चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०१ मे २०१९

Date : 1 May, 2019 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
राफेलबाबत ४ मेपर्यंत उत्तर देण्याचे केंद्राला निर्देश :
  • राफेल विमान खरेदी व्यवहारप्रकरणी फेरविचार याचिकांबाबत ४ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला दिले.

  • राफेल खरेदी व्यवहारास आक्षेप घेणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या डिसेंबरमध्ये फेटाळल्या होत्या. त्यावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी झाली. या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांबाबत उत्तर देण्यासाठी चार आठवडय़ांची मुदत देण्याची मागणी केंद्र सरकारने केली. मात्र ती फेटाळून न्यायालयाने शनिवार, ४ मेपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश केंद्राला दिले. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तीन फेरविचार याचिकांवर ६ मे रोजी सुनावणी होणार आहे. 

  • माजी मंत्री अरुण शौरी, यशवंत सिन्हा तसेच वकील प्रशांत भूषण यांनी १४ डिसेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर फेरविचार याचिका दाखल केली आहे. याशिवाय आम आदमी पक्षाचे नेते व राज्यसभा सदस्य संजय सिंह यांनी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे.

  • संरक्षण मंत्रालयातील गोपनीय कागदपत्रांचा आधार घेऊन फेरविचार याचिका करण्यात आल्याने त्या फेटाळून लावाव्यात, अशी विनंती केंद्राने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र ती फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने फेरविचार याचिकांवर सुनावणी घेणार असल्याचे १० एप्रिल रोजी स्पष्ट केले होते.

पैलवान बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि नेमबाज हिना सिद्धू, अंकुर मित्तलची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस :
  • मुंबई : पैलवान बजरंग पुनिया आणि विनेश फोगाटची भारतीय कुस्ती महासंघाकडून तर भारताची अव्वल नेमबाज हिना सिद्धू आणि ट्रॅप शूटर अंकुर मित्तलची नॅशनल शूटींग फेडरेशनकडून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

  • बजरंग पुनियानं नुकत्य़ाच झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं. तर विनेश फोगाट गेल्या वर्षीच्या एशियाडमध्ये सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. या आणि गेल्या दोन वर्षातल्या कामगिरीच्या आधारेच विनेश आणि बजरंगची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली.

  • याशिवाय कुस्ती महासंघानं महाराष्ट्राचा पैलवान राहुल आवारेसह हरप्रीत सिंग, पूजा ढांडा आणि दिव्या काकरन यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

  • जागतिक शूटींग क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली भारतीय हिना सिद्धूनं नेमबाजी विश्वचषक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई नेमबाजीत सुवर्णपदक पटकावलं होतं. तर अंकुर मित्तलनं गेल्या दोन वर्षात आपल्या कामगिरीत कमालीचं सातत्य राखलं आहे. याच कामगिरीरीच्या आधारे शूटींग फेडरेशननं खेलरत्न या भारतातल्या सर्वोच्च क्रीडा सन्मानासाठी हिना आणि अंकुरची शिफारस केली आहे.

गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल ८९.५९ टक्के, यंदाही मुलींची बाजी :
  • पणजी : गोवा उच्च माध्यमिक शालान्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल 89.59 टक्के लागला आहे. एकूण 16 हजार 952 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील 15 हजार 187 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

  • गेल्या वर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा सहा टक्क्यांनी अधिक होती. यंदाही मुलींनीच परीक्षेत बाजी मारली.

  • गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात चार टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 85.53 टक्के निकाल लागला होता. पर्वरी येथील मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत शालान्त मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत यांनी निकाल जाहीर केला.

  • यंदा परीक्षेला एकूण 8 हजार 967  मुली, तर 7 हजार 985 मुलं बसली होती. परीक्षेत उत्तीर्ण मुलांचे प्रमाण 86.91 टक्के तर मुलींची टक्केवारी 91.97 इतकी आहे.

  • गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक म्‍हणजे 91.86 टक्के लागला आहे. त्या खालोखाल विज्ञान शाखेचा निकाल 91.76 टक्के, कला शाखेचा निकाल 87.73 टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल 84.45 टक्के  लागला.

आजपासून ‘या’ आर्थिक गोष्टींत होणार बदल :
  • आजपासून अर्थात 1 मे 2019 पासून काही आर्थिक नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे. बदलण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बँक, रेल्वे, विमानसेवा यांच्या संबंधित आर्थिक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी सातत्याने अशाप्रकारे नियमांमध्ये बदल करण्यात येतात. त्यामुळे पाहूयात कोणत्या आर्थिक गोष्टीत बदल होणार आहे.

