी गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी विमान कंपन्यांकडे ५७ कोटी रूपये कमी भरण्यात आले आहेत, असे अल्पसंख्याक कामकाज मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. हज समितीमार्फत यात्रेला जाण्यासाठी अनुदान बंद करण्यात आले आहे.

  • ते म्हणाले की, हज अनुदाने बंद करण्यात आली असली व सौदी अरेबियाने अनेक कर लादले असूनही भारतीय यात्रेकरूंना आर्थिक भार सोसावा लागणार नाही.

  • हज प्रशिक्षण समन्वयकांच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या वर्षी सर्वाधिक म्हणजे १७५०२५ भारतीय मुस्लीम यात्रेकरू हजला जात आहेत. त्यातील ४७ टक्के महिला असून तोही विक्रमच आहे. गेल्या वर्षी विमान कंपन्यांना १२४८५२ यात्रेकरूंच्या विमान भाडय़ापोटी १०३० कोटी रूपये देण्यात आले होते. या वर्षी १२८७०२ यात्रेकरू असूनही ९७३ कोटीच रूपये द्यावे लागले. ५७ कोटी रूपये कमी भरावे लागले आहेत.

  • हज यात्रेकरूंसाठी विमानांचे वेळापत्रक - हज यात्रेला कुठल्या ठिकाणाहून विमानात बसायचे याची सुविधा मुस्लीम यात्रेकरूंना दिली असून १४ जुलैपासून हाजची विमाने दिल्ली, गया, गुवाहाटी, लखनौ व श्रीनगर येथून सुटतील. १७  जुलै -कोलकाता,  २० जुलै-  वाराणसी. २१ जुलै-मंगळुरू, २६ जुलै-गोवा, २९ जुलै औरंगाबाद, चेन्नई, मुंबई, नागपूर येथून हाज यात्रेसाठी विमाने सुटणार आहेत. ३० जुलैला रांची, १ ऑगस्टला अहमदाबाद, बंगळुरू, कोचिन, हैदराबाद,. जयपूर येथून, तर ३ ऑगस्टला भोपाळ येथून हजसाठी विमाने जातील.

अमेरिकी वस्तूंवर कॅनडाकडून मोठा कर :
  • अमेरिकेने आयात कर वाढवल्यानंतर त्याचा सूड घेण्यासाठी कॅनडानेही अमेरिकी वस्तूंवर आयात कर लादला आहे. उन्हाळयात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर कॅनडाने कर वाढवला असून त्या वस्तूंमध्ये फ्लोरिडाचा संत्रा रस, केचअप, केंटुकी बोर्बन यांचा समावेश आहे. एकीकडे  तापमान वाढत असताना अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशातील वातावरणही तापले आहे.

  • कॅनडाच्या १२.६ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर अमेरिकेने आयात कर वाढवला होता. त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होत असतानाच कॅनडाने हा निर्णय घेतला आहे. कॅनडात उद्या राष्ट्रीय दिनाची सुटी असून त्यानंतर अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन साजरा होणार आहे. अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशात सध्या जशास तसे वागणे सुरू असून अमेरिकेने जूनमध्ये पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर कर लादला होता.

  • कॅनडाने आता त्यांच्या पोलाद व अ‍ॅल्युमिनियम क्षेत्राला दीड अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. त्यात या क्षेत्रातील ३३५०० कामगारांचे हितही लक्षात घेतले आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडू यांनी शुक्रवारी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांना दूरध्वनी करून सांगितले की, आम्ही अमेरिकेने १ जून रोजी पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर लादलेल्या कराला तोंड देण्यासाठी काही उपाययोजना करीत आहोत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहण्याचे मान्य केले आहे.

  • कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री ख्रिस्तिया फ्रीलँड यांनी ओंटारिओतील हॅमिल्टन येथे अमेरिकी पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर कर लादण्याची घोषणा केली.  त्या म्हणाल्या, की आम्ही संतापातून ही कृती करीत नाही पण आमची ती अपरिहार्यता आहे. अमेरिकेच्या अडीचशे वस्तूंवर कॅनडाने कर वाढवला असून त्यात फ्लोरिडा ज्यूस, विस्कॉन्सिन टॉयलेट पेपर, नॉर्थ कॅरोलिना घेरकिन्स यांचा समावेश आहे. अमेरिकेने पोलाद व अ‍ॅल्युमिनियमवर अनुक्रमे २५ व १० टक्के कर लावला होता, तेवढय़ाच प्रमाणात कर अमेरिकेच्या या वस्तूंवर लावण्यात आला आहे. अमेरिकेने धातूंवरील करातून आधी कॅनडा व मेक्सिकोला वगळले होते.

