चालू घडामोडी - ०१ नोव्हेंबर २०१८

Date : 1 November, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
हॅलोविन म्हणजे नेमकं काय :
  • मुंबई : अमेरिका, युरोप खंडात साजऱ्या होणाऱ्या हॅलोविन सणाचं लोण हळूहळू भारतातही पसरायला लागलं आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील कर्मचारी हॅलोविन साजरा करतात. मात्र हा सण नेमका काय आहे, त्याचा उगम कुठून झाला, याविषयी अनेकांच्या मनात संभ्रमच आहे.

  • दरवर्षी 31 ऑक्टोबरला हॅलोविन हा सण साजरा केला जातो. आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये 19 व्या शतकात या प्रथेचा उगम झाला. या दिवशी पूर्वजांचा आत्मा पृथ्वीवर येतो आणि शेतीच्या कामात मदत करतो, अशी आस्था आहे.

  • ख्रिस्ती बांधव भुतांचा पोशाख करुन, प्राण्यांचे मुखवटे वापरुन नाचत आनंदोत्सव करतात. पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जरी हा सण साजरा केला जात असला, तरी चित्रविचित्र कपडे घालून घाबरवणारा मेकअप यावेळी केला जातो. मात्र गैरख्रिस्ती धर्मीयांनीही आता हा सण साजरा करायला सुरुवात केली आहे.

  • भोपळ्यावर डोळे, नाक, तोंड कोरुन आत मेणबत्ती ठेवली जाते. हे भोपळे घर आणि आसपासच्या परिसरात लावले जातात. या भोपळ्यांना जॅक-ओ-लॅटर्न्स म्हटलं जातं. या दिवशी लहान मुलांना चॉकलेट आणि गोड पदार्थ दिले जातात.

पहिल्यांदाच सेक्शन ७ चा वापर, उर्जित पटेल राजीनामा देण्याची शक्यता :
  • नवी दिल्ली : विविध मुद्द्यांवरील मतभेदामुळे मोदी सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाविरोधात (आरबीआय) 'ब्रह्मास्त्र'चा वापर केला आहे. केंद्र सरकारने आरबीआय अॅक्ट, 1934 च्या कलम 7 अंतर्गत मिळालेल्या अधिकाराचा वापर इतिहासात पहिल्यांदाच केला आहे. आरबीआय अॅक्टच्या सेक्शन 7 अंतर्गत, "सार्वजनिक हिताच्या मुद्द्यावर सरकार आरबीआयला थेट निर्देश देऊ शकतं आणि आरबीआयला ते पाळावेच लागतील.

  • उर्जित पटेल राजीनामा देण्याची शक्यता - यादरम्यान असा अंदाज वर्तवला जात आहे की, "आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल राजीनामा देऊ शकतात. सरकार आणि आरबीआयमधील वाढती कटूता याला कारण आहे."

  • सध्याच्या परिस्थितीचा परिणाम उर्जित पटेल यांच्या भविष्यावर होऊ शकतो. पुढील सप्टेंबर महिन्यात उर्जित पटेल यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे.

  • सेक्शन 7 काय आहे - गव्हर्नरशी सल्लामसलत केल्यानंतर वेळोवेळी सरकार आपल्याला हव्या त्या पद्धतीने रिझर्व बँकेला काम करण्याचे निर्देश देऊ शकतं. सेक्शन 7 लागू झाल्यानंतर आरबीआयचं कामकाज आणि त्यावर नजर ठेवण्याचं काम सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडे सोपवलं जातं. यामुळे रिझर्व बँकेची स्वायत्तता धोक्यात येते, कठोर आणि निष्पक्षपणे कामकाज चालवण्याच्या शक्यतांना पूर्णविराम मिळण्याची भीती असते

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ जगातील सर्वात उंच पुतळयाबद्दल जाणून घ्या दहा गोष्टी :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी नर्मदा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळयाचे लोकार्पण केले. सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारतीय राजकारणातील योगदान लक्षात घेऊन या पुतळयाला ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असे नाव देण्यात आले आहे.

  • अवघ्या पाच वर्षात या स्मारकाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. ३१ ऑक्टोंबर २०१३ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदींनीच या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.

  • नर्मदा नदीतील सरदार सरोवर धरणात हा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.

