चालू घडामोडी - ०१ मार्च २०१८

Date : 1 March, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
आजपासून दहावीची परीक्षा, केंद्रावर स. १०.३० वा. पोहोचणं बंधनकारक :
  • पुणे : राज्यभरात आजपासून दहावीची परीक्षा सुरु होत आहे. 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान ही परीक्षा पार पडणार आहे. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा होणार आहे.

  • महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना सकाळी साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणं बंधनकारक आहे.

  • दरम्यान, उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये, यासाठी त्यावर बारकोड असणार आहेत. उत्तरपत्रिकेवर यापूर्वीही बारकोड असायचा. मात्र यावर्षीपासून पुरवणीवरही बारकोड असेल.

यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेची वैशिष्ट्ये :

  • दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 17 लाख 51 हजार 353 विद्यार्थी
  • 9 लाख 73 हजार 134 विद्यार्थी, तर 7 लाख 78 हजार 219 विद्यार्थिनींचा समावेश
  • 16 लाख 37 हजार 783 नियमित विद्यार्थी, 67 हजार 563 पुनर्परीक्षार्थी आणि 46 हजार 7 इतर (खाजगी श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषयासह प्रविष्ठ)
  • बारावीप्रमाणे दहावीच्या परीक्षेसाठीही सकाळी साडे दहा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावरह पोहोचणं अनिवार्य
  • गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या कमी, मागच्या वर्षी 17 लाख 66 हजार 98 विद्यार्थी होते
  • संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी 4 हजार 657 परीक्षा केंद्र
  • दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात 252 भरारी पथकांची नियुक्ती
PF चे पैसे काढायचेत?... त्याआधी 'हा' नवा नियम वाचून घ्या :
  • नवी दिल्ली - पीएफचे पैसे काढण्याचा तुम्ही विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) विभागाने याबाबत आज नवा नियम जाहिर केला आहे. पीएफमधून दहा लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी EPFOने  ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. EPFO ने पेपरलेस वर्क करण्याकडे हे पाऊल उलचले आहे. 

  • यासोबतच ईपीएफओने कर्मचारी पेन्शन योजना (EPS) 1995 मधून पाच लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठीही ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. सध्या EPFO खातेदारांना ऑनलाईनसोबतच मॅन्युअल पद्धतीनेही पैसे काढण्याची परवानगी आहे. 

  • दरम्यान, नोकरदार वर्गासाठी महत्वाच्या असलेल्या कर्मचारी भविष्य निधी (पीएफ)वरील व्याजदरात गेल्या आठवड्यात कपात केली आहे. 8.65 टक्के असलेला व्याजदार 2017-18 वर्षासाठी 8.55 टक्के होऊ शकतो.

  • ईपीएफओच्या या निर्णयाचा पाच कोटी कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्याता आहे.  हा नोकरदारवर्गासाठी एक धक्का आहे. गेल्या पाच वर्षातील हा सर्वात कमी व्याजदर आहे. गेल्या तीन वर्षामध्ये पीएफवरील व्याजदात सतत कपात केली जात आहे.  ईपीएफओने 2016-17 मध्ये 8.65 टक्के व्याजदराची घोषणा केली होती. त्यापूर्वी 2015-16मध्ये पीएफवरील व्याजदर 8.80 टक्के होता. 

‘शिगमोत्सव’ : गोव्याची सांस्कृतिक ओळख :
  • दणदण वाजणारे ढोल, कडाडणारे ताशे आणि कांसाळ्यांच्या (मोठ्या झांजा) तालबद्ध साथीला ‘ओस्सय ओस्सय’ ‘वा वा किती आनंद झाला, गोविंदा रे गोपाळा’ आदी उत्साही व लयबद्ध घोषणांनी दुमदुमणारा आसमंत, गुलाल-रंगांची उधळण यामुळे गोव्यातील शिगमोत्सवाचा माहौल उत्सवी बनतो. शिमगोत्सवाला स्थानिक भाषेत शिगमोत्सव किंवा शिशिरोत्सव असेही म्हटले जाते.

