चालू घडामोडी - ०१ जून २०१८

Date : 1 June, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
ब्रिटिश उच्चायुक्तालयाकडून रुद्राली पाटीलचा सन्मान :
  • लातूर : साई फाऊंडेशनच्या प्रमुख अ‍ॅड. रुद्राली पाटील चाकूरकर यांच्या आरोग्य, शिक्षण व कायदेविषयक जनजागरण उपक्रमांची ब्रिटिश उच्चायुक्तालयाने ‘वूमेन इन्स्पायर’ मालिकेत दखल घेतली आहे. आजवर भारतातील तीन संस्थांच्या कार्याचा आलेख उच्चायुक्तालयाने एका माहितीपटाद्वारे जगासमोर ठेवला असून, त्यात साई फाऊंडेशनची नोंद झाली आहे. 

  • भारतातील युवक-युवतींच्या पुढाकारातून कार्यरत असलेल्या संस्थांच्या सामाजिक योगदानाची दखल ब्रिटिश उच्चायुक्तालय घेत आहे. त्यात अ‍ॅड. रुद्राली पाटील यांच्या कार्याचा गौरव करणारा माहितीपट ब्रिटिश उच्चायुक्तालयाने प्रसारित केला. उदगीर परिसरात तसेच उत्तर प्रदेशमधील दुर्गम भागात आरोग्य, शिक्षण व महिलांच्या हक्कांबाबत अ‍ॅड. रुद्राली पाटील व त्यांच्या चमूने जनजागरण केले. 

  • आपल्या अनुभवासंदर्भात रुद्राली म्हणाल्या, अकरावी वर्गात असताना उत्तर प्रदेशमधील एका गावात प्रवाह संस्थेच्या माध्यमातून शिबिराला उपस्थित राहता आले.

  •  तिथे महिलांना मिळणारी दुय्यम वागणूक इतकेच नव्हे, पडद्याबाहेर पडण्याची मुभा नसणे हे क्लेशदायी होते. स्वातंत्र्यानंतरचा प्रदीर्घ काळ उलटल्यानंतर शाळेत जातीभेद पाळला जात असल्याचे दिसले. त्याचवेळी आपण एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जनजागरण केले पाहिजे, असे ठरविले होते. 

दहावीचे सर्व पेपर ‘त्याने’ लिहिले उभे राहून; मिळवले ९३ टक्के :
  • त्याचं वय अवघं १६ वर्षं…शिकण्यासाठी तो परिस्थितीशी झगडतोय…आपल्या शारीरिक समस्येवर मात करत पुढे जाण्यासाठी तो धडपडतोय…नुकतीच त्याने आपल्या मर्यादांवर मात १० वीची परीक्षा दिली आणि चक्क त्यात ९३.४ टक्के मिळवत आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. या मुलाचे नाव आहे अश्मीत भटनागर. जयपूरमध्ये राहणाऱ्या अश्मीतला एक मायोसिटीअस ऑस्मानिया हा हाडांशी निगडीत असाध्य आजार असल्याने त्याच्या हाडांमध्ये ताठरता आहे.

  • त्यामुळे त्याला उभे राहता येते आणि झोपता येते, मात्र सामान्यांप्रमाणे बसता येत नाही. त्याला दिवसातील १२ तास उभे रहावे लागते. या अडचणीमुळे त्याने आपले १० वीचे सीबीएसईचे पेपर उभे राहून लिहीले. त्यामुळे मेहनत आणि जिद्द असेल तर तुम्ही कोणतीही गोष्ट साध्य करु शकता हे या लहानग्याने दाखवून दिले आहे.

  • अश्मीतचे वडिल सुमित एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांनी सांगितले, १ वर्षाचा असताना अश्मीतला डीटीपीची लस दिली. तेव्हा त्याच्या शरीरात एक गाठ तयार झाली. शस्त्रक्रियेद्वारे ही गाठ काढण्याचा प्रयत्न केला असता त्याचा कंबरेचा भाग कायमसाठी कठिण झाला. पुढे ते म्हणतात, अश्मीतला शारीरिक समस्या असली तरीही त्याची बुद्धी अतिशय तल्लख आहे.

