चालू घडामोडी - ०१ मार्च २०१९

Date : 1 March, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दहशतवादाविरोधात रशिया भारतासोबत, पुतिन यांचा मोदींना फोन :
  • रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन केला आणि त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पुलवामा येथे हल्ला आणि शहीद जवानांबद्दल त्यांनी त्यांच्या संवेदनाही व्यक्त केल्या. इतकंच नाही तर दहशतवादाविरोधात रशिया भारतासोबत आहे असं वचनही त्यांना दिलं. पुलवामाचा हल्ला ही दुःखद घटना असल्याचं पुतिन यांनी म्हटलं आहे.

  • दहशतवादाविरोधात भारत जी कारवाई करतो आहे त्याला रशियाने साथ दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुतिन यांचे आभार मानले आहेत. दोन्ही नेत्यांनी फोनवरून केलेल्या चर्चेत दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान या वर्षाच्या शेवटी व्लादिवोस्तोक या ठिकाणी होणाऱ्या इस्टर्न इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सहभागी व्हावं असं निमंत्रणही पुतिन यांनी दिलं.

  • पुलवामा येथे 14 फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. या घटनेचा तीव्र निषेध देशभरातून करण्यात आला. तसेच संयुक्त राष्ट्रसंघानेही या घटनेचा निषेध नोंदवला. पुलवामाचा हल्ला आणि चाळीस जवान शहीद होणे ही बाब निश्चितच देशासाठी दुःखाची आहे असं म्हणत पुतिन यांनी त्यांच्या संवेदना पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे व्यक्त केल्या. तसेच दहशतवादाशी लढा देताना रशियाचीही भारताला साथ आहे असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.

जम्मू-काश्मिरसह आंतरराष्ट्रीय सीमेवरील नागरिकांनाही खुल्या प्रवर्गातील आर्थिक आरक्षण :

 

  • नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरबाबत मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. एससी, एसटी, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिक आरक्षणाचा लाभ आता काश्मिरी जनतेसह आंतरराष्ट्रीय सीमेवरील नागरिकांनाही मिळणार आहे.

  • आंतरराष्ट्रीय सीमेवरील नागरिकांना एससी, एसटी, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील आर्थिक आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. आजवर 'इंटरनॅशनल बॉर्डर'वरील नागरिकांना यापैकी कोणतंही आरक्षण लागू नव्हतं.

  • जम्मू-काश्मिर आरक्षण (संशोधन) अध्यादेश 2019 ला कॅबिनेटने मंजुरी दिली. कॅबिनेटच्या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी यासंदर्भात घोषणा केली. त्यामुळे जम्मू काश्मिरमधील आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकरीत आरक्षण मिळणार आहे.

  • 1954 सालच्या राष्ट्रपती आदेशात बदल करण्यात आले असून कलम 370 मधील अटी-शर्थी जवळपास शिथिल करण्यात आल्या आहेत. आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास राहिल्यामुळे या भागातील जनतेने वारंवार आरक्षणाची मागणी उचलून धरली होती.

  • दरम्यान, राजकोटमध्ये विमानतळ बांधण्यासाठी 1405 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आग्रा आणि कानपूरमध्ये मेट्रोलाही मंजुरी मिळाली आहे.

वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचा परतीचा प्रवास कसा असेल :
  • मुंबई : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अवघ्या काही तासात मायदेशी परतणार आहेत. अभिनंदन यांच्या परतीची वेळ अद्याप निश्चित झालेली नसली, तरी बीटिंग द रिट्रीटच्या वेळी त्यांना भारताकडे सुपूर्द केलं जाण्याची शक्यता आहे.

  • अभिनंदन यांना दुपारपर्यंत आणले जावे, अशी भारताची मागणी आहे. पाकिस्तानने मात्र बीटिंग द रिट्रीटच्या वेळी अभिनंदन यांना सुपूर्द करणार असल्याचं सांगितलं आहे.

  • भारताच्या दबावापुढे झुकलेल्या पाकिस्तानने आपल्या ताब्यातील भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका करण्याची तयारी दर्शवली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत यांची घोषणा केली.