  • खासकरून ग्रामीण भागात शिगमोत्सवाची विविध रुपे पाहायला मिळतात. सामाजिक बहुसांस्कृतिकरण व आधुनिकीकरणाच्या झळा शिगमोत्सवालाही बसत आहेत; मात्र इथल्या उत्सवप्रिय जनतेने हे सांस्कृतिक दायज (ठेवा) प्राणपणाने जपले आहे.

  • गावागावात शिगम्याचे स्वरुप बदलत जाताना दिसते. समान्यत: झाड तोडून ग्रामदैवतचे आवाहन करून होळी उभारली जाते. लाकडे व शेणाच्या गोवºया जाळल्या जातात. बहुतेक गावांत रोमटामेळ दिसून येतो. ढोल-ताशे व कांसाळी वाजवत, नाचत-गात गटागटाने लोक गावात दारोदार फिरतात. काही ठिकाणी शिंग (तुतारीसारखे वाद्य) वाजविले जाते. काही गावांत फक्त मंदिराजवळ शिगमोत्सव साजरा होतो. यानिमित्ताने प्रथा, परंपरा पाळल्या जातात.

  • रणमाले हा गायन, नृत्य व नाट्याचा प्रकार उत्तर गोव्यातील झर्मे या गावाने जपला आहे. चोरोत्सव हा विधी उत्तर गोव्यात काही ठिकाणी साजरा होतो. त्याचे स्वरुप गावानुसार बदललेले दिसून येते. गडे उत्सव हे साळ, कुडणे, पिळगाव इथल्या शिगम्याचे वैशिष्ट्य. काही गावांत करुल्यो किंवा करवल्यो हा प्रकार दिसून येतो. स्त्री रुप धारण केलेल्या मुलांची (करुल्यो) खणानारळाने ओटी भरुन पूजा केली जाते. होमखण, घोडेमोडणी, छत्र्यो उत्सव आदी प्रकार वेगवेगळ्या गावांत साजरे होतात.

राज्यात तीन वर्षांत टीबीने घेतले २० हजारावर बळी :
  • मुंबई : राज्यात २०१५ ते २०१७ या तीन वर्षांत क्षयरोगाने (टीबी) तब्बल २० हजार २१३ लोकांचा मृत्यू झाला. क्षयरोग नियंत्रणाचा राज्यात बोजवारा उडाला असून, ‘टीबी हारेगा देश जितेगा’ ही जाहिरात महाराष्ट्रासाठी पोकळच ठरली असल्याची टीका आज विधानसभेत करण्यात आली.

  • राज्यात क्षयरोगाचा प्रादूर्भाव वाढत असल्यासंदर्भात पराग अळवणी व अन्य सदस्यांनी आज लक्षवेधी सूचना मांडली होती. तिच्या लेखी उत्तरात क्षयरोगाने तीन वर्षांत २० हजार २१३ बळी घेतल्याची कबुली सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली. २०१५ मध्ये ७६३० (त्यात मुंबई १४५९), २०१६ मध्ये ६८८४ (मुंबई १२४०) आणि २०१७ मध्ये ५६९९ (मुंबई ९६३) असे मृत्यू झाले.

  • क्षयरोग नियंत्रणाबाबत सरकारची यंत्रणा कुचकामी ठरली असल्याची टीका माजी मंत्री एकनाथ खडसे, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, नसीम खान, सपाचे अबू आझमी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदींनी केली. भाजपाचे डॉ.राहुल आहेर, अतुल भातखळकर, शिवसेनेचे सुनील प्रभू यांनीही उपप्रश्न उपस्थित केले.

  • क्षयरोगासंदर्भात अधिकचे संशोधन करण्यासाठी जे. जे. रुग्णालयात अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. या रोगाच्या तपासणीसाठी मुंबईत पाच प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून त्यापैकी तीन सुरू असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी स्पष्ट केले.