मुस्लीम महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले :
  • कानपूरच्या एका मुस्लीम महिलेने उर्दू भाषेत रामायण लिहिले आहे. मुस्लीम समाजालाही रामायणातील चांगल्या गोष्टींबद्दल माहिती व्हावी हा यामागील उद्देश असल्याचे या महिलेने म्हटले आहे. त्यामुळे सदर महिलेने सामाजिक सलोखा आणि हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण देशासमोर ठेवले असल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • सदर महिलेचे नाव डॉ. माही तलत सिद्दिकी असे असून त्या कानपूरच्या प्रेमनगर येथे राहतात. कानपूर येथील बद्री नारायण तिवारी यांनी त्यांना दोन वर्षांपूर्वी रामायणाची प्रत भेट दिली होती. रामायण वाचल्यानंतर हे महाकाव्य उर्दू भाषेत लिहावे, असा त्यांनी निर्धार केला. रामायणामध्ये शांती आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला आहे आणि ते उर्दूत लिहिल्यानंतर आपण तणावमुक्त झालो असल्याचे डॉ. सिद्दिकी यांनी म्हटले आहे.

  • उर्दू भाषेत रामायण लिहिण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागला. हिंदी भाषेतील रामायणाचा भावार्थ बदलू नये याकडे विशेष लक्ष द्यावे लागले. काही जण धार्मिक मुद्दय़ांवर चिथावणी देऊन हिंसा पसरविण्याचे काम करतात, मात्र कोणताही धर्म द्वेषाची शिकवण देत नाही, असेही त्या म्हणाल्या. यापुढे लेखणीद्वारे सामाजिक ऐक्य घडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.

४९ महिन्यांत काळा पैसा पांढरा कसा झाला -  काँग्रेस :
  • नवी दिल्ली : स्विस बँकेत २0१७ साली जमा झालेल्या भारतीय पैशावरून काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र चढवले आहे. नरेंद्र मोदी २0१४ पर्यंत स्विस बँकेत काळा पैसा आहे, सत्तेत आल्यावर आपण तो परत आणू, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, असे सांगत होते.

  • आता स्विस बँकेतील भारतीयांचा सारा पैसा काळा नाही, असे सांगत असून, ४९ महिन्यांत काळा पैसा पांढरा कसा झाला, असा प्रश्न काँग्रेसने केला आहे. २0१४ सालपर्यंत स्विस बँकेत भारतीयांचा असलेला पैसा काळा होता. आता तो पांढरा कसा झाला, हे मोदी यांनी सांगायला हवे, असे राहुल गांधी म्हणाले.

  • २०१७ मध्ये तर ७000 कोटी जमा झाले. आता मात्र तुम्ही हा सारा पैसा काळा नाही, असे सांगता. त्यामुळे पैसा काळ्याचा पांढरा झाला की काय, याचे उत्तरही द्या.

नव्या वेतनवाढीवर एसटी कर्मचारी संघटना असमाधानी :
  • धुळे : नवीन करारानुसार एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारापासून वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये या वेतन वाढीसंदर्भात असलेल्या परिपत्रकातील मजकुरामुळे गोंधळाची स्थिती आहे.

  • नेमकी किती पगारवाढ आहे, कशी आहे, नवीन कर्मचारी, जुने कर्मचारी यांना वेतन वाढ कशी मिळणार, अशी ही गोंधळाची स्थिती आहे.

  • नव्या वेतनवाढीचा साधारणपणे एक लाख एसटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. मात्र एसटी प्रशासनाने ही वाढ एकतर्फी केल्याचा आरोप एसटीची एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला.

  • परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ मान्य न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय संप केला होता. हा संप मागे घेण्याचं आवाहन करताना रावतेंनी आश्वासन दिलं होतं, की 4849 कोटी रुपयांमध्ये संघटनेने आपले सूत्र बसवावे. त्याप्रमाने संघटनेने 31/316  चे मूळ + 1190x2.57  हे सूत्र तयार करून दिलं होतं. तरीही एसटी प्रशासनाने हा एकतर्फी आदेश काढल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला.