  • अभिनंदन सध्या इस्लामाबादमध्ये असून त्यांना शुक्रवारी दुपारी विमानाने लाहोरला आणण्यात येईल. त्यानंतर वाघा बॉर्डरमार्गे त्यांना भारताकडे सुपूर्द केले जाईल. भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून त्यांना अमृतसर एअर बेसला आणण्यात येईल. तिथून ते राजधानी दिल्लीला रवाना होतील.

  • पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी सकाळी (27 फेब्रुवारी) हवाई हद्दीचं उल्लंघन करत भारतात प्रवेश केला होता. जम्मू काश्मिरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली. भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांना पळ काढला. मात्र या कारवाईत भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं.

बालपणापासून होते सैनिकी गणवेशाचे आकर्षण, अशा आहेत हवाई दलाच्या पहिल्या महिला फ्लाइट इंजिनिअर :
  • भारतातील महिला शक्ती आता सर्वच क्षेत्रात आपली उपस्थिती दर्शवत आहे. अगदी लष्करी सेवेमध्येही आता महिलांचा सहभाग वाढत आहे. असंच एक कर्तबगार नाव म्हणजे हवाई दलातील पहिल्या महिला फ्लाइट इंजिनिअर हीना जयसवाल

  • पंजाबची राजधानी चंदिगड येथील रहिवासी असलेल्या हीना यांनी बालपणापासूनच लष्करी सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले होते. अखेर अथक परिश्रमांच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न साकार केले.

  • हीना या याचवर्षी हवाई दलामध्ये प्लाइट लेफ्टनंट म्हणून दाखल झाल्या आहेत. तसेच फ्लाइट इंजिनियर म्हणून त्या ऑपरेशनल हेलिकॉप्टर युनिटमध्येही सहभागी होणार आहेत.

  • हीना यांनी बंगळुरूमधील येलहांका येथील 112 हेलिकॉप्टर एअरफोर्स स्टेशन येथे फ्लाइट इंजिनियरचे शिक्षण घेतले आहे.

ट्रम्प -किम चर्चा निष्फळ; कोणताही करार नाही :
  • हनोई : उत्तर कोरियावर घालण्यात आलेले निर्बंध उठविण्याची मागणी उत्तर कोरियाचे नेते किम जोन ऊंग यांनी केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ऊन यांच्यासमवेत सुरू असलेल्या शिखर परिषदेतून निघून गेलेष त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही करार न होताच बैठक गुरुवारी संपली.

  • सिंगापूरमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती त्यामुळे दुसऱ्या बैठकीतून काहीतरी चांगले निष्पन्न होण्याची अपेक्षा होती, मात्र कोणताही निर्णय न होताच चर्चा अपुरी राहिली. उत्तर कोरियावर घालण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे उठविण्याची त्यांची मागणी होती आणि आपण ती पूर्ण करू शकत नाही, असे ट्रम्प यांनी व्हिएतनामहून अमेरिकेला परतताना स्पष्ट केले, असे सांगण्यात आले आहे.

  • तथापि, चर्चेच्या वेळी आम्ही जी प्रगती केली आहे त्यामुळे भविष्यात काहीतरी चांगलेच निष्पन्न होईल, अशी स्थिती आहे, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. घाईघाईने काहीतरी निर्णय घेण्यापेक्षा आपण योग्य निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.

गेलचा झंझावात, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० षटकार ठोकणारा पहिला फलंदाज :
  • सेंट जॉर्ज : वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलचा धावांचा पाऊस सुरुच आहे. इंग्लंडविरुद्ध बुधवारी खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात गेलने आणखी एक शतकी खेळी रचली.

  • मात्र सेंट जॉर्ज वनडेमधील ख्रिस गेलचा झंझावात वेस्ट इंडिजच्या कामी आला नाही, आणि त्यांना हा सामना गमवावा लागला. पण गेलने षटकारांचा पाऊस पाडत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करण्याचा पराक्रम केला.

