चालू घडामोडी - ०१ ऑक्टोबर २०१८

Date : 1 October, 2018 | MahaNMK.com

आपल्या मित्रांना पाठवा :
दीपिका कुमारीला विश्व तिरंदाजीत कांस्यपदक :
  • सॅमसन, तुर्की  - भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे रविवारी तिरंदाजी विश्वचषक फायनलच्या तणावपूर्ण प्ले आॅफमध्ये लिजा उनरूला पिछाडीवर टाकत कांस्य पदकाची कमाई केली. दोन्ही तिरंदाज पाच सेट संपल्यावर ५ -५ अशा बरोबरीवर होते. त्यामुळे त्यांना शूट आॅफचा सामना करावा लागला. दीपिका आणि लिजा यांनी ९ गुण मिळवले; मात्र दीपिकाचा शॉट जवळ असल्याने ती विजयी ठरली.

  • दीपिका हिने विश्वकप फायनल्समध्ये पाचव्यांदा पदक मिळवले आहे. या आधी ती चार वेळा रौप्यपदकविजेती राहिली आहे. पाचव्या सेटमध्ये ड्रॉसोबत दीपिका तिसरे स्थान मिळवू शकली असती; मात्र प्रशिक्षकांच्या अनुपस्थितीत ती येथे झुंजताना दिसली. तिचा शॉट बाहेर गेला.

  • या स्पर्धेत भारतीय तिरंदाजांनी कंपांऊंड मिश्र प्रकारात एक रौप्य जिंकले. पहिल्यांदाच प्रशिक्षकाशिवाय कोणत्याही मोठ्या स्पर्धेत खेळत आहे; मात्र मी खूष आहे. जेवढी कठीण स्पर्धा असते, तेवढेच आम्ही सर्वोत्तम असतो. मी बहुतेक शुटआॅफमध्ये पराभूत होते. त्यामुळे माझ्यावर तणाव होता. मी सर्वोत्तम प्रयत्न केला. मी माझ्या खेळाने संतुष्ट आहे. आशियाई स्पर्धेच्या आधी मला डेंग्यू झाला होता. - दीपिका कुमारी

राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे निधन :
  • बॉलिवूडचे शो मॅन दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे मुंबईत दीर्घआजाराने निधन झाले. दीर्घकाळापासून कृष्णा राज कपूर आजारी होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या.

  • कृष्णा यांना गत आॅगस्टमध्ये मुंबईस्थित एका रूग्णालयात भरती करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रूग्णालयातून सुट्टी मिळाली होती.

  • तूर्तास बॉलिवूडच्या अनेकांनी कृष्णा राज कपूर यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्री रवीना टंडन, अनुपम खेर यांनी ट्विटरवर कृष्णा राज कपूर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.

भारताला अमेरिकेबरोबर व्यापार करार करायचा आहे: डोनाल्ड ट्रम्प :
  • भारत अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. भारतीय उत्पादनांवर अमेरिकेने जास्त शूल्क लावू नये, अशी भारताची इच्छा आहे, असे ते म्हणाले. अमेरिकेचे सहायक व्यापार प्रतिनिधी मार्क लिनस्कॉट यांच्या भारत दौऱ्यानंतर अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची ट्रम्प यांची ही दुसरी वेळ आहे. लिनस्कॉट यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार आणि संभावित व्यापार समजोत्यावरुन चर्चा झाली होती.

  • उल्लेखनीय म्हणजे, ट्रम्प हे नेहमी भारत हा अमेरिकन उत्पादनांवर १०० टक्के शूल्क घेत असल्याचा आरोप करत आले आहेत. ट्रम्प म्हणाले, भारताकडे पाहा, तुम्ही मुक्त व्यापाराबाबत बोलत असता.

  • आम्ही सांगू इच्छितो की, त्यांनी जर एखाद्या उत्पादनावर ६० टक्के शूल्क लावले आणि जर तेच उत्पादन ते (अमेरिकेला) पाठवतात तर आम्ही त्यावर काहीच शूल्क लावत नाही. त्यामुळे आता मी त्यावर २५ किंवा २० किंवा १० टक्के या पद्धतीने शूल्क लावू इच्छितो.