  • सरदार पटेल भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. त्यामुळे हा पुतळा उभारण्यासाठी लोखंड गोळा करण्याची विशेष मोहिम राबवण्यात आली. शेतकऱ्यांकडून लोखंड गोळा करण्यात आले.

  • जमा केलेले लोखंड वितळवून पुतळयाचा पाया रचण्यासाठी त्या लोखंडाचा वापर करण्यात आला.

  • या भव्य पुतळयाच्या बांधणीसाठी २५ हजार टन लोखंड आणि ९० हजार टन सिमेंटचा वापर करण्यात आला.

  • देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी इथे थ्री स्टार निवासाची व्यवस्था असून एकूण १२८ खोल्या बांधण्यात आल्या आहेत.

  • या स्मारकाच्या उभारणीसाठी २,९८९ कोटी रुपये खर्च आला असून २,५०० कामगारांनी या प्रकल्पावर काम केले आहे.

  • दरवर्षी या पुतळयामुळे १५ हजार नोकऱ्यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे.

अखेरची वनडे जिंकून वर्षाचा शेवट गोड करण्याचा भारताचा प्रयत्न :
  • थिरुवनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधला पाचवा आणि अखेरचा वन डे सामना आज थिरुवनंतपुरममध्ये खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने चौथी वन डे जिंकून, पाच वन डे सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता पाचव्या वन डेसह मालिकाही जिंकून वर्षाचा शेवट सुखद करण्याचा विराटसेनेचा प्रयत्न राहिल.

  • टीम इंडियाने 2015 सालापासून मायदेशात वन डे सामन्यांची एकही मालिका गमावलेली नाही. त्यामुळे विंडीजने विशाखापट्टणममध्ये टाय केलेली दुसरी वन डे आणि त्यानंतर पुण्याच्या तिसऱ्या वन डेत मिळवलेला विजय ही कामगिरी टीम इंडियाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी होती.

  • पण मुंबईतील चौथ्या वन डे सामन्यात विंडीजने सपशेल लोटांगण घातलं. 224 धावांच्या विराट विजयानंतर भारताच्या अपेक्षा उंचावल्या आहे आणि भारतीय संघाला आता मालिका जिंकण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिज विरोधात सलग आठवी मालिका जिंकण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.

  • थिरुवनंतपुरमच्या ग्रीन फील्ड मैदानावर पहिल्यांदाच वनडे सामना आणि दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाणार आहे. याआधी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकमेव ट्वेण्टी 20 सामना खेळवण्यात आला होता.

राफेल विमानांच्या किमतीची माहिती सर्वोच्च न्यायालयाला देणार नाही, केंद्राचा पवित्रा :
  • नवी दिल्ली- फ्रान्सकडून खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमानांच्या खरेदी प्रक्रियेसंदर्भातील माहिती केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयाला देणार नसल्याची माहिती सरकारच्या विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात राफेलच्या कथित घोटाळ्यासंबंधी केंद्र सरकार प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास चालढकल करण्याची शक्यता आहे.

  • टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, राफेल करारातील विमान खरेदी प्रक्रियेची माहिती सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं ही माहिती बंद लिफाफ्यामधून 10 दिवसांत उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे. कारण न्यायालयाकडे राफेल विमानांच्या किमतीच्या खरेदी प्रक्रियेसंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं काल सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले होते.

  • जर राफेल विमानांच्या किमती विशेष असतील आणि त्या सार्वजनिक करायच्या नसल्यास आम्हाला बंद लिफाफ्यातून त्याची माहिती द्या, असंही खंडपीठानं सुनावणीदरम्यान अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांच्याकडे स्पष्ट केलं होतं. सर्वोच्च न्यायालयात राफेल करारासंबंधी एकूण चार याचिका दाखल आहेत.

  • त्यात वकील प्रशांत भूषण, माजी मंत्री अरुण शौरी, माजी मंत्री यशवंत सिन्हा यांच्या याचिकांचाही समावेश आहे. या तिघांनी राफेल कराराची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी केली आहे. परंतु केंद्र सरकार अधिकृत गोपनीयता अधिनियम 1923 कायद्यांतर्गत सर्वोच्च न्यायालयात 36 राफेल विमान खरेदी प्रक्रियेची माहिती उपलब्ध करून देणार नाही, असंही सरकारी सूत्रांकडून सांगितलं जातंय.  

जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारताने पटकावले ६६वे स्थान :
  • नवी दिल्ली : जागतिक पासपोर्ट निर्देशांकात भारतीयपासपोर्टने ६६वे स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतीय पासपोर्टने ९ स्थानांची प्रगती केली आहे. या निर्देशांकात सिंगापूर आणि जर्मनीचे पासपोर्ट सर्वाधिक शक्तिशाली ठरले आहेत.

  • नागरिकत्व नियोजन क्षेत्रात काम करणाऱ्या ‘हेनले अँड पार्टनर्स’ या संस्थेने हा निर्देशांक जारी केला आहे. संबंधित देशाची पासपोर्टधारक व्यक्ती किती देशांत व्हिसाशिवाय जाऊ शकतात; अथवा त्या देशात गेल्यानंतर व्हिसा, भेट परवाना (व्हिजिटर्स परमिट) किंवा इलेक्ट्रॉनिक प्रवास अधिकार मिळवू शकतात, या निकषांच्या आधारे हा निर्देशांक तयार केला जातो.

  • भारतीय पासपोर्टला ६६ देशांत मुक्त संपर्काधिकार (अ‍ॅक्सेस) आहे. सिंगापूर आणि जर्मनीच्या पासपोर्टचा मुक्त संपर्काधिकार तब्बल १६५ देशांत असल्याचे ‘हेनले अँड पार्टनर्स’ने जारी केलेल्या वार्षिक पासपोर्ट निर्देशांकात म्हटले आहे. केवळ २२ देशांत संपर्काधिकार असलेला अफगाणिस्तानचा पासपोर्ट सर्वांत शेवटच्या ९१व्या स्थानी आला आहे. २६ देशांच्या संपर्काधिकारासह पाकिस्तान शेवटून दुसऱ्या म्हणजेच ९0 व्या स्थानी आहे. २९ देशांच्या संपर्काधिकारासह सीरिया ८८व्या स्थानी, तर ३४ देशांच्या संपर्काधिकारासह सोमालिया ८७व्या स्थानी आहे.

दिनविशेष :
  • जागतिक शाकाहार दिन

महत्वाच्या घटना 

  • १८४५: मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.

  • १८४८: महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.

  • १८९६: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.

  • १९२५: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.

  • १९४५: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • १९५६: भारतामध्ये भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली.

  • १९५६: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.

  • १९५६: दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.

  • १९५६: कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.

  • १९६६: पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.

  • १९६८: मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाच्या फिल्म रेटिंग सिस्टीमची अधिकृतपणे सुरवात झाली.

  • १९७३: मैसूर राज्याचे नाव बदलुन ते कर्नाटक असे करण्यात आले.

  • १९७३: लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव लक्षद्वीप असे ठेवण्यात आले.

  • १९८२: अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.

  • १९९३: औपचारिकपणे युरोपियन युनियन स्थापन झाले.

  • १९९४: मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

  • १९९९: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा कबीर पुरस्कार हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

  • २०००: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

  • २००५: योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

जन्म 

  • १८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.

  • १८९३: शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार इंदुभूषण बॅनर्जी यांचा जन्म. (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९५६ – कोलकता, पश्चिम बंगाल)

  • १९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)

  • १९४०: भारताचे ३५वे सरन्यायाधीश रमेश चंद्र लाहोटी यांचा जन्म.

  • १९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)

  • १९६०: अॅपल इन्कचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचा जन्म.

  • १९६३: भारतीय उद्योजीका नीता अंबानी यांचा जन्म.

मृत्यू 

  • १८७३: बंगाली नाटककार दीनबंधू मित्र यांचे निधन.

  • १९५०: जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक बितीभूषण बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४)

  • १९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.

  • १९९१: संगीतकार व संगीत संयोजक अरुण पौडवाल यांचे निधन.

  • १९९३: ठुमरी, दादरा व गझल गायिका नैनोदेवी यांचे निधन.

  • १९९४: शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे निधन.

  • १९९६: श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष ज्युनिअस जयवर्धने यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १९०६)

  • २००५: लेखिका योगिनी जोगळेकर यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १९२५)

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.