  • 1) SBI : 1 मेपासून बँकेचे डिपॉझिट आणि कर्जाचे व्याजदर RBIच्या बेंचमार्क दराशी जोडले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना आधीच्या व्याजाच्या तुलनेत बचत खात्यावर कमी व्याज मिळणार आहे. हा नियम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त जमा रक्कम आणि कर्जदरावर लागू आहे.

  • 2) PNB : पंजाब नॅशनल बँक स्वतःचा डिजिटल वॉलेट PNB Kitty (पीएनबी किटी )ला 1 मेपासून बंद करणार आहे. त्यामुळे 1 मेपासून आपल्याला पीएनबी किटीऐवजी दुसऱ्या पर्यायी वॉलेटचा वापर करावा लागणार आहे. बँकेने ग्राहकांना 30 एप्रिलपूर्वी वॉलेटमधील रक्कम खर्च करण्याविषयी सूचित केले होते. ही रक्कम खर्च न झाल्यास ‘आयएमपीएस’द्वारे बँकेच्या खात्यात वळते करून घेण्यासही सांगितले होते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी अद्याप ‘पीएनबी किट्टी’मधील रक्कम खर्च अथवा वळती केलेली नाही, त्यांना एक दिवसाचा अवधी आहे.

  • 3) रेल्वे आरक्षण : 1 मेपासून ट्रेन प्रवासाचे आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडले आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. एक मेपासून चार्ट तयार होण्याच्या चार तास आधी प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही.

  • 4) तिकीट रद्द केल्यास शुल्क नाही : 1 मेपासून एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट 24 तासांचा आत रद्द केल्यास आपल्याला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही.

  • 5) गॅस दर : 1 मेपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या नव्या किमती जारी होणार आहे. यावेळी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी 1 एप्रिलला घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली होती.

लातूरच्या शाहू महाविद्यालयाचे १८० विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र :
  • लातूर : लातूरच्या शाहू महाविद्यालयाचे 180 विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. विशेष बाब म्हणजे यातील बारा विद्यार्थी 99 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत.

  • नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे यावर्षी पहिल्यांदाच जेईई मेन्स परीक्षा ही दोन फेजमध्ये घेण्यात आली. त्यापैकी पहिल्या फेजचा निकाल जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर झाला होता तर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दुसऱ्या फेजचा निकाल काल सोमवारी रात्री उशिरा NTA कडून जाहीर करण्यात आला. या निकालाद्वारे NEET, IIIT, CGFTI या ठिकाणच्या प्रवेशासोबतच जेईई अॅडव्हान्स परीक्षेची पात्रताही जाहीर करण्यात अली आहे.

  • यासाठी पर्सेटाइल निकालासोबतच विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक (AIR) जाहीर करण्यात आले आहेत. या परीक्षेद्वारे देशभरातून साधारणपणे 2.5 लाख विद्यार्थ्यांना जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. बहुतेक विद्यार्थ्यांनी दोन्हीही फेजमधील जेईई मेन्स परीक्षा दिल्या होत्या व त्यापैकी तुलनात्मक सर्वोत्तम असणाऱ्या एकूण पर्सेंटाईल गुणांवर विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक देण्यात आले आहेत.

  • या परीक्षेत राजर्षी शाहू जुनिअर सायन्स कॉलेज आणि संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी संस्थेचे 180 विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

उद्योजक नेस वाडियाला जपानमधील कोर्टाकडून दोन वर्षांची शिक्षा :

 

  • टोकियो : भारतीय उद्योगपती नेस वाडियाला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी जपानमधील कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जपानमध्ये सुट्टीनिमित्त गेले असताना नेस वाडियाने अंमली पदार्थ बाळगल्याचा आरोप आहे.

  • होक्काईदो या उत्तर जपानमधील द्वीपकल्पावर स्कीईंग करण्यासाठी नेस वाडिया मार्च महिन्याच्या सुरुवातीला गेला होता. त्यावेळी न्यू चिटोज विमानतळावर नेसला अटक झाली होती. जपानी माध्यमातील वृत्तानुसार सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान नेस वाडियाकडून 25 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले होते.