  • भारताबरोबर चर्चेचा हवाला देताना ट्रम्प म्हणाले, तुम्हाला काय वाटते, हा मुक्त व्यापार नाही. आम्हाला हे पसंत नाही. हे लोक कुठून येत आहेत, त्यासाठी याबाबत विचार करा. तुम्हाला अंदाज नाही की हे किती कठीण आहे. भारताचे नाव फक्त उदाहरण म्हणून आहे. मी इतरही काही देशांचे उदाहरण देऊ शकतो, जे अमेरिकाप्रती कठोर भूमिका घेतात.

पेट्रोलमध्ये महाराष्ट्र सर्वात वेगाने शतक करण्याची चिन्हं, दरवाढ सुरुच :
  • मुंबई : पेट्रोलच्या दरात आज 24 पैशांची तर डिझेलच्या दरात 33 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे आजचे दर 91.08 प्रति लिटर, तर डिझेलचे दर 79.73 इतके झाले आहेत. राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 91 रुपयांच्या पुढे गेले आहेत.

  • राज्यातलं सर्वात महाग पेट्रोल नांदेड जिल्ह्यातील धर्माबादमध्ये आहे. इथे पेट्रोल 93.82 रुपये प्रति लिटर आहे. मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पेट्रोल 92 रुपयांच्या पुढे गेलं आहे. तर डिझेलच्या 80 रुपयांच्या वर गेल्याने वाहनचालकांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

  • देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात - पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणं आमच्या हातात नाही असं सरकार सांगत असलं तरी सरकारने इंधनावर जो कर आकारला आहे, तो कमी करणं सरकारच्या हातात आहे. या कराच्या दृष्टीने पाहिलं तर राज्यात सर्वाधिक कर आहे. देशातलं सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रात मिळतं.

  • राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर 39 टक्के (+कर) वॅट वसूल केला जातो. यामध्ये विविध प्रकारच्या करांचा समावेश आहे. दुष्काळी कर तीन रुपये, महामार्गावरील दारूबंदीनंतर घटलेले उत्पादन तीन रुपये, शिक्षण कर एक रुपया, स्वच्छ भारत अभियानचा एक रुपया, कृषी कल्याण अभियान एक रुपया असा एकूण नऊ रुपये कर आकारला जातोय.

देशभरात आजपासून नवे सात नियम लागू :
  • मुंबई: देशभरात 1 ऑक्टोबर 2018 अर्थात आजपासून नवे सात नियम लागू होणार आहेत. या नियमांचा थेट परिणाम तुमच्या आमच्यावर होणार आहे. आजपासून छोट्या बचत ठेवींवर जास्त व्याज मिळेल. तर कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड द्यावा लागणार आहे. शिवाय गॅस दरात वाढ झाली आहे.

  • पीपीएफ, सुकन्या, समृद्धी, NSC आणि KVP वर जास्त व्याज - आर्थिक  वर्षाची तिसरी तिमाही अर्थात ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान, छोट्या बचत ठेवींवर जास्त व्याज मिळणार आहे. मुदत ठेव, रिकरिंग, ज्येष्ठ नागरिकांची बचत ठेव, मासिक उत्पन्न खातं, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पल्बिक प्रोव्हिडेंट फंड, किसान विकास पत्र आणि सुकन्या समृद्धी स्कीमवर पहिल्यापेक्षा 0.40 टक्केपर्यंत जास्त व्याज मिळणार आहे.

  • गॅस सिलेंडर महागलं - पेट्रोलियम मंत्रालयाने नैसर्गिक गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे एलपीजी आणि सीएनजीचे दरही वाढणार आहेत. अनुदानित एलपीजी सिलेंडर 2 रुपये 89 पैसे तर विनाअनुदानित एलपीजी सिलेंडर तब्बल 59 रुपयांनी महागला आहे.

  • कॉल ड्रॉप झाल्यास दंड - कॉल ड्रॉपच्या समस्येला संपूर्ण देश वैतागला आहे. मात्र या समस्येवर आजपासून नवा उपाय लागू होणार आहे. कॉल ड्रॉप झाल्यास मोबाईल कंपन्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे. कॉल ड्रॉपच्या समस्येवर 2010 नंतर पहिल्यांदाच बदल करण्यात आला आहे.

  • ई-कॉमर्स - ई कॉमर्स कंपन्यांना GST अंतर्गत टॅक्स कलेक्टर अॅट सोर्ससाठी सर्व राज्यांमध्ये रजिस्ट्रेशन करावं लागेल. तिथे त्यांचे पुरवठादार असतील. परदेशी कंपन्यांना रजिस्ट्रेशनसाठी एका एजेंटचीही नियुक्ती करावी लागेल.  त्यामुळे ई कॉमर्स कंपन्यांना आपल्या पुरवठादारांना पेमेंट करण्यासाठी 1 टक्के TCS द्यावा लागेल.