  • फ्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी चारसुत्री पद्धतीने कार्यक्रम राबविला जात आहे.

नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे योजना नाही - शरद पवार :
  • मुंबई : साडेअकरा हजार कोटींचा घोटाळा करून पळालेल्या नीरव मोदीला पकडण्यासाठी पंतप्रधानांकडे कोणतीही योजना नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

  • आझाद मैदान येथील राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात ते बोलत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर पश्चिम महाराष्ट्र व कोकणातही हल्लाबोल यात्रा काढणार असल्याचे सांगून पवार म्हणाले, पीएनबी घोटाळ्यामुळे आता उद्योग सुरू करण्यासाठी जर युवक बँकेत गेले तर त्यांना कर्ज दिले जात नाही. सध्या रेशन दुकानात गहू, तांदूळ देण्याऐवजी मका देऊ लागले आहेत. बाहेरच्या देशात मका हे पशुखाद्य म्हणून वापरले जाते. जनतेला जर नीट अन्नधान्य पुरवता येत नसेल तर सत्तेत राहून सरकारचा काय उपयोग?

  • देशात महागाई वाढली आहे, संसार चालवणे कठीण झाले आहे. कारखाने बंद होऊन रोजगार मिळेनासे झाले आहेत. कामगार वर्गावर अन्याय होत आहे. हे दूर करण्याची जबाबदारी ज्यांची होती ते असफल ठरले आहेत. त्यामुळे आज लोक म्हणायला लागले आहेत की, आम्हाला अच्छे दिन नको, पूर्वीचे दिवस परत द्या, असा टोलाही पवार यांनी लगावला.

  • देशात परिवर्तनाची गरज आहे. निवडणुकांमध्ये पवार साहेबांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे सूचक विधान ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले. आ. जयंत पाटील यांनीही सरकारच्या धोरणावर टीका केली. विधान सभेचे सभापती दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा.मजिद मेमन, नवाब मलिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दिनविशेष : 

महत्वाच्या घटना 

  • १५६५: रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.

  • १८०३: ओहायो हे अमेरिकेचे १७वे राज्य बनले.

  • १८७२: यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.

  • १८७३: ई. रेमिंगटोन आणि सन्स कंपनी ने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र (टाईपरायटर) चे उत्पादन सुरू होते.

  • १८९३: अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.

  • १८९६: हेन्री बॅक्वरल अणुकिरणोत्सर्जीचे किडणे शोधले.

  • १९०७: टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.

  • १९२७: रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.

  • १९४६: बँक ऑफ इंग्लंड चे राष्ट्रीयीकरण झाले.

  • १९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.

  • १९४८: गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९६१: अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पीस कॉर्पस स्थापन करते.

  • १९९२: बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.

  • १९९८: एकूण १ अब्ज डॉलर पेक्षा जास्त कमाई करणारा टायटॅनिक हा पहिला चित्रपट झाला.

  • २००२: पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.

जन्म

  • १९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म.

  • १९२२: नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान यित्झॅक राबिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९५)

  • १९३०: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचा जन्म. (मृत्यू: १४ एप्रिल २०१३)

  • १९४४: पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.

  • १९६८: क्रिकेटपटू सलील अंकोला यांचा जन्म.

  • १९८०: पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद अफ्रिदी यांचा जन्म.

मृत्यू

  • १९५५: महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती याचं निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८७७)

  • १९८९: महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील याचं निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)

  • १९९१: पोलाराईड कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक एडविन एच लँड यांचे निधन. (जन्म: ७ मे १९०९)

  • १९९४: निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली (जन्म: २६ फेब्रुवारी १९३७)

  • १९९९: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर याचं निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९१०)

  • २००३: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी१९४२)

  • २०१६: AOL चे सहसंस्थापक जिम किमसे यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९३९)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.