  • दरम्यान, जोपर्यंत आपल्या ठरलेल्या सूत्रानुसार वाढ होत नाही, तो पर्यंत करारावर सह्या केल्या जाणार नाहीत. याबाबत तातडीने कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.

दिनविशेष

  • भारतीय वैद्य दिन / महाराष्ट्र कृषिदिन

महत्वाच्या घटना

  • १८७४: पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.

  • १८८१: जगातील पहिला आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल कॅनडा मधून अमेरिकेत करण्यात आला.

  • १९०८: एसओएस (SOS) हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.

  • १९०९: क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.

  • १९१९: कै. बाबूराव ठाकूर यांनी तरुणभारत वृत्तपत्राची सुरुवात.

  • १९३४: मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.

  • १९४७: फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.

  • १९४८: बाजारपेठेतील व्यापार्‍यांचे नेतृत्त्व करणार्‍या पूना मर्चंट्स चेंबर या संस्थेची स्थापना झाली.

  • १९४८: कायदेआझम मुहम्मद अली जीना यांच्या हस्ते स्टेट बँक ऑफ पाकिस्तान या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे उद्‍घाटन झाले.

  • १९४९: त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची (सध्याचे केरळ) संस्थान निर्माण झाले.

  • १९५५: स्टेट बँक ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.

  • १९६०: सोमालिया व घाना हे देश स्वतंत्र झाले.

  • १९६१: महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार पुणे विद्यापीठाचे चौथे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.

  • १९६२: रवांडा व बुरुंडी हे देश स्वतंत्र झाले.

  • १९६४: न. वि. गाडगीळ पुणे विद्यापीठाचे पाचवे कुलगुरू झाले.

  • १९६६: कॅनडा मधील पहिल्या रंगीत टेलिव्हिजन चे प्रक्षेपण टोरांटो येथून सुरु झाले.

  • १९७९: सोनी कंपनीने वॉकमन प्रकाशित केला.

  • १९८०: ओ कॅनडा हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.

  • १९९१: सोविएत रशिया, अल्बानिया, बल्गेरिया, झेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, पोलंड, रुमानिया आणि पूर्व जर्मनी या कम्युनिस्ट राष्ट्रांत अस्तित्त्वात असलेला वॉर्सा करार संपुष्टात आला.

  • १९९७: सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत भारताची कुंजराणी देवी यांना स्थान मिळाले.

  • २००१: फेरारी संघाच्या मायकेल शूमाकरने जागतिक फॉर्मुला वन मालिकेतील फ्रेन्च ग्रां. प्री. शर्यत जिंकून फॉर्मुला वन मालिकेतील ५० वे विजेतेपद पटकावले.

  • २००२: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची स्थापना झाली.

  • २००७: इंग्लंड मध्ये सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.

  • २०१५: डिजिटल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

जन्म

  • १८८७: कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचा जन्म.

  • १८८२: भारतरत्न, पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री  डॉ. बिधनचंद्र रॉय यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९६२)

  • १९१३: महाराष्ट्राचे ३रे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑगस्ट १९७९)

  • १९३८: प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा जन्म.

  • १९४९: भारताचे १३वे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा जन्म.

  • १९६६: रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक उस्ताद राशिद खान यांचा जन्म.

मृत्यू

  • १८६०: रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक चार्ल्स गुडईयर यांचे निधन. (जन्म: २९ डिसेंबर १८००)

  • १९३८: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान दादासाहेब खापर्डे यांचे निधन. (जन्म: २७ ऑगस्ट १८५४)

  • १९४१: श्रेष्ठ वृत्तपत्रकारसर सी. वाय. चिंतामणी यांचे निधन. (जन्म: १० एप्रिल १८८० – विजयनगरम, आंध्र प्रदेश)

  • १९६२: अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष पुरुषोत्तमदास टंडन यांचे निधन.

  • १९६२: भारतरत्‍न पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री डॉ. बिधनचंद्र रॉय याचं निधन. (जन्म: १ जुलै १८८२ – पाटणा, बिहार)

  • १९६९: कीर्तनकार मुरलीधरबुवा निजामपूरकर यांचे निधन.

  • १९८९: कवी तसेच शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य ग. ह. पाटील यांचे निधन.

  • १९९४: दिग्दर्शक, नेपथ्यकार, प्रकाशयोजक राजाभाऊ नातू यांचे निधन.

  • १९९९: एम अँड एम आणि मार्स बारचे संस्थापक फॉरेस्ट मार्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २१ मार्च १९०४)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.