  • शारीरिक अडचणी असल्या तरीही त्याला क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ आणि फोटोग्राफीमध्ये मोठ्या प्रमाणात आवड आहे. ११ वीला त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला असून त्याला मोठेपणी सरकारी अधिकारी व्हायचे आहे. त्याचा मोठा भाऊ चैतन्य यालाही स्पास्टीक नावाचा आजार असल्याने तो विशेष मुलांच्या शाळेत जातो.

शासकीय कार्यालयातच मिळणार ‘आधार’
  • पुणे : जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ९० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांची आधार नोंदणी झाली आहे. शासनाच्या आदेशानुसार सध्या सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, टपाल कार्यालय , नागरी सुविधा केंद्र, महापालिकांची क्षेत्रीय कार्यालये या ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्ह्यात सध्या तब्बल साडेतीनशेहून अधिक आधार केंद्र सुरू आहेत; परंतु या सर्व ठिकाणी सुरू असलेल्या आधार केंद्रांचे नियोजन, समन्वय ठेवणे कठीण जाते. यामुळे शासनाच्या आदेशानुसार आता सर्व आधार केंद्र शासकीय कार्यालयांमध्ये हलविण्यात येणार आहेत.

  • आधारची कामे करणाऱ्या खासगी कंपन्यांनी सामान्य नागरिकांकडून शुल्क घेण्यास सुरुवात केल्याच्या असंख्य तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या. त्यानंतर राज्य शासनाने खासगी कंपन्यांकडून कामे काढून सरकारी महाआॅनलाइन कंपनीकडे कामे सोपविली होती; तसेच आधारची सर्व कामे शासकीय कार्यालयांमधूनच करण्याबाबत राज्य शासनाकडून अधिसूचना काढण्यात आली होती; परंतु महाआॅनलाइनला आधारची ही मोठी यंत्रणा झेपली नाही. या बरोबरच राज्य शासनाने विविध अधिसूचना काढून पुन्हा रद्द करणे, महाआॅनलाइन आणि खासगी कंपन्यांमधील टक्केवारीचा वाद, तांत्रिकबाबी आणि किचकट प्रक्रिया अशा विविध कारणांमुळे जून २०१७ पासून शहर आणि जिल्ह्यातील आधार यंत्रणा ठप्प झाली होती.

  • या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आधारची केंद्रे सर्वत्र सुरू ठेवण्याबाबत राज्य शासनाकडे विनंती करण्यात आली होती; मात्र शहरासह जिल्ह्यात पुरेशी आधार केंद्रे सुरळीत सुरू असल्याने नियमानुसार सर्व आधार केंद्रे शासकीय कार्यालयांमध्ये हलविण्यात येणार आहेत.

  • देशातील प्रत्येक जिल्ह्यातील बँकांनी त्यांच्या दहा शाखांमागे एक आधार नोंदणी केंद्र सुरू करावे, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्याबाबतचा अध्यादेशही केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याकरिता देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्र शासनाकडून १२९ आधार यंत्रे पुरविण्यात आली आहेत. त्यानुसार शहर आणि जिल्ह्यातील विविध बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये आधार केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

पी. चिदंबरमना कोर्टाचा दिलासा, ३ जुलैपर्यंत अटक टळली :
  • माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनक्स मीडिया प्रकरणामध्ये 3 जुलैपर्यंत अटक करू नये असा आदेश देत हंगामी दिलासा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. एअरसेल मार्क्सिस प्रकरणातही दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांना 5 जूपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे. अर्थात, चिदंबरम यांनी सहकार्य करावं आणि गरज असेल त्यावेळी चौकशीसाठी उपस्थित रहावं असं न्यायाधीश ए. के. पाठक यांनी स्पष्ट केलं आहे.

  • चिदंबरम यांच्यासाठी वकिल म्हणून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली असून या प्रकरणी तयारीसाठी आणखी वेळ मागितला. या प्रकरणी हायकोर्टात अटकपूर्व जामिनाची चिदंबरम यांची मागणीही प्रलंबित असल्याचे सिब्बल यांनी निदर्शनास आणले. सक्तवसुली संचालनालय व सीबीआय आर्थिक अफरातफर झाल्याचा संशय असल्यामुळे एअरसेल मार्क्सिस या प्रकरणाचा छडा लावत आहेत.