  • वाडिया हे देशातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानलं जातं. वाडिया उद्योग समूहाला जवळपास 283 वर्षांचा इतिहास आहे. प्रसिद्ध उद्योजक नस्ली वाडियांचे सर्वात मोठा मुलगा नेस वाडिया किंग्ज इलेव्हन पंजाब क्रिकेट संघाचा सहमालक आहे.

  • फोर्ब्ज मासिकाच्या अहवालानुसार वाडिया कुटुंबाची संपत्ती सातशे कोटी रुपयांच्या घरात आहे. वाडिया समूहाकडे ब्रिटानियापासून गो एअर या विमान कंपनीचा समावेश आहे.

  • नेस वाडियाविरोधात अभिनेत्री प्रिती झिंटाने विनयभंगाची तक्रार केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने अखेर नेस वाडियाला दिलासा दिला. विनयभंगाचा एफआयआर रद्द करण्याचा आदेश हायकोर्टाने दिला होता.

महाराष्ट्रातील 'या' बोलीभाषा आहेत खास :
  • मुंबई- वैशिष्टपूर्ण भौगोलिक व सामाजिक रचनेमुळे देशाच्या नकाशावर महाराष्ट्राचे स्थान सदोदित अनन्यसाधारण राहिले आहे. भौगोलिक आकारमानानुसार महाराष्ट्र देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. साहजिकच इतका मोठा भूप्रदेश असणाऱ्या महाराष्ट्रात सांस्कृतिक व सामाजिक विविधता पाहायला मिळते. विशेष म्हणजे या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब येथील भाषांवरही दिसते. त्यामुळेच महाराष्ट्रात अगदी कोसाकोसावर भाषेचा लहेजा बदलत जातो. यामधूनच राज्यात अनेक स्थानिक बोलीभाषा अस्तित्वात आल्या आहेत. मराठी, हिंदी, उर्दू , कानडी व हिंदी अशा विविध भाषांच्या प्रभावातून निर्माण झालेल्या या बोलीभाषा महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव मानले जाते.

  • मराठवाडी - महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्य़ात ही बोलीभाषा वापरली जाते. या बोलीभाषेवर कानडी व उर्दू भाषेचा प्रभाव आहे. 

  • मालवणी - दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. विशिष्ट हेल काढून आलेले अनुनासीक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेतच केले जाते. 

  • झाडीबोली - भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली हा चार जिल्ह्य़ांचा भूप्रदेश 'झाडीपट्टी' म्हणून ओळखला जातो. या भागातील बोलीभाषेला झाडीबोली असे म्हणतात. मराठीतील 'ण, छ, श, ष आणि ळ' ही पाच व्यंजने झाडीबोलीत वापरली जात नाहीत. 

  • नागपुरी - पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांचे काही भाग आणि गडचिरोलीचा काही भाग तसेच भंडारा (गोंदिया) या जिल्हय़ांत बोलली जाणारी नागपुरी ही काहीशी निराळी बोली आहे. वऱ्हाडी आणि झाडीबोलीतील अनेक शब्द यात असले तरी ही बोली वेगळी आहे. यावर काही प्रमाणात हिंदी भाषेचा प्रभाव जाणवतो.

  • अहिराणी - जळगाव जिल्हा सावळदबारा, बुलढाणा जिल्हा, मलकापूर ते मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, शहापूर, अंतुर्लीपर्यंतच्या विस्तृत भूप्रदेशात ही बोलीभाषा प्रचलित आहे. 

  • तावडी - जामनेर, भुसावळ, जळगाव, बांदवर, रावेर, यावल तालुका या भागात तावडी बोली प्रचलित आहे. तावडी बोलीत मोठय़ा प्रमाणात आहेत. 'क' च्या जागी 'ख'चा उच्चार केला जातो. 

  • आगरी - आगरी बोली ही महाराष्ट्राच्या  उत्तर आणि मध्य कोकणात बोलली जाते. रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये ही आगरी बोलणारा मोठा समाज आहे.

  • चंदगडी - कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे. या भूभागात दोन भिन्न भाषा-बोलींचा संपर्क, विविध राजकीय अंमल, मराठी, कन्नड आणि कोकणी भाषेच्या प्रभावाखाली तयार झालेली ही एक बोली भाषा आहे. 

  • वऱ्हाडी - बुलढाणा, वाशीम, अकोला, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा या सहा जिल्ह्य़ांतून वऱ्हाडी बोलली जाते. म्हाइंभट यांचा 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ वऱ्हाडी भाषेत लिहिला गेला. या बोलीभाषेवर फारसी व हिंदीचा प्रभाव आहे.