  • TDS - जीएसटी कायद्याअंतर्गत TDS आणि TCS च्या नव्या तरतुदी आजपासून लागू होतील. केंद्राच्या GST (CGST) कायद्यानुसार अधिसूचित संस्थांना आता 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वस्तू आणि सेवा पुरवठा केल्यास 1 टक्के TDS द्यावा लागणार आहे. त्याशिवाय राज्यांनाही राज्य कायद्यांअतर्गत 1 टक्के TDS लावावा लागणार आहे.

  • बीएसई व्यवहार शुल्कात सूट - मुंबई शेअर बाजार अर्थात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) 1 ऑक्टोबरपासून कमोडिटी डेरिवेटिव्समध्ये व्यवहार सुरु करत आहे. त्यामुळे पहिल्या वर्षात व्यवहार शुल्क अर्थात ट्रान्झॅक्शन फी न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

  • PNB कडून कर्ज घेणं महागणार - पंजाब नॅशनल बँकेने छोट्या आणि दीर्घ मुदतीच्या कर्जावरील एमसीएलआर दरांत वाढ झाली आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेकडून कर्ज घेणं महागणार आहे. नवे दर आजपासून लागू होणार आहेत.

दिनविशेष :
  • आंतरराष्ट्रीय कॉफी दिन / आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्तींचा दिन  

महत्वाच्या घटना

  • १८३७: भारतातील पहिले टपाल कार्यालय सुरू झाले.

  • १८९१: स्टॅनफोर्ड विद्यापीठाची स्थापना झाली.

  • १९४९: संगीत रंगभूमीवरील गायक,अभिनेते जयराम शिलेदार यांनी स्वत:ची मराठी रंगभूमी नाट्यसंस्था स्थापन केली.

  • १९५८: भारतात दशमान (मेट्रिक) पद्धत वापरण्यास सुरूवात झाली.

  • १९५९: भुवनेशप्रसाद सिन्हा यांनी भारताचे ६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

  • १९६९: कॉनकॉर्ड विमान प्रथमच ध्वनीगती पेक्षा जोरात उडण्यात यशस्वी झाले.

  • १९७१: अमेरिकेतील वॉल्ट डिस्ने वर्ल्ड सुरु झाले.

  • १९८२: सोनी कंपनीने पहिले कॉम्पॅक्ट डिस्क प्लेयर प्रकाशित केले.

  • २००२: भारतीय दंड संहिता, मोटार वाहन कायदा, १९८८ आणि मुंबई प्रतिबंधक कायदा १९४९ अंतर्गत सलमान खान वर गुन्हा दाखल. तसेच मुंबई पोलिसांनी सलमान विरुद्ध भारतीय दंड संहिता कला ३०४(भाग-२) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

जन्म

  • १८४७: थिऑसॉफिस्ट, सामाजिक कार्यकर्त्या व भारतीय स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या अ‍ॅनी बेझंट यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९३३)

  • १८८१: बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम बोईंग यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९५६)

  • १८९५: पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर १९५१)

  • १९०६: संगीतकार व गायक सचिन देव बर्मन यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑक्टोबर १९७५)

  • १९१९: गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १९७७)

  • १९१९: दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते शायर, गीतकार आणि कवी मजरुह सुलतानपुरी यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे २०००)

  • १९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकेचे ३९ वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचा जन्म.

  • १९२८: दाक्षिणात्य अभिनेते विझुपुरम चिन्नया तथा शिवाजी गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै २००१)

  • १९३०: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री जयदेवप्पा हलप्पा तथा जे. एच. पटेल यांचा जन्म. (मृत्यू: १२ डिसेंबर २०००)

मृत्यू

  • १८६८: थायलंडचा राजा मोंगकुट ऊर्फ राम (चौथा) यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १८०४)

  • १९३१: नाट्यछटाकार शंकर काशिनाथ गर्गे तथा दिवाकर यांचे निधन. (जन्म: १८ जानेवारी १८८९)

  • १९९७: जगातील सर्वात बुटकी व्यक्ती (२२.१”) गुल मोहम्मद यांचे निधन.

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.