  • 39 वर्षीय गेलने 97 चेंडूंमध्ये 162 (14 षटकार, 11 चौकार) धावांची जबरदस्त खेळी केली. एकदिवसीय कारकीर्दीत 25व्या शतकी खेळीत गेलने सामन्यातील आठवा षटकार ठोकला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (कसोटी+एकदिवसीय+ट्वेन्टी 20 आंतरराष्ट्रीय) 500 षटकारांच्या आकड्याला स्पर्श करणारा पहिला फलंदाज बनला. गेलने आतापर्यंत कसोटीमध्ये 98, एकदिवसीय सामन्यात 305 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 103 षटकार लगावले आहेत.

राहुल गांधींच्या बालेकिल्ल्यात मोदी करणार एके-४७ रायफल्स निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन :
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा बालेकिल्ला अमेठीत जाणार आहेत. ३ मार्चला पंतप्रधान मोदी हे अमेठी मतदारसंघात एके-४७ रायफल्स निर्मितीच्या प्रकल्पाचा शुभारंभ करणार आहेत. रशियाबरोबरील भागीदारीत या प्रकल्पाची सुरूवात ऑर्डिनन्स फॅक्टरीत केली जाणार असून २०१० मध्ये त्याचे भूमीपूजन करण्यात आले होते.

  • पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून राहुल गांधीच्या मतदारसंघात जाण्याची मोदींची ही पहिलीच वेळ आहे. नुकताच पंतप्रधान मोदी हे सोनिया गांधी यांचा मतदारसंघ रायबरेलीतही गेले होते. मोदी हे या दौऱ्यावेळी इतर काही प्रकल्प सुरू करण्याबरोबरच गौरीगंज येथे एक जाहीरसभाही घेणार आहेत.

  • दरम्यान, अमेठीत राहुल गांधी यांचे प्रतिनिधीत्व करत असलेले चंद्रकांत दुबे यांनी म्हटले की, केंद्र सरकारने रशियाबरोबर एका करारावर स्वाक्षरी केली आहे. या अटींनुसार तंत्रज्ञानाचे आदानप्रदान होणार नाही.

  • हत्यारे रशियाच बनवणार आहे. कोरवा ऑर्डिनन्स फॅक्टरी आधीपासून आहे. मशिनरीही लागलेल्या आहेत. रशियाबरोबर झालेल्या करारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांच्या जागेवर नवीन लोक कामावर घेतले जातील अशी भीती त्यांना वाटत आहे. त्यामुळे मोदी हे कोरवा ऐवजी शाहगड ब्लॉक येथे ही घोषणा करत आहेत. अमेठीसाठी मागील पाच वर्षांत या सरकारने एकही मोठा प्रकल्प आणला नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

दिनविशेष :
  • जागतिक नागरी संरक्षण दिन

महत्वाच्या घटना 

  • १५६५: रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.

  • १८०३: ओहायो हे अमेरिकेचे १७वे राज्य बनले.

  • १८७२: यलो स्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.

  • १९०७: टाटा आयर्न अँड स्टील कंपनी ची स्थापना झाली.

  • १९४६: बँक ऑफ इंग्लंड चे राष्ट्रीयीकरण झाले.

  • १९४७: आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.

  • १९५४: प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता.

  • १९९८: दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्‍न हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

जन्म 

  • १९२२: महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉ. नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग, रायगड येथे जन्म.

  • १९२२: नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान यित्झॅक राबिन यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९५)

  • १९४४: पश्चिम बंगाल चे ७वे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९५५: महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती याचं निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८७७)

  • १९८९: महाराष्ट्राचे ५वे आणि ९वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील याचं निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)

  • १९९१: पोलाराईड कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक एडविन एच लँड यांचे निधन. (जन्म: ७ मे १९०९)

  • १९९४: निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली (जन्म: २६ फेब्रुवारी १९३७)

  • १९९९: वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा दत्तमहाराज कवीश्वर याचं निधन. (जन्म: १३ फेब्रुवारी १९१०)

  • २००३: कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे याचं निधन. (जन्म: ११ फेब्रुवारी १९४२)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.