  • देहवाली - देहवाली भाषा प्रामुख्याने भिल्ल समाजात प्रचलित आहे. गुजराती आणि हिंदी भाषेचा यावर मोठा प्रभाव आढळतो. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार या भागात ही बोली वापरात आहे. 

  • कोल्हापुरी - महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक इतिहासात कोल्हापुरचे विशेष स्थान आहे. ग्रामीण लहेजा असणाऱ्या या भाषेचा रांगडेपणा विशेष लक्ष वेधून घेतो. 

  • बेळगावी - महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या सीमेवर असणाऱ्या बेळगावात ही भाषा बोलली जाते. कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून ही बोलीभाषा निर्माण झाली आहे. 

  • वाडवळी - ठाणे जिल्ह्य़ात सागरी किनाऱ्यालगतच्या भागात वाडवळी बोली बोलली जाते. या भागात सोमवंशी पाठारे क्षत्रिय व सोमंवशी क्षत्रिय समाजास शेतीवाडी हा व्यवसाय करणारे म्हणून ‘वाडवळ’ असे नामाभिधान पडले आहे. या समाजाच्या बोलीभाषेस ‘वाडवळी’ असे संबोधले जाते. 

दिनविशेष :
  • जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन

महत्वाच्या घटना

  • १७०७: किंगडम ऑफ इंग्लंड व किंगडम ऑफ स्कॉटलंड मिळून किंगडम  ऑफ ग्रेट ब्रिटन बनवण्यात आले.

  • १७३९: चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या वसईवर निकराचा हल्ला केला. तीन महिन्याच्या युद्धानंतर वसई मराठ्यांच्या ताब्यात आली.

  • १८४४: हाँगकाँग पोलिस फोर्स हे जगातील दुसरे आणि आशियातील पहिले आधुनिक पोलिस दल स्थापन झाले.

  • १८८२: आर्य महिला समाजा ची पं. रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली.

  • १८८४: अमेरिकेत कामगारांना एका दिवसात ८ तास कामकाज असावे ह्या मागणीची घोषणा.

  • १८८६: आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसर्‍या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला.

  • १८९०: जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला.

  • १८९७: रामकृष्ण मिशन ची सुरूवात स्वामी विवेकानंद यांनी केली.

  • १९२७: जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला.

  • १९३०: सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले.

  • १९४०: युद्ध सुरू असल्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द करण्यात आल्या.

  • १९६०: मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला.

  • १९६०: गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली.

  • १९६१: क्युबाचे पंतप्रधान फिदेल कॅस्ट्रो यांनी क्यूबा देश समाजवादी राष्ट्र घोषित करून निवडणुका रद्द केल्या.

  • १९६२: महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना.

  • १९७८: जपान चे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत.

  • १९८३: अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १९९८: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कोकण रेल्वे प्रकल्प राष्ट्राला अर्पण करण्यात आला.

  • १९९९: नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची मुदत एक वर्षावरून अडीच वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी सुधारणा करणारा अध्यादेश जारी झाला.

  • २०१५: दिनविशेष (www.dinvishesh.com) या संकेत स्थळाची सुरवात.

जन्म 

  • १९१५: हिन्दी साहित्यिक डॉ. रामेश्वर शुक्ल उर्फ अंचल यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९९५)

  • १९१९: भारतीय भाषेतील प्रतिभासंपन्न पार्श्वगायक मन्ना डे यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर २०१३)

  • १९२२: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि समाजवादी नेते मधु लिमये यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १९९५)

  • १९३२: कर्नाटकचे १६ वे मुख्यमंत्री आणि केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांचा जन्म.

  • १९४४: केंद्रीय मंत्री आणि आमदार सुरेश कलमाडी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १९४५: जर्मनीचा चॅन्सेलर नाझी नेता जोसेफ गोबेल्स यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १८९७)

  • १९५८: नाटककार गणेश शिवराम उर्फ नाना जोग यांचे नागपुर येथे निधन.

  • १९७२: उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव कमलनयन बजाज यांचे निधन. (जन्म: २३ जानेवारी १९१५)

  • १९९३: स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते ना. ग. गोरे यांचे निधन. (जन्म: १५ जून १९०७)

  • २०१३: निखील एकनाथ खडसे यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.