  • फेब्रुवारीमध्ये सीबीआयने चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याला अटक केली. चिदंबरम केंद्रीय मंत्री असताना 2007 मध्ये आयएनएक्स मीडियाला विदेशी गुंतवणुीसंदर्भात मदत करण्यासाठी लाच घेतल्याचा कार्तीवर आरोप आहे. नंतर कार्ती यांना जामीनही देण्यात आला आहे.

  • आएनएक्स मीडियामध्ये 305 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक करण्यात आली होती. त्यास मंजुरी देताना अनियमितता असल्याचे तपास संस्थांना वाटत आहे. या प्रकरणी आर्थिक अफरातफर झाल्याचा संशय असून त्यादृष्टीने कार्ती व चिदंबरम यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी कार्तीने 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप सीबीआयने केला होता.

मेघालयात काँग्रेस बनला नं. १... सत्ताधारी पक्षालाही टाकलं मागे :
  • शिलाँग- मेघालयातल्या अंपाती जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मियानी डी शिरा यांनी विजय मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवार मोमिन यांचा 3191 मतांनी पराभव केला आहे. एकीकडे या विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे या पोटनिवडणुकीतील विजयामुळे मेघालयात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.

  • मियानी डी शिरा या काँग्रेस पक्षाकडून अंपाती जागेवर पोटनिवडणूक लढवत होती. मियानीच्या आधी या जागेवर मेघालयाचे माजी मुख्यमंत्री मुकुल संगमांनी निवडणूक जिंकली होती. परंतु त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्यानं या जागेवर पोटनिवडणूक लागली होती.

  • 28 मे रोजी या जागेवर मतदान घेण्यात आले असून, त्यावेळी जवळपास 90टक्क्यांहून अधिक लोकांनी मतदान केल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आज जाहीर झालेल्या निकालावरून मियानी डी शिरानं स्वतःच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आणि नॅशनल पीपल्स पार्टीचे उमेदवार मोमिनचा 3191 मतांनी पराभव केला होता. 

दिनविशेष :
  • जागतिक दुध दिन

महत्वाच्या घटना 

  • १८३१: सरजेम्स रॉस यांनी पृथ्वीच्या चुंबकीय उत्तर ध्रुवाचे स्थान निश्चित केले.

  • १९२९: विष्णुपंत गोविंद दामले, शेख फत्तेलाल, व्ही. शांताराम व केशवराव धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनीची कोल्हापूर येथे स्थापना केली.

  • १९३०: मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.

  • १९४५: टाटा मूलभूत संशोधन संस्थेची (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च) स्थापना झाली.

  • १९५९: द. गो. कर्वे पुणे विद्यापीठाचे तिसरे कुलगुरू झाले.

  • १९९६: भारताचे ११वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.

  • २००४: रमेशचंद्र लाहोटी भारताचे ३५वे सरन्यायाधीश यांनी सूत्रे हाती घेतली.

जन्म 

  • १८४२: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म. (मृत्यू: ९ जानेवारी १९२३)

  • १८७२: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४७)

  • १९०७: जेट इंजिन विकसित करणारे फ्रँक व्हाईट यांचा जन्म. (मृत्यू: ९ ऑगस्ट १९९६)

मृत्यू 

  • १८३०: भारतीय धार्मिक नेते स्वामीनारायण यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १७८१)

  • १८६८: अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १७९१)

  • १९३४: प्रसिद्ध नाटककार आणि विनोदी लेखक श्रीपादकृष्ण कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २९ जून १८७१)

  • १९९६: भारताचे ६वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नीलमसंजीव रेड्डी यांचे निधन. (जन्म: १९ मे १९१३ – इलुरू, तामिळनाडू)

  • १९९९: होव्हर्क्राफ्ट चे निर्माते शोध ख्रिस्तोफर कॉकेरेल यांचे निधन. (जन्म: ४ जून १९१०)

  • २००२: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन. (जन्म: २५ सप्टेंबर१९६९)

  • २००६: लोकसत्ता देनिकाचे माजी संपादक आणि पत्रकार माधव गडकरी यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.